Collector Raigad

Collector Raigad Shri Kishan N. Jawale, Collector & DM, Raigad (Official Account)

*गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा**नागोठणे उड्डाणपुलावरून छोट्या ...
03/09/2026

*गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा*

*नागोठणे उड्डाणपुलावरून छोट्या वाहनांची वाहतूक सुरळीत करा; माणगाव व इंदापूर बायपासची कामे विहित मुदतीत पूर्ण करा*
*- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले*

*टोलमाफीसाठी थेट दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांना संपर्क*

रायगड-अलिबाग,दि.३(जिमाका): गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहील, वाहतुकीची कोंडी होणार नाही तसेच गणेशभक्त व सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करत आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले.
नागोठणे उड्डाणपुलावरून छोट्या वाहनांची वाहतूक सुरळीत सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करून वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी. तसेच गणेशोत्सव काळात या ठिकाणच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित देखरेख ठेवून त्याचा दैनंदिन अहवाल सादर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गाच्या कामांबाबतचा आढावा घेण्यासाठी महाड येथील शासकीय विश्रामगृहात मंत्री श्री. भोसले यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी पालकमंत्री भरतशेठ गोगावले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल आदी उपस्थित होते.

*नागोठणे उड्डाणपुलावरील वाहतुकीचे नियमित निरीक्षण करा*
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागोठणे उड्डाणपुलावरून छोट्या वाहनांची वाहतूक सुरळीत राहणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून मंत्री श्री.भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांमध्ये वाहतूक कोंडी होणार नाही, वाहतुकीचा प्रवाह अबाधित राहील आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेला कोणताही धोका निर्माण होणार नाही, यासाठी प्रत्यक्ष परिस्थितीवर लक्ष ठेवावे. वाहतुकीच्या स्थितीचे नियमित निरीक्षण करून आवश्यकतेनुसार तातडीने उपाययोजना कराव्यात. या संपूर्ण कालावधीतील वाहतूक व्यवस्थापनाचा दैनंदिन अहवाल संबंधित अधिकाऱ्यांनी सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.
*माणगाव व इंदापूर बायपासची कामे मुदतीत पूर्ण करा*
पनवेल ते इंदापूर आणि इंदापूर ते झाराप या मार्गावरील कामांचा आढावा घेताना मंत्री श्री. भोसले यांनी माणगाव व इंदापूर बायपासची कामे विहित मुदतीत पूर्ण होतील, याची कटाक्षाने काळजी घेण्याचे निर्देश दिले. कामाचा दर्जा आणि गुणवत्ता उत्तम राहील, याची विशेष नोंद घेऊन कामाच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक देखरेख ठेवावी, असे त्यांनी सांगितले. महामार्गाचे काम करताना नागरिकांची गैरसोय होणार नाही तसेच वाहतुकीवर त्याचा अनावश्यक परिणाम होणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य नियोजन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
*महामार्गावर सुविधा केंद्रे उभारून सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करा*
गणेशोत्सवाच्या काळात महामार्गावरून मोठ्या संख्येने प्रवासी व वाहनांची ये-जा होणार असल्याने आवश्यकता असलेल्या ठिकाणांची माहिती घेऊन तेथे सुविधा केंद्रे उभारावीत, अशा सूचना मंत्री श्री. भोसले यांनी दिल्या. या सुविधा केंद्रांवर स्वच्छता, वीज, पाणी, वैद्यकीय सुविधा यासह प्रवाशांना आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. प्रवाशांच्या सोयीसाठी पुरेशा प्रमाणात चलत स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
*पर्यायी मार्गांची चाचपणी करून अंतर्गत रस्ते सुस्थितीत ठेवा*
महामार्गावर वाहतुकीचा भार वाढल्यास वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्गांची चाचपणी करण्यात यावी, असे मंत्री श्री.भोसले यांनी सांगितले. आवश्यकतेनुसार अंतर्गत रस्त्यांचा वापर करता यावा, यासाठी संबंधित रस्त्यांची दुरुस्ती करून ते वाहतुकीसाठी सुस्थितीत ठेवावेत. ऐन गणेशोत्सव काळात रस्त्यांची गैरसोय निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना पूर्वीच पूर्ण कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीही गणेशोत्सव काळात वाहतूक सुरळीत राहण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, अशा सूचना दिल्या. वाहतूक, रस्ते, सुरक्षितता आणि प्रवाशांच्या मूलभूत सुविधांबाबत विभागांनी परस्पर समन्वय ठेवून काम करावे, यावर त्यांनी भर दिला.
या बैठकीस शरद राजभोज, सचिव, रस्ते, श्री.शेलार,सचिव राष्ट्रीय महामार्ग
राजाराम गोसावी, मुख्य अभियंता, कोकण विभाग विवेक बडे, अधीक्षक अभियंता, रायगड, मिलिंद कुलकर्णी, अधीक्षक अभियंता रत्नागिरी, डॉ.रूपाली सातपुते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग,राष्ट्रीय महामार्ग विभागाचे संबंधित क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
0000000

*ग्रामीण भागातील समस्या सोडविण्यासाठी अभियांत्रिकी ज्ञान, तंत्रज्ञान व एआयचा वापर करा* *विद्यार्थ्यांनो केवळ नोकरी शोधणा...
03/09/2026

*ग्रामीण भागातील समस्या सोडविण्यासाठी अभियांत्रिकी ज्ञान, तंत्रज्ञान व एआयचा वापर करा*

*विद्यार्थ्यांनो केवळ नोकरी शोधणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे, नवनिर्मिती करणारे आणि समस्या सोडवणारे बना*
*–राज्यपाल जिष्णुदेव वर्मा*

रायगड-अलिबाग,दि.३(जिमाका): भारताचा विकसित राष्ट्राचा प्रवास महानगरांपुरता मर्यादित राहणार नसून तो गावांमध्ये, लहान शहरांमध्ये आणि विद्यापीठांमध्येही घडणार आहे. त्यामुळे पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या संधी शोधणारे न बनता रोजगार निर्माण करणारे, नवनिर्मिती करणारे आणि समाजाच्या समस्या सोडविणारे अभियंते बनावे. शेती, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण उपजीविकेतील प्रत्यक्ष समस्या सोडविण्यासाठी अभियांत्रिकी ज्ञान, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केले.
लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या २८ व्या दीक्षांत समारंभात राज्यपाल श्री. वर्मा बोलत होते.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, रोजगार हमी योजना मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले, महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीश कामत, कुलसचिव प्रा.अमित शेष, परीक्षा नियंत्रक डॉ.गीतांजली महामुणकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून राज्यपाल जिष्णुदेव वर्मा म्हणाले, तीव्र स्पर्धा, मोठ्या संधी आणि आव्हानांनी भरलेल्या जगात विद्यार्थी आता प्रवेश करीत आहेत. राष्ट्राची प्रगती नवनिर्मिती आणि संशोधनावर अवलंबून आहे. एखादी नवीन कल्पना शोध असू शकते; मात्र त्या कल्पनेचा उत्पादक आणि समाजोपयोगी वापर करणे म्हणजे नवनिर्मिती होय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील चांगल्या कल्पना केवळ विचार म्हणून न ठेवता त्यांचे कृतीत रूपांतर करावे, असेही ते म्हणाले.
आजच्या भारताने डिजिटल इंडिया, स्किल इंडिया, स्टार्ट-अप इंडिया, मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून युवकांना आपल्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सक्षम परिसंस्था निर्माण केली आहे. या संधींचा विद्यार्थ्यांनी उपयोग करावा. आत्मविश्वासाने आव्हानांचा सामना करावा आणि प्रश्न विचारण्यास कधीही घाबरू नये, असे आवाहनही राज्यपाल श्री.वर्मा यांनी यावेळी केले.
लोणेरे हे रायगड आणि महाड या ऐतिहासिक स्थळांच्या दरम्यान वसलेले असून, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला, तर महाड येथील चवदार तळ्यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेच्या लढ्याला प्रारंभ केला. अशा ऐतिहासिक भूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठाला लाभले आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, विद्यापीठाने उद्योग आणि समाजाच्या बदलत्या गरजांशी ताळमेळ राखत भविष्यातील गरजांचा वेध घेऊन विविध उपक्रम सुरू केले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स सेक्टर स्किल्स कौन्सिल ऑफ इंडियाच्या सहकार्याने बी.एस्सी. (ऑनर्स) इन इलेक्ट्रॉनिक्सचे अप्रेंटिसशिपयुक्त पदवी अभ्यासक्रम सुरू केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मराठी माध्यमातून तांत्रिक शिक्षण देण्याच्या विद्यापीठाच्या प्रयत्नांचे कौतुक करत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्यासाठी शिक्षणाला महत्त्व देण्यात आले आहे. मातृभाषेतील शिक्षण, आंतरविद्याशाखीय अध्ययन, संशोधन आणि नवनिर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या या धोरणाची अंमलबजावणी करण्यामध्ये विद्यापीठ अग्रणी असल्याचे त्यांनी सांगितले.
पदवी ही केवळ विद्यार्थ्यांनी काय शिकले याचे प्रमाणपत्र नसून भविष्यात समाजाला काय योगदान देणार आहेत, याची जबाबदारी आहे. ग्रामीण महाराष्ट्रातून आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरातील प्रत्यक्ष समस्या ओळखून त्यावर तंत्रज्ञानाधारित उपाय शोधावेत. जागतिक पातळीवर विचार करताना आपल्या समाजाच्या गरजा कधीही विसरू नयेत. विकसित भारत २०४७ साकारण्यात अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या गावाशी, शहराशी आणि ज्या समाजाच्या आकांक्षा घेऊन ते पुढे आले आहेत, त्या समाजाशी नाते कायम ठेवावे, असे आवाहनही राज्यपाल श्री.वर्मा यांनी केले.
राज्यपालांनी विद्यार्थ्यांना नशामुक्त भारतासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. अमली पदार्थांच्या व्यसनातून मित्र आणि सभोवतालच्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत. युवकांची ऊर्जा सकारात्मक दिशेने वळवून समाज आणि राष्ट्राच्या विकासासाठी तिचा उपयोग करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठ परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला असून लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही उभारला जाणार आहे. हे दोन्ही पुतळे धैर्य आणि न्यायाची प्रेरणा देत विद्यार्थ्यांना समाजासाठी मोठे योगदान देण्याची आठवण करून देतील, असे त्यांनी नमूद केले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, काही कारणांमुळे गेल्या दोन-तीन वर्षांत विद्यापीठातील परीक्षांचे निकाल जाहीर होण्यास विलंब झाला. मात्र, रात्रंदिवस काम करून निकालांचा बॅकलॉग मोठ्या प्रमाणात दूर केला असून, उर्वरित कामही लवकरच पूर्ण करण्यात येईल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी यापुढे निकाल जाहीर झाल्यानंतर तात्काळ पदवी प्रमाणपत्र तयार होऊन ते ‘डिजी लॉकर’मध्ये उपलब्ध होईल. विद्यापीठातील प्राध्यापकांसह रिक्त पदे पुढील तीन महिन्यांत भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. तसेच प्रलंबित निधी, कंपाऊंडसह आवश्यक पायाभूत सुविधा आणि अन्य प्रशासकीय अडचणी दूर करण्यासाठी शासनस्तरावर कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
विद्यापीठातील इनक्युबेशन सेंटरला चालना देऊन विद्यार्थ्यांच्या स्टार्टअप्सना सीड कॅपिटल उपलब्ध करून देण्यात येईल. एकल मातांच्या मुला-मुलींना शिक्षणासाठी विशेष पॅकेज देण्याचा प्रयत्न सुरू असून, व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये मुलींचा सहभाग वाढविण्यावरही भर दिला जाईल. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी विद्यापीठाची निवड झाली असून, ३५ देशांचे प्रतिनिधी परिषदेला उपस्थित राहणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी विद्यापीठासाठी जमीन दिलेल्या प्रकल्पग्रस्त कुटुंबांच्या प्रलंबित नोकरीच्या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेऊन त्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच विद्यापीठाच्या परिसराला संरक्षक भिंत उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी दीक्षांत समारंभ हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि सुवर्णक्षण असल्याचे सांगत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या विकासासाठी उपलब्ध ८०० एकरांहून अधिक जागेचा आणि सुविधांचा अधिकाधिक उपयोग करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. विद्यापीठातील विद्यार्थ्यांना यापुढे निकाल व पदवी मिळण्यासाठी विलंब होऊ नये, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन बैठका घेतल्याबद्दल त्यांनी त्यांचे विशेष आभार मानले. तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागातील शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी संयुक्त प्रशिक्षण केंद्र या परिसरात उभारण्याचा प्रस्ताव असून, त्यादृष्टीने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
कुलगुरू प्रा. राजनिश कामत यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. तंत्रज्ञान व अभियांत्रिकी शिक्षणासोबत संशोधन, नवोपक्रम आणि उद्योगाभिमुख कौशल्यविकासाला विद्यापीठाच्या माध्यमातून प्राधान्य देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
दीक्षांत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आणि ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ तथा शिक्षणतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.
कार्यक्रमास विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
*******

*अचूक मतदार यादीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे-जिल्हाधिकारी किशन जावळे**प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध; नावांबाबत हरकती व दा...
01/09/2026

*अचूक मतदार यादीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे-जिल्हाधिकारी किशन जावळे*

*प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध; नावांबाबत हरकती व दावे असल्यास सादर करावेत*

रायगड-अलिबाग,(जिमाका)दि.01:- विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (SIR 2026) प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी नागरिकांनी प्रारुप मतदार यादी तपासून आवश्यक असल्यास विहित मुदतीत दावे व हरकती सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) नितीन वाघमारे उपस्थित होते.

मा.भारत निवडणूक आयोग यांच्याकडील निर्देशानुसार राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघात दिनांक 01 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमाच्या सुधारीत वेळापत्रकानुसार सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांच्यामार्फत अंमलबजावणी पार पाडण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे सुधारीत वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :-मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण/पुनर्रचना, सुधारीत वेळापत्रक, दि.24 ऑगस्ट 2026, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी सुधारीत वेळापत्रक, दि.31 ऑगस्ट 2026, दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी सुधारीत वेळापत्रक, दि.31 ऑगस्ट 2026 ते दि.30 सप्टेंबर 2026 . नोटीस टप्पा/दावे व हरकती निकालात काढणे सुधारीत वेळापत्रक, दि.31 ऑगस्ट 2026 ते दि.29 ऑक्टोबर 2026 . अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्दी दि.4 नोव्हेंबर 2026.

त्या अनुषंगाने जिल्हयातील 7 विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र ठिकाणी/पदनिर्देशित ठिकाणी मतदार नोंदणी अधिकारी यांच्यामार्फत सोमवार दिनांक 31 ऑगस्ट, 2026 रोजी यादीभाग निहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यामध्ये digitization नंतर 19 लाख 49 हजार 341 इतके मतदार आढळून आलेले आहेत. त्याचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.

188 पनवेल विधानसभा मतदार संघात एकूण मतदान केंद्रे 545, एकूण मतदार 6 लाख 84 हजार 095, गणना प्रपत्राचे डिजीटायझेशन झालेले मतदार 4 लाख 566, गणना प्रपत्राचे संकलन करता आले नाही असे मतदार 2 लाख 83 हजार 356, मॅप न झालेले मतदार 89 हजार 174, अनॉमाली 61 हजार 100.

189 कर्जत विधानसभा मतदार संघात एकूण मतदान केंद्रे 362, एकूण मतदार 3 लाख 19 हजार 337, गणना प्रपत्राचे डिजीटायझेशन झालेले मतदार 2 लाख 57 हजार 442, गणना प्रपत्राचे संकलन करता आले नाही असे मतदार 61 हजार 881, मॅप न झालेले मतदार 15 हजार 791, अनॉमाली 17 हजार 497.

190 उरण विधानसभा मतदार संघात एकूण मतदान केंद्रे 352, एकूण मतदार 3 लाख 57 हजार 255, गणना प्रपत्राचे डिजीटायझेशन झालेले मतदार 2 लाख 72 हजार 772, गणना प्रपत्राचे संकलन करता आले नाही असे मतदार 84 हजार 416, मॅप न झालेले मतदार 37 हजार 227, अनॉमाली 21 हजार 419.

191 पेण विधानसभा मतदार संघात एकूण मतदान केंद्रे 378, एकूण मतदार 3 लाख 5 हजार 343, गणना प्रपत्राचे डिजीटायझेशन झालेले मतदार 2 लाख 68 हजार 217, गणना प्रपत्राचे संकलन करता आले नाही असे मतदार 37 हजार 122, मॅप न झालेले मतदार 13 हजार 715, अनॉमाली 16 हजार 666.

192 अलिबाग विधानसभा मतदार संघात एकूण मतदान केंद्रे 373, एकूण मतदार 3 लाख 9 हजार 580, गणना प्रपत्राचे डिजीटायझेशन झालेले मतदार 2 लाख 66 हजार 800, गणना प्रपत्राचे संकलन करता आले नाही असे मतदार 42 हजार 760, मॅप न झालेले मतदार 18 हजार 925, अनॉमाली 23 हजार 798.

193 श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात एकूण मतदान केंद्रे 345, एकूण मतदार 3 लाख 62 हजार 680, गणना प्रपत्राचे डिजीटायझेशन झालेले मतदार 2 लाख 33 हजार 564, गणना प्रपत्राचे संकलन करता आले नाही असे मतदार 29 हजार 115, मॅप न झालेले मतदार 10 हजार 775, अनॉमाली 14 हजार 85.

194 महाड विधानसभा मतदार संघात एकूण मतदान केंद्रे 392, एकूण मतदार 2 लाख 95 हजार 449, गणना प्रपत्राचे डिजीटायझेशन झालेले मतदार 2 लाख 49 हजार 980, गणना प्रपत्राचे संकलन करता आले नाही असे मतदार 45 हजार 468, मॅप न झालेले मतदार 12 हजार 734, अनॉमाली 29 हजार 698.

असे एकूण मतदान केंद्रे 2 हजार 747, एकूण मतदार 25 लाख 33 हजार 739, गणना प्रपत्राचे डिजीटायझेशन झालेले मतदार 19 लाख 49 हजार 341, गणना प्रपत्राचे संकलन करता आले नाही असे मतदार 5 लाख 84 हजार 118, मॅप न झालेले मतदार 1 लाख 98 हजार 341, अनॉमाली 1 लाख 84 हजार 263.

ज्या पात्र मतदारांची नावे वर नमूद प्रारुप मतदार यादीमध्ये आढळून येणार नाही किंवा जे नव मतदार असतील त्यांना दावे व हरकती दिनांक 31 ऑगस्ट 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे दाखल करता येतील. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना 6 (त्यासोबतच्या घोषणापत्र व आवश्यक कागदपत्रासह) भरण्याची सुविधा उपलब्ध राहील. मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडून सदर अर्जाची पडताळणी करुन पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात येतील. या एका महिन्याच्या कालावधीत (दावे व हरकतीचा कालावधी) मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी संबंधित मतदार अनुक्रमे नमुना 6 किंवा नमुना 8 भरु शकेल. तसेच संबंधित मतदार संघातील कोणताही मतदार सदर यादीतील कोणतीही नोंद वगळण्यासाठी नमुना 7 भरुन हरकती घेऊ शकेल. राजकीय पक्षांना प्राप्त दावे व हरकतींची यादी प्रत्येक आठवडयास उपलब्ध करुन देण्यात येतील.

मतदार नोंदणी अधिकारी/सहायक मतदान नोंदणी अधिकारी हे मतदारांनी केलेल्या दावे व हरकतीची सुनावणी दि.31 ऑगस्ट 2026 ते दि.29 ऑक्टोबर 2026 या कालावधीत घेऊन दावे व हरकतींवर निर्णय घेतील.

अंतिम मतदार यादी दिनांक 04 नोव्हेंबर, 2026 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. मतदार नोंदणी अधिकारी यांच्या निर्णयाविरुध्द प्रसिध्दी दिनांकपासून 15 दिवसाचे आत लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 मधील नियम 24 अंतर्गत अपीलीय अधिकारी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, रायगड यांच्याकडे स्वतः हजर राहून अपिल अर्ज दाखल करण्याबाबतची तरतूद आहे. तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, रायगड यांच्या निर्णयाविरूध्द मा.मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, रायगड यांच्या निर्णयाचे दिनांकापासून 15 दिवसांचे आंत अंतिम अपील करू दाखल करू शकतात.

मतदार यादीच्या अनुषंगाने नाव समाविष्ट करणे, सुधारणा करणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करताना चुकीची घोषणा / विधान केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 च्या कलम 31 नुसार संबंधित व्यक्ती 1वर्षापर्यतची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही यांना पात्र ठरते याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.

0000000

महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानाचे आयोजन रायगड-अलिबाग,(जिमाका)दि.31:- समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत  न्याय आ...
31/08/2026

महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानाचे आयोजन



रायगड-अलिबाग,(जिमाका)दि.31:- समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत न्याय आणि हक्क पोहोचवणे हे क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या विचारांचे मूळ सूत्र होते. शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेले काम अमिट आहे. त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून महसूल विभागांतर्गत प्रलंबित असलेली अर्धन्यायिक प्रकरणे जलद गतीने व तडजोडीने निपटारा करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार दि.1 सप्टेंबर 2026 ते दि 31 मार्च 2027 या कालावधीत महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी दिली

महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभाग यांच्याकडील 13 ऑगस्ट 2026 चे शासन निर्णयानुसार राज्यात महसूल प्रशासनातील मंडळ अधिकारी, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये जमिनींशी संबंधित महसूली दावे मोठया प्रमाणावर दाखल होतात. प्रकरणांमध्ये एका स्तरावर निकाल लागल्यानंतर असंतुष्ट पक्षकार वरिष्ठ न्यायालयात पुन्हा अपील अथवा पुनरीक्षण अर्ज दाखल करतात, ज्यामुळे हे दावे वर्षानुवर्षे सुरु राहतात, विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविल्या जाणाऱ्या लोक अदालत धर्तीवर दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने व तडजोडीने हे महसूली दावे कायमस्वरुपी निकाली काढल्यास अर्धन्यायिक यंत्रणेवरील ताण कमी होऊन पक्षकारांची वेळेची व पैशांची बचत होईल तहसिलदार, उपविभागीय अधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांचा महसूल लोक अदालत कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे

अपर जिल्हाधिकारी

महसूल अदालतीचे ठिकाण- अलिबाग तालुका अपर जिल्हाधिकारी कार्यालय,अलिबाग, अंतर्गत येणारे तालुके अलिबाग, मुरुड, पेण, महसूल अदालत दिनाक दि.05 ऑक्टोबर ते दि.07 डिसेंबर 2026. महसूल अदालतीचे ठिकाण- माणगाव तालुका उपविभागीय अधिकारी कार्यालय माणगाव, अंतर्गत येणारे तालुके माणगाव, तळा,महाड, पोलादपूर, महसूल अदालत दिनाक दि.06 ऑक्टोबर ते दि.08 डिसेंबर 2026. महसूल अदालतीचे ठिकाण- पनवेल तालुका अपर तहसिलदार कार्यालय पनवेल, अंतर्गत येणारे तालुके पनवेल, उरण, कर्जत, खालपूर, महसूल अदालत दिनाक दि.09 ऑक्टोबर ते दि.11 डिसेंबर 2026.

उपविभागीय अधिकारी

महसूल अदालतीचे ठिकाण- अलिबाग तालुका उपविभागीय अधिकारी कार्यालय,अलिबाग, अंतर्गत येणारे तालुके अलिबाग, मुरुड, महसूल अदालत दिनाक दि.05 ऑक्टोबर ते दि.07 डिसेंबर 2026. महसूल अदालतीचे ठिकाण- पेण तालुका उपविभागीय अधिकारी कार्यालय,पेण, अंतर्गत येणारे तालुके पेण, महसूल अदालत दिनाक दि.05ऑक्टोबर ते दि.07 डिसेंबर 2026. महसूल अदालतीचे ठिकाण-रोहा तालुका उपविभागीय अधिकारी कार्यालय,रोहा, अंतर्गत येणारे तालुके रोहा, सुधागड, महसूल अदालत दिनाक दि.05 ऑक्टोबर ते दि.07 डिसेंबर 2026. महसूल अदालतीचे ठिकाण- श्रीवर्धन तालुका उपविभागीय अधिकारी कार्यालय,श्रीवर्धन, अंतर्गत येणारे तालुके श्रीवर्धन, म्हसळा, महसूल अदालत दिनाक दि.05 ऑक्टोबर ते दि.07 डिसेंबर 2026. महसूल अदालतीचे ठिकाण- पनवेल तालुका उपविभागीय अधिकारी कार्यालय,पनवेल, अंतर्गत येणारे तालुके पनवेल, उरण, महसूल अदालत दिनाक दि.05 ऑक्टोबर ते दि.07 डिसेंबर 2026. दि.06 ऑक्टोबर ते दि.08 डिसेंबर 2026. महसूल अदालतीचे ठिकाण- कर्जत तालुका उपविभागीय अधिकारी कार्यालय,कर्जत, अंतर्गत येणारे तालुके कर्जत, खालापूर, महसूल अदालत दिनाक दि.05 ऑक्टोबर ते दि.07 डिसेंबर 2026. महसूल अदालतीचे ठिकाण- माणगाव तालुका उपविभागीय अधिकारी कार्यालय,माणगाव, अंतर्गत येणारे तालुके माणगाव, तळा, महसूल अदालत दिनाक दि.05 ऑक्टोबर ते दि.07 डिसेंबर 2026. महसूल अदालतीचे ठिकाण- महाड तालुका उपविभागीय अधिकारी कार्यालय,महाड, अंतर्गत येणारे तालुके महाड, पोलादपूर, महसूल अदालत दिनाक दि.05 ऑक्टोबर ते दि.07 डिसेंबर 2026.

तहसिलदार

महसूल अदालतीचे ठिकाण- तहसिलदार अलिबाग, तहसिलदार मुरुड, तहसिलदार पेण, तहसिलदार पनवेल, अपर तहसिलदार पनवेल, तहसिलदार उरण, तहसिलदार कर्जत, तहसिलदार खालापूर, तहसिलदार रोहा, तहसिलदार सुधागड, तहसिलदार माणगाव, तहसिलदार तळा, तहसिलदार महाड, तहसिलदार पोलादपूर, तहसिलदार श्रीवर्धन, तहसिलदार म्हसळा, अपर तहसिलदार माणगाव, सर्व तहसिल कार्यालयांकरिता महसूल अदालत दिनाक दि.05 ऑक्टोबर ते दि.07 डिसेंबर 2026 असा आहे.

000

*खारघर मध्ये मतदार पडताळणी प्रपत्रांची अनधिकृत झेरॉक्स काढल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल;**५ बीएलओंवर निलंबनाची कारवाई प्...
28/08/2026

*खारघर मध्ये मतदार पडताळणी प्रपत्रांची अनधिकृत झेरॉक्स काढल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल;*

*५ बीएलओंवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित*

​रायगड-अलिबाग, दि.२८ (जिमाका): १८८-पनवेल विधानसभा मतदारसंघातील मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ अंतर्गत अत्यंत गोपनीय व महत्त्वाची असलेली निवडणूक आयोगाची गणना प्रपत्रे (Enumeration Forms) बेकायदेशीररीत्या ताब्यात बाळगून त्यांची झेरॉक्स काढल्याचा धक्कादायक प्रकार खारघर परिसरात उघडकीस आला आहे. या गंभीर प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित ५ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) तत्काळ निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
​दि.२७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५:३० च्या सुमारास खारघर सेक्टर १९ येथील एका झेरॉक्स सेंटरवर निवडणूक आयोगाच्या अधिकृत गणना प्रपत्रांची अनधिकृतपणे झेरॉक्स प्रत काढली जात असल्याची तक्रार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख श्री. प्रसाद दादा भोईर यांनी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे केली होती.
​या तक्रारीची गंभीर दखल घेत सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी तत्काळ त्या झेरॉक्स सेंटरवर जाऊन प्राथमिक चौकशी केली. त्यावेळी मुर्बी गाव (खारघर) येथील रहिवासी श्री. सूरज पाटील हे सदर प्रपत्रांची झेरॉक्स काढत असल्याचे रंगेहात आढळून आले. तपासणीदरम्यान घटनास्थळी एकूण ३,४०० गणना प्रपत्रे आढळून आली. ही प्रपत्रे एकूण ११ मतदान केंद्रांशी संबंधित होती; त्यापैकी ५ मतदान केंद्रांची १०० पेक्षा जास्त प्रपत्रे होती, तर उर्वरित ६ मतदान केंद्रांचे प्रत्येकी एक प्रपत्र असल्याचे समोर आले.
​निवडणूक नियमांनुसार मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडेच असणे बंधनकारक असलेली ही संवेदनशील कागदपत्रे अनधिकृतपणे बाळगणे आणि त्यांची झेरॉक्स काढणे कायद्याचे थेट उल्लंघन असल्याने श्री. सूरज पाटील यांच्याविरुद्ध खारघर पोलीस ठाण्यात प्रथम खबर अहवाल (FIR) क्र. ०४०९/२६ अन्वये भारतीय लोकप्रतिनिधित्व अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
​तसेच ज्या ५ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या दप्तरामधून ही जास्तीची प्रपत्रे बाहेर गेली, त्या बीएलओंना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, नियुक्ती प्राधिकारी तथा पनवेल महानगरपालिका आयुक्त यांना भारतीय लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम ३२ मधील तरतुदींनुसार या सर्व पाचही बीएलओंना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (क्र. ३) श्री. नानासाहेब कामठे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील पोलीस तपास युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.
000000000

28/08/2026

खारघर येथे घडलेल्या SIR गणनापत्र झेरॉक्स प्रकरणी रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे स्पष्टीकरण....

27/08/2026
27/08/2026

#रायगड जिल्ह्यातील जय गिरनारी शिवदत्त मंदिर ट्रस्टच्या वतीने नेपाळ येथे दर्शन व पर्यटनासाठी गेलेले ३७ नागरिक सध्या सागा (चीन) येथे सुरक्षित आहेत. सर्वांची प्रकृती ठीक असून, त्यांच्यामध्ये दोन डॉक्टरही आहेत.
मा. पालकमंत्री, मा. जिल्हाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष या नागरिकांच्या सतत संपर्कात असून, त्यांना आवश्यक मदत पोहोचविण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.

*मुंबई-गोवा महामार्गाची पालकमंत्री भरत गोगावले यांच्याकडून पाहणी**चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी अडचणींच्या ठिकाण...
27/08/2026

*मुंबई-गोवा महामार्गाची पालकमंत्री भरत गोगावले यांच्याकडून पाहणी*
*चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी अडचणींच्या ठिकाणी*
*तातडीने उपाययोजना करा*

रायगड, दि. २७ (जिमाका) : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास चाकरमान्यांसाठी सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यासाठी महामार्गावरील खड्डे आणि इतर अडचणी तातडीने दूर करण्याच्या सूचना पालकमंत्री भरत गोगावले यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

महामार्गावरील अडचणींची केवळ कार्यालयीन माहिती न घेता प्रत्यक्ष पाहणी करून त्याच ठिकाणी उपाययोजनांबाबत निर्देश त्यांनी यावेळी दिले.
पनवेल-पळस्पे येथून मुंबई-गोवा महामार्गाच्या पाहणी दौऱ्यास पालकमंत्री श्री. गोगावले यांनी प्रारंभ केला. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, प्रांताधिकारी प्रविण पवार तसेच राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम आणि जिल्ह्यातील संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. गोगावले म्हणाले की, ज्या-ज्या ठिकाणी अडचण दिसत आहे, त्या ठिकाणी थांबून प्रत्यक्ष पाहणी करण्यात येत आहे. एका ठिकाणी सुरू असलेले काम पुढील तीन-चार दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग कमी होऊन पुढे वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे खड्डे आणि रस्त्याशी संबंधित अडचणी राहता कामा नयेत, यासाठी संबंधित यंत्रणांनी वेगाने काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
*गणेशोत्सवातील वाहतूक व्यवस्थेला प्राधान्य*
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी ये-जा करतात. रायगडसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि इतर भागांकडे जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुरळीत व्हावा, ही प्रमुख जबाबदारी लक्षात घेऊन महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला जात आहे. महामार्गावरील प्रत्येक अडचणीच्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करून वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, असेही पालकमंत्री श्री. गोगावले म्हणाले.
गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शांतता समितीची बैठकही घेण्यात आली असून, त्यानंतर सर्व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत माणगावपर्यंत महामार्गाची पाहणी करण्यात येत आहे. या मार्गावरील अडचणींची प्रत्यक्ष पाहणी करून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

*वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांचे कौतुक*
गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक कोंडी नियंत्रणात ठेवण्याची मोठी जबाबदारी पोलिसांवर असते. वादविवाद, गर्दी आणि वाहतूक कोंडी अशा विविध परिस्थितींमध्ये पोलीस दलाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे पालकमंत्री श्री. गोगावले यांनी कौतुक केले. काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे योग्य वेळी कौतुक करणे गरजेचे आहे, असे सांगत रायगड पोलिसांच्या कार्याचे त्यांनी अभिनंदन केले.
*******

गणेशोत्सव काळात वीज, पाणी, वाहतूक व सुरक्षेच्या उपाययोजना काटेकोरपणे राबवा                                              ...
27/08/2026

गणेशोत्सव काळात वीज, पाणी, वाहतूक व सुरक्षेच्या उपाययोजना काटेकोरपणे राबवा
--पालकमंत्री भरतशेठ गोगावले

रायगड-अलिबाग,(जिमाका)दि.27:-गणेशोत्सवाच्याआनंदात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी वीज पुरवठ्यापासून वाहतूक व्यवस्थेपर्यंत आणि सुरक्षेपासून आपत्कालीन मदतीपर्यंत प्रत्येक बाबीचे सूक्ष्म नियोजन करावे. दहीहंडीच्या आयोजनात सुरक्षेच्या उपाययोजनांची पूर्तता झाल्याशिवाय परवानगी देऊ नये तर मुंबई-गोवा महामार्गावर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्ग, दिशादर्शक फलक, रुग्णवाहिका व क्रेनची व्यवस्था सक्षम ठेवण्याच्या सुचना पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिल्या.
जिल्हा नियेाजन भवन सभागृहात गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे, आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सुर्यवंशी, तहसिलदार चंद्रसेन पवार आदि उपस्थित होते.
पालकमंत्री भरतशेठ गोगावले म्हणाले, गणेशोत्सव काळात नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी पूर्ण ठेवावी. आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक ती व्यवस्था करावी. गणेशोत्सव काळामध्ये नागरिकांना पुरेशा प्रमाणात वीज, मुबलक प्रमाणात पाणी तसेच वाहतूक व सुरक्षिततेच्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यात याव्यात. गणेशोत्सव, दहीहंडी आणि त्यानंतरचा नवरात्रोत्सव सुरळीत पार पडण्यासाठी सर्वांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांची माहिती नागरिकांना स्पष्टपणे मिळावी, यासाठी योग्य ठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत. इंदापूर, माणगाव, लोणेरे, पोलादपूर आदी भागातील पर्यायी मार्गांचा वापर करताना आवश्यक ठिकाणी वाहतूक मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे. एखादे वाहन बिघडल्यास ते तातडीने बाजूला काढण्यासाठी क्रेनची व्यवस्था आणि टप्प्याटप्प्याने रुग्णवाहिका उपलब्ध ठेवाव्यात. प्रवाशांसाठी पाणी, चहा-पाणी तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी ठेवावी, असे निर्देशही पालकमंत्री श्री. गोगावले यांनी दिले.
महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या, शांतता समितीच्या सदस्यांचे पुढील तीन दिवसांत पोलीस व्हेरिफिकेशन पूर्ण करून त्यांना आवश्यक ओळखपत्रे देण्यात यावीत. जिल्ह्यातील स्थानिक खासगी रेस्क्यू टीम्सशी जिल्हाधिकारी तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी समन्वय साधावा. आपत्कालीन परिस्थितीत शासकीय यंत्रणा पोहोचण्यापूर्वी या स्थानिक रेस्क्यू टीम्स महत्त्वाची मदत करतात, त्यामुळे सणासुदीच्या काळात त्यांची मदत उपलब्ध होईल, अशा पद्धतीने पूर्वसमन्वय ठेवावा, असेही त्यांनी सांगितले.
वाहतूक कोंडीच्या ठिकाणी सुविधा केंद्रांची संख्या आवश्यकतेनुसार वाढवावी आणि ज्या ठिकाणी हॉटेल, रेस्टॉरंट किंवा सार्वजनिक शौचालयाची सुविधा उपलब्ध नाही, अशा ठिकाणी तात्पुरती सार्वजनिक शौचालये उपलब्ध करून द्यावीत. दोन-तीन तास वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक व अन्य प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी. दहीहंडी उत्सवासाठी परवानगी देताना सुरक्षेच्या उपाययोजना, विशेषतः सेफ्टी बेल्टची उपलब्धता ही अनिवार्य अट ठेवावी आणि ती पूर्ण केल्याशिवाय परवानगी देऊ नये. वाहतूक वळविण्यात येणाऱ्या प्रत्येक ठिकाणी पोलीस अथवा सुरक्षा कर्मचारी तैनात करावेत, जेणेकरून रायगडबाहेरील प्रवाशांनाही योग्य मार्गदर्शन मिळेल, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बंदोबस्तासाठी 7 पोलीस उपनिरीक्षक, 128 पोलीस अधिकारी, 1 हजार 900 पोलीस अंमलदार, 400 होमगार्ड तसेच एसआरपीएफची 1 कंपनी तैनात करण्यात येणार आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी 25 मोटारसायकल, 20 टोईंग क्रेन आणि 20 रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आतापर्यंत 36 शांतता समिती बैठका, 30 मोहल्ला समिती बैठका, 137 गणेश मंडळांच्या बैठका आणि 125 गावबैठका घेण्यात आल्या आहेत.
गणेशभक्त व प्रवाशांच्या सोयीसाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा, खारेपाटण, वाकण, कोलाड, इंदापूर, माणगाव, लोणेरे, महाड, महाड एमआयडीसी आणि पोलादपूर या ठिकाणी सुविधा केंद्रे उभारण्यात येणार आहेत. या केंद्रांवर पिण्याचे पाणी, वैद्यकीय कक्ष, पोलीस मदत कक्ष, महिला व बालकांसाठी आवश्यक सुविधा, वाहन विश्रांतीची व्यवस्था तसेच टायरमध्ये हवा भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.
बैठकीस सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार तसेच विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी, शांतता समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
00000

Address

District Collector’s Office, At/PO – Alibag, District – Raigad
Alibag
402201

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+912141222001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Collector Raigad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Collector Raigad:

Shortcuts

Share