10/03/2022
चे तंत्रनिकेतनला ठिय्या आंदोलन, ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांच्या अनुपलब्धतेमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय थांबविण्यासाठी AISF चा पुढाकार....
नाशिक: दि.९ मार्च २०२२ रोजी नाशिक शहरातील अशोका मार्ग परिसरात स्थित असलेल्या जे.एम.सी.टी पॉलिटेक्निक महाविद्यालयात ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन (एआयएसएफ) च्या नेतृत्वाखाली प्राचार्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. ऐन परीक्षेच्या काळात तासिका घेण्यासाठी आवश्यक शिक्षक कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने पॉलिटेक्निक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी बुधवारी ठिय्या आंदोलन केले. गेल्या आठवड्यात जे.एम.सी.टी महाविद्यालय प्रशासनामार्फत दोन शिक्षकांना कुठलेही ठोस कारण न देता बडतर्फ करण्यात आले होते. शिक्षकांच्या अनुपलब्धतेमुळे विद्यार्थ्यांच्या तासिकांवर नकारात्मक परिणाम होत होता, विद्यार्थ्यांनी वेळोवेळी प्राचार्यांकडे दाद मागूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशन च्या प्रतिनिधी मंडळाने प्राचार्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना टाळण्यासाठी प्राचार्यांनी मागच्या दाराने कार्यालय सोडण्याचा केविलवाणा प्रकार विद्यार्थ्यांना पहावयास मिळाला. येत्या २७ मार्च पासून एम.एस.बी.टी. मार्फत कोविड लॉकडाऊन नंतर प्रथमतःच ऑफलाईन परीक्षा घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट असूनही महाविद्यालयीन प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा विद्यार्थ्यांनी तीव्र निषेध नोंदवला, जे.एम.सी.टी प्रशासनाचा निषेध दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांमार्फत प्राचार्यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी 'कॉलेज प्रशासन होश में आओ' अश्या घोषणांनी संपूर्ण कॅम्पस दणाणून निघाला.
आंदोलनाच्या दबावामुळे प्राचार्यांकडून एआयएसएफ च्या प्रतिनिधीमंडळाला भेटण्याची इच्छा दर्शविली, सदर बैठकीत महाविद्यालयीन व्यवस्थापनातील सोबत प्राचार्यांची उपस्थिती होती, येत्या आठवड्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण करून विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
यावेळी ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनचे राज्याध्यक्ष विराज देवांग, राज्य कौन्सिल सदस्य तल्हा शेख, शहराध्यक्ष जयंत विजयपुष्प, सचिव प्राजक्ता कापडणे, दानिश कुरेशी, राणी जगदाने, मोईन शेख, आवेश शेख, नुमान शेख इत्यादी उपस्थित होते.