28/09/2025
…आणि लोकराजा छत्रपती शाहू महाराजांनी तथाकथित सरकार मंडळींचा माज उतरवला !
धामधुमीच्या काळात अनेक सरदार घराण्यांनी तलवार हाती धरून राज्याची सेवा केली. युद्धकाळ संपला आणि राज्ये स्थिर झाली तेव्हा सरदार गेले आणि कोल्हापूर राज्यात “सरकार” म्हणवून घेणारा नवीनच प्रकार उदयास आला. या तथाकथित सरकार मंडळींनी राजर्षी शाहू छत्रपती महाराजांना राज्यकारभारात व सामाजिक चळवळीत अतोनात त्रास दिल्याचे अनेक ऐतिहासिक संदर्भ आढळतात. खुद्द छत्रपतींनाच त्रास देणारे आणि सदासर्वकाळ दरबारी तोऱ्यात फिरणारे हे लोक सामान्य जनतेची किती पिळवणूक करत असतील, याला काही अंदाजच नाही.
राजर्षी शाहू महाराज छत्रपतींच्या गादीवर येण्यापूर्वीचे अर्धे शतक कोल्हापूर राज्यास अल्पवयीन व अल्पायुषी छत्रपती राहिल्याने छत्रपतींचा अंमल कमी होऊन या सरकार मंडळींनी आपले प्रस्थ बरेच वाढविले होते. छत्रपतींच्या दरबाराप्रती यांची बेपर्वाई वाढलेली होती. यापैकी कित्येकजण दरबारावर शक्य असेल त्या मार्गाने कुरघोडी करण्यास झटत होते. दरबाराच्या मार्गातील हे काटे राज्यकारभाराच्या कामी जरी येत नसले तरी ते जाचक होऊ नयेत, याकडे महाराजांनी लक्ष दिले. या सरकार मंडळींची मिजासी व चढेलपणामुळे यांना राज्यकारभारातून दूर ठेवून सर्वसामान्य मराठा व इतर समाजांतील शिक्षित तरुणांना अधिकारी पदांवर घेऊन शाहू महाराजांनी राज्य चालविले होते. तसेच, महाराष्ट्रातील ग्राम व्यवस्थेत पाटील हा अनुवंशिक पुढारी गणला जायचा. पाटील हा खेड्यातील मुख्य अधिकारी असून, त्या गावातील शेतकरी वर्गापैकीच तो एक असल्याने त्यांचा स्वाभाविक पुढारी असतो. गावकीचा कारभार पाहण्यासाठी व या कथित सरकार मंडळींना बाजूला सारून पाटलांना पुढे आणण्यासाठी महाराजांनी बळ दिले. कोल्हापूरातील विद्यार्थी वसतीगृहांमध्ये तरुण पाटलांना त्यांच्या कर्तव्याचे ज्ञान करून देण्यासाठी व पाटीलकीचे प्रशिक्षण देण्यासाठी विशेष वर्ग सुरू केले होते. पुढे याच वर्गाचे रूपांतर महाराजांनी “दिल्ली दरबार पाटील स्कूल” मध्ये केले. मुंबई येथे भव्य पाटील परिषद देखील महाराजांनी आयोजित केलेली होती.
स्वतःचे असे काहीएक कर्तृत्व नसताना केवळ पूर्वपुण्याईवर मोठेपणा मिरवणाऱ्या व सर्वसामान्यांवर अंमल गाजवण्याची खुमखुमी असणाऱ्या दोन कथित सरकार मंडळींचा शाहू महाराजांनी चांगलाच माज उतरवल्याची एक आठवण भाई माधवराव बागल यांनी लिहिलेली आहे. ती अशी,
एके दिवशी शाहू महाराज त्यांचेकडील एक साधी फोर्ड मोटार घेऊन शहरात निघाले. महाराज स्वतः गाडी चालवत होते तर गाडीमध्ये बांधकामावरील डाकवे मिस्त्री, महाराजांचे हुजरे, पागेवरील कामगार, पापा परदेशी, आबालाल रेहमान व खंडेराव बागल यांना अगदी दाटीवाटीनेच बसवले होते. गाडीमध्ये आता लहान मुल बसण्याइतकीही जागा नव्हती. अशी ही गाडी घेऊन महाराज थेट एका मोठ्या सरकाराच्या बंगल्यावर गेले. स्वतःच त्याला हाक मारली. म्हणाले, चल बरोबर. त्याला गाडीत कुठे बसावे कळेना ! महाराजांनी गाडी सुरुही केली. गडबडीत हा सरकार तसाच गाडीच्या दरवाजाला लटकला. तशीच गाडी घेऊन महाराज दुसऱ्या सरकारच्या बंगल्यावर गेले. त्यालाही चल म्हणाले. पहिल्या सरकारला पाहून तोही तसाच दुसऱ्या दाराला लटकला. गाडीला लोंबकळणारे हे सरकार घेऊन गाडी शहरात गेली. शाही पोषाखातील हे मिजासखोर सरकार गाडीला लोंबकळत उभे राहिलेत आणि फाटकातुटका पोशाख केलेली, साधी गरीब माणसं माणसं मात्र गाडीत बसलेत. गंमत म्हणजे अशा या गाडीची मिरवणूक साऱ्या गावभर काढून, लटकलेल्या सरकारांना नुसतंच फिरवून तसंच बंगल्यावर सोडून दिलं. गावभर या सरकार जमातीची चांगलीच शोभा झाली. जनतेला ऐरीगैरी समजणाऱ्या या बढाईखोर सरकारांचा माज उतरवला. जनता कमी दर्जाची नाही, मी तुमच्यापेक्षा त्यांना जास्त मानतो, हे छत्रपतींनी कृतीतून दाखवून दिले.
राजर्षी शाहू महाराजांचे नातू मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराजांनी अशाच एका प्रसंगी या सरकार मंडळींना मांड्या घालून जमिनीवर बसायला लावले होते आणि सर्वसामान्य लोकांना महाराजांनी खुर्च्यांवर बसवले होते, अशी आठवण कोल्हापुरातील जुनी मंडळी सांगतात.
आजच्या काळातही अशी एखादी कृती करण्याची वेळ परत आली आहे की काय, असे वाटते. लोकशाही असल्याने या कथित सरकारांचे अस्तित्व आता मावळले आहे. मात्र पावसाळ्यात जशी बेडकं वर येतात, तसे पारंपारिक कार्यक्रमांत हे सरकार लोक अचानक प्रकट होतात. एरवी बिळात असणाऱ्या या बेडकांची कोल्हापुरातील पारंपारिक धार्मिक कार्यक्रमांत भाविकांवर व छत्रपती प्रेमींवर डराव डराव पाहायला मिळते. आता भारतात लोकशाही आहे, कोल्हापूरचे छत्रपती हे लोकराजे आहेत आणि कोल्हापूरचे पारंपारिक धार्मिक कार्यक्रम हे लोकोत्सव आहेत. या लोकोत्सवातून लोकांनाच दूर ढकलणाऱ्या ढकलकरी बेडकांना लोकांनीच जागा दाखवली असती, मात्र छत्रपतींकडे पाहून लोक संयम ठेवतात, त्याचा हे अतीच गैरफायदा घेताना दिसतात. कोल्हापूरच्या लोकोत्सवाला बाधा आणणाऱ्या, सर्वसामान्य जनतेला त्यांच्या लाडक्या छत्रपतींपासून व आराध्य दैवतापासून दूर ढकलणाऱ्या या एकदिवसीय तथाकतीत सरकार कुप्रवृत्ती ठेचण्यासाठी आजच्या काळातही लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचीच गरज आहे..!
यामध्येही स्वकर्तृत्व असणारे, जनतेशी नाळ व छत्रपतींशी निष्ठा असणारे सन्माननीय अपवाद देखील निश्चितच आहेत. हे अपवाद वगळले तर बाकीच्यांसाठी राजर्षी शाहू महाराजांचेच एक विधान आजही लागू पडते, “ही सरकार मंडळी केवळ दरबारी शोभेची बाहुली आहेत, याउपर त्यांचा काडीमात्र उपयोग नाही !”
ऐतिहासिक संदर्भ :
श्रीमच्छत्रपती शाहू महाराज यांचे चरित्र, प्रो. लठ्ठे, पान २१२ ते २१८, पान २८६,२८७