22/03/2017
प्रधानमंत्री आवास योजना गुढीपाडव्याला गृहप्रवेश… लाभार्थ्यांसह सीईओ डॉ. देशमुख यांना समाधान
सातारा, दि. 21 (जिमाका) : रविवार दिवस तसा सुट्टीचा ! वेळ सकाळी 9 ची. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आपल्या सहकारी अधिकाऱ्यांसह दोन तासांच्या प्रवासानंतर मुनावळे गाठले. तेथून बोटीने प्रवास करत तासा दीड तासात अत्यंत प्रतिकुल आणि दुर्गम असणाऱ्या कारगाव, आंबवडे गावी भेट दिली. निमित्त होतं प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधून तयार असणाऱ्या घरकुलांच्या पहाणीचं ! जावली तालुक्यातील प्रतिकुल, दुर्गम भागात प्रत्यक्ष भेट देवून योजनांची पहाणी करणारे डॉ. देशमुख कदाचीत पहिलेच मुख्य कार्यकारी अधिकारी असावेत. वर्षांनुवर्षे साध्या छपरात राहणारे लाभार्थी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या नव्या पक्क्या घरकुलात प्रवेश करणार, याचा आनंद लाभार्थ्यांपेक्षा डॉ. देशमुख यांच्या चेहऱ्यावर जास्त दिसून आला. प्रधानमंत्री आवास योजना केंद्र व राज्य शासन राबवित आहे. जावली तालुक्यातील कारगाव व आंबवडे या गावात चार घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. ही घरकुले अवघ्या अडीच महिन्यात बांधून पूर्ण झाली आहेत. अत्यंत प्रतिकुल परिस्थितील लाभार्थ्यांनी घरकुलासाठी लागणारे साहित्य बोटीतून आणून आपली वास्तु पूर्ण केली आहे, डॉ. देशमुख गौरवाने सांगत होते. गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांनी समन्वय ठेवून हीच कामे उत्तमरित्या पार पाडले आहे. या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेसह, रोजगार हमी योजना आणि स्वच्छ भारत मिशन अंतर्गत लाभ देण्यात आला आहे. लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर लाभाचे पैसे जमा करण्यात आले आहेत. लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आज हसू पाहून मला खूप प्रसन्न वाटत आहे, अशा शब्दात डॉ. देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शासनाच्या या विविध योजनांबाबत अधिकारी आणि लाभार्थी यांनी काही बोलक्या प्रतिक्रीया दिल्या. जिल्हा विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एन.एल. थाडे : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेंतर्गत जिल्ह्यात 4 हजार 500 घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे. आंबवडे व कारगाव या दुर्गंम भागात 4 घरकुले मंजूर करण्यात आलेली आहेत. लाभार्थ्यांनी बोटीतून साहित्य आणून 3 महिन्याच्या कालावधीत आपली घरे बांधली आहेत. या भागात जास्तीत जास्त घरकुले मंजूर करण्याचा आमचा मानस आहे. गट विकास अधिकारी गजानन भोसले : जावली तालुक्यात 79 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहेत. आंबवडे व कारगाव येथील घरकुलांसाठी जानेवारी महिन्यात मंजुरी दिली होती. ही घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत. रमाई योजनेंतर्गत 110 कामे चालू असून, ही कामे एप्रिलपर्यंत पूर्ण होतील. ग्रामसेवक राजेंद्र राऊत : प्रधानमंत्री आवास योजनेतून 4 लाभार्थ्यांनी घरकुले बांधण्यास संमती दाखवली. आंबवडे व कारगाव हा दुर्गम भाग आहे. या लाभार्थ्यांची पूर्वीची घरे निकृष्ट दर्जाची होती. या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी 1 लाख 45 हजारांची मदत करण्यात आलेली आहे. प्रकाश सकपाळ, सरपंच आंबवडे : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 2016-2017 साठी 4 घरकुले मंजूर करण्यात. लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा केले. त्यामुळेच या लाभार्थ्यांची घरे पूर्ण बांधून झाली आहेत. गावाच्या व ग्रामपंचायतीच्या वतीने मी सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानतो. विठ्ठल झिमाजी कोकरे लाभार्थी (कारगाव): मी 40 वर्षापासून जुन्या घरात राहत आहे. शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेमुळे मला चांगले घर मिळाले. यामध्ये आम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 1 लाख 20 हजार, रोजगार हमी योजनेतून 17 हजार 280 रुपये व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 12 हजार रुपये असे असे एकूण 1 लाख 49 हजार 280 रुपयांचा लाभ देण्यात आला. या घरामध्ये मी आणि माझी पत्नी सुखाने व आनंदाने राहत आहे. जुन्या घरात पावसाळ्यात मोठा त्रास होत होता. या नवीन घरामुळे आता सुरक्षा निर्माण झाली आहे. नवीन घरासमोर गुढीपाडव्या दिवशी गुढी उभी करणार आहे. सखाराम कोंडीबा चव्हाण लाभार्थी (कारगाव): माझे जुने मोडलेले घर होते. जिल्हा परिषदेच्या सहकार्याने तसेच गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्या मदतीने माझे नवीन घर तयार झाले. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजुर झालेले पैसे आमच्या खात्यावर जमा झाले. घर बांधणीसाठी लागणारे साहित्य तापोळा, सातारा येथून बोटीने आणले व हे साहित्य डोक्यावरुन वाहतूक करुन घर बांधले. धोंडीबा विठ्ठल माने लाभार्थी (आंबवडे): माझे घर पूर्णपणे मोकडळीस आले होते. आम्हाला प्रधानमंत्री योजनेंतर्गत घरकुल मंजूर झाले असून लाभाचे पैसे आमच्या खात्यावर जमा झाले आहेत. शासनाच्या योजनेमुळे मला घर बांधता आले. कोंडीबा विठ्ठल माने लाभार्थी (आंबवडे): जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांमुळे आम्हाला घरकुल मंजूर झाले. शासनाने मंजूर झालेले पैसे आमच्या बँक खात्यावर टाकले. आमचे घर पूर्ण बांधून झाले असून गुढीपाडव्याला नवीन घरात रहायला जाणार आहे. पत्नी भागाबाई : आमचे जुने घर मोडकळीस आले होते. शासनाच्या योजनेमुळे आम्हाला नवीन घर बांधता आले. मंजूर झालेले पैसे आमच्या बँक खात्यात जमा केले. आता घर पूर्ण झाले असून गुढीपाडव्याला नवीन घरात वस्तीला जाणार आहोत.