02/08/2026
"जाती देवाने नव्हे, पंडितांनी निर्माण केल्या" या विधानावर मोठी चर्चा सुरू आहे. परंतु इतिहासाचा अभ्यास करताना केवळ एखाद्या विधानावर नव्हे, तर उपलब्ध ऐतिहासिक पुरावे, समाजरचनेचा विकास आणि विविध संस्कृतींचा संदर्भ यांचाही विचार करणे आवश्यक आहे.
सर्वप्रथम, मोहन भागवत यांनी नेमके कोणत्या संदर्भात काय म्हटले, याची मूळ भाषणातून खात्री करणे आवश्यक आहे. माध्यमांमध्ये प्रसारित झालेले प्रत्येक विधान शब्दशः अचूक असेलच, असे गृहीत धरता येत नाही.
परंतु त्यांनी असे म्हटले असो वा नसो, मुख्य प्रश्न असा आहे की - "जातीव्यवस्था खरंच पंडितांनी निर्माण केली का?"
भारतात विविध आकडेवारीनुसार सुमारे 3 हजार जाती आणि जवळपास 25 हजार उपजाती आहेत. अनेक जुन्या ग्रंथांमध्ये ही माहिती आढळते. ही आकडेवारी काही दशके जुनी असल्यामुळे आज त्यात थोडाफार बदल झालेला असू शकतो.
परंतु इतक्या हजारो जाती आणि उपजाती एका व्यक्तीने किंवा एका समाजघटकाने निर्माण केल्या, असे मानणे वास्तववादी वाटत नाही.
असे कधीच घडले नाही की, एखाद्या दिवशी सर्व लोकांना ब्राह्मणांनी एका रांगेत उभे करून कोणीतरी सांगितले -
"आजपासून तू अमुक जातीचा, तू तमुक जातीचा, आणि तू अमुक उपजातीचा."
अशी गोष्ट व्यवहारात शक्यच नव्हती.
भारतात हजारो जाती आणि हजारो उपजाती आहेत. त्या एका व्यक्तीने किंवा एका समाजघटकाने एका दिवसात निर्माण केल्या, असे मानणे तर्कसंगत वाटत नाही. समाजाच्या दीर्घकालीन उत्क्रांतीतून सामाजिक रचना निर्माण होत गेली, हा अधिक इतिहाससुसंगत दृष्टिकोन आहे.
समाजशास्त्रज्ञ आणि मानववंशशास्त्रज्ञ डॉ. इरावती कर्वे यांनी Hindu Society - An Interpretation या ग्रंथात असे मत मांडले आहे की, सिंधू संस्कृतीतही जन्माधारित सामाजिक विभागणीची काही रूपे अस्तित्वात होती. याचप्रमाणे चीन, जपान, आफ्रिकेतील अनेक समाज तसेच युरोपातील सरंजामशाही व्यवस्थेमध्येही जन्म, वंश किंवा सामाजिक स्तरांवर आधारित वर्गीकरण आढळते. यावरून अशी जात/ वर्ण व्यवस्था केवळ भारतापुरती मर्यादित नव्हती, हे स्पष्ट होते.
म्हणूनच, जाती किंवा जन्माच्या आधारे समाजाचे वर्गीकरण भारताबाहेरील अनेक देशांत आणि संस्कृतींमध्ये विविध स्वरूपांत आढळते.
अशा परिस्थितीत प्रत्येक देशात जाऊन पंडितांनीच जातिव्यवस्था निर्माण केली, असे म्हणणे वस्तुस्थितीशी सुसंगत ठरत नाही.
जर आपण पूर्वग्रह न ठेवता विचार केला, तर समाज जसजसा विकसित झाला, तसतशी त्याची रचनाही बदलत गेली. प्रागैतिहासिक काळापासून प्राचीन काळ, मध्ययुग आणि आधुनिक काळापर्यंत समाज अनेक टप्प्यांतून गेला. त्या-त्या काळातील सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि राजकीय परिस्थितीमुळे समाजात विविध प्रकारच्या रचना निर्माण होत गेल्या.
ही गोष्ट एका उदाहरणातून अधिक स्पष्ट करता येईल.
भारताला स्वातंत्र्य नेमके कोणी मिळवून दिले? या प्रश्नाचे एकच निश्चित उत्तर देता येत नाही.
भारताला स्वातंत्र्य केवळ महात्मा गांधींनी मिळवून दिले, किंवा केवळ नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी, किंवा केवळ १९४६ च्या नौदल उठावामुळे, किंवा केवळ काँग्रेसमुळे मिळाले, असे म्हणता येत नाही. दुसरे महायुद्ध, इंग्लंडची कमकुवत झालेली स्थिती, जागतिक राजकीय बदल आणि असंख्य स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान , या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून भारत स्वतंत्र झाला. इतिहासातील मोठ्या घटना अनेक घटकांच्या संयुक्त परिणामातून घडतात.
याचप्रमाणे जातिव्यवस्थेच्या निर्मितीबाबतही विचार केला पाहिजे.
कल्पना करा -कोणीतरी जाहीर केले की, "आजपासून समाजात शंभर-दोनशे जाती असतील," आणि त्यानंतर हजारो जाती व 25 हजार उपजाती निर्माण झाल्या, आणि संपूर्ण समाजाने ते कोणताही विरोध न करता स्वीकारले. अशी घटना व्यवहारात घडणे अशक्यच आहे.
म्हणूनच इतिहासाचा अभ्यास करताना समाजव्यवस्थेतील बदल क्रमाक्रमाने आणि अनेक घटकांच्या परस्पर परिणामातून घडतात, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. जातिव्यवस्थेच्याही बाबतीत हेच अधिक तर्कसंगत आणि इतिहासाशी सुसंगत स्पष्टीकरण मानावे लागेल.
बौद्ध, जैन आणि सनातन धर्माच्या ग्रंथांमध्ये ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यात श्रेष्ठत्वाविषयीचे वैचारिक मतभेद व संघर्ष उल्लेखिलेले आहेत. अनेक बौद्ध ग्रंथांमध्ये क्षत्रियांना श्रेष्ठ मानले गेले आहे, तर सनातन परंपरेत ब्राह्मणांना महत्त्व दिल्याचे दिसते. यावरून त्या काळात विविध समाजघटकांमध्ये श्रेष्ठत्वाबाबत वेगवेगळ्या धारणा अस्तित्वात होत्या, हे स्पष्ट होते.
आज आपण जातीय भेदभाव, उच्च-नीचतेची भावना आणि जन्मावर आधारित श्रेष्ठत्वाला सामाजिक विकृती मानतो, परंतु एका काळी ती समाजव्यवस्थेचा भाग होती. त्या काळातील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीमुळे ही रचना विकसित झाली.
निष्कर्ष: इतिहासाचा वस्तुनिष्ठ अभ्यास केल्यास असे दिसते की, जातिव्यवस्था ही समाजाच्या दीर्घकालीन उत्क्रांतीतून निर्माण झालेली सामाजिक रचना होती. तिची सर्व जबाबदारी केवळ एका समाजावर, एका जातिवर किंवा एका समुदायावर टाकणे हे इतिहासदृष्ट्या योग्य नाही. समाजातील अनेक ऐतिहासिक, आर्थिक, धार्मिक आणि राजकीय घटकांच्या परस्पर परिणामातून ही व्यवस्था विकसित झाली,त्यामुळे तिच्या निर्मितीचे श्रेय किंवा दोष कोणत्याही एका समुदायाला देणे न्याय्य ठरत नाही.