04/09/2026
आकाशवाणी पुणे
प्रादेशिक वृत्त विभाग
पुणे वृत्तांत
वेळ-संध्याकाळी 06.00 वा.
दिनांक-04.09.2026 वार- शुक्रवार
मुख्यमंत्री
पुणे हे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सचं म्हणजे जीसीसीचं प्रमुख केंद्र म्हणून वेगानं विकसित होत असून, पुण्यात आतापर्यंत १३० पेक्षा अधिक जीसीसी कार्यरत आहेत. येत्या एका वर्षात ही संख्या ८०० पेक्षा अधिक होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. जीसीसी क्षेत्रात पुण्यानं देशात प्रथम क्रमांकाचं स्थान मिळवावं हे राज्य शासनाचं उद्दिष्ट असल्याचंही त्यांनी सांगितलं. वाकड इथं ई.ओ.एन. वेस्ट आयटी पार्कमध्ये, मॅग्नम आईस्क्रीम कंपनीच्या ग्लोबल बिझनेस सोल्युशन्स सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या केंद्रामुळे एक हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून अप्रत्यक्ष रोजगारालाही चालना मिळणार आहे.
बजाज फिनसर्व्हच्या माध्यमातून पुण्यात उभारण्यात येणारं आधुनिक आणि शाश्वत सुविधांनी युक्त मुख्यालय शहराच्या विकासाला नवी दिशा देणारं ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी आज पुण्यात व्यक्त केला. बजाज फिनसर्व्हच्या प्रस्तावित मुख्यालयाच्या भूमिपूजन समारंभात मुख्यमंत्री बोलत होते.
पुण्याला देशातील आधुनिक आणि गतिशील शहर म्हणून विकसित करण्यासाठी शासनाकडून आवश्यक पायाभूत सुविधा वेगानं उभारण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, डेटा ॲनालिटिक्स यांसारख्या नव्या क्षेत्रांमध्ये पुण्यातील तरुणांसाठी रोजगार आणि कौशल्यविकासाच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत असं उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी सांगितलं.
श्रीकृष्ण जन्माष्टमी
कृष्ण जन्माष्टमीचा सण आज सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे. जन्माष्टमी निमित्त राज्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दहीहंडी-मेट्रोबदल
उद्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानकावरील प्रवेश आणि निर्गमन मार्गांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे. हा बदल उद्या सकाळी ६ वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत असेल. मंडई मेट्रो स्थानकात उद्या फक्त गेट नं. ३ मधूनच प्रवेश घेता येईल तर गेट नं. २ इथून बाहेर पडता येईल असं महामेट्रोनं कळवलं आहे.
व्याख्यानमाला
भारत–इस्रायल संबंध दोन्ही देशांच्या जनतेमधील सखोल संबंधांवर आधारित आहेत, असं मत इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत जनरल यानिव रेवाख यांनी आज पुण्यात व्यक्त केलं.
गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सनं महादजी शिंदे यांच्या नावानं आयोजित केलेल्या भू-राजकारणावरील नव्या स्मृती व्याख्यानमालेतील, पहिल्या उद्घाटनपर व्याख्यानात रेवाख बोलत होते. पुणे हे उत्पादन, ऑटोमोबाईल, संरक्षण आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाचं महत्त्वाचं केंद्र असल्याचं त्यांनी नमूद केलं. कार्यक्रमाची सुरुवात गोखले संस्थेचे कुलगुरू डॉ. उमाकांत दाश यांच्या भाषणानं झाली.
स्टुडंट फिल्मफे स्टिव्हल
एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म स्कूलतर्फे विद्यार्थ्यांसाठी पहिल्या आंतरराष्ट्रीय भारतीय विद्यार्थी चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा महोत्सव कोथरूड इथल्या एमआयटी विद्यापीठाच्या परिसरात होईल अशी माहिती चित्रपट महोत्सव समितीचे अध्यक्ष आणि चित्रपट दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पर्यावरणपूरक-गणेशमूर्ती
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी ‘रंगवा इको बाप्पा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या हातकागद संस्थेच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
चलवादी
उच्च क्षमतेच्या ध्वनिवर्धकांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता राज्यभरातील सार्वजनिक उत्सवांमध्ये डीजे-डॉल्बीच्या वापरावर बंदी घालण्याच्या मागणीचं रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. हुलगेश चलवादी यांनी समर्थन केलं आहे.
शालेय वाहतूक प्रमाणपत्राचे नूतनीकरण
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राचं नूतनीकरण करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीनं उद्या आणि परवा सुट्टीच्या दिवशी दिवे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचं कामकाज सुरू ठेवण्यात येणार आहे.
पुरस्कार
क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल हॉकीपटू आणि महाराष्ट्र हॉकी संघाचे अध्यक्ष इक्रम खान यांची या वर्षीच्या मेजर ध्यानचंद क्रीडा पुरस्कारासाठी निवड झाली आहे. आज मोशी इथं त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हवामान
पुणे शहर आणि परिसरात आज कमाल 30 तर किमान २० पूर्णांक 7 दशांश अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्याही हवामान साधारण असंच राहून काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी सहा वाजता ताज्या पुणे वृत्तांतसह. नमस्कार.