01/09/2026
हडपसरमध्ये कचऱ्याच्या डंपरने तरुणाचा जीव घेतला; पुणे महानगरपालिकेने नागरिकांचे जीव घेण्याचे कंत्राट घेतले आहे का?
हडपसरमधील JSPM कॉलेज,हांडेवाडी रोड, उरळी देवाची,पुणे येथे महानगरपालिकेचा कचरा वाहून नेणाऱ्या भरधाव डंपरने बेदरकारपणे वाहन चालवत एका निरपराध तरुण स्व.धर्मराज जयस्वाल याचा जीव घेतल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ, संताप आणि प्रचंड असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांपासूनच नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत असेल तर महापालिका नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कधी घेणार? कधी टँकर तर कधी कचरा उचलण्यासाठी असलेले डंपर रस्त्यावर मृत्यूचे सापळे का बनले आहेत? एका कुटुंबाचा आधार हिरावून घेतल्यानंतरही महापालिका प्रशासनाला जाग येणार नाही का?
हडपसर परिसरातील रस्त्यांवर मोठमोठे कचरा डंपर अत्यंत वेगाने, बेदरकारपणे आणि काही वेळा विरुद्ध दिशेने धावत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. निर्धारित वेगमर्यादा, लेन शिस्त, सुरक्षित अंतर, पादचारी सुरक्षेचे नियम आणि वाहतुकीचे इतर मूलभूत नियम यांचे पालन होत नसेल तर या वाहनांवर नियंत्रण कोणाचे? या डंपरचा वेग कोण तपासतो? जीपीएस प्रणालीद्वारे त्यांचे निरीक्षण होते का? चालकांचे प्रशिक्षण आणि परवाने तपासले जातात का? वाहनांची फिटनेस प्रमाणपत्रे नियमित तपासली जातात का? ठेकेदारांना वाहन चालवताना नियम पाळण्याच्या सूचना देऊन महापालिका स्वतः त्याची अंमलबजावणी तपासते का? की नागरिकांच्या जीवाची किंमत ठेकेदारांच्या नफ्यापेक्षा कमी झाली आहे?
या घटनेची पुणे महानगरपालिकेने केवळ चौकशीपुरती मर्यादित न ठेवता जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी. संबंधित चालक आणि ठेकेदाराची भूमिका तपासून दोष आढळल्यास कायद्यानुसार कठोर गुन्हेगारी कारवाई करावी, तसेच मृत तरुणाच्या कुटुंबीयांना तातडीने जास्तीत जास्त आर्थिक मदत द्यावी. हडपसरसह संपूर्ण शहरातील कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांचे सुरक्षा ऑडिट करून त्यांची वेगमर्यादा, जीपीएस रेकॉर्ड, फिटनेस, चालकांची पात्रता व प्रशिक्षण यांची तपासणी करावी. महापालिका प्रशासन आणखी किती अपघातांची वाट पाहणार? आणखी किती निरपराधांचे जीव गेल्यानंतर कारवाई होणार? नागरिकांना रस्त्यावर सुरक्षितपणे चालण्याचा अधिकार आहे की नाही? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नागरिकांचे जीव घेण्याचे हे कंत्राट ठेकेदारांना नेमके कोणी दिले आहे?
PMC Pune