25/08/2026
मा. मंत्री (रोहयो) श्री. भरत गोगावले यांनी घेलता VB-GRAMG योजनेचा आढावा
VB-GRAMG योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियोजन, रोजगार आणि E-KYC वर भर द्या - मा. मंत्री महोदयांचे आवाहन
विकसित भारत – रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) (VB-GRAMG) योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत मा.मंत्री (रोहयो) श्री. भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीत राज्यातील VB-GRAMG योजनेच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेताना सर्वाधिक कामे सुरू असलेल्या ११ जिल्ह्यांच्या प्रगतीचा आलेख सादर करण्यात आला. ग्रामपंचायतनिहाय कामांची प्रगती, मनुष्यदिवस निर्मिती तसेच योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी नंदुरबार, अहिल्यानगर, यवतमाळ, नाशिक व चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाची मा. मंत्री महोदयांनी प्रशंसा केली. या जिल्ह्यांनी अवलंबलेल्या प्रभावी कार्यपद्धती जाणून घेत इतर जिल्ह्यांनीही त्याच धर्तीवर नियोजनबद्ध व आवश्यक कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात आले.
ग्रामपंचायत स्तरावर विकसित ग्रामपंचायत प्लॅन – पंचवार्षिक आराखडा तयार करून ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासाचे नियोजन करावे. मजुरांना मागणीनुसार वेळेत काम उपलब्ध करून देण्यासाठी पुरेसा कामांचा शेल्फ (Shelf of Works) तयार ठेवावा. सर्व मजुरांचे E-KYC प्राधान्याने पूर्ण करून जास्तीत जास्त मजुरांना मागणीनुसार रोजगार उपलब्ध करून द्यावा व योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे निर्देश मा. मंत्री महोदयांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, योजनेच्या अंतर्गत नियोजनबद्ध ग्रामविकास, मागणीनुसार रोजगार आणि पारदर्शक अंमलबजावणी यासाठी सर्व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वयाने कार्यवाही करण्याचे आवाहन केले.
या वेळी रोहयो विभागाचे मा. सचिव श्री. आप्पासाहेब धुळाज (भा.प्र.से.), मा. आयुक्त श्रीमती अनिता मेश्राम (भा.प्र.से.), मा. सहसचिव (रोहयो) श्री. अतुल कोदे, श्री. कैलास साळुंके, मा. सहआयुक्त डॉ. विवेक घोडके, रोहयो विभागातील वरिष्ठ अधिकारी, सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी, मुख कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, उपजिल्हाधिकारी (रोहयो) व उपमुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
Ministry of Rural Development, Government of India
CMOMaharashtra
Bharatsheth Gogawale - भरतशेठ गोगावले
Maharashtra DGIPR