19/06/2026
एक पर्व संपले...
विदर्भाच्या अनुशेष निर्मूलनासाठी आयुष्यभर झटणारे, अभ्यासू, तत्त्वनिष्ठ आणि लोकहितासाठी अखंड लढणारे माजी आमदार प्रा. बी. टी. देशमुख सर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.
अमरावती पदवीधर मतदारसंघाचे सलग पाच वेळा प्रतिनिधित्व करताना त्यांनी लोकप्रतिनिधी कसा असावा, याचा आदर्श निर्माण केला. विधिमंडळातील त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे, आकडेवारीसह मांडलेले मुद्दे आणि विदर्भाच्या सिंचन, पाणी, रस्ते व भौतिक अनुशेषाबाबतचा सातत्यपूर्ण पाठपुरावा नेहमीच मार्गदर्शक ठरला. एखादा प्रश्न ताकदीने मांडून तो मार्गी लागेपर्यंत शांत न बसणे, ही त्यांची कार्यशैली होती.
प्रा. देशमुख यांच्याकडून विधिमंडळाच्या कामकाजाची शिस्त, विषयांचा सखोल अभ्यास आणि जनहितासाठीची निष्ठा याबाबत अनेकांना शिकण्याची संधी मिळाली. विदर्भाच्या विकासासाठी लढणारा एक जिगरी नेता आणि महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील एक महत्त्वाचे पर्व आज काळाच्या पडद्याआड गेले आहे.
प्रा. बी. टी. देशमुख सरांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि असंख्य अनुयायांच्या दुःखात मी सहभागी आहे.
ॐ शांति 🙏