Dio Chhatrapati Sambhajinagar

Dio Chhatrapati Sambhajinagar Official Facebook Account of District Information Office, Directorate of Information & Public Relations Government of Maharashtra, Aurangabad

गणेशोत्सवातील उत्कृष्ट सार्वजनिक मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा·         सहभागासाठी मंडळांना 7 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर ...
04/09/2026

गणेशोत्सवातील उत्कृष्ट सार्वजनिक मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा

· सहभागासाठी मंडळांना 7 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्यास मुदत

मुंबई, दि. 3 : महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर या उपक्रमाचा विस्तार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर केला आहे. 2026 च्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह देशातील तसेच परदेशातील सामाजिक व विधायक उपक्रमांद्वारे गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक मंडळांनाही या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 7 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अर्जासाठी https://ganeshotsav.pldmka.co.in/ या संकेतस्थळाचा वापर करावा. इच्छुक मंडळांनी विहित नमुन्यातील माहिती व आवश्यक कागदपत्रे सादर करून या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

यंदाचा गणेशोत्सव 14 सप्टेंबर 2026 पासून सुरू होत असून उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. या समित्यांकडून मंडळांच्या उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन विविध निकषांच्या आधारे अभिप्रायासह गुणांकन करण्यात येणार आहे.


जिल्हास्तरीय समिती उत्कृष्ट तीन गणेशोत्सव मंडळांची शिफारस करणार असून, संबंधित मंडळांची नावे, आवश्यक कागदपत्रे, व्हिडीओ व अभिप्राय यांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रकल्प संचालक, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यस्तरीय समितीमार्फत पुढील कार्यवाही करण्यात येईल.

स्पर्धेचा निकाल जाहीर करण्याची तारीख तसेच विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पुरस्कार वितरण समारंभाबाबत स्वतंत्र सूचना देण्यात येतील, असेही मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी कळविले आहे.
००००

03/09/2026

लघु उद्योजकांसाठी पुरस्कार; ३० ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागविले
छत्रपती संभाजीनगर, दि. ३ (जिमाका)- राज्य शासनातर्फे उत्कृष्ट लघुउद्योग घटकांची निवड करून जिल्हा पुरस्काराने गौरविण्यात येते. सन २०२६ यावर्षासाठी उत्कृष्ट लघुउद्योग जिल्हा पुरस्कार योजनेअंतर्गत पात्र लघुउद्योजकांकडून दि. ३० ऑक्टोबर पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत, असे जिल्हा उद्योग केंद्राच्या उप आयुक्त करुणा खरात यांनी कळविले आहे.
पात्रतेचे निकषः-
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग आयुक्तालयांतर्गत जिल्हा उद्योग केंद्रामार्फत ही पुरस्कार योजना राबविण्यात येते. सन २०२६ च्या पुरस्कारासाठी दि. १ जानेवारी २०२६ पूर्वी स्थायी लघुउद्योग नोंदणी अथवा उद्यम नोंदणी झालेला आणि मागील दोन वर्षांपासून सलग उत्पादनात असलेला लघुउद्योग घटक पात्र राहील. तसेच संबंधित उद्योग घटक कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
पुरस्काराचे स्वरुपः-
या पुरस्कारांतर्गत प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास शाल, श्रीफळ व १५ हजार रुपये, तर द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यास शाल, श्रीफळ व १० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
आवश्यक कागदपत्रेः-
इच्छुक उद्योजकांनी फोटोसह विहित नमुन्यातील अर्ज, उद्यम नोंदणी प्रमाणपत्र, मागील पाच वर्षांतील गुंतवणूक, रोजगार, उत्पादन व वर्षनिहाय नफ्याची माहिती, मागील तीन वर्षांचे ताळेबंद व नफा-तोटा पत्रक तसेच कर्ज खाते नियमित असल्याबाबत संबंधित बँकेचे पत्र आदी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा.
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. ३० ऑक्टोबर, मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अधिक माहिती व अर्जाच्या नमुन्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, माहिती तंत्रज्ञान इमारत, दुसरा मजला, गरवारे स्टेडियमजवळ, छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या उप आयुक्त करुणा खरात यांनी केले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-क स्पर्धापरीक्षा रविवारी (दि.६)१४ केंद्रांवर ४ हजार ७५२ परीक्षार्थींची बैठक व्यवस्थाछत्रपत...
03/09/2026

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-क स्पर्धापरीक्षा रविवारी (दि.६)

१४ केंद्रांवर ४ हजार ७५२ परीक्षार्थींची बैठक व्यवस्था

छत्रपती संभाजीनगर, दि. ३ (जिमाका)- महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई यांच्यामार्फत आयोजित मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलिफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा-२०२६ रविवार, दि. ६ रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १४ शाळा व महाविद्यालयांतील परीक्षा केंद्रांवर एकूण ४ हजार ७५२ उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी ४८७ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) संगीता राठोड यांनी दिली आहे.
ही परीक्षा दोन सत्रांत होणार असून सकाळचे सत्र सकाळी ११ ते दुपारी १२ आणि दुपारचे सत्र दुपारी ३ ते ४ या वेळेत होईल.

परीक्षा केंद्र व परीक्षार्थी संख्या याप्रमाणे-

१) मौलाना आझाद कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, रोझाबाग, हर्सूल रोड (विज्ञान इमारत), भाग-अ – ३१२.
२) मौलाना आझाद कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, रोझाबाग, हरसूल रोड (टॉम पॅट्रिक बिल्डिंग), भाग-ब – ४८०.
३) श्रीमती वेणूताई चव्हाण कन्या प्रशाला, एन-८, सिडको – ३१२.
४) गोदावरी पब्लिक स्कूल (माध्यमिक), विवेकानंद नगर, एन-१२, हडको – २८८.
५) बळीराम पाटील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सिडको, एन-९, एम-२ – ३१२.
६) एम.जी.एम. जवाहरलाल नेहरू इंजिनीअरिंग कॉलेज, एन-६, सिडको – ४८०.
७) एम.जी.एम. संस्कार विद्यालय, एन-६, सिडको, मध्य नाका – २४०.
८) डॉ. रफीक झकारिया कॉलेज फॉर वुमेन, नवखंडा, जुबली पार्क – ४३२.
९) मिलिंद कॉलेज ऑफ सायन्स, नागसेन वन – ३१२.
१०) सरस्वती भुवन बॉईज स्कूल, औरंगपुरा – ४३२.
११) ए.के. वाघमारे प्रशाला, सरस्वती नगर, औरंगपुरा – २८८.
१२) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रेल्वे स्टेशन रोड, उस्मानपुरा – २८८.
१३) शासकीय तंत्रनिकेतन (गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक), उस्मानपुरा – ३१२.
१४) शासकीय कला व विज्ञान महाविद्यालय, सुभेदारी गेस्ट हाऊसजवळ, विश्वास नगर – २६४.

परीक्षार्थींसाठी सुचनाः-

सुधारित कार्यपद्धतीनुसार प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्राचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात येणार आहे. निर्धारित वेळेनंतर येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.
परीक्षेला येताना उमेदवारांनी ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड किंवा स्मार्ट कार्ड प्रकारातील वाहनचालक परवाना यापैकी किमान एक मूळ ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. परीक्षा कक्षात प्रवेशपत्र, काळ्या किंवा निळ्या शाईचे बॉलपॉइंट पेन, मूळ ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत याव्यतिरिक्त अन्य कोणतेही साहित्य नेण्यास परवानगी असणार नाही.
डिजिटल डायरी, मायक्रोफोन, मोबाईल फोन, ब्लूटूथ, कॅमेरा फोन किंवा तत्सम संदेशवहन उपकरण तसेच कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा केंद्रात नेण्यास सक्त मनाई आहे. असे साहित्य आणल्यास ते परीक्षा केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर स्वतःच्या जबाबदारीवर ठेवावे लागेल. या साहित्याची जबाबदारी आयोग अथवा परीक्षा केंद्राची राहणार नाही. प्रतिबंधित साहित्य परीक्षा केंद्राच्या आवारात आणल्याचे आढळल्यास संबंधित उमेदवारावर नियमानुसार फौजदारी व प्रशासकीय कारवाईसह आयोगाच्या आगामी परीक्षांना बंदी घालण्याची कारवाई होऊ शकते.
परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अधिकारी उपस्थित राहणार असून जिल्हाधिकारी स्वतः परीक्षा व्यवस्थेच्या पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार आहेत. सर्व उमेदवारांनी आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. परीक्षेसाठी उपस्थित राहणाऱ्या सर्व उमेदवारांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) संगीता राठोड यांनी कळविले आहे.

बदलत्या माध्यमविश्वात पत्रकारांनी नवतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा- उपसंचालक प्रवीण टाकेछत्रपती संभाजीनगर, दि. २ (जिमा...
03/09/2026

बदलत्या माध्यमविश्वात पत्रकारांनी नवतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा- उपसंचालक प्रवीण टाके

छत्रपती संभाजीनगर, दि. २ (जिमाका)- बदलत्या माध्यमविश्वात पारंपरिक पत्रकारितेसोबत डिजिटल माध्यमांचे महत्त्व वाढले आहे. पत्रकारांनीही आता सोशल मीडिया व नवतंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा. माहिती व जनसंपर्क विभागही बदलत्या माध्यम व्यवस्थेनुसार आपल्या कार्यपद्धतीत बदल करीत आहे, असे प्रतिपादन विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक प्रवीण टाके यांनी केले.

छत्रपती संभाजीनगर विभागाचे नवनियुक्त उपसंचालक प्रवीण टाके यांची बुधवारी (दि.२) पत्रकार, संपादकांनी भेट घेतली. त्यानिमित्त दुपारी ४ वा. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात संवाद साधला. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, सहायक संचालक सुरेश पाटील, माहिती अधिकारी संजीवनी जाधव पाटील यांच्यासह विविध दैनिके, साप्ताहिक वृत्तपत्रांचे संपादक, प्रतिनिधी व पत्रकार उपस्थित होते.

नव्याने रुजू झालेले उपसंचालक प्रवीण टाके तसेच सहायक संचालक सुरेश पाटील व माहिती अधिकारी संजीवनी जाधव पाटील यांनी यावेळी माध्यम प्रतिनिधींना आपली ओळख करून दिली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी सर्व संपादक पत्रकारांचे स्वागत केले. तसेच पत्रकारांचा परिचय करुन दिला.स्थानिक स्तरावरील पत्रकारांच्या समस्या यावेळी अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या.

उपसंचालक प्रवीण टाके म्हणाले की, डिजिटल माध्यमांमुळे पत्रकारितेचे स्वरूप वेगाने बदलत आहे. पत्रकारांनी डिजिटल माध्यमांचे आव्हान स्वीकारून सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा.पत्रकारांसाठी विविध विषयांवर प्रशिक्षण आयोजित करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
पत्रकारांच्या समस्या, दैनंदिन अडचणी सोडवण्यास प्रशासनाचा प्राधान्य क्रम राहील,असेही त्यांनी सांगितले.
माहिती अधिकारी संजीवनी जाधव पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षणमतदाराच्या हक्काचे संरक्षण करा; सुनावणीचीसंधी द्या- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.छत्...
02/09/2026

मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण

मतदाराच्या हक्काचे संरक्षण करा; सुनावणीची
संधी द्या- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

छत्रपती संभाजीनगर, दि.२(जिमाका) - मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमात प्रारुप मतदार याद्यांच्या प्रसिद्धी पश्चात आता जुळवणी न झालेले, विसंगती वा तफावत असणाऱ्या मतदार तपशिलाबाबत संबंधित प्रत्येक मतदाराला सुनावणीची संधी द्या.त्यांच्या मतदान हक्काचे संरक्षण करा. कोणताही पात्र मतदार वगळला जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज दिले.

मतदार यादीचे विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या पुढच्या म्हणजेच सुनावणीच्या टप्प्याबाबत मतदार नोंदणी अधिकारी, सहा. मतदार नोंदणी अधिकारी यांचे प्रशिक्षण आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडले. अपर आयुक्त मनपा रणजीत पाटील,उपजिल्हा निवडणूक अधिकारी सविता चौधर, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, उपजिल्हाधिकारी रुपेश सिनगारे, नम्रता चाटे, डॉ. निलेश अपार, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, नीलम बाफना, डॉ. व्यंकट राठोड, अरुण जऱ्हाड तसेच सर्व सहा. मतदार नोंदणी अधिकारी आदी उपस्थित होते.

डॉ. निलेश अपार यांनी साधन व्यक्ती म्हणून प्रशिक्षण दिले. त्यात प्रारुप मतदार यादी प्रसिद्धी नंतर राबवावयाच्या सुनावणी प्रक्रियेसंदर्भात आजच्या प्रशिक्षणात माहिती देण्यात आली.

निवडणूक आयोगाने दिलेल्या मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमानुसार, मतदार यादी तयार करण्यासाठी दि. १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकाच्या अनुषंगाने पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी दावा करता येईल. तसेच मतदार यादीत समाविष्ट असलेल्या नावाबाबत अथवा नोंदीतील तपशीलाबाबत आक्षेप असल्यास दि. ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत विहित नमुन्यात दावा अथवा हरकत दाखल करता येईल.

मतदार यादीत नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना क्र. ६, मतदार यादीतील नावाच्या समावेशास हरकत घेण्यासाठी अथवा नाव वगळण्यासाठी नमुना क्र. ७, तर मतदार यादीतील नोंदींच्या तपशीलात दुरुस्ती, बदल अथवा अद्ययावत करण्यासाठी नमुना क्र. ८ मध्ये अर्ज करता येईल. हे दावे व हरकती संबंधित मतदार नोंदणी अधिकारी (ERO) यांच्याकडे विहित पद्धतीने सादर करता येतील.प्राप्त दावे व हरकतींची यादी दर आठवड्याला संबंधित मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच दावे व हरकतींबाबतची माहिती संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात उपलब्ध राहणार आहे. नागरिकांना आपल्या दाव्याची अथवा हरकतीची स्थिती संबंधित निवडणूक कार्यालयाकडून तपासता येईल.

प्रारूप मतदार यादी प्रत्येक पात्र नागरिकाच्या मतदानाच्या अधिकाराच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळे नागरिकांनी मतदार यादीतील आपले नाव आणि अन्य तपशील तपासावेत. पात्र असूनही नाव समाविष्ट नसल्यास विहित कालावधीत दावा दाखल करावा. तसेच आक्षेपार्ह अथवा अपात्र नोंद आढळल्यास त्याबाबत हरकत नोंदवावी.

प्रारूप मतदार यादी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे पाहता येईल. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टल वरही मतदार यादीची पडताळणी करता येईल.

मतदार नोंदणी व सहा. मतदार नोंदणी अधिकारी यांनी आक्षेप असलेल्या प्रत्येक मतदाराचे समाधान करुन त्यांची सुनावणी घ्यावी. त्यासाठीची सर्व विहीत प्रक्रिया पार पाडावी. सुनावणीची नोटीस बीएलओ मार्फत प्रत्येक मतदाराच्या घरी नेण्यात यावी.सुनावणीच्या वेळी मतदारांना सोबत आणाव्या लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती द्यावी, इ. सुचना प्रशिक्षणादरम्यान देण्यात आल्या.
०००००

02/09/2026

जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवारी (दि.७)रोजी

छत्रपती संभाजीनगर, दि.२ (जिमाका)- दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन आयोजित केला जातो. सप्टेंबर महिन्यासाठी लोकशाही दिन हा सोमवार दि.७ रोजी दुपारी १२ वा. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे, असे उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्रीमती संगीता राठोड यांनी कळविले आहे.
नागरिकांनी आपले अर्ज, निवेदने दि.७ रोजी सकाळी ११ ते १२ या वेळात दाखल करावे. अर्ज विहित नमुन्यात असावा. तक्रार वैयक्तिक असावी. तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल केला असल्यास त्याची पोहोच सोबत आणावी. तसेच न्याय प्रविष्ठ प्रकरण, राजस्व अपिल, सेवाविषयक व आस्थापनाविषयक व लोकशाही दिनात यापूर्वी दाखल केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

'पवित्र' पोर्टलद्वारे शिक्षक पदभरती;आज (दि.३)पासून कागदपत्र पडताळणीछत्रपती संभाजीनगर  दि. २ (जिमाका)-आदिवासी विकास विभाग...
02/09/2026

'पवित्र' पोर्टलद्वारे शिक्षक पदभरती;आज (दि.३)पासून कागदपत्र पडताळणी

छत्रपती संभाजीनगर दि. २ (जिमाका)-आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त कार्यालय, अमरावती यांच्या अधिनस्त शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षक संवर्गातील ४६८ रिक्त पदांची भरती ‘पवित्र’ (PAVITRA) पोर्टलद्वारे राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेत शिफारसप्राप्त २९६ उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी गुरुवार दि. ३ ते शनिवार दि.५ सप्टेंबर दरम्यान करण्यात येणार आहे. आदिवासी विकास विभागाच्या संकेतस्थळावरही अमरावती विभागातील पवित्र पोर्टल शिक्षक भरती व शिफारसप्राप्त उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीची सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. कागदपत्रे व प्रमाणपत्रांची पडताळणी अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती यांच्या कार्यालयात करण्यात येणार आहे. उमेदवारांनी त्यांच्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या दिनांक व वेळेनुसार पडताळणीस उपस्थित राहावे, असे आवाहन अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती यांच्या कार्यालयाने केले आहे.
पदनिहाय व माध्यमनिहाय शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी तसेच कागदपत्र पडताळणीचे सविस्तर वेळापत्रक आदिवासी विकास विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. संबंधित उमेदवारांनी संकेतस्थळावरील सूचना तपासून त्यानुसार आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
उमेदवारांनी पोर्टलवर नोंदविलेल्या माहितीनुसार आवश्यक स्वयंप्रमाणित शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची मूळ प्रमाणपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणासंदर्भातील प्रमाणपत्रे, अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र (लागू असल्यास), टीईटी/सीटीईटी प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र तसेच अन्य आवश्यक कागदपत्रांच्या मूळ प्रती व प्रत्येकी एक स्वयंप्रमाणित छायांकित प्रत सोबत आणावी.
सर्व शिफारसप्राप्त उमेदवारांनी त्यांच्यासाठी निश्चित केलेल्या दिनांक व वेळेनुसार कागदपत्र पडताळणीस उपस्थित राहावे, असे आवाहन अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती यांच्या कार्यालयाने केले आहे.
०००००

02/09/2026

विमानतळ परिसरात लेझर व बीम लाईटच्या वापरास प्रतिबंध
छत्रपती संभाजीनगर, दि. २ (जिमाका)- विमान वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या साधारण १५ कि.मी. त्रिज्येतील परिसरासह पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात आकाशाच्या दिशेने प्रखर लेझर लाईट्स व बीम लाईट्सचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये याबाबत आदेश जारी केले आहेत.
भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाने विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरातील फार्म हाऊस, मंगल कार्यालये तसेच विवाह सोहळे, सामाजिक व धार्मिक कार्यक्रम आणि सण-उत्सवांमध्ये लेझर लाईट्स व बीम लाईट्सचा वापर होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली आहे. अशा प्रखर प्रकाशकिरणांमुळे विशेषतः विमानाचे उड्डाण व उतरण्याच्या वेळी वैमानिकांच्या दृष्टीस अडथळा निर्माण होऊन त्यांचे लक्ष विचलित होण्याची शक्यता असते. त्यामुळे हवाई वाहतुकीला धोका निर्माण होऊन विमानातील प्रवाशांच्या सुरक्षिततेवरही परिणाम होऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या साधारण १५ कि.मी. त्रिज्येतील परिसरात तसेच पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही व्यक्तीने अथवा कार्यक्रम आयोजकांनी आकाशाच्या दिशेने लेझर लाईट्स किंवा बीम लाईट्स सोडू नयेत, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
हा प्रतिबंधात्मक आदेश दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजेपासून दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत ६० दिवस अंमलात राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी आदेशात नमूद केले आहे.

‘डीजे’मुक्त, सुरक्षित,पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठीसर्व घटकांनी समन्वय राखावा-जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीगणेश मंडळांसाठी ...
01/09/2026

‘डीजे’मुक्त, सुरक्षित,पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी
सर्व घटकांनी समन्वय राखावा-जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी

गणेश मंडळांसाठी स्पर्धा उत्कृष्ट मंडळांना तालुका व जिल्हास्तरावर पुरस्कार

छत्रपती संभाजीनगर, दि.१(जिमाका)- यंदाचा गणेशोत्सव ‘डीजे’ मुक्त, सुरक्षित व पर्यावरणपूरक करण्यावर भर द्यावयाचा आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक गणेश मंडळे आणि नागरिक अशा सर्व घटकांचा समन्वय राखावा, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज दिले.

यंदा उत्कृष्ट गणेश मंडळांसाठी राज्य शासनाने स्पर्धाही आयोजीत केल्या असून तालुका, जिल्हा पातळीवर पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्यातही गणेश मंडळांनी सहभागी व्हावे असे आवाहनही जिल्हाधिकारी गौडा यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आज सार्वजनिक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सर्व शासकीय विभागांची समन्वय बैठक आज पार पडली.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम., जिल्हा पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्धन विधाते तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी व सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. क्षेत्रीय अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

डीजे’मुक्त साठी पुढाकार घ्यावा

गणेशोत्सव कालावधीत ध्वनीप्रदुषण रोखण्यासाठी तसेच पावित्र्य राखण्यासाठी सार्वजनिक गणेश मंडळांनी ‘डीजे’चा वापर टाळून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे. गणेश मंडळांशी प्रशासनाने संवाद ठेवून आवश्यक सूचना व मार्गदर्शन करावे, असे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी यांनी सांगितले.

उत्कृष्ट गणेश मंडळांना पुरस्कार

सामाजिक उपक्रम, पर्यावरणपूरकता, स्वच्छता आणि सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळांना तालुका व जिल्हास्तरावर पुरस्कार देण्यात येणार आहेत. तालुकास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या गणेश मंडळास २५ हजार रुपये, तर जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकासाठी ५० हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ४० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ३० हजार रुपये बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी गौडा यांनी दिली. याबाबत प्रचार करुन अधिकाधिक मंडळांना सहभागी करुन घ्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी गौडा यांनी दिले.

तालुकास्तरावर समित्या स्थापन करा

तालुकास्तरावर आवश्यक समित्या स्थापन कराव्यात. या समित्यांनी सार्वजनिक गणेश मंडळांशी समन्वय साधून बैठका घ्याव्यात. पोलीस प्रशासनाच्या सहभागातून मंडळांना सुरक्षा, वाहतूक, पार्किंग व विसर्जन व्यवस्थेबाबत आवश्यक मार्गदर्शन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

अग्निशमन, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता आवश्यक

सार्वजनिक गणेश मंडळांनी मंडप उभारणीपासून विसर्जनापर्यंत सुरक्षिततेच्या सर्व निकषांचे काटेकोर पालन करावे. मंडपाच्या ठिकाणी अग्निप्रतिबंधक उपाययोजना, सुरक्षित विद्युत व्यवस्था, आपत्कालीन व्यवस्थापन, स्वच्छता व आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध असाव्यात. गर्दीच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होणार नाही यासाठी वाहतूक नियमन व पार्कींगचे आगाऊ नियोजन करावे.

आगमन-विसर्जन मिरवणूक मार्ग निश्चित करा

आगमन व विसर्जन मिरवणुकी दरम्यान आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवावा. मिरवणूक मार्ग, गर्दीची संभाव्य ठिकाणे, पार्कींगची ठिकाणे, पर्यायी वाहतूक मार्ग निश्चित करून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे जिल्हाधिकारी गौडा यांनी सांगितले.

विसर्जनस्थळी सुरक्षा,प्रकाश व्यवस्था, वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका इ. सज्ज ठेवावीत. विसर्जनानंतर तातडीने स्वच्छता मोहीम राबवावी. जलप्रदूषण टाळण्यासाठी जनजागृती करावी. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती व नैसर्गिक साहित्याच्या वापराला प्रोत्साहन द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

गणेश मंडळांची संपर्क यादी अद्ययावत करा

जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांची संपर्क यादी अद्यावत ठेवावी. महसूल, पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्थांनी मंडळांशी नियमित संपर्क ठेवावा. तालुकास्तरावर मंडळांच्या बैठका घेऊन त्यांना सर्व व्यवस्थेबाबत आवश्यक सूचना द्याव्या.

भेसळमुक्त प्रसाद

अन्न व औषध प्रशासनाने मंडळांतर्फे वाटप होत असलेला प्रसाद तसेच या कालावधीत बाजारात प्रसादासाठी म्हणून विक्री होत असलेल्या मिठाईची विशेष तपासणी करावी. प्रसाद वाटपासाठी मंडळांनी परवाना घेणे आवश्यक आहे. त्यासाठी मंडळांना सहकार्य करावे. खाद्यपदार्थांची गुणवत्ता तपासून भेसळयुक्त पदार्थांची विक्री व प्रसाद म्हणून वाटप होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी गौडा यांनी दिले.

प्रतिबंधात्मक कारवाईची प्रकरणे निकाली काढा- पोलीस अधीक्षक जाधव

जिल्हा पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी विसर्जनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांवरील व्यवस्थेबाबत सूचना दिल्या. गंगापूर तालुक्यातील कायगाव टोका परिसरातील विसर्जनस्थळी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पुरेशी प्रकाश व्यवस्था व आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात. स्थानिक यंत्रणांनी या ठिकाणी विशेष लक्ष देऊन विसर्जन प्रक्रिया सुरक्षित व सुरळीत पार पडेल यासाठी आवश्यक नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले. तसेच याकालावधीत समाजकंटकांवरील प्रतिबंधात्मक कारवाईची प्रकरणे तातडीने निकाली काढावीत.
०००००

31/08/2026

विशेष सखोल पुनरिक्षण (SIR)-२०२६ अंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
३० सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती दाखल करण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर, दि. ३१ (जिमाका)- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision-SIR)-२०२६ अंतर्गत तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव असल्याची तसेच नाव, पत्ता, वय, लिंग व अन्य तपशील अचूक असल्याची खात्री करावी. आवश्यक असल्यास दावे व हरकती दि. ३० सप्टेंबरपर्यंत दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाने केले आहे.

मतदार यादी तयार करण्यासाठी दि. १ ऑक्टोबर २०२६ हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला आहे. या अर्हता दिनांकाच्या अनुषंगाने पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी दावा करता येईल. तसेच मतदार यादीत समाविष्ट असलेल्या नावाबाबत अथवा नोंदीतील तपशीलाबाबत आक्षेप असल्यास दि. ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत विहित नमुन्यात दावा अथवा हरकत दाखल करता येईल.

दावे व हरकतींसाठी विहित नमुने

मतदार यादीत नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना क्र. ६, मतदार यादीतील नावाच्या समावेशास हरकत घेण्यासाठी अथवा नाव वगळण्यासाठी नमुना क्र. ७, तर मतदार यादीतील नोंदींच्या तपशीलात दुरुस्ती, बदल अथवा अद्ययावत करण्यासाठी नमुना क्र. ८ मध्ये अर्ज करता येईल. हे दावे व हरकती संबंधित मतदार नोंदणी अधिकारी (ERO) यांच्याकडे विहित पद्धतीने सादर करता येतील.

दावे व हरकतींची साप्ताहिक प्रसिद्धी

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्राप्त दावे व हरकतींची यादी दर आठवड्याला संबंधित मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच दावे व हरकतींबाबतची माहिती संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात उपलब्ध राहणार आहे. नागरिकांना आपल्या दाव्याची अथवा हरकतीची स्थिती संबंधित निवडणूक कार्यालयाकडून तपासता येईल.

निर्णयाविरुद्ध अपीलची तरतूद

मतदार नोंदणी अधिकाऱ्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० च्या कलम २४ (अ) अन्वये जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे प्रथम अपील करता येईल. प्रथम अपीलीय प्राधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध कलम २४ (ब) अन्वये द्वितीय अपील करण्याची तरतूद आहे. द्वितीय अपील मतदार नोंदणी नियम, १९६० मधील विहित पद्धतीनुसार मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे दाखल करता येईल.

दावे व हरकतींवरील निर्णयाविरुद्धचे अपील निर्णय जाहीर झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत विहित पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे. प्रथम अपीलीय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, छत्रपती संभाजीनगर तर द्वितीय अपीलासाठी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई हे सक्षम प्राधिकारी आहेत.

मतदारांनी नोंदींची पडताळणी करावी

प्रारूप मतदार यादी प्रत्येक पात्र नागरिकाच्या मतदानाच्या अधिकाराच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळे नागरिकांनी मतदार यादीतील आपले नाव आणि अन्य तपशील तपासावेत. पात्र असूनही नाव समाविष्ट नसल्यास विहित कालावधीत दावा दाखल करावा. तसेच आक्षेपार्ह अथवा अपात्र नोंद आढळल्यास त्याबाबत हरकत नोंदवावी.

प्रारूप मतदार यादी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे पाहता येईल. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टल वरही मतदार यादीची पडताळणी करता येईल.

सर्व पात्र नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपली नोंद तपासावी आणि मतदार यादी अचूक व अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेत सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाने केले आहे.
00000

Address

Aurangabad
431003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dio Chhatrapati Sambhajinagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dio Chhatrapati Sambhajinagar:

Shortcuts

Share