13/09/2026
खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उध्वस्त....
UPSC परीक्षार्थींना प्रवेश नाकारल्याप्रकरणी जबाबदार कोण?
नाशिकमध्ये UPSC परीक्षेसाठी आलेल्या १०० हून अधिक परीक्षार्थींना रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यांमुळे परीक्षा केंद्रावर अवघ्या १ मिनिट उशिरा पोहोचल्याने प्रवेश नाकारण्यात आल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे. विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्षे मेहनत करून, दिवस-रात्र अभ्यास करून या परीक्षेची तयारी केली. मात्र प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जाणे हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे.
शहरातील रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांची समस्या ही आजची नाही, वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले नाही. रस्त्यांवरील खड्डे हे विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या आड येत आहेत.
UPSC सारखी देशातील अत्यंत महत्त्वाची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचता आले नाही, याची जबाबदारी केवळ विद्यार्थ्यांवर ढकलता येणार नाही. प्रशासनाने निर्माण केलेल्या परिस्थितीची जबाबदारी प्रशासनानेच स्वीकारली पाहिजे.AISF नाशिकच्या वतीने आमची स्पष्ट मागणी आहे की, या घटनेची तातडीने चौकशी करून १०० हून अधिक परीक्षार्थींना न्याय मिळवून द्यावा. तसेच नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत आणि भविष्यात अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या परीक्षा, नोकरीच्या संधी किंवा नागरिकांच्या आयुष्यावर परिणाम होणार नाही, यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात.
विद्यार्थ्यांचे भविष्य प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे उध्वस्त होऊ देणार नाही. या अन्यायाविरोधात AISF नाशिक विद्यार्थ्यांच्या सोबत ठामपणे उभी आहे आणि गरज पडल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल..
#खड्डेमुक्तनाशिक