04/09/2026
महाराष्ट्रात मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा अंमलात आल्यापासून आणि २०११ व २०१४ मधील सुधारित कायद्यांनुसार राज्यात अवयवदानाचा आलेख सातत्याने उंचावत असून हजारो रुग्णांना नवजीवन मिळाले आहे. राज्य शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग, प्रादेशिक अवयव व उती प्रत्यारोपण समन्वय संस्था तसेच मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्रांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे राज्यभरात अवयवदानाबाबत मोठी सकारात्मकता दिसून येत आहे. यामुळे राज्यभर व्यापक अवयवदान प्रबोधन मोहीम राबविण्याचे आवाहन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.
राज्यात १९९५ पासून ऑक्टोबर २०२६ पर्यंत झालेल्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियांची आकडेवारी पाहिल्यास या क्षेत्रात मोठे यश मिळाल्याचे दिसून येते. या कालावधीत एकूण १७,३२५ जिवंत व्यक्तींमधील अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडल्या असून त्यामध्ये १४,९४९ मूत्रपिंड (किडनी) आणि २,३७६ यकृत (लिव्हर) प्रत्यारोपणांचा समावेश आहे. तसेच मरणोत्तर अवयवदानातून एकूण ३,३७३ गरजू रुग्णांना नवीन आयुष्य मिळाले आहे. यामध्ये १८५३ मूत्रपिंड, ९८७ यकृत, २२० हृदय, ६३ फुफ्फुस आणि नेत्र व उतींसह २५० इतर अवयवांच्या यशस्वी रोपणाचा समावेश आहे. सध्या राज्यात विविध अवयवांसाठी प्रतीक्षारत असलेल्या रुग्णांमध्ये मूत्रपिंडासाठी ४०७५, यकृतासाठी ८८८, हृदयासाठी ६३, फुफ्फुसासाठी २४, स्वादुपिंडासाठी १५, हातासाठी ११ आणि लहान आतड्यासाठी ८ रुग्ण प्रतीक्षेत आहेत, ज्यांच्यासाठी अवयवदानाचे आवाहन सातत्याने केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
शासकीय पातळीवर अवयवदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी पथनाट्ये, चित्रपटगृहांमधील जाहिराती, आकाशवाणीवरील संदेश, परिसंवाद आणि लघुपट प्रदर्शनाद्वारे 'महाअवयवदान महोत्सव' यशस्वीरीत्या राबविण्यात आला. या सर्वसमावेशक प्रयत्नांमुळे राज्यातील अवयवदानाविषयीच्या अंधश्रद्धा दूर होऊन एका नव्या सामाजिक क्रांतीची सुरुवात झाल्याची माहितीही मंत्री आबिटकर यांनी दिली.