06/07/2026
सामान्य रुग्णालयातील समस्या तात्काळ सोडवा; अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन – ॲड. अमोल अंधारे
खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध प्रलंबित प्रश्न, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा आणि रुग्णांना भेडसावणाऱ्या गंभीर अडचणींबाबत शिवसेना खामगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने वैद्यकीय अधीक्षकांना सविस्तर निवेदन देण्यात आले.
रुग्णालयातील आरोग्य सेवा तातडीने सुधारण्यात यावी, रुग्णांची होणारी हेळसांड थांबवावी आणि नागरिकांना दर्जेदार उपचार उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.
निवेदनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :
• रुग्णालयात तात्काळ सोनोग्राफी सेवा सुरू करून कायमस्वरूपी रेडिओलॉजिस्टची नियुक्ती करावी.
• सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नियोजित वेळेत उपस्थित राहून रुग्णांना तत्पर सेवा द्यावी.
• किरकोळ कारणांवरून रुग्णांना अकोला येथे रेफर करण्याची पद्धत थांबवून शक्य तितके उपचार स्थानिक रुग्णालयातच उपलब्ध करून द्यावेत.
• सर्व वॉर्ड व परिसराची नियमित व प्रभावी स्वच्छता राखावी.
• डिलिव्हरी वॉर्डमधील नर्सिंग स्टाफकडून रुग्ण व नातेवाईकांशी होणारी उद्धट वागणूक तात्काळ थांबवावी.
• सिटी स्कॅन विभागातील गैरप्रकार रोखून तपासणीचे अधिकृत दरपत्रक दर्शनी भागात लावावे.
• रुग्णालयातील ए.सी., पंखे, विद्युत व्यवस्था तसेच जनरेटरची सुविधा तातडीने सुरळीत करावी.
या निवेदनावर शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. अमोल अंधारे, उपजिल्हाप्रमुख संजय अवताडे, गजानन उर्फ पिंटू धोरण, तालुकाप्रमुख राजेंद्र बघे, शहरप्रमुख चेतन ठोंबरे, युवासेना शहरप्रमुख राहुल कळमकार, महिला आघाडी तालुका प्रमुख संघटक सौ. जयश्री देशमुख, कल्पना गायगोळ, पल्लवी पाटील, उपशहर प्रमुख करण उर्फ भाऊ बिडकर, करण छापरवाल, जीवन जाधव, विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख विक्की सरवान, वैद्यकीय आघाडी जिल्हा संघटक पियुष चव्हाण, उपतालुकाप्रमुख बाळासाहेब पेसोडे, रवी माळवंदे, ज्ञानेश्वर शेगोकार, पंकज अंबारे, कृष्णा वाघ, रुपेश तायडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
यावेळी जिल्हाप्रमुख ॲड. अमोल अंधारे यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, “उपजिल्हा सामान्य रुग्णालयातील या मूलभूत समस्या तात्काळ सोडवून नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी. अन्यथा शिवसेना आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत तीव्र आंदोलन छेडेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील.”