28/09/2024
माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये खानिवली ग्रामपंचायत कोंकण विभागात प्रथम
राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत माझी वसुंधरा अभियान 4.0 हे अभियान राबविण्यात आले होते.या अभियानात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना राज्य शासनाच्या वतीने बक्षिसे देण्यात येणार आहेत.या अभियानात पृथ्वी,जल,वायु,आकाश,आणि अग्नी या निसर्गाशी संभधित पंचतत्वावर उत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना राज्यस्तर व विभागस्तरावर बक्षिसे देण्यात येतात.या अभियानात राज्यातील 414 नागरी संस्था तर 22 हजार 218 ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता.कोंकण विभागामध्ये 1.5 ते 2.5 हजार लोकसंख्या असलेल्या गटामध्ये वाडा तालुक्यातील खानिवली या ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक मिळाला असून पन्नास लाख रुपयाचे पारितोषिक मिळणार आहे.
ग्रामपंचायतीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एव्हढ्या मोठ्या रकमेचे पारितोषिक मिळाल्यामुळे ग्रामपंचायत कार्यकारिणी व गावातील नागरिक यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण आहे.हे अभियान राबवित असताना ग्रामपंचायत उपसरपंच कु.सागर पाटील,सदस्य सारिका पाटील,प्रेरणा पोटींदा,निकिता वाघ,रमेश डुकले,दिपक खुताडे,फिरदोस काझी,तुलसा पवार,डॉ.राहुल भोईर ग्रामसेवक श्री.पंकज चौधरी व गावातील अंगणवाडी सेविका,आशा वर्कर,महिला बचत गट,गावातील तरुण,पर्यावरण दूत,जि.प.मराठी शाळा,जि.प.उर्दू शाळा,आ.लं.चंदावरकर विद्यालय येथील विद्यार्थी,गावातील ज्येष्ठ नागरिक यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे सरपंच श्री.भरत हजारे यांनी मनोगतामधून भावना व्यक्त केल्या.तसेच या पुढे माझी वसुंधरा अभियान 5.0 मध्ये राज्यामध्ये प्रथम येण्याचा निर्धार सर्व उपस्थित महिलांच्या साक्षीने घेण्यात आला.