जिल्हा माहिती कार्यालय, जालना

  • Home
  • India
  • Jalna
  • जिल्हा माहिती कार्यालय, जालना

जिल्हा माहिती कार्यालय, जालना जालना जिल्ह्यातील शासकीय बातम्यांचे अधिकृत पेज

21/08/2026

जालना जिल्ह्यात परदेश अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांची सोडत पद्धतीने निवड

जालना,दि.21(जिमाका) : राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत जालना जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना परदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्याची संधी मिळणार असून, या अभ्यास दौऱ्यासाठी पात्र अर्जदारांची सोडत पद्धतीने निवड करण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते.
कृषी आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी सन २०२६-२७ या वर्षात ‘राज्य पुरस्कृत योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना परदेशातील आधुनिक कृषी तंत्रज्ञान, कृषी प्रक्रिया, बाजार व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, कृषी यांत्रिकीकरण तसेच विविध कृषी विषयक तांत्रिक बाबींचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
जालना जिल्ह्यासाठी या योजनेंतर्गत एकूण 5 शेतकऱ्यांची लक्षांकित निवड करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांकडून 14 ऑगस्ट, 2026 रोजी पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जांची मार्गदर्शक सूचनांनुसार छाननी करण्यात आली असून, जालना जिल्ह्यात प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या निर्धारित लक्षांकापेक्षा अधिक असल्याने पात्र लाभार्थ्यांची निवड सोडत पद्धतीने करण्यात येणार आहे.
ही सोडत 31 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जालना येथे आयोजित करण्यात आली आहे. सदर निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात येणार असून संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच अर्जदार शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील संबंधित पात्र अर्जदार शेतकऱ्यांनी सदर सोडतीस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. गहीनीनाथ कापसे यांनी केले आहे.
-*-*-*-*-*-

21/08/2026

अपर जिल्हादंडाधिकारी यांचे
कलम 37 (1) व (3) अन्वये आदेश जारी

जालना दि. 21 (जिमाका) :- जिल्ह्यात दि. 26 ऑगस्ट 2026 रोजी ईद-ए- मिलाद, दि. 28 ऑगस्ट 2026 रोजी रक्षा बंधन, दि. 4 सप्टेंबर 2026 रोजी श्रीकृष्ण जयंती, तसेच दि. 5 सप्टेंबर 2026 रोजी गोपाळकाला (दहिहंडी) इत्यादी सण – उत्सव साजरे होणार आहेत. या सण, उत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यात व शहरात मिरवणुका व विविध कार्यक्रम आयोजित होतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र येत असतात.
तसेच सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये विविध समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांच्या तसेच आरक्षण बचावच्या दृष्टीने तसेच शेतक-यांचे विविध मागणीसाठी उपोषणे आंदोलने,मोर्चे, धरणे इत्यादी आंदोलनात्मक कार्यक्रम सुरु आहेत. या मागण्यांच्या दृष्टीने भविष्यातही विविध स्वरुपाची आंदोलने, मोर्चे, निदर्शने, रास्तारोको इत्यादी कार्यक्‌रम आयोजित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची
शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी , भाले, चाकु व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणा-या वस्तु जवळ बाळगणार नाही. तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तु जवळ बाळगणार नाही. दगड किंवा इतर उपकरणे किंवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही. व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणुनबुजुन दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने भाषण म्हणणार नाही, वाद्य वाजविणार नाही, गाणे म्हणणार नाही. व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप,विडंबनापर नकला करणार नाही आणि सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा कोणतीही वस्तु बाळगणार नाही.
तसेच अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई केली आहे.
हा आदेश कामावरील कोणताही ‍ अधिकारी किंवा कर्मचारी यांना लागु होणार नाही. तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलीस अधिक्षक जालना व उपविभागीय पोलीस अधिकारी जालना, अंबड, परतुर, भोकरदन यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुका, सभा, मोर्चा यांना लागु राहणार नाही.
हा आदेश संपुर्ण जिल्ह्यासाठी दि.23.8.2026 रोजीच्या 6.00 वाजेपासुन ते दि. 6.9.2026 रोजीचे रात्री 12.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.
-*-*-*-*-*-

जलसंधारणासाठी जालन्यात एकजूट; ‘महा वॉकेथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसादजलसंधारण दिनानिमित्त ‘महा वॉकेथॉन’ संपन्नजालना,दि.21(जि...
21/08/2026

जलसंधारणासाठी जालन्यात एकजूट; ‘महा वॉकेथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
जलसंधारण दिनानिमित्त ‘महा वॉकेथॉन’ संपन्न

जालना,दि.21(जिमाका) : जलसंधारणाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात जलसंधारण दिनानिमित्त आज (दि.21) रोजी ‘महावॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले होते. येथील जिल्हाधिकारी कार्यालयापासून पोलीस मैदानापर्यंत झालेल्या यावॉकेथॉनमध्ये मोठ्या संख्येने शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक, ज्येष्ठ नागरिकांसह विविध क्षेत्रातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकररावजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी महापौर वंदना मगरे, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या उपस्थितीत उपस्थितांनी जलसंधारणाची शपथ घेतली. त्यानंतर हिरवा झेंडा दाखवूनवॉकेथॉनला प्रारंभ करण्यात आला. यावेळी मृद व जलसंधारण विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता श्रावण उदयभान शेंडे, कार्यालयीन अधीक्षक के.एस.जावळे यांची उपस्थिती होती.
येथील जिल्हाधिकारी कार्यालय, घाटी हॉस्पिटल, सत्कार कॉम्प्लेक्स, अंबड चौफुली मार्गे पोलीस मैदान असा वॉकेथॉनचा मार्ग होता. सहभागी नागरिकांनी उत्साहात 3.1 किलोमीटर महावॉकेथॉनचे अंतर पूर्ण केले. यावेळी जलसंधारणाचे महत्त्व सांगणाऱ्या घोषणा देत, पाणी बचत व जलसंवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली.
पोलीस मैदानावर झालेल्या समारोप कार्यक्रमात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि महापौर वंदना मगरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी जलसंधारणाची कामे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
यावेळी लकी ड्रॉमधून दहा विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. तसेच जिल्ह्यातील जलदूत, विविध सेवाभावी संस्था आणि रोटरी क्लब, जालना यांचा सन्मान करण्यात आला.
या महावॉकेथॉनमध्ये जालना शहरातील शांती निकेतन विद्यामंदिर, जिल्हा परिषद क्रीडा प्रबोधिनी, मत्स्योदरी कॉलेज, शासकीय नर्सिंग कॉलेज, जेईएस महाविद्यालय यांच्यासह विविध शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थीनी, शासकीय-निमशासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महावॉकेथॉनमध्ये सहभागी विद्यार्थी-विद्यार्थीनी, नागरिक आणि सहकार्य करणाऱ्या विविध संस्थांचे महापौर वंदना मगरे आणि जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आभार मानले. जलसंधारणाचा संदेश जनमानसात पोहोचविण्याच्या संकल्पाने कार्यक्रमाची सांगता झाली.

20/08/2026

जलसंधारण दिन विशेष

जलसंधारण : जलसमृद्ध, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा भक्कम पाया

- संजय राठोड

मंत्री, मृद व जलसंधारण, महाराष्ट्र शासन

पाणी म्हणजे शेतीचा श्वास आणि विकासाचा आधार आहे. बदलते हवामान आणि घटती भूजल

पातळी यामुळे जलसंधारणाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबाचे जतन करून

तो जमिनीत मुरवणे, ही काळाची गरज आहे. जलसंधारणातून मातीला नवजीवन, शेतीला आधार आणि

भावी पिढ्यांना सुरक्षित भविष्य देण्याची ताकद आहे.

महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र ३०७.५८ लाख हेक्टर असून, त्यापैकी १७४.७३ लाख हेक्टर

क्षेत्र शेतीखाली आहे. राज्यातील सुमारे ८२ टक्के शेती पावसावर अवलंबून असल्याने पावसाच्या पाण्याच्या

प्रत्येक थेंबाचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. राज्यातील २४१ लाख हेक्टर क्षेत्र पाणलोट

विकासासाठी पात्र असून, त्यापैकी १८२.४७ लाख हेक्टर क्षेत्रावर मृद व जलसंधारणाची विविध कामे पूर्ण

झाली आहेत. उर्वरित क्षेत्रावरही नियोजनबद्ध पद्धतीने कामे सुरू आहेत.

महाराष्ट्र शासनाने जलसंधारणाला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवून विविध प्रभावी योजना राबविल्या

आहेत आणि राबवत आहे. राज्याला जलसुरक्षिततेच्या दिशेने सक्षमपणे पुढे नेण्यासाठी मृद व जलसंधारण

विभाग सातत्याने कार्यरत असून जलस्रोतांचे संवर्धन, भूजल पुनर्भरण, विकेंद्रित जलसाठ्यांची निर्मिती

आणि शाश्वत जलव्यवस्थापनाला प्राधान्य दिले जात आहे.

जलयुक्त शिवारातून गावांच्या जलसमृद्धीकडे

जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यातील अनेक गावांमध्ये जलसाठे वाढले, विहिरींच्या

पाणीपातळीत सुधारणा झाली आणि संरक्षित सिंचनाला चालना मिळाली. ज्या शेतकऱ्यांना पूर्वी वर्षातून

एकच पीक घेता येत होते, अशा अनेक भागांत दुबार पिकांच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

जलसंधारणामुळे निर्माण होणारे संरक्षित सिंचन केवळ शेतीपुरते मर्यादित राहत नाही, तर ग्रामीण

बाजारपेठ, रोजगार, दुग्धव्यवसाय आणि लघुउद्योगांनाही चालना देते.

जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील यशानंतर जलयुक्त शिवार अभियान २.०

अंतर्गत राज्यातील ५,८५८ गावांमध्ये सुमारे १.४३ लाखांहून अधिक कामे प्रस्तावित झाली आहेत.

त्यापैकी १.२४ लाखांपेक्षा अधिक कामे पूर्ण झाली आहेत. जुलै २०२६ अखेर या अभियानावर २,३००

कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च करण्यात आला आहे.

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार-पाण्यासोबत मातीलाही नवजीवन

‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही योजना पर्यावरण आणि शेती यांचा सुंदर समन्वय

साधणारी आहे. धरणातील गाळ काढल्यामुळे पाणीसाठवण क्षमता वाढते, तर तोच सुपीक गाळ शेतात

टाकल्यामुळे जमिनीची गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता सुधारण्यास मदत होते.

२०२३-२४ ते २०२५-२६ या कालावधीत राज्यातील ३,३०५ जलाशयांमधून ९८०.५० लक्ष

घनमीटर गाळ काढण्यात आला असून, तो सुमारे १ लाख ९३ हजार एकर क्षेत्रावर पसरविण्यात आला

आहे. यासाठी सुमारे ३४५ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, ८१,११४ स.घ.मी. पाणीसाठा

पुनर्स्थापित झाला आहे. म्हणजेच जलसंधारण हे शेतीला केवळ पाणी देत नाही, तर जमिनीलाही नवजीवन

देते.

भूजल पुनर्भरण-भविष्याच्या जलसुरक्षेची गुरुकिल्ली

भूजल पुनर्भरण हा जलसंधारणाचा अत्यंत महत्वाचा नैसर्गिक फायदा आहे. गेल्या काही दशकांत

भूजलाचा मोठ्या प्रमाणावर उपसा झाल्यामुळे अनेक भागांत विहिरी कोरड्या पडणे, बोअरवेलची खोली

वाढणे आणि उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता कमी होणे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. याचा

शेतीसोबतच संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होतो.

पावसाचे पाणी योग्य पद्धतीने अडवून जमिनीत मुरविले, तर भूजल पातळी सुधारण्यास मदत

होते. ही प्रक्रिया केवळ शेतीसाठी नव्हे, तर पिण्याच्या पाण्याच्या दीर्घकालीन उपलब्धतेसाठीही अत्यंत

महत्त्वाची आहे. भविष्यातील गंभीर पाणीटंचाईचे संकट टाळायचे असेल, तर भूजल संवर्धन आणि

पुनर्भरणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल.

जलसंधारण म्हणजे पर्यावरणाचेही संवर्धन

जलसंधारणाचा पर्यावरणावरही अत्यंत सकारात्मक परिणाम होतो. एखाद्या भागात पाणी टिकून

राहिले, तर तेथील जैवविविधतेला आधार मिळतो. वृक्षसंवर्धनाला चालना मिळते, जमिनीतील ओलावा

टिकतो आणि नैसर्गिक परिसंस्था मजबूत होण्यास मदत होते. अनेक ठिकाणी जलसंधारणाच्या कामांनंतर

स्थानिक जैवविविधता आणि जलचरांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याची उदाहरणे दिसून येतात.

त्यामुळे जलसंधारण ही केवळ विकासाची योजना नसून निसर्गाशी असलेले आपले नाते अधिक दृढ

करण्याची प्रक्रिया आहे.

हवामान बदलाच्या आव्हानाला जलसंधारणाचे उत्तर

आज हवामान बदल हे जगासमोरील सर्वात गंभीर आव्हानांपैकी एक आहे. पावसाचे स्वरूप

बदलत आहे. काही दिवसांत अतिवृष्टी आणि त्यानंतर दीर्घ काळ पावसाचा खंड असे चित्र अनेक भागांत

दिसून येते. अशा परिस्थितीत केवळ मोठी धरणे किंवा पारंपरिक सिंचन व्यवस्था पुरेशी ठरणार नाही.

गाव पातळीवर पाणी अडवणे, पाणलोट विकास करणे, नैसर्गिक जलमार्ग जिवंत ठेवणे, पावसाचे

पाणी जमिनीत मुरवणे आणि स्थानिक जलस्रोत मजबूत करणे हा शाश्वत मार्ग आहे. हवामान बदल आणि

पर्जन्यमानातील अनिश्चिततेचा विचार करून मृद व जलसंधारण विभागाने जलयुक्त शिवार अभियान २.०,

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार आणि लघु सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती दिली आहे. आवश्यक

दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्यावरही भर दिला जात आहे.

गुणवत्तापूर्ण कामे आणि कालबद्ध अंमलबजावणी

या सर्व उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ

शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाची महत्वपूर्ण भूमिका आहे. विभागाच्या नव्या

प्रशासकीय आकृतिबंधाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पांच्या अंमलबजावणीला अधिक गती मिळाली आहे.

मंजूर कामे मूळ आराखड्यानुसार आणि निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला

आहे. गुणवत्तापूर्ण कामांसाठी स्वतंत्र मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या असून, मालगुजारी

तलावांच्या पुनरुज्जीवनासारख्या महत्त्वाच्या उपक्रमांनाही प्राधान्य दिले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र

फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करून जलसंधारण अधिक परिणामकारक

करण्यासाठी विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून ५.२५ लाख हेक्टर क्षेत्रावर कामे

केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नांतून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना-पाणलोट विकास

घटक २.० अंतर्गत राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये १४० प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून

सुमारे ५.२५ लाख हेक्टर क्षेत्रावर जलसंधारण, भूजल पुनर्भरण, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि

शेतकऱ्यांच्या उपजीविकेला चालना देणारी विविध कामे सुरू आहेत. या योजनेचे एकूण प्रकल्पमूल्य

१,२५१.११ कोटी रुपये असून, जुलै २०२६ अखेर सुमारे १,००३ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात

आला आहे.

मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन, सिमेंट बंधारे, पाणलोट विकास, नाला खोलीकरण, भूजल

पुनर्भरण आणि लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या जलसंवर्धन उपक्रमांची प्रभावी सांगड घालत

महाराष्ट्र जलसुरक्षिततेच्या दिशेने भक्कम वाटचाल करत आहे. नाला खोलीकरणाबरोबरच बांबू

लागवडीसारख्या पर्यावरणपूरक उपक्रमांवरही भर देण्यात आला आहे. विदर्भातील मालगुजारी तलावांची

कामे वेळेत पूर्ण करण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. हा दृष्टिकोन केवळ पाणी

साठविण्यापुरता मर्यादित नसून जलस्रोतांचे दीर्घकालीन संवर्धन सुनिश्चित करणारा आहे.

जलसंधारण दिनातून राज्यव्यापी लोकचळवळ

महाराष्ट्राच्या जलसंधारण क्षेत्राला दूरदृष्टी आणि व्यापक दिशा देणारे माजी मुख्यमंत्री दिवंगत

सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने राज्यात १५ ते २१ ऑगस्ट

२०२६ दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’, तर १५ ऑगस्ट २०२६ ते २६ जानेवारी २०२७ या कालावधीत

‘जलसंधारण अभियान’ राबविण्यात येत आहे.

या अभियानाचा महत्वाचा भाग म्हणून आज २१ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रातील सर्व ३६

जिल्ह्यांत ‘महा वॉकेथॉन २०२६ — वॉक फॉर वॉटर’ आयोजित करण्यात आली आहे. “माती वाचवा ,

पाणी जपा , सुरक्षित भविष्य घडवा” हा या अभियानाचा मुख्य संदेश आहे. सर्व जिल्ह्यांत ३ कि.मी. ‘वॉक

फॉर वॉटर’ आणि सामूहिक मृद व जलसंधारण शपथ आयोजित करण्यात आली आहे. नागरिक, युवक,

विद्यार्थी, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि विविध क्षेत्रांतील नागरिकांना या उपक्रमातून

जलसंधारणाच्या लोकचळवळीशी जोडण्याचा प्रयत्न आहे.

युवकांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ देत त्यांना या लोकचळवळीशी डिजिटल माध्यमातून

जोडण्यासाठी ‘रील चॅलेंज’ स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. माती संवर्धन, पाणी बचत, पावसाच्या

पाण्याचे संकलन, पाणलोट विकास आणि जलसंधारणाच्या नाविन्यपूर्ण कल्पना समाजापर्यंत

पोहोचविण्यासाठी युवकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.

प्रत्येक थेंब जपूया, महाराष्ट्र जलसमृद्ध करूया

जलसंधारण ही केवळ शासनाची योजना नाही, तर शासन आणि समाजाच्या सामूहिक

सहभागातून यशस्वी होणारी लोकचळवळ आहे. शासन योजना आखू शकते, निधी उपलब्ध करून देऊ

शकते, जलसंधारणाची कामे उभी करू शकते; पण त्या जलस्रोतांचे संवर्धन आणि पाण्याचा जबाबदारीने

वापर करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे.

शासनाचे दूरदृष्टीचे धोरण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रभावी नेतृत्व, उपमुख्यमंत्री एकनाथ

शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे सहकार्य, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि

विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या बळावर जलसमृद्ध, दुष्काळमुक्त आणि शाश्वत

महाराष्ट्र घडविण्याचा आपला संकल्प अधिक दृढ होत आहे.

जलसंधारण दिन हा केवळ एका दिवसाचा उत्सव ठरू नये. तो प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन

जीवनातील संकल्प बनला पाहिजे. घरातील पाणी असो, शेतातील पाणी असो किंवा गावातील जलस्रोत-

प्रत्येक थेंब जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.

चला, जलसंधारण दिनानिमित्त आपण सर्वजण संकल्प करूया—

पाणी अडवूया… पाणी जिरवूया…

माती वाचवूया… पाणी जपूया…

आणि जलसमृद्ध, दुष्काळमुक्त महाराष्ट्र घडवूया!

0000

20/08/2026

२१ ऑगस्ट रोजी आयोजित वॉकेथॉनसाठी प्रशासनाची व्यापक तयारी; मोठ्या संख्येने नागरिकांच्या सहभागाची अपेक्षा

जालना,दि.20(जिमाका) : जिल्ह्यात २१ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य वॉकेथॉनसाठी जिल्हा प्रशासनाकडून व्यापक नियोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी आतापर्यंत 4 हजाराहून अधिक नागरिकांनी नोंदणी केली असून, प्रत्यक्ष कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा आहे.
जिल्हाधिकारी, जालना यांच्या मार्गदर्शन व निर्देशानुसार सहभागी नागरिकांच्या सोयी-सुविधा, सुरक्षितता आणि कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन यासाठी विविध व्यवस्था करण्यात येत आहेत.
वॉकेथॉनच्या ठिकाणी सहभागींसाठी नोंदणी व चेक-इन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कार्यक्रम परिसरात आकर्षक प्रवेश कमान, आवश्यक ठिकाणी माहिती फलक, स्टँडीज, तसेच सहभागींसाठी विशेष सेल्फी स्टँड उभारण्यात येणार आहेत. वॉकेथॉनमध्ये जनजागृतीचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी विविध संदेश असलेले प्लॅकार्ड्स देखील सहभागींच्या हाती असतील.
कार्यक्रमात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी विशेष झुंबा उपक्रमासाठी स्वतंत्र स्टेज व आवश्यक ध्वनीव्यवस्था करण्यात येत आहे. सहभागी नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, बिस्किटे आणि केळी यांसारख्या अल्पोपहाराची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे.
मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याने आरोग्य व सुरक्षेला विशेष प्राधान्य देण्यात आले असून, आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. तसेच कार्यक्रमादरम्यान वाहतूक व कायदा-सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी पोलीस बंदोबस्त व आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या निर्देशानुसार विविध विभाग आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून वॉकेथॉनचे नियोजन करण्यात येत असून, हा उपक्रम नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागातून जनजागृती, आरोग्य आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा एक मोठा लोकसहभागाचा उपक्रम ठरणार आहे.
जिल्हा प्रशासनाने जालना जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होऊन या वॉकेथॉनला यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.

****

20/08/2026

युनिसेफ इंडियाचे राष्ट्रीय राजदूत आयुष्मान खुराना यांनी केले मुलांच्या सुरक्षित बालपणाचे आवाहन

ऊसतोड हंगामी स्थलांतराचा परिणाम झालेल्या मुलांसाठीच्या “कुटुंब आणि समुदायआधारित काळजी व संरक्षण” या युनिसेफ कार्यक्रमाला भेट

जालना,दि.20(जिमाका) : युनिसेफ इंडियाचे राष्ट्रीय राजदूत आणि आयुष्मान खुराना प्रसिद्ध अभिनेते यांनी (दि. 19) रोजी जालना येथे भेट देऊन, ऊसतोड हंगामी स्थलांतराचा परिणाम झालेल्या मुलांसाठी राबवण्यात येणाऱ्या “कुटुंब आणि समुदायआधारित काळजी व संरक्षण” या युनिसेफ कार्यक्रमाला भेट देऊन मुले आणि उपस्थितांशी संवाद साधला.
खुराना यांच्यासोबत युनिसेफ इंडियाच्या पथकात उप प्रतिनिधी (कार्यक्रम) यास्पर मोलर यांचा समावेश होता. या मोहिमेला राज्य सरकार आणि स्थानिक स्वयंसेवी संस्था यांचे सहकार्य आहे.
अनेक उपेक्षित कुटुंबांसाठी, आर्थिक अडचणींमुळे हंगामी स्थलांतर ही वास्तविकता आहे. यामुळे मुलांसाठी बालमजुरी, बालविवाह, शिक्षणात खंड, कौटुंबिक दुर्लक्ष आणि हिंसाचाराचा धोका वाढू शकतो. पालकांच्या अनुपस्थितीत काही वेळा विस्तारित कुटुंबासह किंवा आजी-आजोबांसोबत मागे राहणारी मुले शाळेत जातात किंवा त्यांना आरोग्य सेवाही मिळतात. परंतु, त्यांना अनेकदा भावनिक पाठिंबा मिळत नाही, घरातून दुर्लक्ष होण्याची शक्यता वाढते आणि घरगुती जबाबदाऱ्या अंगावर पडतात.
या समस्यांचे निराकरण करणाऱ्या आणि हिंसाचार, अत्याचार, शोषण व कौटुंबिक दुर्लक्ष रोखण्यासाठी तसेच बाल संरक्षण व्यवस्था बळकट करण्यासाठी युनिसेफ भारत सरकारसोबत काम करते. जालन्यात, जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था यांच्या सहकार्याने “कुटुंब आणि समुदायआधारित काळजी व संरक्षण” (किनशिप अँड कम्युनिटी केअर) कार्यक्रम राबवला जातो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्थानिक रहिवासी आणि सरकार यांनी एकत्र काम केल्यामुळे स्थलांतरित पालकांच्या मुलांसाठी सुरक्षित वातावरण, शिक्षणात खंड न पडणे या गोष्टी शक्य झाल्या आहेत. तसेच आरोग्यसेवा, पोषण व मानसिक-सामाजिक आधार यांसारख्या सेवाही मुलांसाठी उपलब्ध झाल्या असून बालमजुरी आणि बालविवाहाचा धोकाही कमी होण्यास मदत झाली आहे.
"हंगामी, आर्थिक अडचणींमुळे होणारे स्थलांतर हा स्वखुशीने निवडलेला पर्याय नसून अनेक कुटुंबांसाठी ते कठोर वास्तव आहे," असे मत आयुष्मान खुराना यांनी मुले आणि स्थानिक सदस्यांची भेट घेतल्यानंतर व्यक्त केले. "कोणत्याही मुलाला त्याच्या आवाक्यात नसलेल्या परिस्थितीमुळे आपले बालपण गमवावे लागू नये. जालन्यात, मी स्थानिक रहिवाशांना एकत्र येऊन स्थलांतरामुळे प्रभावित झालेल्या मुलांना संरक्षण देताना आणि त्यांना कुटुंबाशी जोडून घेऊन काळजी घेताना पाहिले. हा कार्यक्रम केवळ सुरक्षित घर पुरवत नाही तर नातेसंबंधही जपतो, मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतो आणि मुलांना उज्ज्वल भविष्याची आशा देते."
खुराना यांनी शंकर आसाराम या तरुण समुदाय नेत्याची भेट घेतली. शंकर यांनी युवा स्वयंसेवक म्हणून केलेल्या कामामुळे त्यांना स्थानिकांचा विश्वास संपादन करता आला. त्यांच्या कामामुळेच आज ते एका गावाचे सरपंच म्हणून निवडून आले आहेत. खुराना यांनी बारावीत शिकणारी विद्यार्थिनी आणि बालमित्र असलेल्या प्रतिक्षा हिचीही भेट घेतली. प्रतिक्षाने स्थलांतराचा किशोरवयीन मुलींवर होणारा परिणाम प्रत्यक्ष पाहिला आहे.
"बालमित्र हे मुलांसाठी आणि स्थानिकांसाठी विश्वासार्ह आणि उत्तम आदर्श आहेत. मुलांचे हक्क, सुरक्षितता आणि कल्याण तसेच मुलांच्या शिक्षणात खंड न पडण्यासाठी, बालमजुरी आणि बालविवाह रोखण्यासाठी ते मदत करतात. त्यामुळे प्रत्येक मुलाला शिकण्याची आणि यशस्वी होण्याची संधी मिळते. भारतात मुलांच्या संरक्षणासाठी बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) सारखे मजबूत कायदे आहेत. या वर्षी या कायद्याला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे संरक्षणात्मक उपाय हंगामी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबांसह प्रत्येक मूल आणि इतर कुटुंबापर्यंत प्रत्यक्षात पोहोचतील याची खात्री करणे," असे आयुष्मान खुराना म्हणाले.
ग्रामपंचायती आणि आघाडीच्या सेवा पुरवठादारांना एकत्र आणून, हा कार्यक्रम मुलांसाठी एक सामाजिक सुरक्षा तयार करतो. त्या माध्यमातून मुलांना शिक्षण, आरोग्यसेवा, पोषण आणि मानसिक-सामाजिक आधार दिला जातो. गावपातळीवर हा कार्यक्रम मुलांना कसा आधार देतो हे समजून घेण्यासाठी खुराना यांनी किशोरवयीन मुली, मुले आणि काही कुटुंबांची भेट घेतली.
किशोरवयीन मुलींशी झालेल्या संवादाबद्दल बोलताना खुराना म्हणाले की, "मी १८ वर्षांच्या शिल्पाला भेटलो. तिला कुटुंबासोबत स्थलांतराचा अनुभव आहे. पण आज तिने शालेय शिक्षण पूर्ण करून व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. तिचे शिक्षणच तिला हंगामी स्थलांतराचे पिढ्यानपिढ्या चालणारे चक्र मोडण्यास मदत करू शकेल अशी आशा आहे. शिक्षणासाठी योग्य, निरोगी आणि सुरक्षित वातावरणात दिल्यास मुलींची स्वप्ने नक्की पूर्ण होऊ शकतात."
पालकांच्या स्थलांतरानंतर आजोबा आपल्या दोन नातवंडांची काळजी घेत असलेल्या एका कुटुंबाचीही खुराना यांनी भेट घेतली. बालमित्र आणि स्थानिकांच्या मदतीने ही मुले शाळेत जातात. त्यामुळे आरोग्याशी संबंधित पोषण व लसीकरण सेवाही त्यांना मिळतात.
आपल्या भेटीबद्दल सांगताना खुराना म्हणाले की, "प्रत्येक मुलाला सुरक्षित, प्रेमळ आणि पोषक कौटुंबिक वातावरणात वाढण्याचा हक्क आहे. सरकार मुलांच्या संरक्षणासाठी कायदे आणि योजना तयार करते. त्याचवेळी युनिसेफ, महाराष्ट्र सरकार, जिल्हा प्रशासन आणि गावातील रहिवासी एकत्र येऊन प्रत्येक मूल सुरक्षित राहील यासाठी काळजी घेताना पाहून मला त्यांचा अभिमान वाटतो."
"सर्वाधिक असुरक्षित मुलांना सुरक्षित आणि पोषक वातावरण पुरवण्यात जालना जिल्हा प्रशासनाला साथ देताना युनिसेफला आनंद होत आहे," असे युनिसेफ इंडियाचे यास्पर मोलर म्हणाले. "मुलांवरील हिंसाचार रोखला जाऊ शकतो. बाल न्याय (काळजी आणि संरक्षण) कायदा २०१५ ला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. अशावेळी मुलांच्या आयुष्यात असलेले धोके वेळीच ओळखणे आणि कुटुंबांना आवश्यक सेवा देणे गरजेचे आहे. तसेच मुलांना सामाजिक संरक्षणाशी जोडण्यासाठी व्यवस्था अधिक बळकट करणेही महत्त्वाचे आहे. या कामासाठी सहकार्य देणाऱ्या आणि प्रत्येक मुलाच्या सुरक्षितता व काळजी या हक्कांसाठी पुढाकार घेणाऱ्या आयुष्मान खुराना यांचेही युनिसेफ मनःपूर्वक कौतुक करते."
यावेळी अभिनेते आयुष्यमान खुराना आणि युनिसेफ इंडियाच्या यास्पर मोलर यांनी जालना जिल्हाधिकाऱी आशिमा मित्तल यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जालना जिल्ह्यात युनिसेफच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या ‘बालमित्र’ उपक्रमाची माहिती दिली. तसेच या उपक्रमाचा मुख्य उद्देश स्थलांतरित कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवणे असल्याचे सांगितले. ऊसतोडणी किंवा मजुरीसाठी पालक स्थलांतरित झाल्यानंतर काही मुले गावात आजी-आजोबा किंवा नातेवाईकांकडे राहतात. त्यावेळेस ‘बालमित्र’ हे युवा स्वयंसेवक अशा मुलांना शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि मानसिक आधार देत असल्याची माहिती दिली.

****

20/08/2026

*महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला*

जालना,दि.20(जिमाका) : महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. या प्रक्रियेनंतर राज्यातील अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. पात्र मतदारांची नावे मतदार यादीत अचूकपणे समाविष्ट व्हावीत तसेच मतदार यादीच्या शुद्धतेत आणि पारदर्शकतेत सुधारणा व्हावी, या उद्देशाने ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रक्रियेसाठी 1 ऑक्टोबर 2026 ही पात्रता तारीख निश्चित करण्यात आली आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार, मतदार केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना करण्याची प्रक्रिया 24 ऑगस्ट 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना आपल्या नावाची नोंद तपासण्याची तसेच आवश्यक असल्यास दावे व हरकती दाखल करण्याची संधी मिळणार आहे.
प्रारूप मतदार यादीसंदर्भात 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. त्याचबरोबर 31 ऑगस्ट ते 29 ऑक्टोबर 2026 या कालावधीत प्राप्त दावे व हरकतींबाबत नोटिसा देणे तसेच त्यांची सुनावणी व निपटारा करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
विशेष सखोल पुनरिक्षणाच्या या संपूर्ण प्रक्रियेत पात्र मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासोबतच अपात्र किंवा चुकीच्या नोंदींबाबत प्राप्त होणाऱ्या दावे-हरकतींची छाननी केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आपले नाव, पत्ता आणि इतर आवश्यक तपशील तपासून पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दावे व हरकतींच्या प्रक्रियेनंतर आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करून 4 नोव्हेंबर 2026 रोजी महाराष्ट्रातील अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाने हे सुधारित वेळापत्रक जाहीर केले असून, त्यानुसार मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाची संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे.
मतदारांनी या प्रक्रियेदरम्यान आपली नोंद तपासून आवश्यक त्या दुरुस्त्या किंवा हरकती वेळेत नोंदवाव्यात, असे आवाहन निवडणूक यंत्रणेकडून करण्यात आले आहे.

****

20/08/2026

जलसंधारण अभियान ; नाला खोलीकरण व रुंदीकरणामुळे शेतकऱ्यांना फायदा…
#जलसंधारण #पाणीआडवा #पाणीजिरवा


20/08/2026

जलसंधारण अभियान ; पाणी है तो कल है, मिठ्ठी है तो जीवन है…
#जलसंधारण #पाणीआडवा #पाणीजिरवा


Address

Jalna
Jalna

Alerts

Be the first to know and let us send you an email when जिल्हा माहिती कार्यालय, जालना posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to जिल्हा माहिती कार्यालय, जालना:

Shortcuts

Share