04/10/2025
अमरावती युवक काँग्रेस विभागीय आढावा बैठकीत शेतकरी, बेरोजगारी आणि वोट चोरी विरोधात ठराव; स्थानिक निवडणुकांसाठी रणनीती;पोलिस आयुक्तांना निवेदन तसेच भव्य बाईक रॅलीचे आयोजन.
भारतीय युवक काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी मा. अजयजी छिकारा आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराजदादा मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अमरावती विभागाची आढावा बैठक यशस्वीपणे पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, वाढती बेरोजगारी, वोट चोरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांना तातडीने जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याचा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला.
देशात आणि महाराष्ट्रात वाढत्या बेरोजगारीच्या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.तसेच, वोट चोरी विरोधात जनजागृती करण्यासाठी आणि या “वोट चोर” सरकारविरुद्ध जनमत निर्माण करण्यासाठी अमरावती युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष निलेश गुहे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन काळे आणि एन.एस.यू.आय. जिल्हाध्यक्ष संकेत कुलट यांच्या नेतृत्वाखाली भव्य बाईक रॅलीचे आयोजन देखील करण्यात आले होते.
न्यूज18 केरळवरील थेट प्रक्षेपणात भाजप प्रवक्त्याने माननीय विरोधी पक्षनेते श्री. राहुल गांधी यांच्याविरुद्ध उघडपणे दिलेल्या मृत्यूच्या धमकीबाबत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.यासंदर्भात तातडीने गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाईची मागणी करणारे निवेदन पोलिस आयुक्तांना सादर करण्यात आले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भात रणनीती आखण्यात आली. संघटनेची वाढ आणि कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग यावर विशेष भर देण्याचा निर्णय घेण्यात आला.