31/05/2026
मला उमजलेलं कोकण...!❤️
मी कोकणात फिरायला गेलो असताना जेव्हा मी काही मित्रांच्या घरी गेलो तेव्हा तिथल्या बऱ्याच गोष्टी या मला महाराष्ट्रातील इतर भागांपेक्षा वेगळ्या वाटल्या.कोकणी माणसाच्या अंगात संपत्तीचा माज अजिबात नसतो.त्याच्या अंगावरील कपड्यांपासून ते त्याच्या बोलण्यात कुठेही अहंपणाचा गंध येत नाही. निसर्गाच्या सानिध्यात राहणारा कोकणी माणूस नोकरीसाठी मुंबईला गेला पण त्याला त्याचं गाव,त्याची वाडी आणि त्याचे संस्कार तो कधीच विसरला नाही.
कोकणातील स्वच्छता वाखाणण्याजोगी आहे.तसेच गुटखा आणि तंबाखू खाऊन पिचकाऱ्या मारणाऱ्या लोकांचे प्रमाण मराठवाड्याच्या तुलनेत कोकणात नगण्य आहे. कोकणातील चिपळूण, कुडाळ, मालवण, वेंगुर्ले, देवगड, श्रीवर्धन हा भाग फिरताना कधीच कोकणी माणसाने आमची फसवणूक केली नाही किंवा तिथल्या स्थानिक लोकांनी एखाद्या गोष्टीचे अव्वाचे सव्वा पैसे घेतले नाहीत.
कोकणातील मोठी मंदिरे तसेच त्यांची कुलदैवतांची गावोगावची मंदिरे हि इतकी सुंदर होती की अशी मंदिरे गावपातळीवर आजवर इतर ठिकाणी क्वचितच पाहायला मिळालेली होती.या मंदिरांत केलेलं सागवाणी लाकडावरचे कोरीव काम आणि त्याला दिलेला रंग हे उच्च प्रतीचे असून, डोळे दिपवणारे होते.प्रत्येक मंदिरात मन प्रसन्न करणारी शांतता आणि तिथं येणाऱ्या भाविकाला बसण्यासाठी केलेली व्यवस्था टापटीप होती.तिथली प्रसाधनगृहेही स्वच्छ होती.तसेच प्रत्येक मंदिरात एक पुजारी काका आम्हाला दिसले ज्यांच्या चेहऱ्यावर आपण देवी देवतांची सेवा करतोय याचा अतीव आनंद तर होताच पण येणाऱ्या भाविकांकडून त्यांना कसलीही अपेक्षा नव्हती.
कोकणातील एका लग्नाला मी माझ्या मित्रांसोबत गेलो होतो तेव्हा बघितलं की, इथे हुंडा प्रथेचा लवलेशही कुठेच दिसला नाही. तसेच बिनकामाचा दिखावा आणि बडेजाव कोकणी माणसाला शिवलेला नाही हे बघून नवल वाटलं.मुंबईच्या इतके जवळ असूनही ती लोकं शहरीबाजाला चिकटली नाहीत.तसेच त्यांनी आपापल्या लोकांसोबत जपून ठेवलेले जिव्हाळ्याचे संबंधही त्यांच्या लग्न समारंभात दिसून आले.लग्नात मुलाकडचे म्हणून आलेल्या मुलाच्या आई वडिलांना तसेच वऱ्हाडासाठी विशेष असा काही तामझाम नव्हता. आणि दोन्ही बाजूंनी जबाबदाऱ्या आणि लग्नाला लागणारा खर्च अर्धा अर्धा वाटून घेतलेला आहे असं कळताच माझ्या मराठवाडी मनाला आश्चर्याचा धक्का बसला.
कोकणी माणसाचा मुलींच्या शिक्षणावर विशेष भर असून बहुतांश मुली पदवीधर असतातच.मुलींच्या लग्नात तिकडे मुलीच्या संमतीला महत्वाचं स्थान आहे हे तिथल्या लोकांशी बोलल्यावर समजलं.प्रेमविवाह असेल तरीही आम्ही आनंदाने मुलांची लग्न लावून देतो असं मी माझ्या मित्रांच्या वडिलांना एक प्रश्न विचारल्यास त्यांनी उत्तर दिलं होतं. मराठवाडा आणि इतर भागांत विवाहेत्तर ज्या करणी-धरणीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर चालतात त्यांनाही कोकणात जागा नाही.कोकणातील ह्या गोष्ट उर्वरित महाराष्ट्रात राबवल्यास महाराष्ट्र खऱ्या अर्थाने विकसित होईल.
एक गोष्ट कोकण फिरताना सगळ्यात जास्त प्रकर्षाने दिसली ती म्हणजे कोकणी महिलांच्या अंगावर असलेले भरभरून दागिने.अशा फार कमी महिला कोकणात नजरेस पडल्या ज्यांच्या शृंगारात दाग-दागिन्यांची कमी होती.यातून कोकणच्या लोकांच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज थोडक्यात काढता आला.कोकणातील लोकांकडे सगळे खर्च करूनही सोनं-नाणं घेण्यासाठी पैसा उरतो तसेच तिथल्या महिला आपल्या बचतीचा पैसा सोने खरेदीसाठी वापरतात.गुंतवणूकीचा हा उत्तम मार्ग तिथल्या स्त्रियांनी स्वीकारला आहे याचा आनंद झाला. कोकणातील तालुकास्तरावरील गावांत सोन्या-चांदीची जी ब्रँडेड दुकाने आहेत हा तिथं असलेल्या सोने चांदीच्या मागणीचाच परिणाम म्हणावा लागेल.महिला सबलीकरणाचा अजून एक मोठा पुरावा मला या निमित्ताने कोकणात मिळाला.
कोकणी माणूस शहरात जाऊन पैसा कमवत आहे पण तो पैसा तो गावी पाठवून पर्यटनाच्या व्यवसायात गुंतवत आहे.ज्यामुळे कोकणात घरोघरी पर्यटकांना राहण्यासाठीच्या सोयी सहज उपलब्ध असतात.खेड्याकडे चला त्याचबरोबर खेड्यात गुंतवणूकही करा हि गोष्ट कोकणी माणूस प्रत्यक्षात जगतो.कोकणातील पर्यटनामुळे कोकणातील जमिनींना सोन्याचे भाव आले असले तरी जमिनी विकून थार फिरवणे,कमरेला बंदुक असणे,तमाशाचे फड रंगवणे,पैसा उधळणे या गोष्टी कोकणी माणसाच्या मनाला शिवलेल्या दिसल्या नाहीत.
एखाद्या भागात गेल्यावर तिथली सामाजिक,आर्थिक, शैक्षणिक स्थिती जाणून घेतल्याने आपल्या व्यक्तिमत्वात तर बदल होतोच.त्यातले त्यात पर्यटनासोबतच आपण तिथल्या चांगल्या गोष्टी आपल्या भागात पाझरण्यासाठी उत्सुक बनतो.कोकणी माणसांकडून मी शिकलेल्या वरील चांगल्या गोष्टी व्यक्तिगत स्तरावर तरी नक्कीच राबवू शकतो त्याबद्दल कोकणचे आणि कोकणी माणसांचे आभार.
आपणही कोकणात गेल्यास त्यांची कोकणी संस्कृती आणि त्यांचं समाजमन जरूर जवळून बघा.
माहिती साभार ✍🏻 © रविकुमार सुभाषराव.