28/05/2026
*प्रिय सावरकर,*
न तुमच्या नावे कारखाने, न बँका, न पतपेढ्या
न सहकारी सत्तेत मुरलेली मस्ती
न राजघाट, न शांतिवन.. समाधीलाही पारखे
न पद्मांचे भूषण, न रत्नांचे मुखवटे.
न चलनी नोटांवर तुमचे चित्र
न इतिहासाच्या पुस्तकात तुमचे पान
तरीही काळजावर कोरले तुमचे नाव
हाच तुमचा सन्मान.
नातू-पणतू नात-पणती कोणी गादीवर नाही
आमदार-खासदार सोडा साधा नगरसेवकही
न वांग्याची शेती, न लवासाची सृष्टी
न वाळूचे ट्रक, न दारूचे परवाने
न सरकारी गुत्तेदारीच्या गोष्टी
न हप्त्याची टोळी, न गुंडांची फौज दिमतीला
न कुबेरगिरी करणारा पेपर तुमच्या मदतीला.
लाभला नाही तुम्हाला पॅलेसचा तुरुंग
तुम्ही झाला नाहीत कधी विदेशी सत्तेचे
Sincere friend, Obedient servant
तुम्ही होतात शत्रू आणि
राहिलात खरोखरीचे शत्रू
अखेरपर्यंत.
तुमच्या वाट्याला आलं फक्त अंदमान
तिथली ती यमाच्या मालकीची काळकोठडी
निरंतर अकरा वर्षे कोलू ओढणारा देह
दिवस दिवस खडीबेडीत
जखडून ठेवलेले प्राण
हाच तुमचा काळ्या पाण्याचा लेखाजोखा.
खिळ्याने भिंतीवर कोरलेली
कविताच होतं जणू
साखळदंडांत बांधलेलं तुमचं आयुष्य.
अंदमानातून सुटलात
पण शत्रूच्या मगरमिठीतून नाही
अलीपूर, भायखळा, रत्नागिरी, येरवडा
तीन वर्षात चार-चार तुरुंग
सजा चुकली नाहीच
तेरा वर्षे नजरकैदेची बेडी आणखी.
स्वातंत्र्याच्या शत्रूने
अखेरपर्यंत माफ केलं नाही
म्हणून तर तो इतिहासपुरुष
'स्वातंत्र्यवीर' म्हणतो तुम्हाला.
शत्रूने दिली जन्मठेप
एक नव्हे दोन दोन
आम्ही दिली एक ‘मृत्युठेप’
जिवंतपणी आणि मरणोपरांतही
आणि आमच्यासाठी केलीत तुम्ही
राखरांगोळी स्वतःच्या आयुष्याची
जिवंतपणी मरण भोगलेत
“आता मेल्यावरही मरण भोगा”
हा आमचा 'कृतज्ञतेचा' शाप !
"माफ करा सावरकर"..
ओठी येते, पण अडते
कारण माफीच्या त्या डावालाही
ठोठावले त्यांनी काळे पाणी पुढे.
उठेल पुन्हा वणवा तेथून
चितेच्या राखेचीही भीती त्यांना
म्हणून हा अट्टाहास सारा
हा दरारा जिता राहावा..!
🚩 *जयंती निमित्त विनम्र अभिवादन*🙏🏻🚩🚩👏👏
#अज्ञात लेखक