कोकणातील माझ्या समस्त बंधू आणि भगिनींनो....
कोकणात राजापूर तालुक्याच्या विजयदुर्ग वाघोटन निसर्गरम्य "पर्यटनास साजेशा" खाडीकिनारी नाणार येथे १५००० एकर परिसरात वार्षिक ६ कोटी मॅट्रीक टन क्षमतेचा मेगा रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. सदर प्रकल्पांतर्गत राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात १५ गावांमध्ये रिफायनरीसाठी १५००० एकर जमीन संपादित केली जाणार आहे. सदर प्रकल्पात १५०० MW चा कोळश्यावर आधारित औष्णिक
ऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहे. सदर प्रकल्पासाठी विजयदुर्ग येथील बंदरातून वाघोटन खाडी मार्गे पाईपलाइनने कच्या तेलाची वाहतूक केली जाणार आहे. तसेच या प्रकल्पासाठी लागणारे पाणी खाडीतील पाण्यावर प्रक्रिया करून वापरले जाईल व टाकाऊ पाणी पुन्हा खाडीत सोडले जाणार आहे.
या प्रकल्पातून होणाऱया प्रदुषणामुळे राजापूरसोबत देवगड तालुक्यातीलहि गावांचे उत्पनाचे मुख्य साधन असलेले आंबा, काजू व अन्य फळपिके संकटात आले आहे.खाडीपट्यातील (शेजवली ते नाणार व खारेपाटण ते विजयदुर्ग परिसरातील विहिरी व सुमारे ५००० एकरांतील बारमाही शेती खाडीच्या प्रदूषित होणार आहे. त्याच बरोबर सागरी पर्यावरण धोक्यात येऊन खाडीतील मच्छीमारांचाही रोजगार संपुष्टात येईल. त्यामुळे बागायतदार व मच्छीमार देशोधडीला लागतील. शिवाय प्रदुषणामुळे अनेक रोगांना निमंत्रण मिळणार असल्याने जीवनमानच संकटात सापडणार आहे.
नाणार रिफायनरी या प्रदूषणकारी प्रकल्पाच्या छायेत राजापूर तालुक्यातील डोंगर, महाळुंगे, शेजवली, वालये, बांदिवडे, प्रिंदावन,कुंभवडे, पाल्ये हि 'इको सेन्सिटिव्ह' गावे, जुवाठी, हातीवले, विखारे गोठणे, कणेरी, वाडा केरपोई आणि देवगड तालुक्यातील वाघोटन खाडी किनारी सौंदाळे, वाघोटन, मुटाट, पाळेकरवाडी, तिर्लोट, मोवळ, पडेल, मणचे, मालपे, पोंभुर्ले, धालवली हि गावे आहेत. तसेच गिर्ये, रामेश्वर येथे कोळसा उतरण्यासाठी जमीन संपादित केली जाणार त्यामुळे राजापूर तालुक्यातील किमान 30 गावे व देवगड तालुक्यातील किमान २५ गावे या प्रदूषित प्रकल्पाच्या छायेत येणार आहेत. सदर प्रकल्पाच्या प्रदूषणाच्या भीतीने राजापूर - विजयदुर्ग पट्ट्यातील आंबा काजू बागायतदारांनी बागेचे करार करणे बंद केले आहे तसेच शेतकरी नवीन फळझाडांची लागवड करण्यास अनुत्सुक आहेत. सदर प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त जमिनीचे पैसे घेऊन बाजूला होतील, पण प्रकल्पाशेजारील गावांना त्या प्रकल्पाचा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. "या प्रदूषणकारी प्रकल्पासाठी आमची देखील जमीन सरकारने घ्यावी आणि आम्हाला या त्रासातून मोकळे करावे" अशी मागणी प्रकल्पाशेजारील गावांतून जोर धरू लागली आहे.
कोकणी माणूस कोकण विकासाच्या विरोधात नाही, कोकणात प्रकल्प यावेत पण तेथील उत्पादनावर आधारित यावेत, रत्नागिरी - सिंधुदुर्गच्या ३०० किमीच्या समुद्रात आणि ५०० किमीच्या खाडीत केरळ - गोव्यासारखे पर्यटन, मत्स्यउत्पादन व जलवाहतूक प्रकल्प यावेत. मोकळ्या कातळावर पवनचक्की, सौर ऊर्जा प्रकल्प यावेत. स्थानिकांना मुंबई - पुण्यासारख्या ठिकाणी स्थलांतरित न होता, कोकणातच रोजगार मिळावा. तसेच गावाचे गावपण आणि कोकणाचा निसर्ग टिकून राहावे एवढीच अपेक्षा.
तरी कृपया आपण सदर प्रदूषणकारी प्रकल्पात वेळीच लक्ष घालून, वेळीच विरोध करावा आणि पर्यावरणास पूरक असे उद्योग राजापूर तालुक्यात / कोकणात आणावेत तसेच निसर्गरम्य वाघोटन खाडीत विजयदुर्ग ते खारेपाटण जलवाहतूक चालू करून मत्स्यशेती व पर्यटनावर आधारित प्रकल्पांस चालना मिळेल अशी मागणी करावी, ही विनंती.
धन्यवाद.
#कोकण_वाचवा