18/09/2014
जिवाजी वाघमारे हा अंध मुलगा यूपीएससीची परीक्षा देतोय. कलेक्टर होऊन त्याला समाजसेवा करायची आहे. तो एक मोठी आणि महत्त्वाची लढाई लढायला निघाला आहे. डोळ्यातल्या अंधाराला तो शरण गेलेला नाही. त्यांनं आत्मविश्वासही गमावलेला नाही. कर्तृत्वाच्या जोरावर उजेडाचं स्वप्न तो बाळगून आहे. अंध जिवाजी गरिबीशी दोन हात करत आहे...एकाच वेळी अनेक प्रतिकूल आघाड्यांवर झुंज देणाऱ्या लढवय्या जिवाजीचा हा संघर्ष...
पुणे विद्यापीठाचा म्हणजे आताच्या ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’चा मराठी विभाग तसा खूप मोठा आहे. या मोठ्या विभागात कुणाच्याही मदतीशिवाय प्रोफेसर मनोहर जाधव यांची केबिन शोधणं सहज आणि कुणालाही शोधता येणे खूप सोपं आहे. ‘आत येण्यासाठी कसल्याही परवानगीची गरज नाही,’ असं ज्या काचेच्या दरवाजावर लिहिलं असेल, ती केबिन मनोहर जाधवांची. मी त्यांना मनोहरपंत म्हणतो आणि ते माझी पात्रता नसताना मला गुरुजी म्हणतात. परीक्षा न घेता वरच्या वर्गात ढकलणं ज्याला म्हणतात ते हे. डॉ. सुहास जेवळीकर यांनी आपल्या ‘तिमिर’ या पुस्तकातही असा उल्लेख केला आहे. असो. ...तर पाच सप्टेंबरला मी त्यांच्या केबिनमध्ये गेलो. दोन-चार विद्यार्थी बसले होते. नेहमीचंच हे दृश्य असतं. मनोहरपंत वर्गात कमी आणि बाहेर जास्त शिकवतात. एक विद्यार्थी संगणकावर काही ऑपरेट करत होता. दुसरा काही तरी लिहीत होता. तिसरा विद्यार्थी मी प्रथमच बघत होतो. त्याचं नाव जिवाजी वाघमारे. त्याच्या हातात दुमडलेली पांढरी काठी होती. तो अंध आहे हे ओळखायला वेळ लागला नाही. थोड्या वेळात फिजिक्स विभागाचे प्रा. डॉ. ढोले आले. त्या अंध विद्यार्थ्याशी मी थोड्याफार गप्पा मारल्या. तो सामान्य प्रशासन आणि मराठी विषयात एम. ए. झाला होता. यूपीएससीसाठी बसला होता. ‘तुझं आत्मकथन लिही. लढणाऱ्या मुलांना उपयोगी पडंल,’ असं सहजच म्हणालो. त्यानं ते किती गांभीर्यानं घेतलं माहीत नाही. तो निघून गेला; पण माझ्या मनात तो खोलवर उतरला होता. त्याचा सावळा रंग, सडपातळ काया, रेघारेघांचा शर्ट, शर्टिंग केलेलं...काही केल्या तो नजरेसमोरून जात नव्हताच. या मुलाला निवांतपणे भेटता कसं येईल, हाच प्रश्न सारखा सतावत होता. शेवटी मनोहरपंतांनीच प्रश्न सोडवला. ‘‘गुरुजी, उद्या सकाळी साडेसातला जिवाजी तुम्हाला तुमच्या रूमवर भेटायला येईल. काळजी करू नका,’’ असं ते म्हणाले.
रात्रभर जिवाजी माझ्या नजरेसमोर तरळत होता. जणू काही स्वप्नात येऊन तो खेळत होता. त्याला दिसत होतं आणि स्वप्न बघत असल्यामुळं मी डोळे उघडत नव्हतो. स्वप्न तुटंल याची भीती वाटत होती. सकाळी साडेसातला तो आपला एक मित्र भिकचंद लांडे याच्याबरोबर भेटायला आला. मी म्हणालो ः ‘‘तुला काही विचारावं इतका मी कुणी मोठा नाहीय. तूच सांग...’’
जिवाजीनं एक पॉज घेतला. दीर्घ पॉज...त्याची जन्मतारीख १४ ऑगस्ट १९८३ म्हणजे ३०-३१ वर्षांचं विखुरलेलं आयुष्य त्याला एका सुसंगतीत बसवायचं होतं...एकावरून दहावर, दहावरून चारावर, चारावरून सातावर असा काहीतरी त्याचा प्रवास सुरू होता. विखुरलेले तुकडे गोळा करणं कठीण आणि त्याचं एका दणकट धाग्यात रूपांतर करणंही तसं कठीणच होतं. आपल्याला एके सकाळी ‘सकाळ’समोर असं आयुष्य उसवायला लागंल, याची कदाचित त्याला कल्पना नसावी. आयुष्य उसवणं तसं कठीणच...वेदनेचे पंख असलेले, वेदनेनं चोच भरलेले असंख्य पक्षी सैरभैर होऊन उडायला लागतात...उडताना ते काही करत नाहीत; पण उसवलेलं पुन्हा सांधताना ते चोची मारायला लागतात. रक्त उडायला लागतं. पेशी विस्कटायला लागतात. रक्त बराच वेळ साकळत राहतं हिमोग्लोबिनमुळं...
..तर ३१ वर्षांपूर्वीची ही एका अखंड वाहणाऱ्या वेदनेची गोष्ट... केशरबाई आणि रंगनाथराव या जोडप्याच्या पोटी जिवाजीचा जन्म झाला. केशरबाईंच्या डोक्यावरचं आभाळ आणि पायाखालची जमीनही फाटलेली...चहूबाजूंनी वादळवारं घोंघावत राहायचं...निवाऱ्याची कौलं उडवत फिरायचं...जिवाजीला जन्मजातच एकाच डोळ्यानं दिसायचं...दुसऱ्या डोळ्यानं अंधुक दिसायचं... काही दिवसांनंतर पोट भरण्यासाठी जिवाजीला घेऊन त्याचे आई-वडील मुंबईला गेले. भाकरीसाठी अहोरात्र धावणाऱ्या आणि पत्र्यांच्या सावलीत जगणाऱ्या ४० लाख लोकांमध्ये आणखी तीन जिवांची भर पडली. लेकराचे हाल व्हायला नकोत म्हणून केशरबाईनं जिवाजीला रवळगावात अण्णा नावाच्या एका भिकाऱ्यामार्फत पाठवलं. हा अण्णा उंडे रस्त्यावर, रेल्वेत भीक मागायचा. तो जिवाजीच्या आईचा मानलेला भाऊ होता. जिवाजीचं वय तेव्हा असंल चार-पाच वर्षांचं... रवळगावमध्ये आजीनं त्याला शाळेत घातलं. एका डोळ्यानंच हा लिहायला-वाचायला शिकला; पण याही डोळ्यात हळूहळू अंधार पसरला... अनेकांना दाखवलं...अगदी डॉ. तात्याराव लहाने यांनाही दाखवलं; पण डोळा वाचणार नव्हता... तो प्रकाश पकडणारा नव्हता...
पाचवी-सहावीपर्यंत तो नॉर्मल मुलांप्रमाणे शिकला. नंतर मात्र त्याच्या डोळ्यासमोर अंधाराची एक अभेद्य भिंत तयार झाली. ती कधीही हलणार नव्हती. केशरबाई आपल्या लेकराला जिवापाड जपायची. जिवाजीनंतरही तिला दोन मुली आणि आणखी दोन मुलगे झाले. जिवाजीच्या शिक्षणासाठी केशरबाई प्रसंगी चुलीला मौनात पाठवायची. तिचं तोंड बंद करायची. बोरं विकायची. गवत विकायची. केळी विकायची. मजुरी करायची. रात्रंदिवस गुराढोरांसारखी राबायची. मदिरेच्या आहारी जाणाऱ्या नवऱ्याचा मार खायची. या माउलीनं आयुष्यात एकच स्वप्न बाळगलं होतं आणि ते म्हणजे अंध लेकराचं आयुष्य उजेडमान करण्याचं...पुढच्या शिक्षणासाठी जिवाजी परभणीत आला. बोलायला शिकला. वाचायला शिकला. कविता करायला शिकला. कॉलेजचा प्रतिनिधी म्हणून वक्तृत्व स्पर्धेत जाऊ लागला. परभणीतल्या होस्टेलनं हायस्कूल संपल्यावरही त्याला तिथंच राहण्याची परवानगी दिली होती. एव्हाना जिवाजीनं ब्रेल लिपी आत्मसात करून घेतली होती. परभणीतच त्यानं मराठी विषयात एमएची पदवी घेतली. शिकण्याची इच्छा अजून होती आणि आयुष्य उजळण्यासाठी शासकीय सेवेत नोकरी करण्याचं स्वप्न त्याला खुणावत होतं. त्यानं मुंबईत जाऊन संगणकाचा अभ्यास केला. मग पुन्हा औरंगाबादला येऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करत करतच तो लोकप्रशासन या विषयात एमए होण्याचा प्रयत्न करू लागला. याच काळात त्याची आई गंभीर आजारी पडली. तिचे हातपाय सुजले होते. चालणं बंद झालं होतं. तिला औरंगाबादला हलवण्यात आलं. आईला वाचवण्यासाठी तो मित्रांकडून आर्थिक मदत जमा करू लागला. मदत जमलीही; पण आई काही वाचली नाही. तिला डायबेटिस झाला होता, हे मरता मरता कळलं. जमंल तो पैसा लेकराच्या शिक्षणासाठी ठेवणाऱ्या केशरबाईनं स्वतः दवाखान्याची पायरी कधी चढली नव्हती. जेव्हा ती चढली तेव्हा काहीच उपयोग झाला नाही. जिवाजीचं आभाळ म्हणजे त्याची आई. त्याचं सुरक्षाकवच म्हणजे त्याची आई. त्याची चिमुकली बॅंक म्हणजे त्याची आई आणि झालंच तर अंधाराविरुद्ध लढायला शिकवणारं महाऊर्जाकेंद्र म्हणजे त्याची आई... या केंद्रात लोडशेडिंग कधी नसतं. कायम प्रकाशच प्रकाश असतो. जिवाजीनं आईवर सुंदर कविता लिहिली आहे. ती वाचताना तो स्वतः रडायला लागतो. डोळ्यातून धारा वाहतात; पण अंधार मात्र तिथंच चिकटलेला असतो. जिवाजी जेव्हा आपल्या आईचं वर्णन करून सांगतो, तेव्हा वेदनांचा एक मोठा जणू सोहळाच जन्माला येतो. निष्ठुरतेच्या भिंती फोडून आपलेही डोळे ओले होतात. जिवाजी मग मुंबईत गेला अधिकारी होण्याचं स्वप्न घेऊन. यूपीएससीसाठी प्राथमिक परीक्षा त्यानं दिली. तयारी खूप चांगली नव्हती. अनुभवासाठी तो परीक्षेला बसला आणि नापास झाला. मग तो पुण्यात आला. राहण्याची सोय एका बुद्धविहारात एका भन्तेच्या मदतीनं झाली. पुढं याच परीक्षेसाठी पाच महिन्यांच्या तयारीसाठी पुणे विद्यापीठात त्याला प्रवेश मिळाला. हा प्रवेश त्यानं परीक्षा देऊन पास होऊन मिळवला. यूपीएससीसाठी पुन्हा प्राथमिक (प्रीलिम) परीक्षा दिलीय. त्याच्यासाठी रायटर म्हणून प्रतीक दराडे यांनी काम केलं. निकाल उंबरठ्यावर आलाय. काय होणार त्याला माहीत नाही; पण तो अखेरपर्यंत प्रयत्न करणार आहे. शेवटी ‘एमपीएससी तर एकदम आरामात सुटू’, असा त्याला जबरदस्त विश्वास आहे. समाजसेवा करण्याची खूप मोठी संधी कलेक्टर झाल्यानंतर मिळते, असं त्याला वाटतं. परभणीत असताना एका कलेक्टरनंही त्याला प्रेरणा दिली आहे. ‘ब्रेल लिपी, निजी सहाय्यक, संगणक आणि सामाजिक जाणिवांचा वापर करून ही नोकरी करेन’, हे सांगायलाही तो विसरत नाही.
जिवाजीच्या अंधारभरल्या डोळ्यांतून तेजःपुंज असं लाल दिव्याच्या गाडीचं, समाजसेवेचं स्वप्न उगवत आहे. अर्थात, त्याला अडचणीही खूप आहेत. विद्यापीठाच्या वसतिगृहातला प्रवेश पाच महिन्यांसाठीच होता, तो आता संपलाय. जिवाजी कुलगुरूंना भेटून विनंती करून आलाय. जर काही घडलंच नाही, तर कुठं राहायचं हा प्रश्न सर्वांत गंभीर होणार आहे. याशिवाय मेनची परीक्षा खूप जवळ आलीय. त्याच्याकडं मेनसाठीची पुस्तकं नाहीत. त्यासाठी पैसेही नाहीत. पुस्तकं घ्यायची. मित्राला वाचायला लावून ती रेकॉर्ड करायची, मग आपण ऐकायची. ब्रेलवर काही मिळतं का तेही बघायचं. आपल्या दृष्टीनं हे काम छोटं असलं, तरी त्याच्या दृष्टीनं प्रश्न खूप मोठे आहेत. त्याची भावंडं मजुरी करतात. घरातून कसलीही सप्लायलाइन नाही आणि बाहेर अद्याप काही घडत नाही... मोठ्या विवंचनेत आहे तो...
खरंच जिवाजी यूपीएससी उत्तीर्ण होईल का? तर माझ्या दृष्टीनं या प्रश्नाला काही अर्थ नाही; पण तो एक मोठी आणि महत्त्वाची लढाई लढायला निघाला आहे, हेच मला महत्त्वाचं वाटतं. डोळ्यातल्या अंधाराला तो शरण जात नाहीये. आत्मविश्वास गमावत नाहीये. कर्तृत्वाच्या जोरावर उजेडाचं स्वप्न तो बाळगून आहे. आपलं काम त्याला लढ म्हणण्याचं आहे. मी त्याला धीर दिला. ‘समाजात लढ म्हणणारे खूप हात आहेत, ते सारेच तुला मदत करतील,’ असं आश्वासन देऊन बसलो. हा मजकूर लिहितानाच कागलहून डॉ. कापशींचा फोन आला होता. त्यांनी जिवाजीची लढाई ऐकली आणि पाच हजार रुपये देण्याचं स्वतःहून सांगितलं. हे सारे पैसे एकत्र जमा व्हावेत. त्याचा योग्य उपयोग व्हावा, यासाठी मनोहरपंतांनी आपला बॅंक अकाउंट नंबर देऊ केलाय. तो आहे ः मनोहर जाधव, बॅंक ऑफ महाराष्ट्र, युनिव्हर्सिटी कॅम्पस, बॅंक अकाउंट नंबर- २००६३०४०७५७, आयएफ कोड एमएएचबी-०००१३५५. आणि त्यांचा मोबाईल नंबर ९८२२८५०२९० असा आहे. मी त्यांचे आभार मानले. जिवाजीला याविषयी कल्पना दिली. जगात अंधार कितीही दाटला तरी उजेडाचा अंकुर कोणत्या ना कोणत्या काळजातून उगवतच असतो, याची आपल्या सर्वांच्या वतीनं त्याला खात्री दिलीय. तो तूर्त तरी विद्यापीठ कॅम्पसमध्येच असतो आणि त्याचा फोन क्रमांक आहे ः ९४२१८६७०९९. मला खूप खूप उत्सुकता लागलीय त्याच्या लढाईची..अपयशाची नव्हे; तर मैदानावर तग धरून राहण्याची...जय हो!
-----------------------from esakal.com by Uttam Kamble