18/08/2026
आयपीएस अंजना कृष्णा यांचा दणका! मुन्ना दैन, करण आलाटसह सतराजण करमाळा उपविभागातून हद्दपार
करमाळा (अशोक मुरूमकर) : आयपीएस अंजना कृष्णा यांनी वाळू तस्करी, शरीराविषयक व बेकायदा व्यवसाय करणाऱ्या सराईत १७ गुन्हेगारांवर हद्दपारची कारवाई केली आहे. यामध्ये करमाळा तालुक्यातील वांगी १ येथील जयवर्धन उर्फ मुन्ना हनुमंत दैन, मौलालीमाळ येथील करण आलाटसह करमाळा, टेंभुर्णी व कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील संशयित आरोपींचा समावेश आहे.
करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांनी करमाळा, टेंभुर्णी व कुर्डुवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या संशयित गुन्हेगारांची यादी तयार करून हद्दपारच प्रस्ताव पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यामार्फत उपविभागीय दंडाधिकारी जयश्री आव्हाड यांच्याकडे पाठवला होता. त्यानंतर आव्हाड यांनी १७ गुन्हेगारांना हद्दपार करण्याचा आदेश दिला आहे.
यामध्ये मुन्ना दैन, ओंकार दत्तात्रय गव्हाणे (कुर्डुवाडी), नागेश शंकर लोंढे (रा. टेंभुर्णी), करण कृष्णा आलाट, मारुती जनार्धन केचे (रा. आलेगाव बु.), अंगदराव लक्ष्मण काळे (अकोले बु), हनुमंत बापू महाडिक (रा. मुंगशी), धीरज अशोक जाडकर (रा. मोडनिंब), बप्पा उर्फ शिवानंद मेघराज भोसले (रा. बेंबळे), महेश उत्तरेश्वर गायकवाड (रा. शेवरे), संजय हरिदास दुर्गुडे (रा. चोंभेपिंप्री), अजित नवनाथ पाटोळे (रा. शेवरे), विकास रमेश काळे (चोभेपिंप्री), समाधान कल्याण जरक (रा. टाकळी, माढा), रत्नमाला अंगदराव काळे (रा. अकोले बु.), विमल अंगतराव काळे (रा. अकोले) व चेतन अण्णा काळे (रा. बेंबळे) यांचा समावेश आहे.
या कारवाईसाठी सोलापूर ग्रामीण पोलिसचे अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळ्याचे पोलिस निरीक्षक रणजित माने, कुर्डुवाडीचे पोलिस निरीक्षक अतुल मोहिते, टेंभुर्णीचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, अनिस शेख, अंगद नलवडे, विलास रणदिवे, सुशांत शिंदे, जयलाल बारवाल यांनी काम पाहिले.