06/05/2026
📍पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सर्वसाधारण सभा | ५ मे २०२६
चिखली परिसरातील वाढीव कर आकारणी आणि सुविधांच्या अभावावर नगरसेवक विकास भाऊ साने यांचा तीव्र आक्षेप.!
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवक विकास भाऊ साने यांनी चिखली, चऱ्होली, किवळे, रावेतसह उपनगरांमधील नागरिकांवर लादल्या जाणाऱ्या करप्रणालीवर जोरदार आवाज उठवला.
“महापालिका नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कर वसूल करते, मात्र त्या बदल्यात रस्ते, पाणी, लाईट यांसारख्या मूलभूत सुविधा देण्यात पूर्णपणे अपयशी ठरत आहे,” असा घणाघात त्यांनी सभागृहात केला.
विकास भाऊ साने यांनी विशेषतः चिखली परिसराचा उल्लेख करत, वाकड आणि थेरगावप्रमाणेच मोठ्या प्रमाणावर कर आकारला जात असताना त्या दर्जाच्या सुविधा मात्र मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. तसेच मोकळ्या जागांवर आणि गोठ्यांवरही कर आकारला जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
रेड झोनमधील नागरिकांना ५०% करसवलतीच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रशासनाला जाब विचारत, “ही सवलत प्रत्यक्षात कोणत्या भागांना दिली आहे, याची स्पष्ट माहिती द्यावी,” अशी मागणी केली.
“नागरिकांना सुविधा द्या, मग ते प्रामाणिकपणे कर भरतील. पण सुविधा न देता फक्त कर आकारणी केली तर नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
शेवटी पाणीप्रश्नासंदर्भात पुढील सभेमध्येही सविस्तर भूमिका मांडणार असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.