05/11/2022
पुणे महानगरपालिका, पुणे पोलीस, मेट्रो आणि ठेकेदारांच्या हेव्यादाव्यांमध्ये पुणेकरांची वाहतूक कोंडी
मनसे नेते जयराज लांडगे यांचा आरोप
पुणे : शहरातील वाहतूक कोंडीमुळे पुणे महानगरपालिका आणि पुणे पोलिसांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आता अधिकाऱ्यांनी शहरातील कोंडी ही मेट्रो आणि ठेकेदारांमुळे निर्माण झाल्याचा निर्माण झाल्याचे सांगून आपले हात झटकले आहेत. मात्र असे हात झटकून अधिकाऱ्यांना जबाबदारी झटकता येणार नाही. पुणेकरांच्या कोंडीला पुणे महानगरपालिकेचा बेजबाबदार कारभार, पुणे पोलिसांची वाहतूक शाखा, मेट्रोचे खोदकाम आणि ठेकेदाराने केलेले निकृष्ट दर्जाचे रस्ते जबाबदार आहेत, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे उपशहर अध्यक्ष जयराज लांडगे यांनी केला.
जयराज लांडगे म्हणाले, पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी रस्त्यावरक खड्डे दुरुस्त करावेत, असे पत्र आयुक्तांना दिल्यानंतर महानगरपालिका आणि पुणे पोलीस आमने सामने आले आहेत. आता महापालिकेचे अधिकारी शहरातील कोंडी मेट्रोच्या कामामुळे खोदकामामुळे आणि ठेकेदारांनी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे निर्माण झाल्याचे सांगत आहेत. मात्र ही टोलवाटोलवी चुकीची आहे, असे करून वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार नाही. सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविला पाहिजे, असे मागणी जयराज लांडगे यांनी महापालिका आयुक्त आणि पुणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे.