25/06/2026
तिकीट काढतांना सुट्ट्या पैश्यांची कटकट संपली, सिटीलिंक प्रवाश्यांना करता येणार आता डिजिटल पेमेंट, महापौरांच्या हस्ते शुभारंभ.
नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. (सिटीलिंक) तर्फे प्रवाशांसाठी बसमधून प्रवास करताना डिजिटल पद्धतीने तिकीट काढण्याच्या सुविधेचा आज शुभारंभ करण्यात आला. या अत्याधुनिक यंत्रणेचा शुभारंभ मा. महापौर श्रीमती हिमगौरी आहेर व मा. उपमहापौर श्री. विलास शिंदे यांच्या हस्ते नाशिक महानगरपालिका येथील राजीव गांधी भवन बस स्टॉप येथे संपन्न झाला.
यावेळी महापौर हिमगौरी आहेर व उपमहापौर विलास शिंदे यांनी राजीव गांधी भवन बस स्टॉप ते कुलकर्णी गार्डन बस स्टॉप असा सिटीलिंक बसमधून प्रवास करत डिजिटल पद्धतीने तिकीट काढून या नव्या सुविधेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. यावेळी नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात या डिजिटल तिकीट सुविधेचा लाभ घ्यावा आणि सिटीलिंक बसमधून प्रवास करताना डिजिटल पद्धतीने तिकीट काढावे, असे आवाहन करण्यात आले.
सिटीलिंकच्या या नव्या सुविधेमुळे प्रवाशांना आता बसमध्येच कोणतेहीUPI, डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड अश्या डिजिटल माध्यमातून त्वरित, सुलभ आणि सुरक्षित पद्धतीने तिकीट उपलब्ध होणार आहे. यामुळे तिकीट वितरण प्रक्रिया अधिक वेगवान, अचूक आणि पारदर्शक होणार असून रोख व्यवहारांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच प्रवासी आणि वाहक यांच्यात सुट्ट्या पैशांवरून होणारे वाद टाळण्यासही या यंत्रणेचा मोठा उपयोग होणार आहे.
या प्रसंगी सिटीलिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विजयकुमार मुंडे यांनी सिटीलिंककडून प्रवाशांसाठी अधिकाधिक तंत्रज्ञानाधारित, स्मार्ट आणि प्रवाशाभिमुख सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू असल्याचे सांगितले. डिजिटल तिकीट यंत्रणा ही त्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सदर कार्यक्रमाप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार मुंडे, मुख्य महाव्यवस्थापक बाजीराव माळी, महाव्यवस्थापक (वाहतूक) राहुल तोरो, महाव्यवस्थापक (प्रशासन व तांत्रिकी) रघुनाथ कांबळे, उपमहाव्यवस्थापक (वाहतूक) संजय सुर्वे, उपमहाव्यवस्थापक (प्रशासन व तांत्रिकी) विकास जोशी, जनसंपर्क अधिकारी तथा प्रशासन व्यवस्थापक दिपाली घाटोळ, व्यवस्थापक (आयटी) दिनेश देसले, व्यवस्थापक स्वप्निल पवार, चिन्मय खैरनार, नितीन तांबे, स्वप्निल सांगळे, अजित बच्छाव यांच्यासह सिटीलिंकचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. तर्फे नाशिककर नागरिकांनी या डिजिटल सुविधेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. च्या वतीने करण्यात आले आहे.