28/10/2024
'स्वच्छ दिवाळी - शुभ दिवाळी' 'माझी वसुंधरा अभियान 5.0' व ' स्वच्छ सर्वेक्षण - 2024' अंतर्गत
फटाके बंदीबाबत जाहीर सुचना
नगर परिषद खामगांव क्षेत्रातील सर्व फटाका व्यवसायधारक व वापर करणारे नागरीकांना कळविण्यात येते की, खामगांव शहरात माझी वसुंधरा अभियान 5.0 आणि स्वच्छ सर्वेक्षण 2024 ची अंमलबजावणी सुरू झालेली असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व प्रदूषणास आळा घालणेकरिता उपाययोजना सुरू आहेत व दिवाळी सणादरम्यान फटाक्यांचा वापर हा जास्त प्रमाणात केला जातो. मा. शासन निर्णय परिपत्रक क्रमांक संकिर्ण 1020/सी-186/पोल- 9, दिनांक 06 नोव्हेंबर 2020 नुसार परदेशातून आयात केलेले फटाके विक्री व त्यांचा वापरास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. भारत सरकार, अधिसूचना क्रमांक GS.R. 682 (E) Date. 05/10/1999 अन्वये 125 dB (AI) पेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांची निर्मिती, विक्री वापर करण्यास मनाई केली आहे. अशा फटाक्यांचे उत्पादन, विक्री किंवा वापर बेकायदेशीर आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार फटाक्यांमध्ये बेरियम सॉफ्ट, लिथीयम, अर्सेनिक, लीड, मर्क्युरी, यासारखे घट असणारे फटाके वापरण्यास बंदी आहे, या घटकांमुळे विषारी वायु तयार होतात हे वायु प्राणी, पक्षी व वनस्पतीस घातक आहेत, तसेच जनहित याचिका क्र. 152/2015 मध्ये मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार फटाका विक्रेत्यांनी विस्फोटक व अधिनियम 1884 आणि त्यास अंतर्गत केलेले विस्फोटक नियम 2008 मधील प्रतिबंध व नियम यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे, तरी सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, यावर्षी जास्त आवाज करून ध्वनी प्रदूषण करणारे व हवामान प्रदूषण करणारे फटाक्यांची विक्री अथवा वापर करू नये, तसेच फटाके विक्रेत्यांनी बंदी असलेले फटाके विक्री करू नयेत. सर्व फटाका व्यवसायधारकांनी फटाक्यांची विक्री नगरपरिषदेने निश्चित करून दिलेल्या ठिकाणी परवानगी घेवूनच करण्यात यावी. महाराष्ट्र शासनाने माझी वसुंधरा अभियान 5.0 आणि स्वच्छ सर्वेक्षण 2024 अभियानांतर्गत फटाके मुक्त प्लास्टीक मुक्त, कचरा मुक्त, प्रदुषण मुक्त व पर्यावरणपूरक ग्रीन फेस्टीवल, सण-उत्सव साजरे करण्याचा प्रयत्न करूया. सदर अभियानांतर्गत नागरिकांनी फटाक्यांचा वापर टाळावा, प्लास्टीकचा वापर टाळून कापडी किंवा कागदी पिशवीचा वापर करावा, सण समारंभामध्ये टाकावू वस्तूंचा व पुनर्वापर करण्यायोग्य वस्तूंचा वापर जास्तीत जास्त करावा, पर्यावरणपुरक, प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करावी. यंदा सगळे उत्साह आनंदाने व प्रदूषणमुक्तपणे साजरे करून खामगांव नगरपरिषदेस महाराष्ट्र शासनाने चालू केलेल्या माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ महाराष्ट्र अभियानास सहकार्य करावे, तरी येणारी दिवाळी हरीत व पर्यावरणपूरक दिवाळी म्हणून साजरी करूया. तसेच ही दिवाळी आनंदी व सुरक्षित राहो अशा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !