11/07/2025
न्युक्लिअस बजेट योजनांची मुदतवाढ करून लाभार्थ्यांची निष्पक्षपातीपणे निवड करा..
DYFI आंबेगाव तालुका समितीची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी..
घोडेगाव दि. ११/०७/२०२५ डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) च्या वतीने, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव अंतर्गत सुरु असलेल्या न्युक्लिअस बजेट च्या योजनांचे फॉर्म भरण्यासाठी 31 जुलै पर्यंत मुदत वाढ द्या, ऑनलाईन फॉर्म भरताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करा व या निष्पक्षपाती पने लाभार्थी निवड करा.. या मागणीचे निवेदन प्रकल्प अधिकारी मा. देसाई यांना देण्यात आले..
आदिवासी प्रकल्प कार्यालय घोडेगाव तर्फे दरवर्षी न्यूक्लियस बजेट म्हणजे केंद्रवर्ती अर्थसंकल्प अंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांना विविध योजनां साठी अर्थसहाय्य केले जाते. यापूर्वी ही योजना ऑफलाइन असल्याने या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व लाचखोरी होत होती त्यावर उपाय म्हणून यावर्षी ऑनलाइन स्वरूपात अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 जुलै 2025 ही आहे. मात्र अनेक लाभार्थ्यांना ग्रामसभांचे ठराव व उत्पन्नाचे दाखले मिळण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे अद्याप बऱ्याच गरजू लोकांनी या योजनांसाठी अर्ज केलेले नाहीत. तसेच ऑनलाईन अर्ज भरताना योजनांची नावे यादीत न दिसणे व आवश्यकता नसलेली कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक असल्याने नागरिकांना अर्ज भरताना समस्या उद्भवत होत्या. त्याचबरोबर या योजनांची लाभार्थी निवड पारदर्शीपणे होणार की मागच्या सारखाच सावळा गोंधळ चालणार याबाबत डी वाय एफ आय च्या प्रतिनिधींनी प्रकल्प अधिकारी व सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देऊन चर्चा केली.
यावर सकारात्मक चर्चा करत, "मुदत वाढीचा व तांत्रिक अडचणी दुर करण्याबाबतचा प्रस्ताव ठाणे येथील अप्पर आयुक्त कार्यालयाकडे आजच सादर केला जाईल व न्युक्लिअस बजेट च्या शासन निर्णयानुसार पारदर्शक व निष्पक्षपातीपणे लाभार्थ्यांची निवड केली जाईल." असे मा. प्रकल्प अधिकारी श्री. प्रदिप देसाई व मा. सहाय्यक प्रकल्प अधिकारी श्री. सोनुल कोतवाल यांनी सांगितले.
यावेळी DYFI चे आंबेगाव तालुका सचिव अविनाश गवारी, सहसचिव किरण दगडे, उपाध्यक्ष रोहिदास गभाले आदी उपस्थित होते.