25/07/2026
*अमरावतीच्या विकासावर अजितदादांचे प्रतिबिंब उमटले - आ.संजय खोडके*
*अमरावती मधील महाराजस्व अभियान व समाधान शिबिराला लाभार्थी नागरिकांचा उत्फुर्त प्रतिसाद*
*आ.सौ. सुलभाताई खोडके व आ.संजय खोडके यांच्या हस्ते लाभार्थींना प्रमाणपत्र व दाखल्याचे वाटप*
*अमरावती( प्रतिनिधी ) दिनांक - २५ जुलै सरकार मध्ये राहून लोकनेता अजितदादा पवार यांनी समाज विकासाचे व लोकहिताचे जे काही निर्णय घेतले, जी धोरणे ठरविली , ज्या योजना राबविल्या, त्या सर्वांचा अमरावती शहराला पुरेपूर लाभ मिळाला. अमरावती विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी अजितदादा पवार यांनी वेगवेगळ्या क्षेत्राकरिता भरभरून निधी दिल्याने अमरावती शहराच्या शाश्वत विकासाला बळकटी मिळाली आहे. अमरावतीच्या विकासावर अजितदादा पवार यांचे प्रतिबिंब उमटले असून विकासाच्या प्रत्येक पाऊलावर दादांची आठवण आल्या शिवाय राहत नाही. अमरावती शहराला महानगराच्या धर्तीवर नवी ओळख व लौकिक मिळावा यासाठी पुढेही निधी कमी पडू देणार नाही,असा अजितदादांचा वादा होता. हा वादा आता माननीय मुख्यमंत्री- देवेन्द्रजी फडणवीस व जिल्ह्याचे पालकमंत्री - नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे पुढे नेत आहे. असे प्रतिपादन विधान परिषद आमदार - संजय खोडके यांनी केले.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेन्द्रजी फडणवीस यांच्या वाढदिवस व दिवंगत उपमुख्यमंत्री लोकनेता अजितदादा पवार यांच्या जयंती प्रित्यर्थ आयोजित जनसेवा सप्ताह अंतर्गत आज शनिवार दिनांक २५ जुलै २०२६ रोजी महाराजस्व अभियान व समाधान शिबीर स्थानिक श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन,मोर्शी रोड,अमरावती येथे राबविण्यात आले.
शासकीय सेवा नागरिकांपर्यंत पोहोचून देण्यासाठी राज्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबविण्यात येत असल्याने यावेळी आमदार महोदय व मान्यवरांच्या हस्ते लाभार्थी नागरिकांना विविध योजनांचे प्रमाणपत्र व दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
पुढे बोलतांना आ. संजय खोडके म्हणाले कि, लोकाभिमुख शासन व गतिमान प्रशासन या भावनेतून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाच्या वतीने महाराजस्व अभियान राबविण्यात येत आहे. आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांची संख्या पाहता खरोखर प्रशासन चांगले काम करत असल्याचा प्रत्यय घडून येत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या समन्वयातून पुढे सुद्धा लोकाभिमुख विकासासाठी काम करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास आमदार संजय खोडके यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्याचे सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहिलेले दिवंगत लोकनेते - अजित दादा पवार यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या कार्यकर्तृत्वावर आधारित यावेळी ध्वनिचित्रफीत दाखवण्यात आली. व त्या माध्यमातून स्वर्गीय अजित दादांचे योगदान हे महाराष्ट्र घडवणारे आहे. सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यात दादांनी उजेड निर्माण करण्याचे काम सातत्याने केलेले आहे त्यामुळे दादांप्रती कृतज्ञता व्यक्त करत यावेळी सर्व उपस्थितांनी दोन मिनिटे मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण केली.
दरम्यान या महाराजस्व अभियान व समाधान शिबिरामध्ये आरोग्य सुविधा व योजना शिबीर, राशन कार्ड शिबीर, महसूल कागदपत्रे व दाखले वितरण, कामगार योजना शिबीर, रमाई आवास योजना व प्रधानमंत्री आवास योजना शिबीर, एस.टी. महामंडळ सवलतीच्या दरात प्रवासासाठी एन.सी. एम.सी. कार्ड शिबीर, आधार कार्ड केंद्र, पीआर कार्ड वाटप, पट्टे वाटप, सारथी,बार्टी, आर्टी योजना , समाज कल्याण विभाग योजना, दिव्यांग कल्याण योजना, अशा विविध योजनांचे स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी आमदार- सौ. सुलभाताई खोडके , आमदार संजय खोडके यांनी शिबिरांना भेट देऊन लाभार्थ्यांचा उत्साह वाढविला. तत्पूर्वी महाराजस्व शिबिरात मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांची शुभेच्छा चित्रफीत, लोकनेता दिवंगत अजितदादा पवार यांच्या स्मृतींना उजाळा देणारी चित्रफीत तसेच पालकमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामकाजाबद्दल माहिती दर्शविणारी चित्रफीत दाखविण्यात आली. यावेळी आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी सर्व लाभार्थीचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देत प्रमाणपत्राचे वाटप केले. आपल्या प्रास्ताविकामधे उपविभागीय अधिकारी - अनिल भटकर यांनी महाराजस्व अभियान आयोजनामागची रूपरेषा व्यक्त केली.सूत्रसंचालन - श्रीकृष्ण पखाले समाज कल्याण विभाग अमरावती आणि आभार प्रदर्शन नायब तहसीलदार - श्रीकृष्ण गाडेकर यांनी केले.
यावेळी अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई खोडके , विधानपरिषद आमदार संजय खोडके यांच्या समवेत यश सुलभा संजय खोडके,मनपा आयुक्त मंगेश गोदावले, अमरावती उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी महसूल विवेक जाधव, उपजिल्हाधिकारी निवडणूक शिवाजी शिंदे, अमरावती तहसीलदार विजय लोखंडे, सहायक आयुक्त समाजकल्याण राजेंद्र जाधवर, मनपा स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, महिला बाल कल्याण सभापती ममता संदीप आवारे, नगरसेवक चंद्रकांत उर्फ चंदू खेडकर, प्रशांत उर्फ गुड्डू धर्माळे, मीनल योगेश सवाई, उपायुक्त मनपा नरेंद्र वानखडे, उपायुक्त मनपा भाग्यश्री बोरेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे, शहरी अन्न व पुरवठा अधिकारी प्रवीण राऊत, अमरावती नायब तहसीलदार कृष्णा गाडेकर , टिना चव्हाण, माजी महापौर सौ. रिनाताई नंदा आदींसह महसूल, कामगार विभाग , आरोग्य, एस.टी. महामंडळ, रोजगार हमी योजना, संजय गांधी निराधार योजना, समाज कल्याण विभाग रमाई आवास, पीएम आवास, भूमी अभिलेख विभाग, आदींचे विभागप्रमुख तसेच अधिकारी व कर्मचारी तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरात एकूण २,५०० लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यात आले.