Veer maharashtra news वीर महाराष्ट्र न्युज

  • Home
  • India
  • Tuljapur
  • Veer maharashtra news वीर महाराष्ट्र न्युज

Veer maharashtra news वीर महाराष्ट्र न्युज veermaharashtranews.in

राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाच्या महिला आघाडीच्या प्रमुखपदी हेमलता बाळासाहेब बेडेकर यांची...
06/09/2026

राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाच्या महिला आघाडीच्या प्रमुखपदी हेमलता बाळासाहेब बेडेकर यांची नियुक्ती

प्रतिनिधी : जुबेर शेख

पुणे : अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाच्या राज्यातील महिला आघाडीच्या प्रमुखपदी श्रीमती हेमलता बाळासाहेब बेडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महासंघाच्या वतीने दिनांक ६ सप्टेंबर २०२६ रोजी नियुक्तीपत्राद्वारे ही घोषणा करण्यात आली.

महासंघाचे अध्यक्ष डी. एन. पाटील, जनरल सेक्रेटरी चंद्रकांत यादव आणि ज्येष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र अंबुसकर यांच्या स्वाक्षरीने हे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.

नियुक्तीपत्रात नमूद केल्याप्रमाणे, राज्यभरातील महिला स्वस्त धान्य दुकानदार तसेच महिला बचत गटांच्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये समन्वय साधणे, तसेच त्यांच्या विविध अडचणी आणि प्रश्नांबाबत राज्यस्तरीय पातळीवर पाठपुरावा करण्याची जबाबदारी महिला आघाडीच्या प्रमुख म्हणून हेमलता बेडेकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

महिला स्वस्त धान्य दुकानदारांच्या सक्षमीकरणासाठी तसेच परवाना व संबंधित बाबींमध्ये शासनाच्या धोरणात्मक आणि शासकीय निर्णयांच्या दृष्टीने सक्रियपणे काम करण्याची अपेक्षा नियुक्तीपत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.

राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत धान्य पोहोचविण्यात स्वस्त धान्य दुकानदारांची महत्त्वाची भूमिका असते. या क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला दुकानदारांच्या समस्या, अडचणी आणि मागण्यांना संघटित व्यासपीठ मिळावे, यासाठी महिला आघाडीच्या माध्यमातून काम करण्याची संधी हेमलता बेडेकर यांना मिळणार आहे.

नियुक्तीनंतर राज्यातील महिला स्वस्त धान्य दुकानदार आणि महिला बचत गटांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांचा शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

महासंघाच्या या नियुक्तीमुळे राज्यातील महिला स्वस्त धान्य दुकानदारांमध्ये नव्या नेतृत्वाबाबत उत्सुकता निर्माण झाली असून, महिला दुकानदारांच्या प्रश्नांना आता अधिक संघटितपणे आवाज मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

#हेमलताबेडेकर #महिलाआघाडी #स्वस्तधान्यदुकानदार #केरोसीनपरवानाधारक #अखिलमहाराष्ट्रमहासंघ #स्वस्तधान्यदुकान #महिलास्वस्तधान्यदुकानदार #महिलाबचतगट #सार्वजनिकवितरणव्यवस्था #रेशनदुकानदार #रेशनदुकानदारांचेमुद्दे #महाराष्ट्र #पुणे #धाराशिव #वीरमहाराष्ट्रन्यूज

श्री सिद्धीविनायक मध्ये बालगोपाळांचा दहीहंडी उत्सव संपन्नप्रतिनिधी : जुबेर शेख धाराशिव : धाराशिव येथील रामनगर भागातील श्...
04/09/2026

श्री सिद्धीविनायक मध्ये बालगोपाळांचा दहीहंडी उत्सव संपन्न

प्रतिनिधी : जुबेर शेख

धाराशिव : धाराशिव येथील रामनगर भागातील श्री सिद्धीविनायक सोशल फाउंडेशन संचलित, विजयसिंहराजे प्राथमिक विद्यालय येथे गोकुळाष्टमीच्या निमित्ताने दहीहंडीचा सण अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. या निमित्ताने संपूर्ण शाळा परिसर बालगोपाळांच्या जयघोषाने आणि रंगीबेरंगी वेशभूषेने नटला होता.

या कार्यक्रमासाठी सौ. प्राची दिनेश कुलकर्णी आणि सौ. तृप्ती नकुल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी पाहुण्यांनी चिमुकल्यांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कौतुक केले.

उत्सवासाठी शाळेतील लहान मुले श्रीकृष्ण आणि राधेच्या मनमोहक वेशभूषेत आली होती, त्यांच्या निरागस भावमुद्रांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या वेळी सर्व चिमुकल्यांनी एकत्र येत मोठ्या जिद्दीने आणि उत्साहाने मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडली. दहीहंडी फुटल्यानंतर सर्व बालगोपाळांना शाळेच्या वतीने भेळ आणि बिस्किटांचा 'प्रसाद' देण्यात आला.

हा प्रसाद मिळताच मुलांचा आनंद द्विगुणित झाला आणि चिमुकल्यांनी या 'काल्याचा' आस्वाद घेत आणि नाचत गोकुळाष्टमीच्या उत्सवात रंग भरला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेच्या कार्यालय अधीक्षक सौ. प्रतीक्षा भिंगारे, मुख्याध्यापिका सौ. लोमटे मॅडम, श्री. माने सर सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

#धाराशिव #खतरों_का_खिलाडी #काँक्रीट_रस्ता #रस्तेकाम #दुचाकी #गाडीअडकली #धाराशिव_न्यूज #रस्ते_सुरक्षा #व्हायरल_व्हिडिओ #स्थानिक_बातमी #वीरमहाराष्ट्रन्यूज

८० लाख की दोन कोटी? जप्त रकमेवरून संभ्रमप्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ‘त्या’ नेत्याच्या दबावाच्या फोनचीही चर्चाशहर...
04/09/2026

८० लाख की दोन कोटी? जप्त रकमेवरून संभ्रम

प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ‘त्या’ नेत्याच्या दबावाच्या फोनचीही चर्चा

शहर पोलिस ठाण्यातील कारवाईनंतर खळबळ; गुन्हा दाखल न झाल्याने अनेक प्रश्न अनुत्तरित

धाराशिव : शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी धाड टाकून मोठी रोकड जप्त केल्याची घटना समोर आली असून, जप्त करण्यात आलेली रक्कम नेमकी ८० लाख रुपये आहे की दोन कोटी रुपये, यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. पोलिसांकडून ८० लाख रुपये जप्त केल्याची कबुली दिली जात असली, तरी या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नसल्याने संशयाला अधिकच बळ मिळत आहे.

पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या चर्चेनुसार, ही कारवाई झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत जिल्ह्यातील एका मातब्बर राजकीय नेत्याचा पोलिस प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांना फोन गेल्याची चर्चा आहे. या फोनद्वारे प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचीही चर्चा पोलिस वर्तुळात रंगली आहे. मात्र, या चर्चेला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

पोलिसांनी जप्त केलेली रोकड नेमकी कोणाची आहे, ती कुठून आली आणि कुठे नेली जात होती, याचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही. रोकड घेऊन जाणाऱ्या व्यक्तींसोबत आणखी किती जण होते, त्यांची भूमिका काय होती, तसेच या पैशांचा स्रोत काय आहे, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

विशेष म्हणजे, पोलिसांनी रोकड जप्त केल्याचे मान्य केले असताना अद्याप गुन्हा दाखल का करण्यात आलेला नाही, हा प्रश्नही चर्चेचा विषय बनला आहे. एवढी मोठी रक्कम आढळून आल्यानंतर तिच्या मालकीबाबत, पैशांच्या स्रोताबाबत आणि वाहतुकीच्या कारणाबाबत चौकशी होणे अपेक्षित आहे.

कारवाईनंतर अवघ्या दहा मिनिटांत जिल्ह्यातील एका मातब्बर नेत्याने फोन करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सध्या शहर पोलिस ठाण्यातील कर्मचारी आणि अधिकारी वर्गात सुरू आहे. संबंधित नेत्याने कोणाला फोन केला, नेमका कोणता दबाव आणला आणि त्यामागे कारण काय होते, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, या सर्व बाबी सध्या चर्चेच्या स्वरूपात असून, त्याला अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनाने वस्तुस्थिती स्पष्ट करणे गरजेचे आहे.

या संपूर्ण प्रकरणातील संभ्रम दूर करण्याची जबाबदारी आता जिल्हा पोलिस अधीक्षक रितू खोकर यांच्यावर आली आहे. पोलिसांनी नेमकी किती रक्कम जप्त केली? ती कोणाकडून आणि कुठे जप्त केली? संबंधित व्यक्ती कोण होत्या? पैशांच्या स्रोताबाबत काय माहिती समोर आली? तसेच कारवाईनंतर कोणत्याही राजकीय व्यक्तीकडून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला का, याचा खुलासा पोलिस प्रशासन करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या रकमेतील नेमका आकडा स्पष्ट होणे, कारवाईची अधिकृत माहिती जाहीर होणे आणि गुन्हा दाखल न करण्यामागचे कारण स्पष्ट होणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्व संभ्रम जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या अधिकृत भूमिकेनंतरच दूर होणार का, हा प्रश्न सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.

#धाराशिव #धाराशिवन्यूज #शहरपोलिस #पोलीसकारवाई #जप्तरक्कम #८०लाख #दोनकोटी #रोकडजप्त #पोलीसप्रशासन #पोलिसअधीक्षक #राजकीयदबाव #दबावाचाफोन #खुलासाहोणारका #गुन्हादाखल #धाराशिवब्रेकिंग #महाराष्ट्रन्यूज #वीरमहाराष्ट्रन्यूज

04/09/2026

काँक्रीट रस्ता सुरू असतानाही दुचाकीस्वाराचा ‘स्टंट’! पुढे जे घडलं ते पाहून उडेल हसू!

#धाराशिव #खतरों_का_खिलाडी #काँक्रीट_रस्ता #रस्तेकाम #दुचाकी #गाडीअडकली #धाराशिव_न्यूज #रस्ते_सुरक्षा #व्हायरल_व्हिडिओ #स्थानिक_बातमी #वीरमहाराष्ट्रन्यूज

भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्याच्या थकीत बिलासाठी शेतकऱ्याचा टोकाचा आंदोलनाचा पवित्रा; जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर...
04/09/2026

भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्याच्या थकीत बिलासाठी शेतकऱ्याचा टोकाचा आंदोलनाचा पवित्रा; जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर चढला!

#भाऊसाहेबबिराजदारसाखरकारखाना #ऊसबिल #थकीतबिल #शेतकरीआंदोलन #शेतकऱ्यांचाआक्रोश #आठमहिनेप्रतीक्षा #जिल्हाधिकारीकार्यालय #शेतकरी #ऊसउत्पादक #धाराशिव #शेतकऱ्यांनान्याय #वीरमहाराष्ट्रन्यूज

नळदुर्ग भुईकोट किल्ल्यात दुर्दैवी घटना; आईसह मुलाचा मृत्यू, दोन मुली गंभीरउपळी बुरुजावरून तीन मुलांसह महिलेने उडी घेतल्य...
03/09/2026

नळदुर्ग भुईकोट किल्ल्यात दुर्दैवी घटना; आईसह मुलाचा मृत्यू, दोन मुली गंभीर

उपळी बुरुजावरून तीन मुलांसह महिलेने उडी घेतल्याची प्राथमिक माहिती; जखमी मुलींवर धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार

प्रतिनिधी : जुबेर शेख

नळदुर्ग : तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यात गुरुवारी (३ सप्टेंबर) दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. एका महिलेने आपल्या तीन मुलांसह किल्ल्यातील उपळी बुरुजावरून उडी घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत महिलेचा आणि तिच्या एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, मृत महिलेचे नाव अश्विनी मोहिते (रा. लोहारा, ता. उमरगा; सासर अंबुलगा, ता. निलंगा) असल्याचे समजते. घटनेनंतर जखमी झालेल्या दोन्ही मुलींना तातडीने उपचारासाठी धाराशिव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

गुरुवारी दुपारी महिला आपल्या तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यातील उपळी बुरुजाच्या परिसरात गेली होती. त्यानंतर तिने मुलांसह बुरुजावरून उडी घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेत महिला आणि एका मुलाचा मृत्यू झाला, तर दोन मुली गंभीर जखमी झाल्या.

घटना घडताच किल्ला परिसरात उपस्थित नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. नागरिक आणि संबंधितांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमी मुलींना उपचारासाठी धाराशिव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.

मृत अश्विनी मोहिते या शालेय जीवनापासूनच कुस्ती स्पर्धांमध्ये सहभागी होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली होती, अशी माहिती स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे नातेवाईक, परिचित तसेच परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

या धक्कादायक घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. महिला मुलांसह किल्ल्यात का आली होती आणि त्यानंतर नेमके काय घडले, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर नळदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. घटनेपूर्वीची परिस्थिती, संबंधित व्यक्तींची पार्श्वभूमी आणि इतर बाबींची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

या घटनेमुळे नळदुर्गसह लोहारा, उमरगा आणि अंबुलगा परिसरात शोककळा पसरली आहे. आईसह एका मुलाचा झालेला मृत्यू आणि दोन मुली गंभीर जखमी झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जखमी मुलींच्या प्रकृतीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

#नळदुर्ग #नळदुर्गकिल्ला #भुईकोटकिल्ला #नळदुर्गबातमी #तुळजापूर #धाराशिव #धाराशिवबातम्या #दुर्दैवीघटना #हृदयद्रावकघटना #अश्विनीमोहिते #उपळीबुरुज #पोलिसतपास #जिल्हाशासकीयरुग्णालय #लोहारा #उमरगा #अंबुलगा #वीरमहाराष्ट्रन्यूज

02/09/2026

अंतरवालीच्या आंदोलनावर नेत्यांची शांतता का?; मराठा तरुणाचा खा. ओमदादा, आ. राणा दादांना सवाल

#मराठा_आंदोलन #मराठा_आरक्षण #अंतरवाली_सराटी #मनोज_जरांगे_पाटील #मराठा_तरुण #मराठा_समाज #ओमराजे_निंबाळकर #राणा_जगजितसिंह_पाटील #धाराशिव #महाराष्ट्र #आरक्षणाचा_लढा #मराठा_एकजूट #वीर_महाराष्ट्र_न्यूज

आभाळ भरून आले; पण पावसाची प्रतीक्षा कायम!तुळजापूर तालुक्यात पंधरा दिवसांपासून पावसाचा खंड; हाताशी आलेले सोयाबीन पीक सुकण...
02/09/2026

आभाळ भरून आले; पण पावसाची प्रतीक्षा कायम!

तुळजापूर तालुक्यात पंधरा दिवसांपासून पावसाचा खंड; हाताशी आलेले सोयाबीन पीक सुकण्याच्या मार्गावर

प्रतिनिधी : जुबेर शेख

तुळजापूर : तुळजापूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात मागील पंधरा दिवसांपासून पावसाने मोठा खंड घेतल्याने शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे. हाताशी आलेले सोयाबीनचे पीक पावसाअभावी सुकण्याच्या अवस्थेत असून, शेतकऱ्यांचे संपूर्ण लक्ष आता आभाळाकडे लागले आहे. दरम्यान, बुधवारी सायंकाळच्या सुमारास तुळजापूर शहरासह आसपासच्या परिसरात अचानक आभाळ दाटून आल्याने पाऊस होण्याच्या आशा पुन्हा एकदा निर्माण झाल्या.

खरीप हंगामातील सोयाबीनचे पीक सध्या महत्त्वाच्या अवस्थेत आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जमिनीतील ओलावा कमी होत चालला असून अनेक ठिकाणी सोयाबीनची पाने सुकू लागल्याचे चित्र दिसत आहे. पिकाला या टप्प्यावर पावसाची नितांत गरज असताना पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

तुळजापूर शहर आणि परिसरात बुधवारी दिवसभर उकाडा जाणवत होता. मात्र, संध्याकाळच्या वेळेस अचानक आकाशात मोठ्या प्रमाणात ढग जमा झाले. संपूर्ण आभाळ ढगांनी व्यापल्याचे दृश्य पाहायला मिळाले. त्यामुळे आता तरी पाऊस पडेल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी आशा शेतकरी वर्गाला लागली आहे.

मात्र, केवळ आभाळ भरून येण्यापेक्षा प्रत्यक्षात दमदार पावसाची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यापूर्वीही अनेक वेळा ढग जमा होऊन पावसाचे वातावरण निर्माण झाले; मात्र प्रत्यक्षात अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.

तुळजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात झालेल्या पावसामुळे पिकांची वाढ चांगली झाली होती. त्यामुळे यंदा उत्पादन चांगले मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, आता पावसाने घेतलेल्या खंडामुळे हाताशी आलेल्या पिकाचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.

पिकाला वेळेत पाऊस मिळाला तर सोयाबीनला मोठा आधार मिळू शकतो. मात्र आणखी काही दिवस पाऊस लांबल्यास उत्पादनावर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत.

पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी दिवसेंदिवस आकाशाकडे पाहत आहेत. संध्याकाळी आभाळ भरून आल्याने काही काळासाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता हे ढग बरसणार का? पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का? हाताशी आलेले सोयाबीनचे पीक वाचणार का? याकडे संपूर्ण शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

“आभाळ आले म्हणजे पाऊस पडेल, अशी आशा आहे; मात्र पिकाला आता पाण्याची खरी गरज आहे. आणखी पाऊस लांबला तर हाताशी आलेले पीक अडचणीत येऊ शकते,” अशी भावना परिसरातील शेतकरी व्यक्त करत आहेत.

दरम्यान, आगामी काळात तुळजापूर तालुक्यात पावसाचे पुनरागमन होते का आणि शेतकऱ्यांच्या चिंतेला काहीसा दिलासा मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

#तुळजापूर #धाराशिव #पाऊस #पावसाचीप्रतीक्षा #शेतकरी #सोयाबीन #सोयाबीनपीक #खरीपहंगाम #शेतकऱ्यांचीचिंता #पावसाचाखंड #पीकनुकसान #शेतकऱ्यांनादिलासा #तुळजापूरतालुका #धाराशिवजिल्हा #वीरमहाराष्ट्रन्यूज

पावसाच्या खंडामुळे सोयाबीनसह खरीप पिकांचे नुकसान; पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्याआमदार कैलास पाटील यांच...
02/09/2026

पावसाच्या खंडामुळे सोयाबीनसह खरीप पिकांचे नुकसान; पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या

आमदार कैलास पाटील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

प्रतिनिधी : जुबेर शेख

धाराशिव : मराठवाड्यातील आकांक्षित जिल्हा असलेल्या धाराशिव जिल्ह्यात मागील महिनाभरापासून पावसाने मोठा खंड दिल्याने खरीप हंगामातील पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनसह इतर खरीप पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून, नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत व पीक नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

बुधवारी मुख्यमंत्री यांच्याकडे केलेल्या मागणीत आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यातील सद्यस्थिती गंभीर असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. जिल्हा प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असून, शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा मोठा आधार खरीप हंगामातील पिकांवर असतो. मात्र, पावसाने मोठा खंड दिल्याने शेतकऱ्यांसमोर उत्पादनाबाबत मोठे संकट उभे राहिले आहे.

सध्या सोयाबीन पीक फुलोरा व शेंगा लागण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या अवस्थेत आहे. या कालावधीत पिकाला पुरेशा पाण्याची व जमिनीतील ओलाव्याची आवश्यकता असते. मात्र, पावसाचा दीर्घ खंड पडल्यामुळे जमिनीतील ओलावा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. त्यातच वाढत्या तापमानाचा परिणाम पिकांवर होत असून, अनेक ठिकाणी सोयाबीनची पिके करपू लागल्याचे चित्र आहे.

काही शेतांमध्ये सोयाबीनची झाडे वरून हिरवी दिसत असली तरी जमिनीमध्ये पुरेसा ओलावा नसल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. पाण्याअभावी सोयाबीनची फुले व शेंगा गळून पडत असल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

पावसाचा खंड आणखी कायम राहिल्यास सोयाबीनबरोबरच इतर खरीप पिकांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने केवळ कागदोपत्री पाहणी न करता प्रत्यक्ष शेतपातळीवर जाऊन पिकांची स्थिती तपासणे आवश्यक असल्याचे आमदार कैलास पाटील यांनी म्हटले आहे.

महसूल आणि कृषी विभागाच्या माध्यमातून गावनिहाय तसेच शेतनिहाय पाहणी करून पिकांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद करावी आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पावसाच्या अनिश्चिततेमुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर शेतकरी कुटुंबांचा दैनंदिन खर्च, पुढील हंगामासाठी लागणारा शेतीचा खर्च तसेच मुला-मुलींच्या शिक्षणाचा खर्च अवलंबून असतो.

पीक उत्पादनात मोठी घट झाल्यास शेतकरी कुटुंबांवर आर्थिक संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. विशेषतः महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुला-मुलींच्या शैक्षणिक शुल्काचा खर्च करणेही अनेक कुटुंबांना कठीण होऊ शकते. त्यामुळे शासनाने या संकटाकडे गांभीर्याने पाहून तातडीने मदतीचा निर्णय घेणे गरजेचे असल्याचे आमदार पाटील यांनी नमूद केले.

धाराशिव जिल्ह्यासह ज्या-ज्या भागात पावसाचा मोठा खंड पडला आहे, त्या सर्व भागांमध्ये सोयाबीनसह इतर खरीप पिकांच्या सद्यस्थितीची महसूल व कृषी विभागामार्फत तातडीने प्रत्यक्ष पाहणी करावी. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून पात्र शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत व पीक नुकसानभरपाई उपलब्ध करून द्यावी.

तसेच, पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आणि पात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

#धाराशिव #कैलासपाटील #सोयाबीन #शेतकरी #शेतकरीप्रश्न #पीकनुकसान #पंचनामा #नुकसानभरपाई #आर्थिकमदत #पावसाचाखंड #खरीपहंगाम #खरीपपिके #मराठवाडा #शेतकरीमदत #कृषीविभाग #महसूलविभाग #देवेंद्रफडणवीस #मुख्यमंत्री #धाराशिवन्यूज #वीरमहाराष्ट्रन्यूज

तुळजापूर तालुक्यात पावसाचा खंड; सोयाबीनसह खरीप पिके संकटाततात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्या...
02/09/2026

तुळजापूर तालुक्यात पावसाचा खंड; सोयाबीनसह खरीप पिके संकटात

तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्या; पंचायत समिती सदस्य किसान देडे यांचे निवेदन

प्रतिनिधी : राम थोरात

तुळजापूर : तुळजापूर तालुक्यात मागील सुमारे महिनाभरापासून पावसाचा खंड पडल्याने सोयाबीनसह इतर खरीप पिकांवर गंभीर संकट निर्माण झाले आहे. अनेक भागात पिके करपण्यास सुरुवात झाली असून, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य किसान देडे यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, यंदाच्या खरीप हंगामात तुळजापूर तालुक्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन व इतर खरीप पिकांची पेरणी केली आहे. सुरुवातीला झालेल्या पावसामुळे पिकांची उगवण चांगली झाली होती. मात्र, त्यानंतर जवळपास दोन महिन्यांपासून पावसाने मोठी दडी मारल्याने अनेक ठिकाणी पिकांची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे.

विशेषतः सोयाबीन पिकांच्या वाढीच्या व शेंगा भरण्याच्या महत्त्वाच्या अवस्थेतच पावसाचा मोठा खंड पडल्याने पिकांवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी पाने वाळत असून झाडांची वाढ खुंटली आहे. परिणामी सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

शेतकऱ्यांनी पेरणीपासून मशागत, बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी यांसह इतर बाबींवर मोठा खर्च केला आहे. मात्र, पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे पिकांची परिस्थिती बिकट झाल्याने केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडण्याची भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची तात्काळ पाहणी करून पंचनामे करावेत, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गावातील नुकसानग्रस्त क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करून पावसाच्या खंडामुळे झालेल्या नुकसानीची वस्तुनिष्ठ पद्धतीने नोंद करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

तसेच, पात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या प्रचलित नियमांनुसार तात्काळ आर्थिक मदत व नुकसानभरपाई मंजूर करून ती थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची नोंद घेऊन त्यांना पीक विम्याचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. संबंधित यंत्रणांनी शेतकऱ्यांना विमा नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक ती मदत करावी, असे निवेदनात नमूद आहे.

दरम्यान, पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेल्या गावांची विशेष पाहणी करून दुष्काळसदृश परिस्थितीनुसार आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठांसाठी विशेष मदत उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

पंचनाम्याच्या प्रक्रियेत कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी विशेष पथके नियुक्त करून युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या निकषांनुसार जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे विशेष प्रस्ताव सादर करावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

तुळजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने दखल घेऊन सकारात्मक कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनाच्या शेवटी करण्यात आली आहे.

#तुळजापूर #तुळजापूरतालुका #धाराशिव #धाराशिवजिल्हा #शेतकरी #शेतकरीप्रश्न #सोयाबीन #खरीपहंगाम #पावसाचाखंड #पिकांचेनुकसान #पंचनामे #नुकसानभरपाई #आर्थिकमदत #पीकविमा #कृषी #कृषीविभाग #शेतकऱ्यांचेमागणी #किसानबांडे #महाराष्ट्रातीलशेतकरी

Address

Raje Sambhaji Nagar
Tuljapur
413601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Veer maharashtra news वीर महाराष्ट्र न्युज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Veer maharashtra news वीर महाराष्ट्र न्युज:

Shortcuts

Share