29/08/2026
साशे बहात्तर रुपयांचे महानगरीय वर्गवास्तव.....................................................
जयंत पवार हे समकाळातील अत्यंत सशक्त कथालेखक आणि नाटककार म्हणून ओळखले जातात. महानगरी जाणीवांचे तिथल्या कष्टकरी अर्धनागर पोटसंस्कृतीचे, तेथील दबलेल्या पिचलेल्या वर्गाचे, माणसांचे, त्यांच्या दारीद्रय, दु:ख, बकालपाणाचे, उपजिविकेच्या संघर्षाचे, त्यातून उभ्या राहिलेल्या गुन्हेगारी अधोविश्वाचे, जगण्यातील अटळ पेचाचे, प्रत्ययकारी चित्रण त्यांच्या कथेत येते. जागतिकिकरणानंतरच्या विखंडीत काळाची शेकडो कथनरुपे त्यांच्या कथात्म साहित्यात अवतरतात. त्यांच्या कथांमध्ये महानगरातील वर्गसंघर्षाचा लेखाजोखा आहे. निम्नस्तरीय जगण्याचा कोलाज म्हणजे त्यांची कथा आहे. ती वास्तवाची समकाळाच्या आधारावर चिकित्सा करते. पत्रकारीतेत असल्यामुळे प्रश्नांचे संगतवार अर्थ लावण्याची, त्यातील गुंते कथात्म पद्धतीने उलगडण्याची, त्याचे समाजशास्त्रीय विश्लेषन करण्याची त्यांची क्षमता अफाट आहे. जयंत पवारांची भाषा ही गिरणगावाच्या मिश्र संस्कृतीतून कमावलेली भाषा आहे. तीच्यात वाचकाला संमोहीत करण्याची अफाट क्षमता आहे. ती प्रवाही आहेच, मात्र ती कमालीची टोकदार, थेट आणि आशयसमृद्ध आहे.
जयंत पवारांनी अत्यंत मोजके पण मर्मभेदी लेखन केले आहे. त्यांच्या लेखनातील कथाबीजे वैश्विक आहेत. ‘काय डेंजर वारा सुटलाय’ हे नाटक त्यांच्या प्रतिभेचा उत्कट अविष्कार मानले जाते. अधांतर, माझं घर ही नाटके, फिनिक्सच्या राखेतून उठला मोर, नाय वरणभात लोंचा नि कोण नाय कोंचा, मेरी नींद नसानी होय, हे त्यांचे महत्वाचे कथासंग्रह. नाय वरणभात लोंचा नि कोण नाय कोंचा त्यांचा दुसरा कथासंग्रह.या शिर्षककथेवर मराठीत चित्रपट येवून गेला आहे.
कथेचे चित्रपट माध्यमांतर या विषयासाठी घेतलेली ‘साशे भात्तर रुपायांचा सवाल: अर्थात युद्ध आमुचे सुरू’ ही कथा त्यांच्या फिनिक्सच्या राखेतून उठला मोर या कथासंग्रहातील आहे. ज्याचे ‘भाऊबळी’ या मराठी चित्रपटात २०२३ साली माध्यमांतर झाले. फिनिक्सच्या राखेतून उठला मोर हा जयंत पवार यांचा पहिलाच कथासंग्रह. जागतिकिकरणांतर झालेली गिरणगावची अटळ शोकांतीका यात आहे. त्याच्या प्रस्तावनेत निखिलेश चित्रे म्हणतात, “ जयंत पवार हे कथा माध्यमाच्या नव्या शक्यता तपासून पाहणारे गंभीर लेखक आहेत. कोणत्याही चांगल्या लेखकाला पछाडनार्या जन्म,मृत्यू, दु:ख, क्रौर्य, हिंसा या गोष्टी पवारांच्या कथेत निव्वळ ‘थीम्स’ पुरत्या मर्यादीत राहत नाहीत. तर लेखकाच्या सतत सुरू असलेल्या चिंतनाचे विषय म्हणून समोर येतात. पवारांची कथा जगण्याच्या धुमश्चक्रीत वाचकाला मध्यभागी आणून उभे करते.”
यासंदर्भात खुद्द जयंत पवार आपल्या कथालेखनाविषयी सांगतात, “ मी आयुष्याची तीस बत्तीस वर्ष जिथे घालवली,तो गिरणगाव, नाटकवाल्यांचं जग, साहित्यिकांचं जग, मुंबईतल्या गिरण्यांचा संप, बाबरीकांड, धार्मिक पुनरुज्जिवनवाद,आणि जातीय दंगे, जागतिकिकरणानंतरचे भले बुरे आघात या सगळ्याचा परिणाम जाणिवांवर आणि लेखनावर झाला आहे.”
साशे बहात्तर रुपयांचे महानगरीय वर्गवास्तव
जयंत पवार यांच्या फिनिक्सच्या राखेतून उठला मोर या पहिल्याच कथासंग्रहातील साशे बहात्तर रुपयांचा सवाल: अर्थात युद्ध आमुचे सुरू ही कथा विसाव्या शताकाच्या उत्तरार्धात आलेल्या जागतिकिकीकरणातून उद्ध्वस्त झालेल्या गरीब मध्यमवर्गाचे आणि याच जागतिकिकरणाचा ग्राहक असलेल्या उच्चवर्गाचे वर्गवास्तव मांडते.
कथातत्व
गिरणी कामगार उद्ध्वस्त झाल्यानंतर गिरणगावाची वाताहत झाली..नव्वद नंतर आलेल्या जागतिकिकरणामुळे मुंबईचे रुपडे बदलले. चाळी पाडून अपार्टमेंट उभी राहिली. गिरण्यांच्या जागी मॉल होवू घातले. शहराला चकचकीत पणा आला. मध्यमवर्गाला काही स्वप्न दाखवण्यात आली. त्या स्वप्नांचा पाठलाग करताना मध्यमवर्ग त्याचं सत्व हरवून बसला. जातीय उतरंडीत उच्च स्थानी असणारांनी त्यांचे समायोजन बदलत्या वास्तवाशी केले. त्याचे लाभही पटकावले. मात्र पोटापाण्यासाठी शहरात आलेला गरीब मध्यमवर्गीय उद्ध्वस्त झाला. त्याचे स्थलांतर झाले. मूळचा मुंबईकर हुसकावून शहराबाहेर फेकला गेला. शहरातील उपजिविकेच्या संधीमुळे असा हतबल गरीब शहराच्या आणि तिथल्या टोलेजंग इमारतीच्या आडोशाने कसा बसा जगू लागला. मिळेल ती जागा शोधून झोपडीत राहू लागला.
या गरीब लोकांच्या उपजिविकेची साधनं याच उच्च वर्गाच्या निकडीतून उभी राहिली होती. पेपर टाकणे, दूध पुरवणे, भाजीपाला विकणे, घरात लागणार्या दुरूस्ती आणि देखभालीच्या सेवा पुरवणे असे त्याचे स्वरूप होते. याच गरिबांच्या वस्तीतल्या बाया अपार्टमेंटमध्ये कपडे धुणे, भांडी घासणे,आणि काही वेळा स्वयंपाक करणे अशा सेवा पुरवत होत्या.
याचाच अर्थ उच्चवर्गाची निकड ही गरीब वर्गाची निवड होती. या निकडीतून या सेवा पुरवल्या जात होत्या. त्यातून गरीबांना चार पैसे मिळत होते. मात्र ते पोटापाण्याला पुरत नव्हते. कमी शिक्षण, बेरोजगारी, यातून मग झोपडपट्टीत व्यसनांचा आणि गुन्हेगारी विश्वाचा शिरकाव झाला होता. असुविधांमुळे घाण, दुर्गंधी आणि रोगराई हे प्रश्न होतेच. शहरानं आणि इथल्या जिवनशैलीनं दाखवलेली स्वप्न या वर्गाच्या आवाक्यात नव्ह्ती. त्यामूळे येणारे वैफल्य आणि विद्रोह हा या वर्गाचा स्थायिभाव जरी झाला असला तरी, आम्ही या भूमीचे मूळ लोक असूनही सरकारच्या धोरणानं आमची वाताहत झाली आहे. ही किनार त्या विद्रोहाला होती. शहरात येवूनही जातवास्तव नव्या स्वरूपात आ वासून उभे होते. आणि त्यातून मग ‘साशे बहात्तर’ सारखे पेचप्रसंग उभे राहत होते.
जयंत पवार हे शब्दावर मजबूत पकड असलेले कथाकार आहेत. त्यांची कथा मजेदार वळसे घेता घेता एकदम फणा काढून उभी राहते. ती नुसती शाब्दीक फुत्कार टाकत नाही, तर व्यवस्थेचा कडकडून चावा घेते. साशे बहात्तर या कथेची भाषा अशीच तीरकस आणि नर्मविनोदी आहे. तीच्यातील उपरोध इतका कडवा आहे की, तो वरवर साधा वाटतो मात्र, त्याचा दंश बसला तरी त्याची जाणीव तेव्हाच होते जेव्हा हे वर्गवास्तव वाचकाच्या अंगोपांगी, आणि मनीमानसी भिनत जातं.
पात्रव्यवस्था
कथेची पात्ररचना अत्यंत विचारपूर्वक केली आहे. यातला बळी जंगम हा मागास वर्गापेक्षा गरीब निम्नवर्गाचं प्रतिनिधित्व करतो म्हणायला हरकत नाही. तरीही दाराच्या बाहेरून दूध घालणे ही जातीची पाळंमुळं अजूनही भिनल्याची उदाहरणं आहेत. शहर बदलूनही जातवास्तव कायमच असल्याचं निदर्शक आहे. बळीने मातीच्या पायाने लिनोनियमवरनं चालत येणं यामुळं भाऊ अस्वस्थ होतात. त्यांना तो मॅनर्सलेस वाटतो.
लेखकाने हे वर्गवास्तव ठळक करण्यासाठी भांडारकरांना न्यायमूर्ती हा पेशा देवून पाचव्या मजल्यावर, आवळस्करांना मंत्रालयात ऑफीसर बनवून दूसर्या मजल्यावर आणि बळीला शेजारच्या झोपडपट्टीत योजून त्याला दूध घालायला लावणं हे अतिशय प्रतिकात्मक आहे. बळीचं बळी हे नाव त्या अर्थाने अत्यंत प्रतिकात्मक आहे.
पात्रांच्या तोंडची भाषा हाही अभ्यासविषय आहे. त्याअर्थाने, बळीचे, भाऊ आवळस्करांचे, क्रांतीगीता या भाउंच्या सुनेचे आणि धायमोडे नावाच्या पोलीस निरिक्षकाचे संवाद अभ्यासण्यासारखे आहेत.
भारतीय समाजव्यवस्थेचं प्रतिकात्मक लघुरूप म्हणून या कथेकडं पाहता येतं. भारतातल्या कुठल्याही शहरात ही गोष्ट हुबेहूब अशीच घडू शकते म्हणून या कथेचं समकालिनत्व मह्त्वाचं आहे. ज्यात समाजव्यवस्था, न्यायव्यवस्था, पोलीस प्रशासन, आणि माध्यमं यांचा परस्पर संबंध अत्यंत टोकदाररित्या व्यक्त केला आहे.. हे वर्गवास्तव टिपताना अत्यंत प्रतिकात्मक भाषाही वापरली आहे. कथेतील वडके या समाजशास्त्राच्या अभ्यासक असलेल्या पात्राच्या म्हणन्यानुसार, “विभाग पूर्वी शांत दिसत असला तरी, तणावाची बीजं सुप्तावस्थेत पूर्वीच पेरली गेली होती. आणि त्याचे सिम्पटम्स आता दिसू लागले आहेत.’
कथनात्मकता
या कथेची निवेदनाची भाषा लालित्यपूर्ण असूनही तीला पत्रकारीतेच्या भाषेचा स्वर आहे. लेखकाने मुद्दाम हा स्वर निवडला आहे. ज्यात तथ्यांची मांडणी तटस्थपणे करावी लागते. ज्यामुळे घटनांचे विश्लेषण करताना ताटस्थ्य येते आणि वास्तव बोध होतो. वर वर लेखक एका वृत्तनिवेदकाच्या रुपात दिसतो मात्र हे तृतीय पुरूशी निवेदन आहे. कथेचे निवेदन एका सुरूवातीची कथेला उत्तेजन देणारी घटना सांगून फ्लॅशबॅक तंत्राने भूतकाळात शिरते.आणि सरतेशेवाटी कथा जेथे येवून थांबली होती त्या बिंदूवर माघारी येते.
कथाबंध
मराठीत विषेशत: नागर साहित्यात भाषेच्या अंगाने कथाबंधाचे विपूल प्रयोग आढळतात. मात्र त्यासाठी आवश्यक असणारे आशयद्रव्य आणि घटनांचे अर्थ लावण्याची जयंत पवारांची हातोटी अभूतपूर्व आहे. दगड मारण्याची घटना सांगताना जयंत पवार दृकप्रत्यय देतात. ‘ काळ्या आकृतीने काळा दगड उचलला’ हे ऐंद्रीय संवेदन टीपताना ‘झालं काहीच नाही’ या वाक्यावर तो प्रसंग थांबतो. लेखक काय सांगतो आणि काय सांगायचे टाळतो, ही गोष्ट कथेचा आशय आणि अभिव्यक्ती समृद्ध करते. ‘क्रांतीगीताचं दोन्ही कानातील चार चार ग्रामची डुलं हलवत बोलणं, राग आल्यानंतर भाऊ आवळस्करांचं ‘ कंपायमान होत्साते फुसफुसत गुरगुरत’ राहणं ही जयंत पवारांच्या उपरोधीक शैलीची खास वैशिष्ट्ये आहेत.
सदर कथा अत्यंत प्रवाही आहे. तिची मांडणी कमालीची नाट्यमय आहे. क्रियेला प्रतिक्रिया येणं आणि त्यातून प्रसंगांची अर्थपूर्ण मालिका तयार होणे आणि पात्रांचा संघर्ष उभा राहणे, घटनांचा चढता क्रम आणि अनपेक्षित वळणं ही उत्तम कथेची सगळी लक्षणं या कथेत आहेत.
तरीही मूळ गाभा राहतोच की ज्या सहाशे बहात्तर रुपयांसाठी भांडणं, धकाबुक्की, पोलीस केस, गरीबाला नाडणारा आणि नं परवडानारा पोलिसी खाक्या, दोन घरातला राडा, त्याला पुढं आलेलं दोन वर्गाच्या युद्धाचं स्वरूप, त्याचा माध्यमांनी टीआरपी साठी करून घेतलेला वापर, गणिमी कावे, तुंबळ हाणामारी असं करत करत हे युद्ध झालं त्या सहाशे बहात्तर रुपयांचं काय? तर ते पैसे रमाला सापडतात. रमाला या गोष्टीचे अत्यंत वाईट वाटते. ती पापभिरू आहे. तिच्या या कृत्यामुळे तीला फणफणून ताप येतो. ती भाऊ आवळस्करांना हे सांगते. पण भाऊ आता प्रतिशोधाच्या आगीने भडकले आहेत.कारण हा प्रश्न आता प्रतिष्ठेचा आणि अस्मितेचा झाला आहे. “आता कुठं थ्रील येतंय..जीवनाचा मक्सद ध्यानी येतोय..प्रश्न इथंच संपता कामा नये...” “हा प्रश्न जागा राहो”
भाऊ आवाळस्करांना असं अत्यंत मूलतत्ववादी स्वरूपातील काही वाटत राहणं यावर या पिढीनं उत्तर शोधलं आहे..ते आता आंतरजातीय विवाह करत आहेत. आणि जागल्याची भूमिका ज्याच्या वाट्याला आहे, ती पोलीस व्यवस्था मद्याचे घोट रीचवत या पिढीवर, नार्कोटीक्सवाल्यांमार्फत अंमली पदार्थ विक्रीचे गन्हे दाखल करण्यासाठी सेटींग लावत आहे.
अंमल कुणावर कशाचा आहे असे मूलभूत प्रश्न उभे करून ही कथा थांबते.
दाहक वर्गसंघर्षाचा दृक-श्राव्य अनुभव देणारे माध्यमांतर
याच कथेवर पुढे भाऊबळी या नावाने सिनेमा आला. समीर पाटील यांचे दिग्दर्शन आणि किशोर कदम यांची यात प्रमुख भूमिका होती. साशे बहात्तर या कथेचे यासिनेमात माध्यमांतर झाले..नव्वद नंतर शहरीकरणाने वेग घेतला. गावखेड्यातली बलुतेदारी मोडीत निघाली. असा मोठा वर्ग शहराकडे ओढला गेला. जागतिकिकरणाने शहरांना काही स्वप्न दाखवली..नवा मध्यमवर्ग हा या व्यव्स्थेचा ग्राहक होता.. त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वेगळीच बाजारव्यवस्था उभी राहिली. फ्लॅट प्लॉट हॉटेल्स. मॉल, शोरूम्स. अम्युजमेंट पार्क आले.
या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठा कष्टकरी वर्ग झटू लागला. त्यांच्याही हाताला काम मिळू लागले. गावाकडचं जात वास्तव शहरात जावून वर्गवास्तव झालं. गेल्या काही वर्षात ही दरी वाढत गेली. झोपडपट्ट्या हे शहरांचंच बायप्रॉडक्ट होतं. त्याचबरोबर जो स्थनिक होता, त्याला अमिश दाखवून, मूळ जागेतून हुसकावून लावलं.
याचाच परिणाम म्हणून हा वर्गसंघर्ष उभा राहिला. व्यव्स्थेनं त्याला खतपाणीच घातलं.
केवळ सहाशे बहातर रुपयांचा हिशेब चुकल्याने एका गरीब माणसाला कोणत्या संघर्षातून जावे लागते. याची ही चित्तथरारक गोष्ट आहे.
भाऊबळी हा सिनेमा याच गृहितकावर उभा आहे. जयंत पवारांच्या कथेचे माध्यमांतर करताना, जयंत पवार तितक्याच खुमासदार पद्धतीने त्याची संहिता मांडतात. समिर पाटील यांनी सर्वच आघाड्यांवर यात आपली छाप उमटवली आहे. आवश्यक बदल करूनही कथा तीचा मूळ आशय आणि रोख बदलत नाही. किंबहुना दिग्दर्शक ती अधिक ठळक करतात. चित्रपटाची नाट्यमय मांडणी, त्याला असलेला ब्लॅक ह्यूमरचा तडका, चित्रपटातली चित्र विचित्र पात्रं. ती तितक्याच ताकदिने वठवणारे अभिनेते. आणि याचा एकत्र परिणाम म्हणून दाहक वर्गसंघर्षाचा तितकाच अफलातून दृकश्राव्य अनुभव म्हणजे भाऊ बळी हा चित्रपट.
सुरूवातीच्या काही दृश्यात चित्रपट प्रस्थापीत होतो. मात्र त्यानंतर तो असा काही वेग पकडतो, की आपण त्या दृश्य प्रवासात सहप्रवासी होतो. ती आपल्याच भोवतालची गोष्ट वाटू लागते.
किशोर कदम यांनी साकारलेला ‘बळी’ या चित्रपटात वंचीत वर्गाचे हुबेहूब प्रतिनिधित्व करतो. अत्यंत नैसर्गीक अभिनय हे त्यांचं वैशिष्ट्य. मनोज जोशी यांनी साकरलेला भाऊ आवळस्कर हा पांढरपेशी आणि वर्गवर्चस्वाच्या जाणीवेने पछडलेला उभा करण्यात ते यशस्वी झाले आहेत. रमाबाईंच्या भुमिकेतील मेधा मांजरेकर, समाजशास्त्रज्ञ वडकेंच्या भुमीकेत, विजय केंकरे, मालविका रेशम टीपणीस, चिन्मयी प्रियदर्शिनी इंदलकर न्यायमूर्ती भांडारकरांचा राजन भिसे, नगरसेवक साकारलेले आनंद अलकुंटे, विषेशत: धायगुडेच्या भुमीकेत हृशीकेश जोशी ही पात्रं अत्यंत उठावदार झाली आहेत. कमी काळासाठी आलेले जिजाई नगरातले मास्तर संतोष पवार आणि बळीची दोन्ही मुलं लक्षात राहतात.
दोन हजार दहा नंतर मराठी चित्रपटांमध्ये गावकूसाबाहेरच्या, तथाकथीत परिघाबाहेरच्या गोष्टी येवू लागल्या. त्याला जातवास्तवाची किनार होती. मात्र महानागरातील वर्गवास्तव पहिल्यांदाच इतक्या ठळकपणे आणि थेटपणे चित्रपटात अविष्कृत झाले, याचे सर्वस्वी श्रेय जयंत पवार यांच्या लेखणिला जाते.
सहाशे बहात्तर रुपयांचा सवाल हा अत्यंत मूलभूत सवाल आहे. कुणासाठी तो उपजिविकेचा प्रश्न आहे, तर कुणासाठी अस्मितेचा. हा सवाल मुळात उभं राहणंच दुर्दैवी आहे, त्यासाठी लढावं लागणारं युद्ध गरीबाला परवडणारं नाही.. न्यायव्यवस्था आणि इतर व्यव्स्था या उच्च्वर्गीयांच्या बटीक असतात. त्या ते पैशाच्या जीवावर हव्या तशा वाकवू शकतात. दोन वर्गाचं हे युद्ध जितकं सनातन आहे, तितकाच हा लढा विषम आहे. हा लढा साधनांचा आहे. संधींचा आहे. तसाच तो जीवनमरणाचा आहे.हा लढा प्रेक्षकांना वर्गव्यवस्थेचा एका दाहक दृक श्राव्य अनुभव देतो यात दुमत नाही.
निलेश महिगावकर
पूर्वप्रसिद्धी
(वरील लेख हा साहित्यकृतीचे माध्यमांतर या शिवाजी विद्यापीठाच्या
एम.ए भाग 2 पेपर 3 या अभ्यासक्रमातून घेतला आहे.)