09/03/2015
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भलेही काँग्रेस पराभूत झाली असेल. परंतु, खरे ‘अच्छे दिन’ देण्याची क्षमता फक्त काँग्रेसमध्येच असल्याचे आता जनतेच्याही लक्षात आले आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा एकदिलाने कामाला लागले असून, पुनरागमनापासून काँग्रेसला कोणीही रोखू शकणार नाही, असा आत्मविश्वास नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.श्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारताना आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आ.श्री माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी श्री मोहन प्रकाश, माजी केंद्रीय गृहमंत्री श्री सुशीलकुमार शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष श्री एन.एम. कांबळे, विधान परिषदेचे सभापती श्री शिवाजीराव देशमुख, ज्येष्ठ नेते श्री पतंगराव कदम, विरोधी पक्षनेते श्री राधाकृष्ण विखे पाटील, उपनेते श्री विजय वडेट्टीवार, श्री हर्षवर्धन पाटील, मुंबई विभागीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री संजय निरूपम, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा श्रीमती कमलताई व्यवहारे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष श्री विश्वजित कदम, एनएसयुआयचे प्रदेशाध्यक्ष श्री शिवराज मोरे, सेवादलचे अध्यक्ष श्री चंद्रकांत दायमा, इंटकचे अध्यक्ष श्री जयप्रकाश छाजेड यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते, आजी-माजी आमदार व खासदार, पक्षाचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यकर्त्यांना संबोधित करताना खा.श्री अशोक चव्हाण म्हणाले की, प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी मी एकटा पार पाडू शकणार नाही. त्यासाठी सर्वांची साथ लागेल. कार्यकर्त्यांनी वाईट दिवसांची काळजी न करता काम करीत रहावे. काँग्रेसचे आणि जनतेचे ‘अच्छे दिन’ परतल्याशिवाय राहणार नाहीत. पक्षात काम करेल त्यांला संधी मिळेल, प्रोत्साहन दिले जाईल. कुठेही गटबाजी किंवा आपपरभाव असणार नाही. काँग्रेस पक्ष हाच एकमेव गट, याच भूमिकेतून पुढील वाटचाल होईल. काही कारणांमुळे ज्यांनी मागील काळात काँग्रेस सोडली, ते पक्षात परतून चांगले काम करू इच्छित असतील तर त्यासंदर्भात सकारात्मक पद्धतीने विचार केला जाईल, असे संकेत खा.श्री चव्हाण यांनी दिले.
नवीन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी यावेळी सत्तारूढ पक्षांच्या लोकविरोधी धोरणांवर कडाडून टीका केली. काँग्रेस पक्ष विरोधासाठी विरोध करणार नाही. लोकांचे प्रश्न सकारात्मक पद्धतीने सरकार समक्ष मांडण्याचा आमचा प्रयत्न असेल. परंतु, लोकसभेतील बहुमताच्या बळावर आणि विकासाच्या नावाखाली सरकार जबरदस्तीने शेतक-यांच्या जमिनी हिरावून घेणार असेल व त्यांना न्यायालयात दाद मागण्याचीही संधी मिळणार नसेल तर काँग्रेस रस्त्यावर उतरून सरकारला ते निर्णय मागे घेण्यास भाग पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा खा.श्री चव्हाण यांनी दिला.
याप्रसंगी खा.श्री चव्हाण यांनी काँग्रेसच्या काळातील अनेक चांगले निर्णय व भाजपच्या दुटप्पी धोरणांची तुलना केली. ते म्हणाले की, आदिवासींच्या जमिनी हिरावून घेतल्या जाऊ नयेत म्हणून काँग्रेसनेच कायदा आणून त्यांना संरक्षण दिले. दुसरीकडे भाजपचे सरकार सर्वसहमतीविनाच शेतक-यांच्या जमिनी लुबाडायला निघायले आहे. काँग्रेसने मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढला. भाजपच्या सरकारने विहित वेळेत अध्यादेशाचे विधेयकात रूपांतर केले नाही आणि नवा अध्यादेशही काढला नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या मागास मुस्लीम समाजाला आरक्षणाचे लाभ मिळू शकले नाहीत. मुस्लीम आरक्षणाचा निर्णय आपोआप रद्द झाला, आम्ही रद्द केला नाही, असे मुख्यमंत्री सांगत असतील तर ही जनतेची फसवणूक आहे.
अलिकडच्या काही महिन्यात राज्यात 1100 शेतक-यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. परंतु, सरकारला अजूनही दुष्काळाची तीव्रता लक्षात आलेली नाही. मुख्यमंत्री आणि मंत्री उद्घाटने व शासकीय कार्यक्रमातच व्यस्त आहेत. शेतकरी आत्महत्या थांबविण्यापेक्षा अमके पाप कोणी केले, तमके पुण्य कोणी केले यावर चर्चा करण्यात त्यांना जास्त स्वारस्य आहे. परंतु, या चर्चेऐवजी शेतकरी आत्महत्यांमुळे महाराष्ट्राच्या नावलौकिकाला धक्का लागणार नाही, याची त्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी निवर्तमान प्रदेशाध्यक्ष आ.श्री माणिकराव ठाकरे यांनी नव्या अध्यक्षांना सूत्रे सोपवली. त्यानंतर आ.श्री ठाकरे यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांच्या आभाराचा प्रस्ताव मांडण्यात आला. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी आजवर मिळालेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहकार्याशिवाय ही जबाबदारी सांभाळणे शक्यच नव्हते, असे सांगून मावळत्या प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्या काळात झालेल्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेतला.
या कार्यक्रमाला इतरही मान्यवरांनी संबोधित केले. श्री मोहन प्रकाश यांनी नवीन अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या व मावळत्या अध्यक्षांच्या काळात झालेल्या कामांबद्दल गौरवोद्गार काढले. श्री सुशीलकुमार शिंदे यांनी श्री चव्हाण यांची कारकिर्द पक्षाला नवी दिशा देईल, असा विश्वास व्यक्त केला. श्री शिवाजीराव देशमुख यांनी या कार्यक्रमाला झालेली गर्दी काँग्रेसने मरगळ झटकल्याचा संकेत असल्याचे सांगितले. श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आजवर माणिकरावांनी पेललेल्या आव्हानांना भविष्यात अशोकराव यशस्वीपणे तोंड देतील, असा विश्वास व्यक्त केला. श्री पतंगराव कदम यांनी काँग्रेस पक्षाला पुन:श्च मजबूत करण्याची गरज विषद केली. श्री हर्षवर्धन पाटील यांनी सध्या देशावर मोठे वैचारिक संकट घोंगावत असून, त्याला परतवून लावण्याची क्षमता फक्त काँग्रेस पक्षात असल्याचे सांगितले. श्री श्योराज जीवन वाल्मिकी यांनी नवीन प्रदेशाध्यक्षांच्या आजवरच्या कारकिर्दीचा आढावा घेत त्यांची पुढील कामगिरी निश्चितच सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारी असेल, असा विश्वास व्यक्त केला. श्री संजय निरूपम यांनी महाराष्ट्रात काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याचे सांगितले. श्रीमती कमलताई व्यवहारे यांनी नुकत्याच झालेल्या पराभवाने खचून न जाता पक्षबांधणीसाठी नव्या प्रदेशाध्यक्षांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन उपस्थितांना केले. श्री विश्वजित कदम यांनी मनोगत व्यक्त करताना दिवंगत मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचा उल्लेख केला. स्व. शंकरराव चव्हाणांनी काँग्रेसच्या अतिशय अडचणीच्या काळात सूत्रे स्वीकारून पक्षाला यश मिळवून दिले होते. श्री अशोक चव्हाण देखील आज खडतर परिस्थिती पक्षाची सूत्रे स्वीकारत असून, ते सुद्धा स्व. शंकरराव चव्हाणांच्या पावलावर पाऊल ठेवून काँग्रेसला नवी उर्जा देतील, असे श्री कदम म्हणाले.