03/09/2026
जालना महापालिका स्थायी समितीची बैठक संपन्न; कर मूल्यनिर्धारणासह विविध विषयांचा आढावा
जालना | दि. ३ सप्टेंबर २०२६
जालना महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक आज भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृहात स्थायी समिती सभापती अशोक उर्फ लक्ष्मीकांत मनोहरराव पांगारकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
बैठकीत कर मूल्यनिर्धारण, महापालिका उत्पन्नवाढ, B.O.T. प्रस्ताव, स्वच्छता निविदा, सणासुदीतील फॉगिंग तसेच विविध विभागांच्या कामांचा आढावा घेण्यात आला.
कर मूल्यनिर्धारणासाठी नियुक्त एजन्सीच्या कामाचा आढावा घेताना शहरातील सुमारे ६ हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. सध्या सहा पथकांद्वारे सर्वेक्षणाचे काम सुरू असून, महापालिकेचे उत्पन्न सुमारे १०० कोटी रुपयांपर्यंत वाढविण्याच्या उद्दिष्टाने काम करण्याच्या सूचना सभापतींनी दिल्या.
महापालिकेला प्राप्त होणारा निधी व त्यातून प्रस्तावित कामांची माहिती सर्व विभागप्रमुखांनी स्थायी समितीला पूर्वकल्पित स्वरूपात देण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच मागील नगरपालिका काळातील B.O.T. प्रस्तावांची सद्यस्थितीचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी स्वच्छता निविदा प्रक्रिया येत्या तीन दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळीच्या काळात आवश्यक ठिकाणी नियमित धूर फवारणी (फॉगिंग) करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या.
बैठकीस स्थायी समिती सदस्य भास्कर आबा दानवे, अक्षय गोरंट्याल, महावीर ढक्का, अशोक पवार, महेश निकम तसेच महापालिकेचे अधिकारी, विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीत निश्चित करण्यात आलेल्या कामांचा प्रगती अहवाल संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लेखी स्वरूपात वेळेत सादर करणे आवश्यक असून, प्रगती अहवाल न देणाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा सभापती अशोक उर्फ लक्ष्मीकांत मनोहरराव पांगारकर यांनी दिला.
#जालना #जालना_महानगरपालिका #स्थायीसमिती #स्थायीसमितीबैठक #करमूल्यनिर्धारण #महापालिका #शहरविकास #स्वच्छताव्यवस्था #नागरिकहित #नागरीसुविधा