24/11/2022
✍️बसवराज बोम्मई यांचे आभार...
एकाच दिवसात जत तालुका महाराष्ट्रत आहे हे सर्व मंत्र्यांना दाखवून दिलं आणि जागृत केलं.. वर्षानुवर्ष सतत दुष्काळाच्या झळा सोसत असलेला जत तालुका प्रशासनाच्या योजना अभावी आणि विकासाच्या दृष्टीने इतरांच्या तुलनेत खूप मागे आहे, राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे व भ्रष्ट नेत्यामुळे अजूनपर्यंत या भागात पाणी पोचलं नाही. प्रत्येक निवडणुका पाणी या प्रश्नावर लढायच्या आणि जिंकायच्या मात्र जत तालुका नेहमी तहानलेलाच असतो....मात्र याच भागात कर्नाटक सरकारने त्यांच्या सीमाभागात पाणी देऊन एकप्रकारची आम्हाला आशा लावली आणि प्रत्येकाला वाटतं आम्ही जर या कर्नाटक भागात असतो तर आम्हाला ही पाणी मिळालं असतं, ही प्रत्येकाची भावना आहे. आत्ता आम्ही आशा गावात राहतो की दोन कि.मी गावापासून अंतर पार केलं की पाण्याचा नुसता खळखळ आवाज येतो...पण आमची गावं पाण्याविना तडफडत आहेत. शासकीय एखाद काम असलं की आम्हाला थेट जत जाण्यासाठी साठ कि.मी अंतर पार करून चक्रा माराव्या लागतात, आणि तिथून म्हणजे आमच्या गावापासून पंधरा कि.मी अंतरावर विजापूर जिल्हा आहे. आता या सीमाभागातील लोकांचा थेट आर्थिक व्यवहार हा जास्त करून कर्नाटक मध्ये येतो परंतु शासकीय कामव्यतिरिक्त महाराष्ट्राची संबंध राहत नाही...हे सरकारने आणि इथल्या स्थानिक आमदार आणि खासदारांनी समजून घ्यावं..आणि सीमा भागातील लोकांचे प्रश्न सोडवण्याचा तात्काळ प्रयत्न करावा, वर्षातून दोन-तीन वेळा तरी कर्नाटक सरकारचा जलसंपदा मंत्री येऊन महाराष्ट्रात भाषण देऊन जातो, परंतु महाराष्ट्राचा जलसंपदा मंत्री या भागात कधी आलेला पाहिला नाही. कर्नाटक सरकारने अनेक प्रकारच्या शासनाच्या सुविधा थेट शेतकऱ्यांना पुरवून शेतकरी समृद्ध केले आहेत. पण महाराष्ट्र सरकार जत तालुक्यावर नेहमी दुजाभाव करत आलेलं आहे... निश्चितचं आम्हाला ज्या मातीत जन्माला आलो त्या मातीविषयी अभिमान आहेच, मराठी असल्याचा गर्व ही तितकाच आहे. पण शेवटी पोटापाण्याचा आणि जगण्या-मरण्याचा प्रश्न आहेच की आणि तोच सतावतोय, जत तालुक्यातील पोटाची खळगी भरण्यासाठी वर्षानुवर्ष ऊस तोडी करणारे कामगार किती दिवस कामगार म्हणून स्थलांतर करत राहणार, स्वतःची शेती असून सुद्धा पाण्याविना पडीक पडलेली शेती आपल्याला पाहायला मिळते, कोणत्याही गावाची कर्नाटकमध्ये जाण्याची ईच्छा नाही परंतू महाराष्ट्र सरकार जर जत तालुक्यावर अन्याय करत असेल तर सीमाभागातील लोकं कठोर निर्णय घेऊ शकतात, त्यामुळे जत तालुक्यातील पाण्याविना जी गावे वंचित आहेत त्यांचा पाण्याच्या प्रश्न मिटवावा... स्वतःच्या कारकिर्दीत जत मध्ये कधी पाऊल न टाकणाऱ्या नेतेमंडळींनी लांबून पोकळ बाता मारून जत चा विकास होत आहे असं खोटंनाट्य करून बोलू नये कारण प्रत्यक्षात खूप विदारक चित्र आहे या जत च्या माळरानाचं....!!
करेवाडी (को.बो) जत