06/09/2026
आणि घटस्फोट रद्द झाला......
#कथाविश्व
सकाळी लवकर उठून मॉर्निंग वाॅक ची तयारी करत होतो. शूज घातले तेवढ्यात दारावरची बेल वाजली मनात विचार आला एवढ्या सकाळी कोण आले असेल.पेपरवाला व दुधवाला यायला बराच वेळ आहे अजुन.दार उघडलं समोर एक सुंदर २५/२६ वर्षाची स्त्री बाळाला घेऊन उभी होती.तिच्या बरोबर एक पन्नाशीतली एक स्त्री ही होती तिच्या हातात बॅग होती. तिने मला विचारले,"वकीलसाहेब इथेच राहातात ना? तुम्हीच का ?" मी म्हणालो," हो, मीच." मी त्यांना घरात घेतले बाळ जागे झाले होते त्याने इकडे तिकडे पाहिले व मोठ्याने रडायला लागला.
माझी पत्नी बेडरूम मध्येच होती मी तिला आवाज दिला व म्हणालो,"या बाळासाठी दूध बिस्किट आण."
तिने माझे म्हणणे ऐकले. बाळासाठी दूध बिस्किट आणले व ती पुन: किचनमध्ये गेली. मी त्या दोघींना हॉलमध्ये बसण्यास सांगितले. एव्हाना माझा मॉर्निंग वॉकचा कार्यक्रम जवळपास रद्द झाला होता. तिने मला सांगितले की,"वकिल साहेब तुम्ही मला माझे पती तर्फे नोटीस पाठवलेली आहे." मी म्हणालो,"आपण या विषयावर नंतर बोलू आधी बाळाला शांत करा त्याला दुध बिस्किट खाऊ घाला."
बाळाने दुध बिस्किट खाल्ले तो पर्यंत पत्नीने मी काही न सांगताच त्या दोघींना व मला चहा करुन आणला .आम्ही सगळ्यांनी चहा घेतला त्यांचे म्हणणे ऐकुन घेतले. त्यांच्या चेहऱ्यावरून माझ्या लक्षात आले कि हे लोक खुप लांबून प्रवास करून आलेले दिसत आहेत.
मी तिच्या पतीला फोन केला व सांगितले की,"तुझी पत्नी व लहान बाळ माझ्या घरी आलेले आहेत त्यांना तू घरी घेऊन जा त्यांना अंघोळ नाश्ता करू दे त्याच्यानंतर तुम्ही सर्वजण मला दहा वाजता ऑफिसला येऊन भेटा."
तिचा पती त्यांना घरात घेण्यास तयार नव्हता. मी त्याला समजावले,"अरे भांडण पत्नीचे व तुझे आहे त्यात बाळाचा काय दोष आहे ते लांबून प्रवास करून आलेले आहेत त्यांना व बाळाला थोडासा आराम मिळेल मग आपण ठरवू कोर्ट कारवाई करायची किंवा तुला तुझ्या पत्नीला नांदवायची का सोडचिट्टी द्यायची याबाबत आपण दहा वाजता बोलू."
खूप विनंती केल्यानंतर तो त्यांना घरात घ्यायला तयार झाला मी त्या दोघींना समजावून सांगितले, "वाद करू नका आपण हा विषय समंजसपणाने सोडवू . तुम्ही आता घरी जा,आंघोळ करा, नाश्ता करा त्यानंतर मला येऊन भेटा."
माझ्या घरातून निघतांना तिच्या आईने मला सांगितले की, "वकील साहेब हिचे वडील लहानपणीच वारले . मी हिला, तिच्या बहिणीला खूप कष्टाने मोठे केले आहे . तिचे वडील खाजगी कंपनीत नोकरीला होते त्यामुळे आमची कशीतरी गुजराण होत होती. ते अटॅकने गेल्यानंतर मी खाजगी दवाखान्यात नर्स म्हणून काम करून दोन्ही मुलींचे संगोपन केले.हिला चांगले स्थळ आले व रेल्वेची नोकरी असलेला मुलगा असल्याने मी खूप कष्टाने लग्न करून दिले आहे. मी तुमच्या पाया पडते माझ्या मुलीचा संसार वाचवा." मी म्हणालो,"मावशी काळजी करू नका मी तुमच्या मुलीचा संसार उध्वस्त होऊ देणार नाही. मी तुमच्या जावयाची समजूत काढतो तुम्ही काळजी करू नका. असे बोलून त्यांना निरोप दिला."
मी माझा मॉर्निंग वाँकचा बेत रद्द केला. लवकर फ्रेश होऊन नाश्ता करून ऑफिसला जाऊन बसलो. साधारण पावणेदहा वाजता माझा पक्षकार आला. त्याने मला सांगितले की,"मला माझ्या पत्नीला नांदावायचे नाही." मी म्हणालो,"मी त्यांच्याशी बोलतो आपण ठरवू काय करायचे ते."
दोघाना मी वेगवेगळी वेळ दिली. त्यानंतर साधारणतः पंधरा मिनिटांनी त्याची पत्नी व सासू लहान बाळाला घेऊन माझ्या ऑफिसला आले. मी त्यांना बोलते केले व सर्व हकीकत विचारली. ती ढसाढसा रडू लागली मी म्हणालो,"रडू नको तुला काय त्रास आहे ते मला सांग." ती मला म्हणाली,"मला माझ्या पतीचा काहीच त्रास नाही." मग मी विचारले," नेमकं तुमच्या दोघांमध्ये कशावरून भांडण आहे." ती म्हणाली," माझे पती रेल्वे खात्यात ड्रायव्हर म्हणून नोकरीस आहे ते ड्युटीवर गेल्यानंतर दोन-दोन दिवस बाहेर असतात मला एकच मुलगी आहे. माझे शिक्षण बीए पर्यंत झालेले आहे मला पुढे एम.ए करण्याची इच्छा आहे.मी माझ्या शिक्षणाचा विषय माझ्या सासू जवळ बोलून दाखवला. तिने हा विषय आमच्या बिल्डींग मधील सर्व स्त्रियांना सांगितला. त्यांनी माझ्या सासूचे मत कलुषित केले म्हणाले की, तुझी सून या वयात बाहेर शिकायला गेली तर घरचे काम कोण करणार? तिने बाहेर जाणे योग्य नाही.माझ्या सासूने लोकांचे ऐकून माझ्या पतीच्या मनात माझ्याविषयी गैरसमज निर्माण केला व त्यातूनच वाद होऊन माझ्या पतीने मला माहेरी सोडले आहे." मी तिच्या आईला विचारले," या व्यतिरिक्त तुमच्या जावयाची वागणूक कशी आहे." तिने सांगितले, "साहेब,माझा जावई अतिशय चांगला माणूस आहे."
दोघांकडचे म्हणणे ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आले दोघांचा काहीच प्राॅब्लेम नाही .घरातले शब्द बाहेर गेल्यामुळे आस- पासच्या लोंकाच्या हस्तक्षेपामुळे घटस्फोटाची परिस्थिती निर्माण झाली होती. मी त्यांना घर बदलायला सांगितले व या तुमच्या बाळासाठी एक महिना तुम्ही दोघे एकत्र रहा जर काही प्राॅब्लेम झाला तर आपण घटस्फोटासाठी प्रोसेस सुरु करु .माझा तर हा व्यवसाय आहे .समजावल्या नंतर एक महिना दोघांनी एकत्र राहण्याचे मान्य केले व आज दहा वर्ष झाली त्यांचा सुखाने संसार चालु आहे .त्यांना आता दोन अपत्य आहेत. रस्त्याने जर दिसले कधी तर मी स्मित हास्य करुन पुढे निघुन जातो.
फोटो सौजन्य - pinterest
✒अनिस ए.एस.
कथाविश्व - आपले कौटुंबिक कथांचे अद्भुत विश्व 🎉