जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती

  • Home
  • India
  • Amravati
  • जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती

जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती Official page of District Information Office, Amravati

आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहांसाठी भाडेतत्वावर इमारत उपलब्ध करूण देण्याचे आवाहन        अमरावती, दि. 1 (जिमाका) : प्र...
01/09/2026

आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहांसाठी भाडेतत्वावर इमारत उपलब्ध करूण देण्याचे आवाहन

अमरावती, दि. 1 (जिमाका) : प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी अंतर्गत अमरावती शहरातील आदिवासी मुलांच्या तीन वसतिगृहांच्या मंजूर क्षमतेमध्ये वाढ झाल्याने नवीन सुसज्ज इमारतीसाठी भाडेतत्वावर येत्या सात दिवसात प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.


गाडगेनगर स्थित आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह क्र. 1च्या मंजूर क्षमतेत वाढ होवून 100 विद्यार्थी झाली आहे. राठीनगर स्थित आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह क्र. 2 ची विद्यार्थी क्षमता वाढून 125 झाली आहे आणि दस्तुरनगर येथील आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह क्र. 3 ची क्षमता वाढून 180 झाली आहे. या तिन्ही वसतिगृहांमध्ये प्रवेशीत विद्यार्थ्यांच्या निवासासाठी नवीन, सुरक्षित व सुसज्ज इमारत भाडेतत्वाने घेणे आहे. या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांसाठी निवास कक्ष, कार्यालय, संगणक कक्ष, वाचनालय, अभ्यासिका, भोजनकक्ष, स्वयंपाकगृह, स्टोअर रूम, वैद्यकीय कक्ष, शौचालय व स्नानगृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वीज व्यवस्था, सौरऊर्जा प्रणाली, पावसाचे पाणी साठवण व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा व्यवस्था, वाहनतळ तसेच आवश्यक फर्निचर व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध असाव्यात.


ही इमारत अमरावती शहाराच्या मध्यवर्ती व शैक्षणिक परिसराच्या जवळ असावी. इच्छुक इमारत मालकांनी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी या कार्यालयात किंवा अमरावती येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील गृहप्रमुख किंवा गृहपालास कार्यालयीन वेळेत येत्या सात दिवसात कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास धारणी कार्यालयाचे सहायक प्रकल्प अधिकारी (वसतीगृह) यांनी केले आहे.

०००००

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)मंगळवार, दि. १ सप्टेंबर, २०२६.मंत्रिमंडळ निर्णय (एकूण – ४)(गृह विभाग)महाराष्ट्रातून अ...
01/09/2026

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)
मंगळवार, दि. १ सप्टेंबर, २०२६.

मंत्रिमंडळ निर्णय (एकूण – ४)

(गृह विभाग)

महाराष्ट्रातून अंमली पदार्थाचे सन २०२९ पर्यंत समूळ उच्चाटन
नशामुक्त भारत अभियानात पुढचे पाऊल, सर्वसमावेशक धोरण

नशामुक्त भारत अभियानात महाराष्ट्र राज्याने पुढचे पाऊल टाकले आहे. सन २०२९ पर्यंत राज्यातून अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी तयार करण्यात आलेले सर्वसमावेशक धोरण आज मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. व्यापक जनजागृती आणि अंमली पदार्थांच्या विरोधात कठोर कारवाई असे हे धोरण असेल. यात शासनाच्या सर्वच विभागांचा सहभाग घेतला जाणार आहे. हे सर्वसमावेशक धोरण यशस्वी व्हावे यासाठी ग्राम पातळीपासून ते जिल्हा, विभाग आणि मंत्रालयीन स्तरापर्यंत जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे. नशामुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी विविध विभागांच्या सहकार्याने अशाप्रकारे सर्वसमावेशक अभियान राबवणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे.

केंद्र शासनाने विविध केंद्रीय व राज्य शासनाच्या विभागांमध्ये समन्वय साधून सन २०२९ पर्यंत संपूर्ण देशातून अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यानुषंगाने राष्ट्रीय पातळीवर "नशामुक्त भारत अभियान" प्रभावीपणे राबविले जात आहे.

केंद्र शासनाच्या या धोरणाला गती देण्यासाठी आणि महाराष्ट्र राज्याला सन २०२९ पर्यंत पूर्णपणे अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी "सर्वसमावेशक शासकीय दृष्टिकोन" (A Whole-of-Government Approach) असे धोरण तयार करण्यात आले आहे. याअंतर्गत राज्यातील अवैध अंमली पदार्थाच्या निर्मितीला कारणीभूत असणारी पिकांची शेती, लागवड, नैसर्गिक व सिंथेटिक अंमली पदार्थांचे उत्पादन - वाहतूक, विक्री व सेवनावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवित येणार आहे. या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व विभागांना "अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (ANTF)" यांच्याशी समन्वय साधून काम करावे लागणार आहे. यासाठी मंत्रालय स्तरावरून समन्वयासाठी प्रत्येक विभागाकडून उपसचिव दर्जाचा अधिकारी नोडल अधिकारी नियुक्त केला जाणार आहे.
या धोरणाच्या अंलबजावणीसाठी विविध विभागांना कार्यवाहीचे मुद्दे – अँक्शन प्लॅन निश्चित करण्यात आला आहे. यात शालेय शिक्षणात पुढील शैक्षणिक वर्षापासून (सन २०२७) इयत्ता पाचवीपासून अंमली पदार्थाबाबत जनजागृतीबाबत किमान एक धडा समाविष्ट करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा – ३ मध्ये अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीसाठी वाढीव गुण दिले जाणार आहेत.
सर्व शैक्षणिक संस्थांचा परिसर ड्रग फ्री कॅम्पस ठेवण्याकरिता उच्च व तंत्रशिक्षण विभागाला कार्यवाही करावी लागणार आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान, माझं गाव, आरोग्य संपन्न गाव अभियानातही वाढीव गुण दिले जाणार आहेत. याशिवाय दरवर्षी २६ जून रोजी अंमली पदार्थमुक्त उत्कृष्ट जिल्हा म्हणून पुरस्कार घोषित केले जातील. यात त्या – त्या जिल्ह्याची २ ऑक्टोंबर ते ३० एप्रिल कालावधीतील या कामगिरीचे मूल्यमापन केले जाईल.

या धोरणात अंमली पदार्थ नियंत्रणाकरीता प्रभावी अंमलबजावणी, अंमली पदार्थ पुरवठ्यात तीव्र घट करणे, अंमली पदार्थांच्या मागणीत प्रभावी घट करणे, व्यसनमुक्ती, उपचार व पुनर्वसन असे चार स्तंभ निश्चित करण्यात आले आहेत. अंमली पदार्थ नियंत्रणाकरिता प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी गृह,परिवहन, बंदरे, विधि व न्याय या विभागांवर असेल. अंमली पदार्थांच्या पुरवठ्यास आळा घालण्याची जबाबदारी महसूल, कृषि, वन विभाग यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तर कृत्रिमरित्या निर्माण करण्यात येणाऱ्या अवैध अंमली पदार्थांबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग, उद्योग विभाग यांना कारवाई करावी लागणार आहे. अंमली पदार्थांच्या मागणीत प्रभावी घट व्हावी या दृष्टीने शालेय शिक्षण विभाग, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा विभाग, ग्रामविकास, सार्वजनिक आरोग्य, महिला व बालविकास, कौशल्य व उद्योजकता, माहिती व जनसंपर्क विभाग यांना जबाबदारी देण्यात आली आहे. व्यसनमुक्ती व उपचार पुनर्वसनासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण विभाग, नगर विकास तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग यांच्याकडे जबाबदारी राहील.
--००--

(सार्वजनिक बांधकाम विभाग)

सोलापूरातील जुना पुणे नाका ते बोरामणी नाका उन्नत मार्ग प्रकल्पाला गती
वाहतूक गतिमान होणार; निकडीचा प्रकल्पाचा दर्जा

सोलापूर शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील जुना पुणे नाका ते बोरामणी नाक्यापर्यंतच्या चार पदरी उन्नत मार्गिकेस आवश्यक निकडीचा सार्वजनिक प्रकल्प ( Vital Public Project) म्हणून घोषित करण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. प्रकल्पासाठी विविध शासकीय विभागाच्या जमिनी कोणताही भोगवटा मूल्य न आकारता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हस्तांतरित होणार असल्यामुळे हा प्रकल्प गतीने पूर्ण होण्याचा मार्ग खुला झाला आहे.

हा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यासाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी निर्देश होते. त्यानुसार या प्रकल्पाच्या निकडीची आणि अनुषंगिक बाबींची पडताळणी करून, हा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्याला आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे सोलापूर शहर, जिल्ह्यांतील वाहतुकीसह, आंतरराज्यीय वाहतूक सुरळीत होणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वरील सोलापूर शहरातून जाणारा जुना पुणे नाका ते बोरामणी नाका उन्नत मार्ग सोलापूर शहरातील आणि आंतरराज्य वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा आहे. या मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी जुना पुणे नाका ते बोरामणी नाका दरम्यान चार पदरी उन्नत मार्ग आणि आवश्यक तिथे सेवा रस्ता आणि पोच मार्ग विकसित करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या उन्नत मार्गामुळे सोलापूर शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत मिळणार आहे.

या प्रकल्पाच्या पूर्ण होण्यासाठी आवश्यक असणारी बहुतांश जमीन राज्य शासनाच्या विविध विभागांच्या ताब्यात आहे. सार्वजनिक हिताच्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी आवश्यक असणारी शासकीय जमीन संबंधित विभागाला वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्प आवश्यक निकडीचा सार्वजनिक म्हणून घोषित करण्यास मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर विविध शासकीय विभागांच्या ताब्यातील जमीन कोणताही भोगवटा मूल्य न आकारता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यासही मान्यता देण्यात आली.
प्रकल्पाबाबत माहिती
प्रकल्पाची लांबी - ९.६६० किलोमीटर चार पदरी उन्नत मार्ग
रँम्प – सहा, छोटे पुल – तीन
किंमत – १०२०.५० कोटी रुपये.
प्रकल्पामुळे होणारे फायदे - सोलापूर शहरातील वाहतूक कोंडीत घट होणार. राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास आधिक सुरक्षित आणि जलद होणार. इंधनाची बचत होणार, पर्यावरण प्रदूषणात कपात होणार.
औद्योगिक, व्यापारी आणि कृषि विकासाला चालना मिळणार. तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, सोलापूर या धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या स्थळांकडे जाणारी वाहतूक सुरळीत होणार. तसेच सोलापूर शहराच्या नियोजित विकासास, वस्त्रोद्योग आणि वैशिष्ट्यपूर्ण कापड उद्योगास गती मिळणार.
--००--
(सार्वजनिक आरोग्य विभाग)

शासकीय, निमशासकीय बैठक, कार्यक्रम, उपहारगृहात आरोग्यदायी अन्नपदार्थ, संतुलित मेनू बंधनकारक

शासकीय, निमशासकीय बैठका, शासकीय कार्यक्रम व उपहारगृहात आरोग्यदायी अल्पोपहार आणि जेवण उपलब्ध करून देण्याचा आणि तशाच पद्धतीचा मेनू ठेवणे बंधनकारक करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना बैठका, कार्यक्रम आणि प्रशिक्षणाच्या वेळी संतुलित व पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. आरोग्यदायी जीवनशैली आणि पोषक आहाराची सवय ही शासकीय कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग व्हावी, या उद्देशाने सर्व विभागांना कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत.
बैठका, कार्यक्रम, प्रशिक्षण संस्था, परिषदा तसेच उपहारगृहांमध्ये अल्पोपहार अथवा भोजन देताना आरोग्यदायी पर्यायांचा समावेश करण्यात येणार आहे. यामध्ये हंगामी फळे, केळी, सफरचंद, पेरू, पपई यांसारखी फळे, उकडलेली अंडी, उकडलेले कडधान्य, पोहे, इडली-सांबार, मागणीनुसार गरम दूध, साखरविरहित ग्रीन टी, नाचणीची भाकरी, ज्वारी-बाजरीची भाकरी, ताक, कोशिंबीर, विविध भाज्या, डाळी व उसळी यांसारख्या पौष्टिक पदार्थांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
अल्पोपहारामध्ये तेलकट व अति-प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांचे प्रमाण कमी करण्याबरोबरच पौष्टिक घटक असलेल्या स्थानिक व पारंपरिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. जेवणामध्ये डाळ, उसळ, पालेभाज्या, ताक, कोशिंबीर, भाजी आणि आवश्यकतेनुसार संतुलित धान्यांचा समावेश करण्याची सूचना करण्यात आली आहे.
संबंधित कार्यालयांच्या नवीन खानपान (केटरिंग) करारामध्ये आरोग्यदायी मेनूचा समावेश करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. या निर्णयाची योग्य अंमलबजावणी करण्यापूर्वी संबंधित शासकीय तसेच निमशासकीय संस्थांनी आपल्या कर्मचाऱ्यांशी आरोग्यविषयक भूमिकेबाबत चर्चा करावी, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
शासकीय व निमशासकीय संस्थांनी आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्यदायी जीवनशैली आणि पौष्टिक आहाराबाबत आवश्यक जनजागृती करावी तसेच संतुलित आहाराचे मेनू उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार कराव्यात. आरोग्यदायी मेनू निश्चित करताना ICMR-NIN यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचा उपयोग करता येणार आहे.
मंत्रालयातील उपहारगृहात सध्या फळे, उकडलेली अंडी, उकडलेले कडधान्य, पोहे, इडली-सांबार, गरम दूध आणि ग्रीन टी यांसारखे आरोग्यदायी पदार्थ उपलब्ध करून देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे अल्पोपहारातील तेलकट खाद्यपदार्थांचे प्रमाण कमी करण्यास मदत झाली असून, डाळ, उसळ, पालेभाजी, ताक, कोशिंबीर, पुलाव यांसारख्या पौष्टिक पदार्थांचाही जेवणात समावेश करण्यात येत आहे.
--००--

(जलसंपदा विभाग)

कुकडी प्रकल्पासाठी ५ हजार ७०४ कोटी रुपयांची तरतूद
पुणे, अहिल्यानगरसह सोलापूर जिल्ह्यातील १ लाख ४४ हजार ९१२ हेक्टरला सिंचन

पुणे जिल्ह्यातील कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या कामासाठी चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानुसार या प्रकल्पासाठी ५ हजार ७०४ कोटी ५० लाख रुपयांच्या तरतुदीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागातील सिंचन सुविधांना बळकटी मिळणार आहे.

कुकडी पाटबंधारे प्रकल्प येडगाव, माणिकडोह, वडज, डिंभे आणि पिंपळगाव जोगे या पाच धरणांचा संयुक्त प्रकल्प आहे. या पाच धरणांची एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता ३०.५२ टीएमसी असून प्रकल्पाचा पाणीवापर ३९.३६ टीएमसी इतका आहे. प्रकल्पामुळे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर व शिरूर, अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा व कर्जत तसेच सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या सात टंचाईग्रस्त तालुक्यांतील एकूण १ लाख ४४ हजार ९१२ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.
दरसूचीतील वाढ, जादा दराच्या निविदांची स्वीकृती, भूसंपादनाच्या खर्चातील वाढ, विशेषतः नवीन भूसंपादन कायद्यामुळे झालेली वाढ, संकल्पचित्रातील बदल, नवीन अथवा वगळलेल्या तरतुदी, अपुऱ्या तरतुदी तसेच अन्य अनुषंगिक खर्चामुळे प्रकल्पाच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यानुसार राज्यस्तरीय तांत्रिक समितीने प्रस्तावाची छाननी केल्यानंतर महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने हा चौथ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव सादर केला होता. बांधकामविषयक उच्चाधिकार समितीनेही प्रस्तावाची छाननी केल्यानंतर ५ हजार ७०४ कोटी ५० लाख रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेस मान्यता देण्याची शिफारस केली होती.
मंजूर करण्यात आलेल्या तरतुदीमध्ये प्रत्यक्ष कामासाठी ४ हजार ९४६ कोटी २० लाख रुपये, तर अनुषंगिक खर्चासाठी ७५८ कोटी ३० लाख रुपयांचा समावेश असेल. प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत आणि सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या मर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रकल्पाची किंमत कमी करण्याच्या दृष्टीने उर्वरित भूसंपादनासाठी केवळ आवश्यक क्षेत्राचेच भूसंपादन करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीच्या छाननी अहवालातील सर्व मुद्द्यांची पूर्तता करणे तसेच मंजूर प्रशासकीय मान्यतेच्या मर्यादेबाहेर जाऊन निधी वितरित अथवा अतिरिक्त खर्च न करण्याची जबाबदारी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळावर सोपविण्यात आली आहे.
००००

जवाहर नवोदय विद्यालयाच्या 9 वी व 11 वी  प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहनअर्ज करण्याची अंतिम तारिख 30 सप्टेंबर ; पु...
01/09/2026

जवाहर नवोदय विद्यालयाच्या 9 वी व 11 वी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

अर्ज करण्याची अंतिम तारिख 30 सप्टेंबर ; पुढील वर्षी 10 एप्रिलला प्रवेश परीक्षा


अमरावती, दि. 1 (जिमाका) : येथील जवाहर नवोदय विद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष 2027-28 साठी इयत्ता 9 वी व 11 वी प्रवेशाकरिता ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 1 ते 30 सप्टेंबर 2026 दरम्यान ऑनलाईल अर्ज करता येणार असून शनिवार, 10 एप्रिल 2027 रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.


इच्छुक विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालय समितीच्या navoday.gov.in संकेतस्थळावर‍ किंवा इयत्ता 11 वी करिता cbseitms.nic.in/2026/nvsix_11 आणि इयत्ता 9वी करिता cbseitms.nic.in/2026/nvsix_9 अधिकृत संकेतस्थळावर नि:शुल्क अर्ज भरता येणार आहे. विद्यार्थी -विद्यार्थीनी ही अमरावती जिल्हयातील रहिवासी व याच जिल्ह्यातील मान्यताप्राप्त शाळेतून शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये इयत्ता 10 आणि इयत्ता 8वीत क्रमश: इयत्ता 11 वी व 9वीच्या प्रवेशासाठी अध्ययनरत असणे आवश्यक आहे. 9वी प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांचा जन्म 1 मे 2012 ते ३१ जुलै २०१४ आणि १० वी प्रवेशाकरिता १ जून २०१० ते ३१ जुलै २०१२ दरम्यान असावा. आरक्षित आणि अनारक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जन्म तारखेची अट सारखीच आहे.अधिक माहितीसाठी navoday.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधता येणार आहे.

०००००

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)मंगळवार, दि. 1 सप्टेंबर 2026मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)- नशामुक्त भारत अभियानात महा...
01/09/2026

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)
मंगळवार, दि. 1 सप्टेंबर 2026

मंत्रिमंडळ निर्णय (संक्षिप्त)

- नशामुक्त भारत अभियानात महाराष्ट्राचे पुढचे पाऊल. सन 2029 पर्यंत महाराष्ट्रातून अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करणार. त्यासाठी राज्य शासनाचे सर्वसमावेशक शासकीय दृष्टिकोन (A Whole-of Government Approach) धोरण जाहीर. (गृह विभाग)

- शासकीय-निमशासकीय बैठका, कार्यक्रमांच्या दरम्यान तसेच उपहारगृहात आरोग्यदायी अन्नपदार्थ ठेवण्याच्या धोरणाला मान्यता. संतुलित मेन्यू ठेवणे बंधकारक (सार्वजनिक आरोग्य विभाग)

- सोलापूर शहरातील जुना पुणे नाका ते बोरामणी नाका दरम्यान उन्नत मार्ग प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प म्हणून घोषित. यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वरील हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक शासकीय जमीन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणास (NHAI) हस्तांतरित होण्याचा मार्ग मोकळा. (सार्वजनिक बांधकाम विभाग)

- कुकडी पाटबंधारे प्रकल्प, जिल्हा पुणेला 5704.50 कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मान्यता; 1,44,912 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार (जलसंपदा विभाग)

अतिदक्षता विभागाची नव्याने उभारणी करू   - पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेबालकांच्या पालकांना 5 लाखांचा धनादेश प्रदान      ...
31/08/2026

अतिदक्षता विभागाची नव्याने उभारणी करू
- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

बालकांच्या पालकांना 5 लाखांचा धनादेश प्रदान

अमरावती, दि. 31 : जिल्हा स्त्री रूग्णालयातील आगीमध्ये 3 बालकांचा मृत्यू झाला आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. याठिकाणचा अतिदक्षता विभाग हा गरजूंसाठी महत्वाचा असल्याने अत्याधुनिक आणि सुसज्ज अतिदक्षता विभागाची नव्याने उभारणी करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मुरके हॉस्पीटल आणि जिल्हा स्त्री रूग्णालयाला भेट दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रविण पोटे, रवी राणा, जिल्हाधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी, रूग्णालयातील आपत्कालीन वेळेत नवजात शिशूंचे जीव वाचविणे ही प्राथमिकता होती. 36 बालकांना तातडीने खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर यशस्वी उपचार झाल्याने या सर्व बालकांची प्रकृती आज ठिक झाली आहे. तसेच घटनेनंतर जिल्हा प्रशासनाशी सातत्याने संपर्कात राहून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य मंत्र्यांनी त्याच‍ दिवशी भेट देऊन चौकशी समितीची घोषणा केली आहे. आरोग्य आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालानंतर दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. मात्र भविष्यात अशा प्रकारच्या घटना होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

जिल्हा स्त्री रूग्णालयाला गेल्या दोन वर्षात आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून देण्यात आला. यावर्षी या रूग्णालयाचा कोणताही प्रस्ताव जिल्हा नियोजन कार्यालयाकडे प्रलंबित नाही. रूग्णालयातील प्रस्तावांबाबत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती असून या समितीकडून छाननी केल्यानंतरच प्रस्ताव नियोजनकडे सादर केले जातात. येत्या कालावधीत अतिदक्षता कक्ष हा एम्सच्या मानकानुसार तयार करण्यात येईल. याठिकाणी जागतिक दर्जाचे उपकरणे बसविण्यात येतील. यात कोणतीही त्रृटी राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी निधीची करतरता भासू देणार नसल्याचे श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

यावेळी स्वप्नील बोरंगे, प्रफुल्ल चोपडे, गंगाराम बेठेकर या पालकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केलेल्या पाच लाख रूपयांचा धनादेश पालकमंत्री श्री. बावनकुळे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. तसेच खासगी रूग्णालयांनी शिशूंवर मोफत उपचार केल्याबद्दल आभार मानले.

00000

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून बाधित नवजात बालकांच्या प्रकृतीची विचारपूस; जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटना...
31/08/2026

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून बाधित नवजात बालकांच्या प्रकृतीची विचारपूस; जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटनाग्रस्त कक्षाची पाहणी

अमरावती, दि. ३१ (जिमाका),:जिल्हा स्त्री रुग्णालयातील २४ ऑगस्ट रोजी घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेतील बाधित बालकांची राज्याचे महसूल व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन आस्थेने विचारपूस केली. त्यांनी पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (पीडीएमसी) तसेच मुरके हॉस्पिटलला भेट देऊन उपचारधीन बालकांच्या आरोग्याची माहिती घेतली, तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटनाग्रस्त नवजात अतिदक्षता विभागाची पाहणी केली.

पीडीएमसी आणि मुरके रुग्णालयात उपचार घेत असलेल्या काही नवजात बालकांची प्रकृती धोक्याबाहेर आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर उर्वरित बालकांवर विशेष डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून बालकांच्या उपचाराबाबत मार्गदर्शन केले. तसेच, उपचाराधीन बालकांच्या माता-पित्यांची भेट घेऊन त्यांना धीर देत "राज्य शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे," असा विश्वास दिला.

त्यानंतर पालकमंत्र्यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटनाग्रस्त कक्षाची पाहणी करून प्रशासकीय अधिकारी आणि वरिष्ठ डॉक्टरांकडून दुर्घटनेची सविस्तर माहिती घेतली. दुर्घटनेच्यावेळी जीवाची बाजी लावून नवजात बालकांना अतिदक्षता विभागातून सुखरूप बाहेर काढणाऱ्या परिचारकांशी त्यांनी चर्चा केली व माहिती जाणून घेतली.यावेळी रुग्णालयातील सुरक्षितता आणि आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्यादृष्टीने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

या पाहणी दौऱ्याप्रसंगी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त मंगेश गोंदावले, पोलीस आयुक्त राकेश ओला आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००००००

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध, ‘एसआयआर’मध्ये जिल्ह्यात 21 लाख 92 हजार 395 मतदार3 लाख 53 हजार 282 मतदारांची नावे वगळली ; 22...
31/08/2026

प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध, ‘एसआयआर’मध्ये जिल्ह्यात 21 लाख 92 हजार 395 मतदार

3 लाख 53 हजार 282 मतदारांची नावे वगळली ; 22 मतदान केंद्रांची वाढ

30 सप्टेंबरपर्यंत दावे हरकती नोंदवावे- जिल्हाधिकारी आशिष येरेकर


अमरावती, दि. 31 (जिमाका): जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेअंतर्गत सोमवार, 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध प्रारूप मतदार यादीनुसार 8 विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 21 लाख 92 हजार 395 मतदारांची नोंद असून 3 लाख 53 हजार 282 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. जिल्ह्यातील एकूण मतदार केंद्रांची संख्या प्रस्तावित मतदान केंद्र आणि समायोजनाअंती 2 हजार 682 वरून वाढून 2 हजार 704 झाली आहे. सर्व पात्र मतदारांनी आणि वगळण्यात आलेल्या मतदारांनी 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 दरम्यान संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहायक नोंदणी अधिकारी यांच्याकडे दावे व आक्षेप नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.


भारत निवडणूक आयोगाद्वारे देशभरात मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण हाती घेण्यात आले आहे. या मोहिमेचा तिसरा टप्पा महाराष्ट्रासह 16 राज्य व 3 केंद्रशासित प्रदेशात राबविला जात आहे. या मोहिमेअंतर्गत ‘एकही पात्र नागरिक सुटणार नाही आणि एकही अपात्र नागरिक समाविष्ट होणार नाही.’ या उद्दिष्ट्याने अमरावती जिल्ह्यात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ) 25 लाख 45 हजार 677 मतदारांच्या तपशिलाची प्रत्यक्ष खातर जमा करण्यात आली आहे. त्यानुसार 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याात आली आहे. यात जिल्ह्यातील एकूण 8 विधानसभा मतदार संघात 11 लाख 24 हजार 83 पुरूष मतदार तर 10 लाख 68 हजार 251 महिला मतदार आणि 61 तृतीयपंथी मतदार असे एकूण 21 लाख 92 हजार 395 मतदारांची नोंद करण्यात आली आहे. मय्यत मतदार वगळता जिल्ह्यातील एकही पात्र मतदार यादीमध्ये येण्यापासून वंचित राहू नये. या उद्देशाने पात्र मतदारांना गणनापत्रक बीएलओकडे जमा करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर यादी उपलब्ध करून देण्यात आली होती. या प्रक्रियेअंती 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध प्रारूप मतदार यादीतून 3 लाख 53 हजार 282 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.


जिल्ह्यात 21 लाख 92 हजार 395 मतदार


प्रारूप मतदार यादीमध्ये धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघात 1 लाख 38 हजार 465 पुरूष, तर 1 लाख 30 हजार 935 महिला मतदार आणि 1 तृतीयपंथी मतदार असे एकूण 2 लाख 69 हजार 401 मतदार नोंदण्यात आले आहेत. बडनेरा विधानसभा मतदार संघात 1 लाख 56 हजार 831 पुरूष, तर 1 लाख 53 हजार 915 महिला मतदार आणि 32 तृतीयपंथी मतदार असे एकूण 3 लाख 10 हजार 778 मतदार नोंदण्यात आले आहेत.

अमरावती विधानसभा मतदार संघात 1 लाख 51 हजार 82 पुरूष, तर 1 लाख 48 हजार 504 महिला मतदार आणि 18 तृतीयपंथी मतदार असे एकूण 2 लाख 99 हजार 604 मतदार नोंदण्यात आले आहेत. तिवसा विधानसभा मतदार संघात 1 लाख 28 हजार 93 पुरूष, तर 1 लाख 19 हजार 186 महिला मतदार असे एकूण 2 लाख 47 हजार 279 मतदार नोंदण्यात आले आहेत.


दर्यापूर विधानसभा मतदार संघात 1 लाख 42 हजार 984 पुरूष, तर 1 लाख 32 हजार 865 महिला मतदार आणि 3 तृतीयपंथी मतदार असे एकूण 2 लाख 75 हजार 852 मतदार नोंदण्यात आले आहेत. मेळघाट विधानसभा मतदार संघात 1 लाख 40 हजार 610 पुरूष, तर 1 लाख 33 हजार 112 महिला मतदार आणि 7 तृतीयपंथी मतदार असे एकूण 2 लाख 73 हजार 729 मतदार नोंदण्यात आले आहेत.


अचलपूर विधानसभा मतदार संघात 1 लाख 31 हजार 215 पुरूष, तर 1 लाख 22 हजार 83 महिला मतदार असे एकूण 2 लाख 53 हजार 298 मतदार नोंदण्यात आले आहेत. मोर्शी विधानसभा मतदार संघात 1 लाख 34 हजार 803 पुरूष, तर 1 लाख 27 हजार 651 महिला मतदार असे एकूण 2 लाख 62 हजार 454 मतदार नोंदण्यात आले आहेत.


3 लाख 53 हजार 282 मतदारांची नावे वगळली


प्रसिद्ध प्रारूप मतदार यादीतून 1 लाख 9 हजार 307 मय्यत, आढळून नआलेले 22 हजार 357, कायम स्तलांतरीत 1 लाख 64 हजार 513 आणि 978 इतर तसेच 56 हजार 142 आधिच नोंदलेले मतदार अशा एकूण 3 लाख 53 हजार 282 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. धामणगाव रेल्वे विधानसभा मतदार संघातील 10 हजार 681 मय्यत, आढळून नआलेले 1 हजार 495, कायम स्तलांतरीत 23 हजार 694 आणि 84 इतर तसेच 4 हजार 483 आधिच नोंदलेले मतदार असे एकूण 40 हजार 437 मतदार वगळण्यात आले आहेत. बडनेरा विधानसभा मतदार संघातील 23 हजार 667 मय्यत, आढळून नआलेले 3 हजार 523, कायम स्तलांतरीत 25 हजार 983 आणि 264 इतर तसेच 10 हजार 331 आधिच नोंदलेले मतदार असे एकूण 63 हजार 768 मतदार वगळण्यात आले आहेत.


अमरावती विधानसभा मतदार संघातील 18 हजार 920 मय्यत, आढळून नआलेले 9 हजार 249, कायम स्तलांतरीत 30 हजार 515 आणि 136 इतर तसेच 16 हजार 976 आधिच नोंदलेले मतदार असे एकूण 75 हजार 796 मतदार वगळण्यात आले आहेत. तिवसा विधानसभा मतदार संघातील 14 हजार 780 मय्यत, आढळून नआलेले 2 हजार 64, कायम स्तलांतरीत 23 हजार 732 आणि 87 इतर तसेच 7 हजार 659 आधिच नोंदलेले मतदार असे एकूण 48 हजार 322 मतदार वगळण्यात आले आहेत.


दर्यापूर विधानसभा मतदार संघातील 8 हजार 688 मय्यत, आढळून नआलेले 1 हजार 175, कायम स्तलांतरीत 17 हजार 865 आणि 117 इतर तसेच 2 हजार 331 आधिच नोंदलेले मतदार असे एकूण 30 हजार 176 मतदार वगळण्यात आले आहेत. मेळघाट विधानसभा मतदार संघातील 13 हजार 286 मय्यत, आढळून नआलेले 1 हजार 805, कायम स्तलांतरीत 12 हजार 455 आणि 127 इतर तसेच 6 हजार 350 आधिच नोंदलेले मतदार असे एकूण 34 हजार 23 मतदार वगळण्यात आले आहेत.


अचलपूर विधानसभा मतदार संघातील 10 हजार 210 मय्यत, आढळून नआलेले 1 हजार 462, कायम स्तलांतरीत 18 हजार 867 आणि 57 इतर तसेच 3 हजार 690 आधिच नोंदलेले मतदार असे एकूण 34 हजार 286 मतदार वगळण्यात आले आहेत. मोर्शी विधानसभा मतदार संघातील 9 हजार 75 मय्यत, आढळून नआलेले 1 हजार 584, कायम स्तलांतरीत 11 हजार 402 आणि 106 इतर तसेच 4 हजार 322 आधिच नोंदलेले मतदार असे एकूण 26 हजार 489 मतदार वगळण्यात आले आहेत.



जिल्ह्यात 22 मतदान केंद्रांची वाढ


प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होण्यापूर्वी नवीन प्रस्तावित मतदान केंद्र व समायोजन मतदान केंद्र याद्वारे मतदान केंद्रांचे सुसूत्रिकरण करण्यात आले आहे. यानुसार अस्तित्वात असलेल्या 2 हजार 682 मतदान केंद्रांची संख्या वाढून 2 हजार 704 झाली आहे. बडनेरा विधानसभा मतदार संघात मतदान केंद्रांची संख्या 345 वरून वाढून 354 झाली आहे. अमरावती विधानसभा मतदार संघात मतदान केंद्रांची संख्या 322 वरून वाढून 328 झाली आहे. मेळघाट विधानसभा मतदार संघात मतदान केंद्रांची संख्या 356 वरून वाढून 363 झाली आहे.


30 सप्टेंबर पर्यंत दावे हरकती नोंदवण्याचे आवाहन

अमरावती जिल्ह्यातील सर्व पात्र मतदारांनी आणि वगळण्यात आलेल्या मतदारांनी 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 दरम्यान संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहायक नोंदणी अधिकारी यांच्याकडे दावे व आक्षेप नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे. 1 आक्टोबर 2026 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नव मतदारांनी फॉर्म क्रं. 6 भरून मतदार यादीत नाव नोंदवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

000000

आज ‘डाक अदालत’ सहा आठवडयात समस्येचे निराकरण न झालेल्या तक्रारी मांडता येणार        अमरावती, दि.31 (जिमाका) : अमरावती विभ...
31/08/2026

आज ‘डाक अदालत’

सहा आठवडयात समस्येचे निराकरण न झालेल्या तक्रारी मांडता येणार

अमरावती, दि.31 (जिमाका) : अमरावती विभागातील स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तु रजिस्टर पार्सल,बचत बँक व मनीऑर्डर आदी सहा आठवडयात निराकरण न झालेल्या तक्रांरींच्या समाधानासाठी मंगळवार, 1 सप्टेंबर रोजी प्रवर अधीक्षक डाकघर अमरावती यांच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

सहा आठवडयात निराकरण न झालेल्या व समाधानकारक उत्तर नमिळालेल्या तक्रारींची डाक अदालतीत दखल घेण्यात येणार आहे. या अदालतीत अर्ज सादर करताना तक्रारीचा सर्व तपशील ,तक्रारीची तारिख, ज्या अधिकाऱ्यांना तक्रार पाठविली त्यांचे नाव व हुद्दा आदींचा उल्लेख असावा. वेळेत प्राप्त अर्जांचा विचार डाक अदालतील केला जाईल, असे प्रवर अधीक्ष डाकघर यांनी कळविले आहे.

00000000

ग्रामीण भागात  कलम 37 (1) व (3) लागू अमरावती, दि. 31 (जिमाका) : जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोली...
31/08/2026

ग्रामीण भागात कलम 37 (1) व (3) लागू

अमरावती, दि. 31 (जिमाका) : जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस अधीक्षक (ग्रामीण), अमरावती यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात लागू करण्यात आला असून दि. 1 सप्टेंबर 2026 ते 15 सप्टेंबर 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अपर जिल्हादंडाधिकारी संतोष काकडे यांनी कळविले आहे.

0000000

29/08/2026

नीट -पीजी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शहरात जमावबंदी आदेश लागू

अमरावती दि. 29 (जिमाका): नीट- पीजी परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात 30 ऑगस्ट रोजी जमावबंदी आदेश लागू करण्यात आला असून, नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी दिला आहे.

राष्ट्रीय परीक्षा मंडळातर्फे रविवार, 30 ऑगस्ट 2026 रोजी ' नीट -पीजी एंट्रान्स परीक्षा 2026' आयोजित करण्यात आली आहे. अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील एकूण 6 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार, अनुचित प्रकार किंवा शांतताभंग होऊ नये यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये पोलीस आयुक्तांनी हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

हा जमावबंदी आदेश 30 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 6 ते दुपारी 1 वाजेपर्यंत लागू राहील. परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर त्रिज्येच्या आत अनधिकृत व्यक्तींना फिरण्यास सक्त मनाई आहे. केवळ परीक्षार्थी, परीक्षा कर्तव्यावर असलेले कर्मचारी आणि शासनमान्य व्यक्तींनाच प्रवेश असेल. परीक्षा संपल्यानंतर परीक्षार्थ्यांनी तत्काळ परिसर खाली करणे बंधनकारक आहे.

100 मीटर परिसरात कोणत्याही प्रकारची वाहने पार्क करण्यास बंदी आहे. मात्र, अपंग विद्यार्थी, परीक्षा समन्वयक-कर्मचारी आणि स्थानिक रहिवाशांच्या वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे.परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरातील एसटीडी-टेलिफोन बूथ, झेरॉक्स सेंटर्स, संगणक दुकाने, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि फेरीवाले परीक्षा संपेपर्यंत पूर्णपणे बंद राहतील.

या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर 'भारतीय न्याय संहिता 2023' च्या कलम 223 व प्रचलित कायद्यानुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे अमरावती शहर पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
00000

Address

Khaparde Bagicha
Amravati
444606

Opening Hours

Monday 9:45am - 6:15pm
Tuesday 9:45am - 6:15pm
Wednesday 9:45am - 6:15pm
Thursday 9:45am - 6:15pm
Friday 9:45am - 6:15pm
Saturday 9:45am - 6:15pm
Sunday 10am - 6pm

Telephone

+917212551842

Alerts

Be the first to know and let us send you an email when जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to जिल्हा माहिती कार्यालय, अमरावती:

Shortcuts

Share