22/05/2026
विवाहपूर्व विचारांची सामाजिक जागृती -
एका अभिनेत्रीने सोशल मीडियावर व्यक्त केलेले विचार The Times of India समूहाच्या Kolhapur Times मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर समाजात विविध स्तरांवर चर्चा सुरू झाली. दोन तरुण महिलांच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मांडलेले हे विचार एक प्रतिक्रिया असली तरी त्यामागील सामाजिक वास्तव समजून घेणे आज अधिक आवश्यक ठरते. घटनांची वस्तुस्थिती वेगळी असू शकते, परंतु त्या निमित्ताने विषयास अनुसरून आत्मपरीक्षणाची गरज दुर्लक्षित करता येणार नाही.
आजचे तरुण जग सोशल मीडियाच्या प्रभावाखाली वेगाने बदलत आहे. मोबाईलच्या पडद्यावर दिसणारे आकर्षक आयुष्य, रिलेशनशिपचे दिखावे, महागडी जीवनशैली आणि क्षणिक प्रसिद्धी यामुळे अनेक तरुण-तरुणी नकळत वास्तवापासून दूर जात आहेत. सोशल मीडियावर दिसणारे प्रत्येक हसरे चित्र हे खऱ्या आयुष्याचे प्रतिबिंब असतेच असे नाही. अनेकदा त्या मागे मानसिक ताण, असुरक्षितता, संघर्ष आणि अपूर्णता लपलेली असते. मात्र तुलना आणि आभासी अपेक्षांच्या ओझ्यामुळे तरुण मनांमध्ये अस्थिरता वाढताना दिसते.
अभिनेत्रीने व्यक्त केलेल्या विचारांमधून एक महत्त्वाचा संदेश समोर येतो आयुष्याचे निर्णय भावनांवर किंवा सोशल मीडियाच्या प्रभावावर आधारित नसावेत. विवाह, प्रेमसंबंध किंवा जीवनसाथीची निवड ही आयुष्यभराची जबाबदारी असते फक्त आकर्षण ठरू नये. व्यक्तीचा स्वभाव, मानसिकता, कुटुंबातील संस्कार, परस्पर सन्मान, सुरक्षितता आणि एकमेकांविषयी असलेली जबाबदारी या गोष्टी अधिक महत्त्वाच्या असतात. “परफेक्ट लाइफ” च्या आभासी प्रतिमेमागे धावताना वास्तव विसरणे अनेकदा धोकादायक ठरू शकते.
आज समाजामध्ये वाढत असलेली भावनिक अस्थिरता, नात्यांमधील अधीरता आणि तात्काळ निर्णय घेण्याची प्रवृत्ती ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे तरुणांनी काही महत्त्वाच्या गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक आहे. कोणतेही नाते स्वीकारण्यापूर्वी पुरेसा वेळ घेऊन त्या व्यक्तीची मानसिकता आणि वर्तन समजून घेणे गरजेचे आहे. सोशल मीडियावरील दिखाऊ प्रेमापेक्षा प्रत्यक्ष आयुष्यातील आदर, संवाद आणि विश्वास अधिक महत्त्वाचा असतो. स्वतःचे शिक्षण, करिअर, आर्थिक स्वावलंबन आणि मानसिक स्वास्थ्य यांना प्राधान्य देणे हीच सुरक्षित भविष्याची खरी तयारी आहे.
विशेषतः मुलींनी कोणत्याही नात्यात स्वतःचा सन्मान, सुरक्षितता आणि स्वतंत्र विचार जपणे अत्यंत गरजेचे आहे. भावनिक दबाव, समाजाची भीती किंवा आभासी आकर्षण यामुळे चुकीचे निर्णय घेण्यापेक्षा वेळेत थांबून विचार करणे अधिक शहाणपणाचे ठरते. त्याचप्रमाणे मुलांनीही नातेसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा, संयम आणि जबाबदारी यांना महत्त्व देणे आवश्यक आहे. सुदृढ समाजासाठी दोन्ही बाजूंमध्ये परस्पर सन्मान आणि संवेदनशीलता असणे तितकेच गरजेचे आहे.
पालक आणि समाजाची भूमिकाही येथे अत्यंत महत्त्वाची ठरते. मुलांवर केवळ नियंत्रण ठेवण्यापेक्षा त्यांच्याशी संवाद साधणे, मानसिक आधार देणे आणि योग्य-अयोग्य यातील फरक समजावून सांगणे आवश्यक आहे. शिक्षणासोबत भावनिक परिपक्वता, स्वसंरक्षण, डिजिटल सजगता आणि जीवनमूल्यांचे संस्कार दिल्यास अनेक चुकीचे निर्णय टाळता येऊ शकतात.
सोशल मीडियाचा वापर माहिती, प्रगती आणि सकारात्मक संवादासाठी व्हावा; आयुष्याचे वास्तव विसरण्यासाठी नव्हे. वेळेत स्वतःला सावरणे, योग्य सल्ला घेणे, वास्तव स्वीकारणे आणि संयमाने निर्णय घेणे हेच आजच्या पिढीसमोरचे सर्वात प्रभावी उपाय आहेत. कारण एका चुकीच्या निर्णयाचा परिणाम केवळ एका व्यक्तीवर नाही, तर संपूर्ण कुटुंब आणि समाजावरही होत असतो. म्हणूनच आभासी आकर्षणापेक्षा वास्तववादी विचार, आत्मसन्मान, कुटुंबीय मूल्ये आणि जबाबदार जीवनदृष्टी यांना अधिक महत्त्व देणे हीच काळाची खरी गरज आहे.