23/02/2025
*⭐थुंकी मुक्त कोल्हापूरची शपथ घेऊन संत गाडगेबाबांना अभिवादन*
"राधाबाई शिंदे शाळेतील शिक्षीकांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग.."
आयुष्यभर स्वच्छतेची शिकवण देणाऱ्या संत गाडगेबाबांच्या जयंतीचे औचित्य साधून आज सार्वजनिक ठिकाणी थुंकणे विरोधी चळवळीने,शिक्षणाची वाट दाखवणाऱ्या राजारामपुरीतील माऊली पुतळ्याजवळ थुंकीमुक्त व निरोगी कोल्हापूरची शपथ घेऊन फेरीद्वारे नागरिकांचे प्रबोधन केले.
मुलांना जबाबदार नागरिक बनवण्यात शिक्षकांची भूमिका मोलाची ठरते. असे आदर्श शिक्षक मुलांना लाभले तर पुढील पिढी व्यसनमुक्त व घरासोबतच परिसर स्वच्छते विषयी जागरूक असणारी असेल . असे कौतुकास्पद उद्गार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपुरकर यांनी काढले.
उघड्यावर थुंकल्यामुळे रोगराई पसरते तसेच सार्वजनिक मालमत्ता उध्वस्त होते. असे असूनही अनेक वर्षांपासून पाठपुरावा करूनही प्रशासनाने ही गोष्ट गांभीर्याने घेतलेली नाही अशी खंत चळवळीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
उपक्रमात सार्वजनिक स्वच्छते विषयीच्या फलकासोबत "थुंकणारा नवरा नको ग बाई," "काका मामा थुंकता तुम्ही, आजारी पडतो आम्ही "असे छोट्या मुलांच्या हातातील संवेदनशील संदेश नागरिकांना विचार करायला भाग पाडत होते.
उपक्रमाचे संयोजन निना जोशी व दीपा शिपुरकर यांनी केले. विजय धर्माधिकारी, डॉ. देवेंद्र रासकर, अभिजीत गुरव, ललित गांधी, कपिल मुळे, ललिता गांधी, मोहन सातपुते यांनी परिश्रम घेतले. उपक्रमास तात्या गोवावाला,डॉ. मकरंद ऐतवडे , अभिजीत जाधव,अश्विनी माने , अल्लाउद्दीन बागवान, संघसेन जगतकर तसेच राधाबाई शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल च्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक वर्गाच्या शिक्षिका मोठ्या संख्येने सहभागी होत्या.