06/08/2026
मनन चिंतन:161
खरे खानदानी कोण?
मनुष्य बाह्य रूपाकडे पाहतो; परंतु परमेश्वर अंतःकरण पाहतो. (१ शमुवेल १६:७)
आज अनेकजण अभिमानाने म्हणतात, “आम्ही खानदानी लोक आहोत.” पण एक क्षण थांबून स्वतःला विचारूया…
खानदानी म्हणजे नेमके काय? मोठे आडनाव? मोठे घर? भरपूर संपत्ती? समाजातील प्रतिष्ठा?
जर तसे असते, तर येशूने गरीब मच्छीमारांना आपले शिष्य निवडले नसते आणि गोठ्यात जन्म घेतला नसता. बायबल शिकवते की, खानदानीपणा वंशातून नाही; तो अंतःकरणातून दिसतो.
आज काही लोक घराण्याचा अभिमान बाळगतात; पण आई-वडिलांशी उद्धटपणे बोलतात. चर्चमध्ये नम्र दिसतात; पण घरी पत्नी, पती किंवा मुलांचा अपमान करतात. लोकांसमोर प्रार्थना करतात; पण व्यवहारात खोटे बोलतात. स्वतःला मोठे म्हणवतात; पण चुकीचे वागणे सोडू शकत नाहीत. अशा जीवनाला देव “खानदानी” म्हणत नाही.
येशू म्हणाला,“त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल.” (मत्तय ७:१६)
फळे झाडाची ओळख करून देतात. त्याचप्रमाणे आपले बोलणे, वागणे, नम्रता, प्रामाणिकपणा, प्रेम आणि क्षमा हेच आपल्या आत्मिक घराण्याची ओळख करून देतात.
बायबलमध्ये बेरीयातील लोकांना “खानदानी” म्हटले आहे. कारण त्यांच्याकडे मोठी संपत्ती नव्हती, पण मोठे मन होते. त्यांनी देवाचे वचन नम्रतेने स्वीकारले आणि सत्याचा शोध घेतला. (प्रेषितांची कृत्ये १७:११)
प्रियांनो,
तुमच्या नावापुढे कितीही मोठी पदवी असो, समाजात कितीही मान असो किंवा कितीही संपत्ती असो, जर तुमच्यात ख्रिस्ताचा स्वभाव नसेल, तर देवाच्या दृष्टीने त्या सर्व गोष्टींची किंमत शून्य आहे.
लक्षात ठेवा…
खानदानीपणा वारशाने मिळत नाही; तो प्रत्येक दिवशी आपल्या जीवनातून सिद्ध करावा लागतो.
देवाला तुमचे आडनाव महत्त्वाचे नाही; तुमचे अंतःकरण महत्त्वाचे आहे. देवाला तुमचे घर किती मोठे आहे हे महत्त्वाचे नाही; तुमच्या घरात प्रेम, शांती आणि पवित्रता आहे का, हे महत्त्वाचे आहे. देवाला तुमच्या कपड्यांचा रंग दिसत नाही; तो तुमच्या आत्म्याची स्थिती पाहतो.
आरशात स्वतःला पाहूया…
जर आज येशू आपल्या घरात पाहुणा म्हणून आला तर…
1) आपल्या बोलण्याने तो आनंदी होईल का?
2) आपल्या व्यवहारात त्याला सत्य दिसेल का?
3) आपल्या कुटुंबात त्याला प्रेम दिसेल का?
4) आपल्या जीवनात त्याला स्वतःचे प्रतिबिंब दिसेल का?
खरा खानदानी तो नाही, जो स्वतःची स्तुती करतो; खरा खानदानी तो आहे, ज्याच्या जीवनाकडे पाहून लोक म्हणतात. “याच्यात ख्रिस्त दिसतो.”
आजचे वास्तव
आज काही लोक म्हणतात…
“आम्ही खानदानी आहोत.”
पण…
1) घरात आई-वडिलांशी उद्धटपणे बोलतात.
2) पत्नी किंवा पतीचा अपमान करणे विश्वासघात करणे.
3) दिलेला शब्द पाळत नाहीत.
4) व्यवहारात फसवणूक करतात.
5) गरिबांना कमी लेखतात.
6) चर्चमध्ये भक्ती दाखवतात, पण बाहेर अन्याय करतात.
असा खानदानीपणा हा केवळ नावापुरता असतो.
बायबलनुसार खरा खानदानी कोण?
खरा खानदानी तो…
1) जो देवाचे भय बाळगतो.
2) जो सत्यासाठी उभा राहतो.
3) जो दिलेला शब्द पाळतो.
4) जो पैशापेक्षा चारित्र्याला महत्त्व देतो.
5) जो नम्र असतो.
6) जो क्षमा करतो.
7) जो गरिबांची मदत करतो.
😎 जो स्वतःचा नव्हे, तर देवाचा गौरव शोधतो.
अशा व्यक्तीचे घर मोठे असो वा लहान, ती देवाच्या दृष्टीने महान असते.
मनन चिंतनासाठी प्रश्न
1. माझा अभिमान माझ्या घराण्यावर आहे की माझ्या देवाशी असलेल्या नात्यावर?
2. माझ्या घरातील लोक माझ्याबद्दल काय साक्ष देतील?
3. माझे चारित्र्य माझ्या शब्दांपेक्षा मोठे आहे का?
4. माझ्या जीवनात ख्रिस्ताचा स्वभाव किती दिसतो?
5. आज देव माझ्या अंतःकरणात पाहील, तर त्याला “खानदानी” व्यक्ती दिसेल का?
“धन्य ते शुद्ध अंतःकरणाचे, कारण ते देवाला पाहतील.” (मत्तय ५:८)
✍️आशिष शिंदे
अल्फा ओमेगा