Maharashtra Information Centre,New Delhi

Maharashtra Information Centre,New Delhi Official page of Maharashtra Information Centre, New Delhi (DGIPR), Government of Maharashtra

छत्रपती शिवरायांच्या विचारांवर नवी दिल्लीत राष्ट्रीय चर्चासत्र आयोजितनवी दिल्ली, दि. 31 : छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन...
31/08/2026

छत्रपती शिवरायांच्या विचारांवर नवी दिल्लीत राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित

नवी दिल्ली, दि. 31 : छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य, प्रशासन व्यवस्था आणि राष्ट्रनिर्मितीच्या विचारांसंदर्भात विविध अंगांनी चर्चा करण्यासाठी नवी दिल्लीत दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जयिष्णू : सहिष्णू भारताचे रक्षक’ या विषयावर 2 व 3 सप्टेंबर 2026 रोजी जेएनयूच्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हे चर्चासत्र होणार आहे.

शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे केवळ युद्ध आणि पराक्रमाच्या दृष्टिकोनातून न पाहता त्यांची प्रशासन व्यवस्था, राज्याभिषेक, दक्षिण दिग्विजय, मराठा आरमार, संस्कृत साहित्यातील शिवरायांचे संदर्भ तसेच पुढील काळातील मराठ्यांचा दिल्लीवरील प्रभाव अशा विविध पैलूंवर चर्चासत्रात तज्ज्ञांकडून विचारमंथन केले जाणार आहे.

चर्चासत्राचा उद्घाटन सोहळा २ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता जेएनयूच्या कुलगुरू प्रा. शांतिश्री पंडित यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तंजावर घराण्याचे प्रतिनीधी श्री बाबाजी भोसले मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक श्री प्रशांत खेडेकर विशेष अतिथी, तर प्रसिद्ध विचारवंत श्री मुकुल कानिटकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहतील.

उद्घाटनानंतर खासदार डॉ. सुधांशू त्रिवेदी ‘एक हजार वर्षांचा हिंदू प्रतिकार’या विषयावर विचार मांडतील. तसेच शिवरायांचा राज्याभिषेक व प्रशासन, महाराजांची दक्षिण मोहीम आणि संस्कृत साहित्यातील शिवरायांचे संदर्भ या विषयांवर विविध तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. पहिल्या दिवसाचा समारोप कवी भूषण यांच्या काव्यावर आधारित ‘शिवराज भूषण’ या महानाट्याने होणार आहे.

दुसऱ्या दिवशी, तीन सप्टेंबर रोजी शोधनिबंध सादरीकरणासह विविध तांत्रिक सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. यामध्ये ‘मराठा आरमार’, औरंगजेबाच्या वेढ्यादरम्यान मराठ्यांचा संघर्ष तसेच ‘18 व्या शतकातील दिल्लीवरील मराठ्यांचे वर्चस्व’ या विषयांवर इतिहास संशोधक व अभ्यासक आपले विचार मांडणार आहेत.

या चर्चासत्राचा समारोप ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वा चारला होणार असून, जेएनयूच्या कुलगुरू प्रा. शांतिश्री धुलिपुडी पंडित अध्यक्षस्थानी राहतील. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार मुख्य अतिथी, तर ज्येष्ठ विचारवंत श्री प्रदीप रावत आणि प्रा. हिरामण तिवारी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

00000000

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली - वृत्तविशेष - 192/ दि.30.08.2026
एक्सवर आम्हाला फॉलो करा:
https://x.com/MahaGovtMichttps://x.com/micnewde4lhi, https://x.com/MahaMicHindi

महाराष्ट्र सदनात रक्षाबंधन !नवी दिल्ली येथे नागरी सेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनींनी आज महाराष्ट्र सदनात महा...
28/08/2026

महाराष्ट्र सदनात रक्षाबंधन !

नवी दिल्ली येथे नागरी सेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनींनी आज महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला !

दिल्लीतील म-हाटी एम्पोरियममध्ये रविवारपासून गणेशमूर्ती विक्रीपुरणपोळीही उपलब्धनवी दिल्ली, दि. २७ :  दिल्लीतील बाबा खडकसि...
27/08/2026

दिल्लीतील म-हाटी एम्पोरियममध्ये रविवारपासून गणेशमूर्ती विक्री

पुरणपोळीही उपलब्ध

नवी दिल्ली, दि. २७ : दिल्लीतील बाबा खडकसिंह मार्गावरील महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या म-हाटी एम्पोरियममध्ये रविवारपासून गणेशमूर्तींच्या प्रदर्शन व विक्रीला सुरुवात होणार आहे. गणेशभक्तांसाठी हे प्रदर्शन १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत खुले राहणार आहे. महाराष्ट्रातील मूर्तीकारांच्या कलेला प्रोत्साहन देतानाच त्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे आणि दिल्लीतील गणेशभक्तांना गणेशोत्सवासाठी आवश्यक साहित्य एकाच छताखाली उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

महामंडळाच्या वतीने गेल्या ३० वर्षांपासून या गणेशमूर्ती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील ३० हून अधिक गणेश मंडळांमध्ये दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

यंदाच्या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण म्हणजे पेण येथील सपना जाधव आणि वीणा भट यांच्या मार्गदर्शनाखाली महिला कारागिरांनी शाडूची माती आणि कागदाच्या लगद्यापासून साकारलेल्या ५०० हून अधिक पर्यावरणपूरक गणेशमूर्ती. ६ इंचांपासून ३ फुटांपर्यंत विविध आकारांत उपलब्ध असलेल्या या आकर्षक मूर्तींची किंमत १,५०० रुपयांपासून २५ हजार रुपयांपर्यंत आहे.

गणेशमूर्तींसोबतच गणेशोत्सवासाठी आवश्यक पूजासाहित्य, सजावटीचे साहित्य, पैठणीची तोरणे, आसने आणि विविध पूजावस्तूही येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गणेशभक्तांना उत्सवाची आवश्यक खरेदी एकाच ठिकाणी करता येणार आहे.

या प्रदर्शनाचे आणखी एक आकर्षण म्हणजे गणेशभक्तांना येथे महाराष्ट्रीयन चवीच्या गरमागरम पुरणपोळीचा आस्वाद घेता येणार आहे. त्यामुळे गणेशमूर्ती खरेदीसोबतच महाराष्ट्राच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा आनंदही दिल्लीकरांना घेता येणार आहे.

गणेशमूर्तींचे बुकिंग तसेच प्रदर्शनासंदर्भातील अधिक माहितीसाठी ०११-२३३६३८८८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच सपना जाधव (९९७०२७७५५७) आणि वीणा भाट (८९९९१२०९४९) यांच्याशी संपर्क साधून मूर्तींचे बुकिंग करता येईल, असे आवाहन करण्यात आले आहे.



00000000

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली - वृत्तविशेष - 191/ दि.25.08.2026

एक्सवर आम्हाला फॉलो करा:

https://x.com/MahaGovtMichttps://x.com/micnewde4lhi, https://x.com/MahaMicHindi

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत सर्वोत्तम कामगिरीबद्दल महाराष्ट्राला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आ...
25/08/2026

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत सर्वोत्तम कामगिरीबद्दल महाराष्ट्राला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

शेतमालाचे मूल्यवर्धन, रोजगारनिर्मिती आणि महिला उद्योजकतेला चालना देणाऱ्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत महाराष्ट्राने देशातील मोठ्या राज्यांच्या श्रेणीत अव्वल कामगिरी केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत महाराष्ट्राला ‘सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे आयोजित दोन दिवसीय ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबाबत आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या समारोप सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी कृषी प्रक्रिया व नियोजन विभागाचे संचालक विनायक कुमार आवटे, राज्य प्रकल्प व्यवस्थापक अमोल चिद्रावार, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी, अहिल्यानगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बाळासाहेब बोराळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्राची देशात दमदार कामगिरीराष्ट्रीय पुरस्काराने महाराष्ट्राचा ग...
25/08/2026

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत महाराष्ट्राची देशात दमदार कामगिरी

राष्ट्रीय पुरस्काराने महाराष्ट्राचा गौरव

नवी दिल्ली, दि. 25 : शेतमालाचे मूल्यवर्धन, रोजगारनिर्मिती आणि महिला उद्योजकतेला चालना देणाऱ्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत महाराष्ट्राने देशातील मोठ्या राज्यांच्या श्रेणीत अव्वल कामगिरी केली आहे. या उल्लेखनीय कामगिरीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत महाराष्ट्राला ‘सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे आयोजित दोन दिवसीय ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबाबत आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या समारोप सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी कृषी प्रक्रिया व नियोजन विभागाचे संचालक विनायक कुमार आवटे, राज्य प्रकल्प व्यवस्थापक अमोल चिद्रावार, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी, अहिल्यानगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बाळासाहेब बोराळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

केंद्र शासनाने निश्चित केलेल्या विविध कामगिरी निकषांवर महाराष्ट्राने उल्लेखनीय यश मिळविले आहे. योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट आणि नवउद्योजकांना अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन मिळत असून, स्थानिक पातळीवर रोजगार आणि उद्योगनिर्मितीला चालना मिळत आहे.

32 हजार प्रकल्पांना मंजुरी; 56 टक्के प्रकल्प महिलांचे

राज्यात 2021-22 पासून राबविण्यात येत असलेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत 31 हजार 746 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी 17 हजार 786प्रकल्प महिला उद्योजकांचे असून, मंजूर प्रकल्पांमध्ये महिलांचा सहभाग तब्बल 56 टक्के आहे. अन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने महाराष्ट्राने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे.

10.56 लाख मनुष्यदिन रोजगार; 3 हजार 135 कोटींची गुंतवणूक

या योजनेमुळे राज्यातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया क्षेत्राला मोठी आर्थिक गती मिळाली आहे. मंजूर प्रकल्पांमधून 2.64 लाख प्रत्यक्ष आणि 7.92 लाख अप्रत्यक्ष, असे एकूण 10.56 लाख मनुष्यदिन रोजगार निर्माण झाले आहेत. योजनेअंतर्गत राज्यात सुमारे 3 हजार 135 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून, सुमारे 18 लाख मेट्रिक टन प्रक्रिया क्षमता निर्माण झाली आहे. लाभार्थ्यांना आतापर्यंत 715 कोटी रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.

शेतमालापासून उद्योगापर्यंत; मूल्यवर्धनाला मोठी चालना

तृणधान्ये, कडधान्ये, मसाले, फळे, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ आणि तेलबिया अशा विविध कृषी उत्पादनांवर आधारित प्रक्रिया उद्योगांना या योजनेचा लाभ मिळत आहे. शेतमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करण्याबरोबरच स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम योजनेच्या माध्यमातून होत आहे. यामुळे शेतकरी ते उद्योजक आणि उत्पादन ते बाजारपेठ अशी संपूर्ण मूल्यसाखळी अधिक सक्षम होत असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळत आहे. स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती आणि उद्योगांना चालना मिळाल्याने ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहारांनाही वेग आला आहे.

ग्रामीण व शहरी उपजीविका अभियानातही महाराष्ट्र अव्वल

ग्रामीण आणि शहरी उपजीविका अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीतही महाराष्ट्राने देशातील मोठ्या राज्यांच्या श्रेणीत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. राज्य ग्रामीण उपजीविका अभियानासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर दुबे पाटील आणि अश्विनी अकुसकर यांनी पुरस्कार स्वीकारला. तर राज्य शहरी उपजीविका अभियानाचा पुरस्कार सहआयुक्त नूतन खाडे आणि राज्य अभियान व्यवस्थापक प्रसाद राजेभोसले यांनी स्वीकारला.

ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांसाठी शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करण्याच्या राज्याच्या प्रयत्नांना या पुरस्कारांमुळे राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.

छत्रपती संभाजीनगर व अहिल्यानगरच्या अधिकाऱ्यांचा विशेष गौरव

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या जिल्हास्तरीय प्रभावी अंमलबजावणीत उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा नोडल अधिकारी दीपक कृष्णा गवळी आणि अहिल्यानगरचे जिल्हा नोडल अधिकारी सुधाकर बाळासाहेब बोराळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. उद्योजकांना मार्गदर्शन, प्रकल्पांना चालना आणि योजनेचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचविण्यात त्यांच्या योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली.

तसेच, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा संसाधन व्यक्ती पवन काबरा यांनी देशभरात सर्वाधिक प्रकल्प मंजूर होण्यासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचाही विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला.

केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत देशभरातील अन्न प्रक्रिया क्षेत्रातील यशस्वी उपक्रम, उद्योजकता आणि योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. केंद्र व राज्य शासनांचे वरिष्ठ अधिकारी, विविध राज्यांचे प्रतिनिधी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील तज्ज्ञ यावेळी उपस्थित होते.

00000000

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली - वृत्तविशेष - 190/ दि.25.08.2026

एक्सवर आम्हाला फॉलो करा:

https://x.com/MahaGovtMichttps://x.com/micnewde4lhi, https://x.com/MahaMicHindi

उच्च शिक्षण - तंत्रनिकेतन क्षेत्रातीलराष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीरमहाराष्ट्रातील तीन प्राध्यापकांचा समावेशनवी दिल्ली, ...
24/08/2026

उच्च शिक्षण - तंत्रनिकेतन क्षेत्रातील

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

महाराष्ट्रातील तीन प्राध्यापकांचा समावेश

नवी दिल्ली, दि. 24 : देशभरातील उच्च शिक्षण आणि तंत्रनिकेतन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 21 अध्यापक-प्राध्यापकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी (2026) निवड करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या या पुरस्कारार्थींच्या यादीत महाराष्ट्रातील तीन प्राध्यापकांचा समावेश आहे.

शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित विशेष समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. अध्यापनातील गुणवत्ता, नावीन्यपूर्ण उपक्रम, संशोधन तसेच शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत दोन टप्प्यांतील कठोर छाननी प्रक्रियेनंतर या प्राध्यापकांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील तीन मानकरी

डॉ. विक्रम विशाल (आयआयटी, मुंबई) :

आयआयटी (मुंबई) मधील पृथ्वी विज्ञान विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. विक्रम विशाल हे ‘कॉम्प्युटेशनल अँड एक्सपेरिमेंटल जिओमेकॅनिक्स’ या संशोधन गटाचे नेतृत्व करतात. जिओमेकॅनिक्स, कार्बन कॅप्चर अँड सिक्वेस्ट्रेशन तसेच अपारंपरिक हायड्रोकार्बन प्रणाली या क्षेत्रांतील त्यांच्या उल्लेखनीय संशोधनाची दखल घेत त्यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

डॉ. अमर ताकसांडे (जेएनएमसी, वर्धा) :

दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. अमर मोहनराव ताकसांडे यांना बालरोगशास्त्रातील दीर्घकालीन अध्यापन, संशोधन तसेच वैद्यकीय सेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

डॉ. संदीपान नरोटे (शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर) :

इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन क्षेत्रातील संशोधन, विशेषतः इमेज प्रोसेसिंग आणि बायोमेट्रिक्समधील योगदानासाठी डॉ. संदीपान प्रल्हाद नरोटे यांची निवड करण्यात आली आहे. शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता सारखे (एआय) आधुनिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचीही दखल घेण्यात आली आहे.

उच्च शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि तंत्रशिक्षण अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राध्यापकांच्या प्राप्त अर्जांच्या छाननीनंतर केंद्रीय उच्च शिक्षण संस्थांमधील 12 राज्य विद्यापीठे व महाविद्यालयांमधील 5 आणि तंत्रनिकेतन संस्थांमधील 4, अशा एकूण 21 शिक्षक-प्राध्यापकांची या पुरस्कारांसाठी अंतिम निवड करण्यात आली आहे.

0000000

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली – वृत्त विशेष – 190, दिनांक – 24.08.2026

आम्हाला फॉलो कराएक्स -
https://x.com/MahaGovtMic

https://x.com/micnewdelhi

https://x.com/MahaMicHindi

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीरदेशभरातील 48 शिक्षकांची निवडमहाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेशनवी दिल्ली, दि. 22 : विद्...
22/08/2026

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

देशभरातील 48 शिक्षकांची निवड

महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश

नवी दिल्ली, दि. 22 : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देत शिक्षण क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या देशभरातील 48 शिक्षकांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 साठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार शिक्षकांचा समावेश आहे. शिक्षक दिनानिमित्त 5 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत हा पुरस्कार दिला जातो. नावीन्यपूर्ण अध्यापन, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्त्व विकास, शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केलेले प्रयत्न तसेच सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील चार मानकरी

डॉ. कविता नृसिंहराव गिट्टे – (बीड) :

केज येथील साने गुरुजी निवासी विद्यालयात कार्यरत असलेल्या डॉ. कविता गिट्टे यांनी दिव्यांग तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांसह वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अध्यापन करताना त्यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गळती रोखण्यासाठीही प्रभावी प्रयत्न केले.

कुंदा जयवंत बच्छाव – (नाशिक) :

नाशिक महानगरपालिका शाळा क्र. १८चा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी कुंदा बच्छाव यांनी विविध अभिनव उपक्रम राबविले. ‘मिशन मोबाईल-फ्री’ अंतर्गत ‘ज्ञानभिंती’, ‘आनंदवली शिक्षण कट्टा’ तसेच अमेरिकेतील शाळांशी ‘ई-ट्विनिंग’द्वारे संवाद अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांना डिजिटल आणि आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा अनुभव मिळवून दिला.

वैभव वसंतराव कुलकर्णी – (लातूर) :

पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, लातूर येथे कार्यरत असलेल्या वैभव कुलकर्णी यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा, विज्ञान-तंत्रज्ञान आणि कौशल्याधारित शिक्षणावर विशेष भर दिला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी विविध शालेय व राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

शिवप्रसाद अरविंद टिंगरे – (सातारा) :

सैनिक स्कूल, सातारा येथे कार्यरत असलेल्या शिवप्रसाद टिंगरे यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण आणि देशसेवेची भावना रुजविण्यासाठी विशेष योगदान दिले. एनडीए तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून भावी लष्करी अधिकारी घडविण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

तीन टप्प्यांत निवड प्रक्रिया

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी यंदा जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय अशा तीन टप्प्यांत निवड प्रक्रिया राबविण्यात आली. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय पोर्टलवर 15 जून ते 20 जुलै 2026 या कालावधीत पात्र शिक्षकांकडून ऑनलाइन स्व-नामांकन मागविण्यात आले होते. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, नावीन्यपूर्ण अध्यापन, व्यक्तिमत्त्व विकास, शाळेच्या गुणवत्तावाढीसाठीचे प्रयत्न आणि वंचित घटकांसाठी केलेले कार्य या निकषांवर मूल्यमापन करून अंतिम ४८ शिक्षकांची निवड करण्यात आली.

विज्ञान भवनात राष्ट्रीय गौरव

शिक्षक दिनानिमित्त 5 सप्टेंबर रोजी विज्ञान भवनात होणाऱ्या विशेष समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातील. पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या प्रेरणादायी कार्याची माहिती देणारे लघुपटही यावेळी प्रदर्शित करण्यात येणार आहेत. या सोहळ्याचे दूरदर्शन, शिक्षण मंत्रालयाची ‘स्वयं प्रभा’वाहिनी तसेच अधिकृत वेबकास्ट आणि सोशल मीडिया माध्यमांवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

0000000

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली – वृत्त विशेष – 189, दिनांक – 22.08.2026

आम्हाला फॉलो करा एक्स -
https://x.com/MahaGovtMic
https://x.com/micnewdelhi
https://x.com/MahaMicHindi

राजधानीत सद्भावना दिन साजरानवी दिल्ली,  20: दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या 82 व्या जयंतीनिमित्त निवासी आयुक्त व...
20/08/2026

राजधानीत सद्भावना दिन साजरा

नवी दिल्ली, 20: दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या 82 व्या जयंतीनिमित्त निवासी आयुक्त व सचिव डॉ श्वेता सिंघल यांनी महाराष्ट्र सदन येथे राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी श्रीमती सिंघल यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व पोलीस जवानांना सद्भावना प्रतिज्ञा दिली.

जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करण्याची, तसेच सर्व प्रकारचे मतभेद हिंसाचाराचा अवलंब न करता संविधानिक मार्गानी सोडवण्याची प्रतिज्ञा यावेळी उपस्थितांनी घेतली.

दिवंगत राजीव गांधी यांची जयंती सदभावना दिवस म्हणून साजरी करण्यात येते. यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, व्यवस्थापक सारिका शेलार, प्रमोद कोलपटे यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही राजीव गांधी यांना आदरांजली अर्पण केली.

0000000

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली – वृत्त विशेष – 188, दिनांक – 20.08.2026

आम्हाला फॉलो करा एक्स -
https://x.com/MahaGovtMic
https://x.com/micnewdelhi
https://x.com/MahaMicHindi

19/08/2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांचा नागरी सत्कार

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देशनवी दिल्ली, दि. १९ :केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवह...
19/08/2026

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्याचे निर्देश

नवी दिल्ली, दि. १९ :केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयामार्फत महाराष्ट्रातील बावीस शहरांमध्ये राबविण्यात येत असलेल्या पीएम ई-बस सेवा योजनेची अंमलबजावणी निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रलंबित कामांना गती देण्याचे निर्देश अर्बन ट्रान्सपोर्ट विभागाचे संचालक भानू प्रताप सिंह भदौरिया यांनी दिले.

महाराष्ट्र सदन येथे निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत योजनेच्या प्रगतीचा शहरनिहाय आढावा घेण्यात आला. महाराष्ट्रातील अहिल्यानगर, अकोले, अमरावती, भिवंडी, चंद्रपूर, इचलकरंजी, धुळे, जळगाव, कल्याण डोंबिवली, कोल्हापूर, लातूर, मालेगाव, मीरा भाईदर, नागपूर, परभणी, नाशिक, सांगली, सोलापूर, ठाणे, उल्हासनगर, वसई विरार, नांदेड या महापालिकामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. या आढावा बैठकीत योजनेच्या निधीचा वापर, निविदा प्रक्रिया, ई-बसेसच्या संचालनाची तयारी, चार्जिंग स्टेशन, बस डेपो तसेच आवश्यक पायाभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

नागपूर, सोलापूर आणि ठाणे येथे ई-बस सेवा कार्यान्वित झाली असून, आगामी दोन महिन्यांत उर्वरित शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान बससेवा सुरू करण्यास सज्ज असलेल्या शहरांनी त्याबाबतचे पत्र सादर करावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. त्यानुसार आवश्यक सामग्री व इतर बाबींच्या पुरवठ्याचा केंद्रस्तरावर पाठपुरावा करण्यात येणार आहे.

ज्या शहरांमध्ये निविदा प्रक्रिया सुरू आहे, ती वेळेत पूर्ण करून पुढील कार्यवाहीला गती द्यावी. तसेच प्रशासकीय व तांत्रिक अडचणींचे तातडीने निराकरण करून केंद्र व राज्यातील संबंधित यंत्रणांनी प्रभावी समन्वय साधावा, असे निर्देश श्री. भानू प्रताप सिंह भदौरिया यांनी दिले.

ई-बस सेवा सुरळीतपणे सुरू होण्यासाठी चार्जिंग पायाभूत सुविधा आणि बस डेपोची तयारी प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. ई-बसेसचे संचालन सुरू होण्यापूर्वी सर्व आवश्यक सुविधा पूर्ण क्षमतेने उपलब्ध राहतील, यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

प्रकल्पाचे काम पूर्ण झालेल्या शहरांसाठी लवकरच विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत अंतिम बिल, उपयोगिता प्रमाणपत्र आणि प्रकल्पाच्या अंतिम कार्यवाहीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

यावेळी निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड यांनी आर्थिक व भौतिक प्रगती निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यावर भर दिला. पर्यावरणपूरक, आधुनिक आणि नागरिककेंद्रित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने पीएम ई-बस सेवा योजना महत्त्वपूर्ण असून, तिची प्रभावी आणि वेळबद्ध अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असेही श्री. गायकवाड यांनी स्पष्ट केले.

या बैठकीला मनपा आयुक्त, संबंधित अधिकारी आणि अर्बन ट्रान्सपोर्ट विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

00000000
महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली - वृत्तविशेष - 187/ दि.19.08.2026
एक्सवर आम्हाला फॉलो करा:
https://x.com/MahaGovtMichttps://x.com/micnewde4lhi, https://x.com/MahaMicHindi See less

Address

A/8 Sate Emporia Building, Baba Kharak Sing Marg, New Delhi-11000
Delhi
110001

Telephone

+911123367830

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maharashtra Information Centre,New Delhi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Maharashtra Information Centre,New Delhi:

Shortcuts

Share