Dio Dharashiv

Dio Dharashiv जिल्हा माहिती कार्यालय, धाराशिव जिल्हा माहिती कार्यालय,धाराशिव

गणेश मंडळांना विविध स्पर्धांत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे यंत्रणांना निर्देश ...
04/09/2026

गणेश मंडळांना विविध स्पर्धांत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे यंत्रणांना निर्देश

जलसंवर्धन,लोककला आणि पर्यावरणपूरक विसर्जनावर भर

धाराशिव,दि.४ सप्टेंबर (जिमाका) राज्य सरकारने यंदापासून गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले असून, गणेशोत्सवाची परंपरा आणि संस्कृती जपण्याबरोबरच हा उत्सव व्यापक स्वरूपात साजरा व्हावा. जिल्ह्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन राज्यस्तरापर्यंत पोहोचावे,यासाठी संबंधित यंत्रणांनी मंडळांना प्रोत्साहित करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज शुक्रवारी ४ सप्टेंबर रोजी यंदाच्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देणे तसेच विविध उपक्रम राबविण्याच्या अनुषंगाने संबंधित यंत्रणांची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत जिल्हाधिकारी पुजार बोलत होते.
बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदळकर,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, स्वाती शेंडे,अरुणा गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे,उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख व गणेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी पुजार म्हणाले, ‘‘गणेशोत्सवानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी गणेश मंडळांनी ऑनलाइन नोंदणी करावी. संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात शांतता समित्यांच्या बैठका घ्याव्यात.या बैठकांमध्ये गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याबाबतच्या शासन निर्णयाची माहिती गणेश मंडळे आणि संबंधितांना द्यावी.’’
जिल्ह्यात चांगले आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारी गणेशोत्सव मंडळे राज्यस्तरावरील स्पर्धेत पोहोचली पाहिजेत. त्यासाठी विविध यंत्रणांनी त्यांना आवश्यक प्रोत्साहन द्यावे. पारंपरिक लोककला लोप पावत असताना गणेशोत्सवासारख्या व्यापक लोकसहभागाच्या उत्सवाच्या माध्यमातून या लोककलांना प्रोत्साहन मिळाले पाहिजे.गणेश मंडळांनी आपल्या उपक्रमांमधून पारंपरिक लोककलांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर प्रभावी जनजागृती करता येते.त्यामुळे विशेषतः गणेश मंडळांनी जलसंवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी केले.जिल्ह्यातील विविध गणेशोत्सव मंडळांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विविध उपक्रम राबविण्यात यावेत. त्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी गणेश मंडळांना सहभागी करून घेत त्यांना प्रोत्साहन द्यावे,असेही त्यांनी स्पष्ट केले.

गणेशमूर्तींच्या विसर्जनावेळी पर्यावरण संवर्धनालाही प्राधान्य देण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी पुजार यांनी सांगितले.गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे जलस्रोत दूषित होणार नाहीत,याची दक्षता घ्यावी. गावांमध्ये आणि शहरांमध्ये योग्य ठिकाणी गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम टँक तयार करावेत,असे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांनी सांगितले की, जिल्ह्यात एकूण १ हजार ६८० गणेशोत्सव मंडळे आहेत. यापैकी २५६ ठिकाणी ‘एक गाव,एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.धाराशिव येथील गणेश विसर्जन मार्ग निश्चित करण्यात आला आहे,असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांनी यंदापासून राज्य सरकारने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केल्याची माहिती दिली.तसेच गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यासंदर्भातील शासन निर्णयाची सविस्तर माहिती त्यांनी बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना दिली.

या बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी,सर्व तहसीलदार तसेच सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते.

******

04/09/2026

तुळजापुर येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश न्यायालयाचे रविवारी उद्घाटन

धाराशिव दि.४ सप्टेंबर (जिमाका)
तुळजापुर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश न्यायालयाचे उद्घाटन रविवार,६ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे.मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांच्या शुभहस्ते या न्यायालयाचे उद्घाटन होणार असून, उस्मानाबादच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती.अभिश्री देव यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ संपन्न होणार आहे.या समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन तुळजापुरचे जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री.राजेश खोमणे आणि विधीज्ञ मंडळ अध्यक्ष, ॲड.जयवंत इंगळे यांनी केले आहे.
*******

04/09/2026

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या नूतनीकरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविले
शासकीय वसतिगृहाबाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी

धाराशिव दि.४ सप्टेंबर (जिमाका) अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये,यासाठी राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील नूतनीकरण अर्जांची प्रक्रिया सुरू झाली आहे.पात्र विद्यार्थ्यांनी १५ सप्टेंबर २०२६ पूर्वी ऑनलाइन अर्ज करून त्याची हार्डकॉपी आवश्यक कागदपत्रांसह समाज कल्याण कार्यालय,धाराशिव येथे जमा करावी,असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन कवले यांनी केले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या,तसेच वसतिगृह प्रवेशासाठी रीतसर अर्ज करूनही शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबविण्यात येते.

इयत्ता अकरावी,बारावी तसेच व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे,या उद्देशाने या योजनेअंतर्गत भोजन भत्ता,निवास भत्ता तसेच इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या २६ डिसेंबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना तालुकास्तरावर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठीही लागू करण्यात आली आहे.

त्यानुषंगाने सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या नूतनीकरणाचे अर्ज (Renewal Applications) स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. तसेच ज्या तालुक्यामध्ये शासकीय वसतिगृह नाही,अशा तालुक्यातील विद्यार्थ्यांचे थेट स्वाधार योजनेचे अर्जही स्वीकारण्यात येत आहेत.

या योजनेसाठी https://hmasnew.mahait.org या पोर्टलवर १ ऑगस्ट २०२६ पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून,नूतनीकरण अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२६ आहे. त्यामुळे सन २०२६-२७ करिता नूतनीकरण अर्ज असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी १५ सप्टेंबर २०२६ पूर्वी https://hmasnew.mahait.org या ऑनलाइन संकेतस्थळावर अर्ज करावा.

ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्याची हार्डकॉपी म्हणजे ऑनलाइन अर्जाची प्रत व आवश्यक कागदपत्रे समाज कल्याण कार्यालय,धाराशिव येथे जमा करणे आवश्यक आहे.पात्र विद्यार्थ्यांनी निर्धारित मुदतीत अर्जाची प्रक्रिया पूर्ण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन सचिन कवले,सहायक आयुक्त,समाज कल्याण,धाराशिव यांनी केले आहे.
*******

04/09/2026

२९ सप्टेंबरला जिल्ह्यात दहा
ठिकाणी ‘रोजगार महाकुंभ- महाराष्ट्र’
बेरोजगार युवक-युवतींसाठी रोजगाराची संधी ; आस्थापना व उद्योजकांना सहभागी होण्याचे आवाहन

धाराशिव,दि. ४ सप्टेंबर (जिमाका) राज्यातील युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता,कौशल्य आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी मंगळवार,२९ सप्टेंबर २०२६ रोजी धाराशिव जिल्ह्यात दहा ठिकाणी ‘रोजगार महाकुंभ- महाराष्ट्र’ (पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा) आयोजित करण्यात येणार आहे.

या रोजगार महाकुंभात जिल्ह्यातील जास्तीत जास्त आस्थापना आणि उद्योजकांनी सहभागी होऊन उपलब्ध रिक्त पदांची माहिती नोंदवावी,असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संजय गुरव यांनी केले आहे.देशातील युवकांना रोजगार,स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि उद्योजकतेच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला अनुसरून महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत राज्यभर एकाच दिवशी ५०० रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.

राज्यातील युवकांना त्यांच्या जिल्ह्यात अथवा परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे,उद्योगांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे तसेच शासन,उद्योग-आस्थापना आणि रोजगार इच्छुक युवक यांना एका सामायिक व्यासपीठावर आणणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता,कौशल्य व क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी ‘रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात येत आहे.या कार्यक्रमाचा भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व आस्थापना आणि उद्योगांनी त्यांना आवश्यक असलेल्या पुरुष व महिला उमेदवारांच्या रिक्त पदांची माहिती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.

त्यानुसार जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,धाराशिव कार्यालयामार्फत पात्रताधारक बेरोजगार व नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्ह्यातील दहा ठिकाणी ‘रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ घेण्यात येणार आहे.

या खालील दहा ठिकाणी होणार रोजगार महाकुंभ
भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, धाराशिव,शिक्षणमहर्षी रा.ना.आलुरे गुरुजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तुळजापूर,संतश्रेष्ठ गोराबा काका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,कळंब,आचार्य विद्यासागरजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,भूम
शासकीय तंत्रनिकेतन,धाराशिव, शिक्षणमहर्षी गुरुवर्य आर.जी.शिंदे महाविद्यालय,परंडा,श्री.छत्रपती शिवाजी महाविद्यालय,उमरगा,
भानुदासराव चव्हाण महाविद्यालय,लोहारा,आर्ट, सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालय, नळदुर्ग आणि पवनराजे निंबाळकर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था,गोवर्धनवाडी, ता. व जि.धाराशिव येथे होणार आहे.

रिक्त पदांची माहिती https://forms.gle/Mrz८Gc३ofqq३७wwr६ या लिंकद्वारे ऑनलाइन नोंदविण्याची सुविधा जिल्ह्यातील आस्थापना, उद्योग समूह आणि व्यावसायिकांनी त्यांच्याकडे आवश्यक असलेल्या पुरुष व महिला उमेदवारांच्या माहिती भरावी.या नोंदणीच्या माध्यमातून रोजगार मेळाव्यात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धाराशिव येथे कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्रमांक ०२४७२- २९९४३४ वर संपर्क साधावा.
जिल्ह्यात होणाऱ्या या ‘रोजगार महाकुंभ-महाराष्ट्र’ (पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा) उपक्रमात जास्तीत जास्त आस्थापना आणि उद्योजकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन सहायक आयुक्त संजय गुरव यांनी केले आहे.
*******

If you are the developer of this app, ensure that your Dynamic Links domain is correctly configured and that the path component of this URL is valid.

नेत्रदानाचा संदेश घेऊन धाराशिव येथे जनजागरण रॅली४१ व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त उपक्रम ; विद्यार्थी,शिक्षकां...
04/09/2026

नेत्रदानाचा संदेश घेऊन धाराशिव येथे जनजागरण रॅली
४१ व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त उपक्रम ; विद्यार्थी,शिक्षकांसह आरोग्य कर्मचाऱ्यांचा सहभाग

धाराशिव,दि.४ सप्टेंबर (जिमाका) नेत्रदानातून गरजूंच्या आयुष्यात दृष्टीचा प्रकाश निर्माण होऊ शकतो,’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ४१ व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त शुक्रवारी आज ४ सप्टेंबर रोजी धाराशिव शहरातून नेत्रदान जनजागरण रॅली काढण्यात आली. घोषवाक्ये आणि जनजागृतीपर फलकांच्या माध्यमातून नेत्रदानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.

राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ४१ वा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.त्यानिमित्त या नेत्रदान जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

रॅलीच्या प्रारंभी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर यांनी हिरवा झेंडा दाखविला.जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय,धाराशिव येथून रॅलीला सुरुवात झाली.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसर,मारवाडी गल्ली,काळा मारुती चौक, सावरकर चौक आणि त्रिशरण चौकमार्गे रॅली पुन्हा जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात पोहोचली.तेथे रॅलीची सांगता करण्यात आली.

या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर,रोटरी सेवा ट्रस्टचे सचिव रोटेरियन प्रवीण काळे,जे.एफ. अजमेरा रोटरी नेत्ररुग्णालयाचे अतुल देशमुख, शिवरुद्र इसाके,जिल्हा नेत्रशल्यचिकित्सक डॉ.महेश पाटील,डॉ.एम.के.पल्ला, नेत्रचिकित्सा अधिकारी डॉ.ज्योती कानडे, परिचारिका प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रवी सुरवसे तसेच रुग्णालयातील कर्मचारी प्रदीप तटाळे आणि श्रीनिवास निर्मळ यांची प्रमुख उपस्थिती होती.रॅलीमध्ये धाराशिव शासकीय परिचारिका प्रशिक्षण केंद्र,के.टी.पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग आणि सह्याद्री नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थी व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.विद्यार्थ्यांच्या हातातील नेत्रदानविषयी संदेश देणारे फलक आणि घोषवाक्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या माध्यमातून नेत्रदानाविषयी समाजात व्यापक जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

नेत्रदानाबाबत जनजागृतीचा जागर
रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयातील कर्मचारी प्रदीप तटाळे,श्रीनिवास निर्मळ,उमेश गोरे,रुग्णालयातील नर्सिंग स्टाफ तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.जिल्हा नेत्रशल्यचिकित्सक,जिल्हा रुग्णालय, धाराशिव यांच्या वतीने या नेत्रदान जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले.
******

विशेष लेखदि.४ सप्टेंबर २०२६गणरायाचा उत्सव... लोकजागृतीपासून पर्यावरण संवर्धनापर्यंत !घराघरांतील श्रद्धेपासून सार्वजनिक ल...
04/09/2026

विशेष लेख

दि.४ सप्टेंबर २०२६

गणरायाचा उत्सव... लोकजागृतीपासून पर्यावरण संवर्धनापर्यंत !

घराघरांतील श्रद्धेपासून सार्वजनिक लोकचळवळीपर्यंतचा गणेशोत्सवाचा प्रवास;‘राज्य महोत्सवामुळे आता कला, संस्कृती,सामाजिक समता आणि पर्यावरण संवर्धनाला नवा आयाम मिळणार आहे.

‘गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया!’चा जयघोष कानावर पडू लागला की अवघा महाराष्ट्र एका वेगळ्याच चैतन्याने भारून जातो. घरातील गणरायाच्या प्रतिष्ठापनेपासून सार्वजनिक मंडळांच्या देखण्या मंडपांपर्यंत, आरतीच्या मंगल स्वरांपासून ढोल-ताशांच्या गजरापर्यंत आणि भक्तिभावाने ओथंबलेल्या विसर्जनापर्यंत गणेशोत्सव महाराष्ट्राच्या लोकजीवनाशी इतका एकरूप झाला आहे की तो केवळ धार्मिक उत्सव राहिलेला नाही. श्रद्धा,संस्कृती,कला,सामाजिक समता, लोकजागृती आणि समाजसेवेचा तो एक व्यापक उत्सव बनला आहे.राज्यात १४ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होणार आहे.

आता गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्यात येत असल्याने महाराष्ट्राच्या या समृद्ध परंपरेला नवा आयाम मिळाला आहे.बदलत्या काळानुसार उत्सवाचे स्वरूप बदलले,त्यात आधुनिकतेची भर पडली.मात्र लोकांना जोडणारा त्याचा सामाजिक धागा आजही तितकाच मजबूत आहे.किंबहुना पर्यावरण संवर्धन,सामाजिक बांधिलकी आणि विधायक लोकसहभागाच्या माध्यमातून हा धागा आणखी बळकट करण्याची संधी आता निर्माण झाली आहे.

घराघरांतील गणरायापासून सार्वजनिक उत्सवापर्यंत...
महाराष्ट्रातील गणेशभक्तीची परंपरा शतकानुशतके जुनी आहे. पेशव्यांच्या काळात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.त्या काळात गणेशपूजनासोबत कथा,कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रम होत असत.घराघरांत गणरायाची प्रतिष्ठापना करून भक्तिभावाने उत्सव साजरा करण्याची ही परंपरा पुढेही कायम राहिली.

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस मात्र या उत्सवाने घराचा उंबरठा ओलांडला आणि त्याला सार्वजनिक स्वरूप येऊ लागले. पुण्यामध्ये भाऊसाहेब रंगारी यांनी १८९२ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्याच्या ऐतिहासिक नोंदी आणि दावे आढळतात.त्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवामागील लोकशक्ती ओळखली.१८९३ नंतर या उत्सवाला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप देण्यात त्यांचे योगदान मोलाचे ठरले. ब्रिटिश राजवटीत लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र येणे सहज शक्य नव्हते.अशा काळात सार्वजनिक गणेशोत्सव समाजातील विविध घटकांना एका व्यासपीठावर आणू लागला.लोकमान्य टिळकांनी याच व्यासपीठाचा उपयोग लोकजागृती, राष्ट्रीय अस्मिता,सामाजिक संघटन आणि स्वराज्याच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी केला.
गणरायाच्या आराधनेसोबत देशभक्ती आणि समाजजागृतीचे विचारही घराघरांत पोहोचू लागले.

आरतीच्या स्वरांत मिसळले प्रबोधनाचे सूर
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सुरुवातीच्या काळात गणेशपूजन आणि आरतीपुरता उत्सव मर्यादित राहिला नाही.कीर्तन,प्रवचने, व्याख्याने,पोवाडे,भावगीते आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम,स्वदेशी, सामाजिक प्रश्न आणि एकात्मतेचा विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचू लागला.

जात,पंथ,आर्थिक स्थिती आणि सामाजिक स्तराच्या भिंती ओलांडून नागरिकांना एका सार्वजनिक व्यासपीठावर आणण्याचे महत्त्वाचे काम गणेशोत्सवाने केले.सामान्य माणसाला विचार ऐकण्याची, सांस्कृतिक कार्यक्रम अनुभवण्याची आणि सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची संधी मिळाली.त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय भावना जागविणारा गणेशोत्सव स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग बनला.काळ पुढे सरकला तसा गणेशोत्सवही बदलला. भजन,कीर्तन आणि पोवाड्यांच्या जोडीला नाटक,संगीत,लोककला, आकर्षक देखावे आणि सामाजिक संदेश देणाऱ्या आरासी आल्या. रक्तदान शिबिरे,आरोग्य तपासणी, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, वृक्षारोपण,स्वच्छता मोहीम, जलसंवर्धन,महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती आणि रस्ते सुरक्षेसारख्या विषयांवरील उपक्रमांमधून अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी समाजसेवेची परंपराही समृद्ध केली.

‘राज्य महोत्सव’... नव्या पर्वाची सुरुवात
यावर्षापासून गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा होत असल्याने या वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक परंपरेला आणखी व्यापक अधिष्ठान मिळाले आहे. संस्कृतीचे जतन व संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरणपूरक उत्सवाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेलाही महत्त्व प्राप्त झाले आहे.
या स्पर्धेच्या माध्यमातून कलांचे जतन व संवर्धन,महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरांचे संवर्धन, निसर्ग व सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण,सामाजिक कार्य आणि विधायक उपक्रमांना चालना मिळणार आहे.पर्यावरणपूरक गणेशमूर्ती,ध्वनी,वायू व जलप्रदूषणमुक्त परिसर तसेच ‘एक गाव,एक गणपती’सारख्या उपक्रमांना प्रोत्साहन मिळत आहे त्यामुळे गणेशोत्सवाच्या सामाजिक आशयाला आणखी व्यापकता मिळत आहे.

गणरायाच्या स्वागतासोबत निसर्गाचाही सन्मान
हवामान बदल,जलप्रदूषण, प्लास्टिक कचरा आणि वाढते ध्वनिप्रदूषण ही आजची गंभीर आव्हाने आहेत.त्यामुळे उत्सवाचा आनंद कायम ठेवतानाच गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरणस्नेही करण्याची जबाबदारीही समाजाची आहे. त्यासाठी विविध गणेश उत्सव मंडळे पुढाकार घेताना दिसत आहे.गणेशमूर्तीसाठी शाडू माती किंवा पर्यावरणस्नेही साहित्याचा वापर,नैसर्गिक रंगांना प्राधान्य, प्लास्टिक व थर्माकोलमुक्त सजावट आणि पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा कल्पक उपयोग हा त्याचा पहिला टप्पा ठरू शकतो.

कापड,कागद,बांबू,फुले,पाने आणि पारंपरिक वस्तूंच्या साहाय्याने आकर्षक आरास करता येते आणि त्याचवेळी पर्यावरणाची हानीही टाळता येते.विद्युत रोषणाईमध्ये ऊर्जाबचतीला प्राधान्य,मंडप आणि परिसराची स्वच्छता,ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण,एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकला नकार आणि प्रसादासाठी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर अशा छोट्या वाटणाऱ्या कृतीदेखील मोठा बदल घडवू शकतात.

पूजेनंतरचे हार,फुले,पाने आणि अन्य निर्माल्य नदी,तलाव अथवा विहिरीत टाकण्याऐवजी त्याचे स्वतंत्र संकलन करून कंपोस्ट किंवा सेंद्रिय खत तयार करता येऊ शकते.उपलब्धतेनुसार कृत्रिम विसर्जन कुंडांचा वापर केल्यास नैसर्गिक जलस्रोतांवरील ताण आणि प्रदूषण कमी करण्यास मदत होईल.विसर्जन मिरवणुकीत अनावश्यक ध्वनिप्रदूषण टाळणे, निर्धारित नियमांचे पालन करणे, रस्त्यांवर कचरा न टाकणे आणि मिरवणुकीनंतर परिसर स्वच्छ ठेवणे हीदेखील गणरायाच्या भक्तीचीच पर्यावरणपूरक अभिव्यक्ती आहे.गणरायाची भक्ती आणि निसर्गाचे रक्षण या परस्परविरोधी गोष्टी नाहीत.उलट निसर्ग संवर्धन हाच आजच्या काळातील उत्सवाचा सर्वांत विधायक संस्कार ठरू शकतो.

‘एक गाव, एक गणपती’... उत्सव एकोप्याचा
गणेशोत्सवाचे खरे सामर्थ्य त्याच्या सामूहिकतेत आहे.‘एक गाव,एक गणपती’ ही संकल्पना त्याचेच सुंदर रूप आहे. गावातील सर्व समाजघटकांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येत गणेशोत्सव साजरा केला,तर सामाजिक एकोपा अधिक दृढ होतो. अनावश्यक स्पर्धा आणि खर्च कमी होतो.त्यातून वाचणारी ऊर्जा, वेळ आणि साधने गावाच्या विकासासाठी उपयोगात आणण्याची संधीही मिळते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी समाजकार्य केवळ उत्सवाच्या दहा दिवसांपुरते मर्यादित न ठेवता वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले,तर गणेशोत्सवातून निर्माण होणारी लोकशक्ती खऱ्या अर्थाने समाजपरिवर्तनाची शक्ती बनू शकते.

कलेला व्यासपीठ ; संस्कृतीचा वारसा नव्या पिढीकडे
गणेशोत्सवाने महाराष्ट्रातील असंख्य कलाकारांना हक्काचे व्यासपीठ दिले आहे.मूर्तिकाराच्या हातातील कलाकुसर असो, ढोल-ताशांचा जोशपूर्ण नाद असो, लोककलावंतांचे सादरीकरण असो किंवा एखाद्या ज्वलंत सामाजिक प्रश्नावर भाष्य करणारा देखावा असो गणेशोत्सवातून महाराष्ट्राच्या कलावैभवाचे दर्शन घडते.

हीच परंपरा नव्या पिढीशी जोडण्याची गरज आहे.महाराष्ट्राचा इतिहास,छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा,संत आणि समाजसुधारकांचे विचार, स्वातंत्र्यलढा, संविधानिक मूल्ये,सामाजिक समता, लोककला आणि पारंपरिक संस्कृतीची ओळख मुलांना व युवकांना करून देण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव हे प्रभावी लोकशिक्षणाचे व्यासपीठ ठरू शकते.

काळ बदलला ; सामाजिक धागा मात्र कायम
पेशवाईच्या काळातील धार्मिक उत्सवापासून एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस सार्वजनिक स्वरूपाकडे,तेथून स्वातंत्र्यलढ्यातील लोकजागृतीच्या व्यासपीठापर्यंत आणि स्वातंत्र्यानंतर कला-संस्कृतीच्या उत्सवापासून आजच्या सामाजिक व पर्यावरणीय जबाबदारीच्या पर्वापर्यंतचा महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचा प्रवास विलक्षण आहे.

आज ‘राज्य महोत्सव’ म्हणून गणेशोत्सव साजरा होत असताना प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळापुढे या ऐतिहासिक परंपरेला नवा विधायक अर्थ देण्याची संधी आहे.उत्सवाची भव्यता केवळ मूर्तीची उंची,रोषणाईचा झगमगाट किंवा सजावटीच्या खर्चात मोजली जाऊ नये.किती माणसे जोडली, किती कला जपल्या,किती सामाजिक प्रश्नांवर जागृती केली, किती पर्यावरण वाचविले आणि समाजासाठी किती चांगले काम उभे राहिले,यावरही उत्सवाचे यश मोजले जाणार आहे.त्यासाठी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.लोकमान्य टिळकांच्या काळात गणेशोत्सवाने माणसांना एकत्र आणले.स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रीय अस्मितेला बळ दिले. स्वातंत्र्यानंतर कला आणि संस्कृतीला व्यापक व्यासपीठ दिले.आता पर्यावरण संवर्धन, सामाजिक समता आणि समाजहिताच्या विधायक कार्यातून त्याच परंपरेला पुढे नेण्याची वेळ आहे.

गणरायाच्या आगमनाचा आनंद साजरा करताना निसर्गही हसला पाहिजे, समाजातील माणसे आणखी जवळ आली पाहिजेत,कलाकारांच्या कलेला नवे बळ मिळाले पाहिजे आणि उत्सवानंतरही समाजहिताची एखादी चांगली गोष्ट मागे उरली पाहिजे.तेव्हाच सार्वजनिक गणेशोत्सवाचा वारसा अधिक अर्थपूर्ण ठरेल.

श्रद्धेतून संस्कार,इतिहासातून प्रेरणा, उत्सवातून प्रबोधन,कलेतून संस्कृतीचे संवर्धन,कृतीतून पर्यावरणाचे रक्षण आणि लोकसहभागातून समाजहित हीच महाराष्ट्राच्या या राज्य महोत्सवाची नवी ओळख ठरणार आहे !

संकलन
जिल्हा माहिती कार्यालय,
धाराशिव

04/09/2026

महसुली वाद मिटविण्याची संधी : ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’
शेतकरी,नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार

धाराशिव दि.३ सप्टेंबर (जिमाका) वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या महसुली दावे आणि अपिलांच्या फेऱ्यांत अडकलेल्या शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना आता आपापसातील तडजोड आणि सहमतीने वाद कायमस्वरूपी मिटविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.महसूल विभागाकडील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्यासाठी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने राज्यभर ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यास मान्यता दिली आहे.१ सप्टेंबर २०२६ पासून सुरू झालेले हे अभियान ३१ मार्च २०२७ पर्यंत सात महिने राबविण्यात येणार आहे.

शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचा महसुली दावे व अपिलांसाठी खर्च होणारा वेळ आणि पैसा वाचविणे,तसेच महसूल विभागांतर्गत प्रलंबित असलेली अर्धन्यायिक प्रकरणे आपापसातील तडजोड व सहमतीने जलदगतीने निकाली काढणे,हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.जिल्ह्यात मंडळ अधिकारी,नायब तहसीलदार,तहसीलदार,उपविभागीय अधिकारी,उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), उपजिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयांमध्ये प्रलंबित असलेल्या सर्व प्रकारच्या महसुली दावे आणि अपिलांसंदर्भात हे अभियान राबविण्यात येणार आहे.

७ ऑक्टोबर,९ डिसेंबरला लोकअदालत
जिल्ह्यातील सर्व मंडळ अधिकारी, तहसीलदार,उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), उपजिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर ७ ऑक्टोबर २०२६ आणि ९ डिसेंबर २०२६ रोजी महसूल लोकअदालतींचे आयोजन करण्यात येणार आहे.त्यासाठी प्रशासनाने निश्चित कार्यपद्धती आखली आहे.

दोन्ही पक्षकारांना संयुक्त अर्ज करता येणार
ज्या न्यायालयात किंवा कार्यालयात महसुली दावा प्रलंबित आहे,तेथे संबंधित दोन्ही पक्षकार किंवा त्यांचे वकील संयुक्तपणे विहित ‘प्रपत्र-अ’ मधील नमुन्यात तडजोडीसाठी अर्ज करू शकतील.‘प्रपत्र-अ’ संबंधित कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.प्राप्त झालेल्या अर्जांची संबंधित यंत्रणेकडून छाननी केली जाईल.दोन्ही पक्षांची तडजोडीसाठी संमती असल्याची खात्री करण्यात येईल.त्यानंतर त्यांच्याकडून कायदेशीर तडजोडनामा (Consent Terms) लिहून घेतला जाईल.

तडजोडीनंतर अंतिम आदेश
निश्चित केलेल्या लोकअदालतीच्या दिवशी दोन्ही पक्षकारांच्या उपस्थितीत तडजोडीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर अंतिम आदेश पारित करून संबंधित प्रकरण कायमस्वरूपी निकाली काढण्यात येणार आहे.त्यामुळे दीर्घकाळ प्रलंबित महसुली वाद परस्पर सहमतीने सोडविण्यासाठी नागरिकांना या अभियानाच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

कार्यालयीन वेळेत अर्ज करण्याचे आवाहन
महसुली दावे आणि अपिले तडजोडीने निकाली काढू इच्छिणाऱ्या नागरिकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा.त्यासाठी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी, कार्यालयीन वेळेत संबंधित अधिकाऱ्यांकडे त्वरित अर्ज दाखल करावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी केले आहे.
******

04/09/2026

घरात, मंदिरात जुनी हस्तलिखिते असेल तर
‘ज्ञान भारतम्’मध्ये करा नोंद ; मालकी हक्क राहणार अबाधित

धाराशिव दि.३ सप्टेंबर (जिमाका) घरातील जुन्या संदुकीत,देवघरात किंवा पिढ्यान्‌पिढ्या जपलेल्या संग्रहात एखादा प्राचीन हस्तलिखित ग्रंथ असेल,तर तो केवळ एका कुटुंबाचा ठेवा नसून देशाच्या ज्ञानपरंपरेतील महत्त्वाचा दुवा ठरू शकतो. अशा विखुरलेल्या अमूल्य हस्तलिखितांचा शोध घेऊन त्यांची नोंद,जतन आणि संवर्धन करण्यासाठी भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयामार्फत ‘ज्ञान भारतम् मिशन’ हा महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय उपक्रम राबविण्यात येत आहे.या उपक्रमात जिल्ह्यातील नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा,असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले आहे.

भारताच्या समृद्ध हस्तलिखित वारशाचा शोध,सर्वेक्षण,दस्तऐवजीकरण,जतन, संवर्धन आणि डिजिटायझेशन करणे हा ‘ज्ञान भारतम् मिशन’चा प्रमुख उद्देश आहे.देशात तत्त्वज्ञान,विज्ञान, वैद्यकशास्त्र,गणित,खगोलशास्त्र, साहित्य,कला,प्रशासन तसेच विविध पारंपरिक ज्ञानप्रणालींशी संबंधित असंख्य प्राचीन हस्तलिखिते उपलब्ध आहेत. त्यापैकी अनेक हस्तलिखिते आजही खासगी कुटुंबे,मंदिरे,मठ,ग्रंथालये, शैक्षणिक संस्था तसेच अन्य संस्थांकडे जतन करून ठेवण्यात आली आहेत.

या अमूल्य ज्ञानवारशाचा शोध घेऊन त्याचे जतन करण्यासाठी केंद्र सरकारने ‘ज्ञान भारतम् राष्ट्रीय हस्तलिखित सर्वेक्षण’ सुरू केले आहे.या सर्वेक्षणाद्वारे देशभरात उपलब्ध असलेल्या हस्तलिखितांची तसेच ती कोणत्या ठिकाणी आहेत,याची माहिती संकलित केली जाणार आहे. त्याआधारे राष्ट्रीय स्तरावर सर्वसमावेशक माहिती प्रणाली तयार करण्यात येणार असून, त्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे.

कोणताही नागरिक होऊ शकतो सहभागी
‘ज्ञान भारतम्’ उपक्रमात कोणताही नागरिक सहभागी होऊ शकतो.आपल्या कुटुंबाकडे, गावात,मंदिरात,मठात, ग्रंथालयात,शैक्षणिक संस्थेत किंवा परिसरात जुनी हस्तलिखिते उपलब्ध असतील अथवा अशा हस्तलिखितांविषयी माहिती असेल, तर ती या राष्ट्रीय उपक्रमासाठी नोंदविता येणार आहे.

हस्तलिखितांविषयी उपलब्ध असलेली प्राथमिक माहिती ‘Gyan Bharatam Mobile Application’ तसेच अधिकृत डिजिटल माध्यमातून नोंदविता येईल. नोंदणी करताना उपलब्धतेनुसार हस्तलिखित असलेले ठिकाण, हस्तलिखितांची अंदाजे संख्या,मालकी किंवा जतनकर्त्यांची माहिती, हस्तलिखिताविषयी उपलब्ध प्राथमिक माहिती आणि आवश्यकतेनुसार हस्तलिखिताचे छायाचित्र अशी माहिती देता येणार आहे.

मालकी हक्कावर कोणताही परिणाम नाही
या सर्वेक्षणातील सहभाग पूर्णपणे स्वेच्छेचा आणि गैर-हस्तक्षेपी स्वरूपाचा आहे.हस्तलिखिताची माहिती दिल्यामुळे संबंधित व्यक्ती किंवा संस्थेच्या मालकी हक्कावर कोणताही परिणाम होणार नाही. तसेच केवळ सर्वेक्षणात सहभाग नोंदविला म्हणून संबंधित हस्तलिखित हस्तांतरित करणेही आवश्यक नाही.संकलित माहितीच्या आधारे संबंधित हस्तलिखितांची ओळख आणि पडताळणी केली जाईल.त्यानंतर तपशीलवार दस्तऐवजीकरण तसेच आवश्यकतेनुसार हस्तलिखितांचे संवर्धन आणि डिजिटायझेशन करण्याची पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

हस्तलिखित कार्यालयात जमा करण्याची गरज नाही
नागरिकांकडे असलेली हस्तलिखिते डिजिटल स्वरूपात जतन करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.संबंधित हस्तलिखित ‘ज्ञान भारतम्’ मोबाईल अॅपच्या माध्यमातून अपलोड केल्यानंतर ते कोणत्याही कार्यालयात जमा किंवा ठेवण्याची आवश्यकता नाही.मूळ हस्तलिखित नागरिकांनी स्वतःकडेच सुरक्षितपणे जपून ठेवायचे आहे. आपल्याकडे एखादे हस्तलिखित उपलब्ध असल्यास किंवा आपल्या परिसरातील हस्तलिखितांविषयी माहिती असल्यास ‘ज्ञान भारतम्’ मोबाईल अॅपच्या माध्यमातून अथवा ज्ञान भारतम् या अधिकृत संकेतस्थळावरून या राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होता येणार आहे.

‘ज्ञान भारतम्’ उपक्रमातून भारताच्या अमूल्य हस्तलिखित वारशाचे भावी पिढ्यांसाठी जतन करण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हा वारसा संशोधन आणि ज्ञानाच्या प्रसारासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.त्यामुळे नागरिक,विद्यार्थी, संशोधक,विद्वान,ग्रंथालये, शैक्षणिक संस्था,मंदिरे,मठ तसेच हस्तलिखितांचे खासगी जतनकर्ते यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

यासंदर्भात अधिक माहितीसाठी नागरिकांनी ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), संबंधित तालुक्याचे निवासी नायब तहसीलदार तसेच ग्राम महसूल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.भारताच्या अमूल्य ज्ञानवारशाच्या शोध,नोंदणी आणि जतनासाठी सर्वांनी एकत्रितपणे योगदान द्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी,धाराशिव यांनी केले आहे.

एका नजरेत ‘ज्ञान भारतम्’
प्राचीन हस्तलिखितांचा शोध आणि सर्वेक्षण
हस्तलिखितांचे दस्तऐवजीकरण, जतन व संवर्धन हस्तलिखितांचे डिजिटायझेशन नागरिक,विद्यार्थी, संशोधक,संस्था,मंदिरे व मठांना सहभागी होता येणार आहे. हस्तलिखिताची माहिती दिल्याने मालकी हक्कावर कोणताही परिणाम होणार नाही. हस्तलिखित कार्यालयात जमा करण्याची आवश्यकता नाही; मूळ हस्तलिखित संबंधित नागरिकाकडेच राहणार आहे.
*****

03/09/2026

वाद मिटवा सामोपचाराने ; १२ सप्टेंबरला राष्ट्रीय लोकअदालत
जिल्ह्यातील सर्व न्यायालयांत आयोजन

धाराशिव,दि.२ सप्टेंबर (जिमाका) वर्षानुवर्षे सुरू असलेला न्यायालयीन वाद म्हणजे वेळ,पैसा आणि मानसिक ताणही.अशा प्रलंबित वादांना सामोपचाराने पूर्णविराम देण्याची संधी नागरिकांना राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून मिळणार आहे.राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण,सर्वोच्च न्यायालय,नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण,मुंबई यांच्या निर्देशानुसार शनिवार,१२ सप्टेंबर २०२६ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.

या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मोटार वाहन अपघात प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे,वीज वितरण कंपनीशी संबंधित प्रकरणे, दिवाणी तसेच तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.यासोबतच बँका आणि वीज वितरण कंपन्यांची दाखलपूर्व प्रकरणेही लोकअदालतीमध्ये विचारात घेतली जाणार आहेत.

कौटुंबिक व ग्राहक मंचातील प्रकरणांचाही समावेश कौटुंबिक न्यायालय तसेच ग्राहक तक्रार निवारण मंचातील प्रकरणेदेखील या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत.त्यामुळे विविध स्वरूपाच्या न्यायालयीन तसेच दाखलपूर्व वादांमध्ये परस्पर सहमतीने तोडगा काढण्यासाठी पक्षकारांना एकाच दिवशी महत्त्वाची संधी उपलब्ध होणार आहे.

लोकअदालतीमध्ये प्रकरण तडजोडीने मिटल्यास संबंधित पक्षकाराने भरलेली न्यायालयीन फी परत मिळते.त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेत खर्च झालेला वेळ आणि पैसा वाचण्याबरोबरच दीर्घकाळ चालणाऱ्या वादामुळे निर्माण होणारा मानसिक ताण कमी करण्यासाठीही लोकअदालत उपयुक्त ठरणार आहे.

नागरिकांनी आपापसातील वाद सामोपचाराने मिटवून वेळ,पैसा आणि मानसिक ताण-तणाव वाचवावा तसेच राष्ट्रीय लोकअदालतीचा अधिकाधिक लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती.अभिश्री देव आणि सचिव श्रीमती.भाग्यश्री पाटील यांनी केले आहे.

आपली प्रकरणे राष्ट्रीय लोकअदालतीत ठेवण्यास इच्छुक असलेल्या नागरिकांनी जिल्हा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,उस्मानाबाद किंवा संबंधित तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधावा.तसेच प्रकरण लोकअदालतीमध्ये ठेवण्यासाठी पक्षकारांनी आपल्या वकिलांशीही संपर्क साधावा,असे कळविण्यात आले आहे.राष्ट्रीय लोकअदालतीबाबत अधिक माहितीसाठी ८५९१९०३६२५ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा [email protected] या इमेल वर संपर्क साधता येईल असेही कळविण्यात आले आहे.
******

03/09/2026

भूमचे आरटीओ शिबिर आता २२ सप्टेंबरला
नागरिकांनी सुधारित तारखेची नोंद घेण्याचे आवाहन

धाराशिव,दि.२ सप्टेंबर (जिमाका) वाहनविषयक विविध कामांसाठी नागरिकांना वारंवार जिल्ह्याच्या ठिकाणी येण्याची गरज भासू नये आणि त्यांच्या वेळेसह प्रवासाचा त्रास वाचावा,यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय,धाराशिव यांच्यामार्फत दरमहा तालुकास्तरीय शिबिर कार्यालयांचे आयोजन करण्यात येते.त्यानुसार भूम येथे १७ सप्टेंबर २०२६ रोजी नियोजित असलेले शिबिर आता प्रशासकीय कारणास्तव मंगळवार,२२ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अनुषंगाने १७ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने भूम येथील नियोजित शिबिर कार्यालयाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.आता हे शिबिर २२ सप्टेंबर रोजी नियोजित ठिकाणी भूम येथे आयोजित करण्यात येणार आहे.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाशी संबंधित कामांसाठी तालुकास्तरीय शिबिराची वाट पाहणाऱ्या नागरिकांनी पूर्वीच्या १७ सप्टेंबर या तारखेऐवजी २२ सप्टेंबर ही सुधारित तारीख लक्षात घ्यावी.गैरसोय टाळण्यासाठी सर्व संबंधित नागरिकांनी या बदलाची नोंद घ्यावी,असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांनी केले आहे.
******

Address

Central Building
Osmanabad
413501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dio Dharashiv posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dio Dharashiv:

Shortcuts

Share