विभागीय माहिती कार्यालय, पुणे

  • Home
  • India
  • Pune
  • विभागीय माहिती कार्यालय, पुणे

विभागीय माहिती कार्यालय, पुणे Page Designed and Published By DDI, Pune नागरिक, पत्रकार व माध्यम प्रतिनिधींना राज्य शासनाची माहिती उपलब्ध करुन देणे.

राज्यस्तरीय भरती परीक्षांच्या पद्धतीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीविद्यार्थी, उमेदवारांसह पालक, शिक्षक, शि...
06/09/2026

राज्यस्तरीय भरती परीक्षांच्या पद्धतीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती

विद्यार्थी, उमेदवारांसह पालक, शिक्षक, शिकवणी वर्ग व नागरिकांच्या सूचनाही विचारात घेणार; समिती १२ सप्टेंबरला पुण्यात

सकाळी १०.३० वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी- उमेदवारांशी संवाद

जिल्हाधिकारी कार्यालयात ७ ते १० सप्टेंबरदरम्यान विशेष कक्ष स्थापन

पुणे, दि. ६ : राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी तसेच गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने विद्यमान परीक्षा पद्धतीचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.

समितीच्या कार्यकक्षेनुसार राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील विद्यार्थी, परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी तसेच अन्य संबंधित घटकांशी चर्चा करून परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी सूचना व अभिप्राय घेण्यात येणार आहेत.

या अनुषंगाने समितीचे अध्यक्ष व सदस्य शनिवार, दि. १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे भेट देणार असून, यावेळी विद्यार्थी व परीक्षार्थींशी संवाद साधून त्यांच्या सूचना व अभिप्राय जाणून घेण्यात येणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील नागरिक व संबंधित घटकांना आपल्या सूचना, शिफारशी, हरकती व निवेदने सादर करता यावीत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हा कक्ष सोमवार, दि. ७ सप्टेंबर ते गुरुवार, दि. १० सप्टेंबर २०२६ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहे.

*सूचना व अभिप्राय सादर करण्याचा तपशील*
नोडल अधिकारी : निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे
प्रत्यक्ष सादरीकरणाचे ठिकाण : करमणूक कर शाखा, ‘बी’ विंग, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे
ई-मेल : [email protected]
कालावधी : दि. ७ ते १० सप्टेंबर २०२६, सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत.

ज्या नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कक्षात प्रत्यक्ष उपस्थित राहणे शक्य नसेल, त्यांनी विहित मुदतीत आपले लेखी अभिप्राय वरील ई-मेलवर पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

*या विषयांवर सूचना अपेक्षित*
विद्यमान परीक्षा प्रणाली तसेच राज्य शासनाचे विविध विभाग, प्राधिकरणे व परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या कार्यपद्धतीबाबत अभिप्राय मागविण्यात येत आहेत. परीक्षा अधिक सुरक्षित, विश्वासार्ह, निष्पक्ष आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतही सूचना अपेक्षित आहेत.

प्रश्नपत्रिका तयार करणे व मॉडरेशन, डिजिटल अथवा मुद्रित प्रश्नपत्रिकांचे वितरण, गोपनीय वाहतूक, परीक्षा केंद्रांचे व्यवस्थापन, प्रतिसाद नोंदणी, मूल्यांकन व निकाल प्रक्रियेतील सुरक्षा यांचा आढावा घेण्यासाठी सूचना मागविण्यात येणार आहेत. तसेच डिजिटल प्रणाली, बायोमेट्रिक प्रमाणीकरण, प्रवेश नियंत्रण, ऑडिट ट्रेल्स आणि सीसीटीव्ही देखरेख यांसारख्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याबाबतही अभिप्राय घेण्यात येणार आहेत.

प्रश्नपत्रिका फुटणे, गोपनीयतेचा भंग, तोतया उमेदवार, संगनमत तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा गैरवापर यांसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना व संबंधितांची उत्तरदायित्व निश्चित करण्याबाबतही सूचना विचारात घेतल्या जाणार आहेत. इतर राज्ये अथवा देशांतील यशस्वी व सुरक्षित परीक्षा पद्धतींचा अभ्यास, परीक्षा केंद्रांसाठी किमान पायाभूत सुविधा व सुरक्षितता मानके, विविध शासकीय यंत्रणांमधील समन्वय तसेच उमेदवारांसाठी जलद व पारदर्शक तक्रार निवारण व्यवस्था याबाबतही सूचना अपेक्षित आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त होणाऱ्या सर्व सूचना व अभिप्रायांचे संकलन करून ते उच्चस्तरीय समितीकडे सादर करण्यात येणार आहेत. समिती या सूचनांचा सखोल अभ्यास करून राज्य शासनास सर्वसमावेशक अंतिम अहवाल सादर करणार आहे.

राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षा परीक्षार्थींच्या भवितव्याशी निगडित असलेल्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी, परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या सूचना व अभिप्राय सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

05/09/2026

📍बारामती, जिल्हा पुणे

उपमुख्यमंत्री #सुनेत्राअजितपवार यांच्या उपस्थितीत #सोमेश्वर सहकारी साखर कारखाना येथे #शेतकरी मेळावा संपन्न.

शेतकरीहितासाठी आधुनिक तंत्रज्ञान व मूल्यवर्धित उत्पादनांवर भर द्यावा-उपमुख्यमंत्री

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, उत्पादन खर्चात बचत आणि शेतीचे अर्थकारण मजबूत करण्यावर भर देणे आवश्यक आहे. बदलत्या हवामान परिस्थिती आणि वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर कृषी व साखर क्षेत्राने आधुनिक तंत्रज्ञान, मूल्यवर्धित उत्पादन आणि अचूक नियोजनाचा स्वीकार करून शेतकरीहिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री Sunetra Ajit Pawar यांनी केले.

यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील, आमदार सचिन पाटील, माजी आमदार संभाजी कुंजीर, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष किसन तांबे, माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक राजवर्धन शिंदे, #शेतकरी आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या की, शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. शेतकरी सक्षम झाला तर गावाची आणि पर्यायाने राज्याची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल. त्यामुळे शासन, शेतकरी, सहकारी संस्था आणि साखर उद्योगाने परस्पर समन्वयाने काम करून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. स्वर्गीय दादा हे स्वतः शेतकरी असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या अडचणी आणि गरजांची जवळून जाण होती. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला. कृत्रिम बुद्धिमत्ता, आधुनिक सिंचन पद्धती, यांत्रिकीकरण, माती परीक्षण, सुधारित वाणांची निवड आणि अचूक पीक नियोजन यांचा वापर वाढविल्यास उत्पादनक्षमता वाढवून उत्पादन खर्च कमी करता येईल.

साखर उद्योग हा महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा आहे. अतिवृष्टी, दुष्काळ, हवामानातील अनिश्चितता, वाढता उत्पादन खर्च आणि साखरेच्या बाजारपेठेतील चढ-उतार यांसारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी साखर कारखान्यांनी केवळ साखर उत्पादनावर अवलंबून न राहता इथेनॉल, बायोगॅस, सीएनजी, सेंद्रिय खत आणि इतर मूल्यवर्धित उत्पादनांकडे लक्ष द्यावे, असे उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने आर्थिक शिस्त, कार्यक्षम व्यवस्थापन आणि शेतकरीहिताला प्राधान्य देत सहकार क्षेत्रात विश्वासार्हता निर्माण केली आहे. कारखान्याच्या प्रगतीमध्ये सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, अधिकारी आणि व्यवस्थापनाचे योगदान महत्त्वाचे आहे. आगामी काळातही शेतकरी सभासदांना अधिकाधिक लाभ मिळेल, यासाठी कारखान्याने दीर्घकालीन नियोजन करावे. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाची परंपरा कायम ठेवत परिसराच्या सर्वांगीण विकासासाठीही सहकारी संस्थांनी योगदान द्यावे, असे उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी सांगितले.

मंत्री श्री. पाटील यांनी सोमेश्वर कारखान्याच्या प्रगतीचे कौतुक करून शेतकरी, सभासद, कामगार आणि व्यवस्थापनाच्या योगदानातून संस्थेने उल्लेखनीय प्रगती साधल्याचे सांगितले. कारखान्याची आर्थिक बळकटी, कार्यक्षमता आणि विश्वासार्हता कायम ठेवत भविष्यातील विकासासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

#शेतकरीमेळावा
#आधुनिकतंत्रज्ञान
#मूल्यवर्धितउत्पादन
#बारामती
#पुणे

📍सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणेउच्च व तंत्रशिक्षण मंत्री Chandrakant Patil यांच्या हस्ते ४२ शिक्षकांना डॉ.जे.पी.न...
05/09/2026

📍सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री Chandrakant Patil यांच्या हस्ते ४२ शिक्षकांना डॉ.जे.पी.नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार प्रदान

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे उत्कृष्ट सामाजिक सेवा कार्य पुरस्कार व आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार देणार असल्याची केली घोषणा.

१४ वर्षांनंतर शिक्षक पुरस्काराची परंपरा पुन्हा सुरू; ४२ शिक्षकांचा सन्मान

विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी किंवा बाह्य ज्ञान न देता अंतर्मुख होऊन विचार करण्यास प्रवृत्त करणारे शिक्षण दिले पाहिजे. सांस्कृतिक पैलू व तर्कावर आधारित विधायक प्रथा परंपरांमागील विज्ञान हे नव्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे, अशी भावना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. तसेच, चांगले संस्कार झिरपण्यासाठी शिक्षणासोबत जीवनमूल्यांचे शिक्षणही आवश्यक आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षणतज्ज्ञ,पद्मभूषण डाॅ. जे.पी.नाईक यांचे शिक्षण,संशोधन,शिक्षक प्रशिक्षण,ग्रामविकास,आरोग्य क्षेत्रातील मुलभूत योगदान लक्षात घेऊन त्यांच्या नावे उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने शिक्षक पुरस्कार सुरू करावेत अशी मागणी नाईक साहेबांच्या कार्याचे अभ्यासक असलेले,आंतरभारती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सागर देशपांडे यांनी केली होती,ती मान्य करून हे पुरस्कार सुरू करताना मला विलक्षण आनंद होत आहे,कृतार्थ वाटत आहे.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणारा डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार १४ वर्षांच्या परंपरेनंतर पुन्हा सुरु झाला. पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी ना. पाटील बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, डॉ. किशोर इंगळे, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू पराग काळकर, सचिव प्रफुल्ल पवार यांच्यासह राज्यातील विविध महाविद्यालयाचे पुरस्कार प्राप्त प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यापीठाचे कर्मचारी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील यांनी पुरस्कारासाठी कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या शिफारशीचा विचार केला नसल्याचे सांगितले. पुरस्कार राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या चिठ्ठीवर दिले गेलेले नाहीत, तर केवळ गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

“मोठ्या व्यक्तिमत्त्वांची माहिती आजच्या पिढीला नसणे हे दुर्दैव आहे. कर्तृत्वासोबत नम्रपणाही वाढवला पाहिजे. पुढील पिढीत चांगले संस्कार झिरपण्यासाठी शिक्षणासोबत जीवनमूल्यांचे शिक्षणही आवश्यक आहे,” असे पाटील यांनी नमूद केले.

शिक्षकांची भूमिका केवळ वर्गातील अध्यापनापुरती मर्यादित नसून ते सामाजिक नेतृत्वही करतात. आज विद्यार्थ्यांच्या हातात ज्ञानाचे मोठे भांडार उपलब्ध असले तरी शिक्षकांचे महत्त्व कमी झालेले नाही. उलट बदलत्या काळानुसार शिक्षकांवर नवीन जबाबदाऱ्या आल्या आहेत, असे मत यावेळी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी किंवा बाह्य ज्ञान न देता अंतर्मुख होऊन विचार करण्यास प्रवृत्त करणारे शिक्षण दिले पाहिजे. महाराष्ट्राच्या परंपरा, संस्कृती आणि जीवनमूल्यांचा अभ्यासक्रमाच्या माध्यमातून परिचय करून देण्याची गरज आहे. गणेशोत्सव केवळ डीजेपुरता मर्यादित न राहता त्यातील सांस्कृतिक व धार्मिक पैलू नव्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत, असेही पाटील यांनी सांगितले.

तरुण पिढीमध्ये भविष्यासंदर्भात असुरक्षिततेची भावना निर्माण होत असल्याने त्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या मनात नेमके काय सुरू आहे, हे शिक्षकांनी समजून घेऊन त्यानुसार मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

सामाजिक काम हे गरजेनुसार केले पाहिजे, असे सांगताना पाटील यांनी एकल पालक कुटुंबांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार एकल पालक योजनेसाठी शासनाने समिती स्थापन केली आहे. कोथरूड परिसरातील सुमारे ९५० एकल महिलांना समुत्कर्ष ग्राहक पेठेतून ५० टक्के सवलतीत धान्य उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

उच्च शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढण्यासाठी एकल माता कुटुंबांना मदत करण्याची आवश्यकता असून, अशा कुटुंबांना व्यापक स्तरावर मदत मिळाल्यास त्याचा सकारात्मक परिणाम होईल, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचाही शैक्षणिक व्यवस्थेत महत्त्वाचा सहभाग असल्याने त्यांनाही आदर्श शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय पुढील वर्षापासून घेण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. तसेच नवीन प्रयोग करणाऱ्या व्यक्तींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्कार देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

📍पुणे जिल्ह्यातील ५३ शिक्षक, ५२२ गुणवंत विद्यार्थी तसेच अध्यक्ष चषक स्पर्धेतील तीन विजेत्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र ...
05/09/2026

📍पुणे

जिल्ह्यातील ५३ शिक्षक, ५२२ गुणवंत विद्यार्थी तसेच अध्यक्ष चषक स्पर्धेतील तीन विजेत्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन उपमुख्यमंत्री Sunetra Ajit Pawar यांच्या हस्ते सन्मान

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये सत्यनिष्ठा, देशप्रेम आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवावा- उपमुख्यमंत्री

शिक्षण हे सर्वात मोठे शस्त्र असून शिक्षक ही राष्ट्राची खरी संपत्ती आहे. विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकांवर आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान न देता त्यांच्यामध्ये सत्यनिष्ठा, देशप्रेम आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार, अध्यक्ष चषक आणि शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, आमदार शंकर मांडेकर, बापूसाहेब पठारे, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील तसेच आदर्श शिक्षक, गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, पुणे ही शिक्षणाची पंढरी आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी याच भूमीत शिक्षणाची ज्योत पेटवली. या समृद्ध शैक्षणिक परंपरेत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शिक्षक हे समाज आणि राष्ट्राचे खरे शिल्पकार असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करण्याचे कार्य ते करतात.

पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय आहे. या शाळांमध्ये शिक्षण घेणारी मुले ही ग्रामीण महाराष्ट्राची खरी ताकद असून त्यांच्या गुणवत्ता आणि क्षमतेला योग्य दिशा देण्याचे काम शिक्षकांनी करावे. महाराष्ट्र ही संत, समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञांची भूमी आहे. राज्यातील अनेक शिक्षकांनी आपल्या कार्यातून राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक मिळवला आहे, असेही त्यांनी सांगितले.

त्या म्हणाल्या, राज्य शासनाने शिक्षण आणि शिक्षण क्षेत्राच्या विकासाला नेहमीच अग्रक्रम दिला आहे. बदलत्या काळानुरूप शिक्षकांनी अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षणासोबतच समस्या निराकरण, टीमवर्क आणि मूल्याधारित शिक्षणाची जोड देत त्यांच्यामध्ये सद्गुणांची रुजवणूक करावी. स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने परिस्थितीला सामोरे जाणारी सशक्त पिढी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे.

विद्यार्थ्यांनी वाचन करावे, विचार करावा, प्रश्न विचारावेत, स्वतःचे मत तयार करावे आणि अपयशाची भीती बाळगू नये, असा सल्लाही उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी दिला.

केंद्रप्रमुख हे शिक्षक आणि प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहेत. केंद्रप्रमुखांच्या यशस्वी नेतृत्वामुळे अनेक शाळांनी प्रगती साधली आहे. शिक्षणामुळे सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल घडतो. स्व. अजितदादांनी नेहमीच महाराष्ट्राच्या तसेच पुणे जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला प्राधान्य दिले. प्रत्येक जिल्हा परिषद शाळेत अद्ययावत संगणक कक्ष, ई-लर्निंग सुविधा आणि डिजिटल वर्गखोल्या उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांना आधुनिक अध्यापन पद्धतींचे प्रशिक्षण देण्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

राज्याच्या शिक्षण क्षेत्रात सकारात्मक आणि गुणात्मक बदल घडविण्याचा शासनाचा निर्धार असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी मुख्यमंत्री विज्ञानवारी, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सायन्स सेंटर, समूह शाळा, आदर्श शाळा, दत्तक शाळा, प्रवेशोत्सव, आरोग्य तपासणी, सैनिकी शिक्षण, मोफत गणवेश, निपुण महाराष्ट्र अभियान यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शिक्षकांचे प्रश्न, शाळांमधील सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी शासन सदैव तत्पर आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

#शिक्षकदिन




04/09/2026

#सोलापूर जिल्ह्यात १३ ते २६ सप्टेंबर या कालावधीत , आणि वापरण्यास प्रतिबंध. गणेशोत्सव मिरवणुकीत पारंपरिक वाद्याचा वापर करण्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे नागरिकांना आवाहन.



📍 साताराप्रादेशिक पर्यटन आराखड्यातील कामे गतीने पूर्ण करा -पालकमंत्री शंभूराज देसाईसातारा जिल्ह्यात प्रादेशिक पर्यटन आरा...
04/09/2026

📍 सातारा

प्रादेशिक पर्यटन आराखड्यातील कामे गतीने पूर्ण करा -पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा जिल्ह्यात प्रादेशिक पर्यटन आराखड्यातील कामांना मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला असून या आराखड्यातील कामे मुदतीत व गुणवत्तापूर्ण करावी, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

प्रादेशिक पर्यटन आराखड्यातील सुरु असलेल्या कामांचा पालकमंत्री श्री. देसाई यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, उपवन संरक्षक अमोल सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या सह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

प्रादेशिक पर्यटन आराखड्यातील सुरू असलेली कामे गतीने पूर्ण करावीत. ही कामे पूर्ण झाल्यामुळे जिल्ह्यात स्थानिकांना रोजगाच्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच पर्यटकांची संख्या ही वाढणार आहे. आराखड्यातील कामे वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वयाने करून ही कामे येत्या मार्च पर्यंत पूर्ण करावीत. जल पर्यटन कामेही तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या
०००००

📍 साताराकेरा-मणदुरे आणि तारळी उपसा सिंचन योजनेचे पाणी प्रथम स्थानिक शेतकऱ्यांना द्या-पालकमंत्री शंभूराज देसाईकेरा-मणदुरे...
04/09/2026

📍 सातारा

केरा-मणदुरे आणि तारळी उपसा सिंचन योजनेचे पाणी प्रथम स्थानिक शेतकऱ्यांना द्या-पालकमंत्री शंभूराज देसाई

केरा-मणदुरे आणि तारळी उपसा सिंचन योजनांद्वारे पाणी वितरण करताना प्रथम स्थानिक शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने पाणी द्या. स्थानिक शेतकऱ्यांची गरज भागल्यानंतर उर्वरित शिल्लक पाणी इतर योजनांना देण्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री #शंभूराजदेसाई निर्देश दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केरा-मणदुरे आणि तारळी उपसा सिंचन योजनांच्या आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोणपे यांच्यासह संबंधित अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
या दोन्ही उपसा सिंचन योजनांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून जास्तीत जास्त शेती क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे निर्देश देऊन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, सिंचन योजनेची चाचणी लवकरात लवकर घेऊन पहिला टप्पा नोव्हेंबरपर्यंत पोटपाटांसह सुरू करावा तर दुसरा टप्पा डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावा.

बैठकीत पाटण एमआयडीसीच्या कामाचा आढावा घेताना पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, एमआयडीसीमध्ये अद्याप सुरू न झालेल्या उद्योगांना तत्काळ नोटीस पाठवावी आणि उद्योग सुरू न करणाऱ्यांच्या जमिनी परत ताब्यात घेऊन त्यांचे फेरवाटप करण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे त्यांनी सांगितले. या जमिनींची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी प्रांताधिकारी आणि एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे दौरा करावा, असेही निर्देश त्यांनी दिले.
0000

04/09/2026

📍 पुणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते #बजाज फिनसर्व्हच्या प्रस्तावित मुख्यालयाचे भूमिपूजन.

बजाज फिनसर्व्हच्या अत्याधुनिक मुख्यालयामुळे पुण्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बजाज फिनसर्व्हच्या माध्यमातून पुण्यात उभारण्यात येणारे आधुनिक आणि शाश्वत सुविधांनी युक्त मुख्यालय शहराच्या विकासाला नवी दिशा देणारे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. पुण्याला देशातील आधुनिक आणि वेगवान मोबिलिटी असलेले शहर म्हणून विकसित करण्यासाठी शासनाकडून आवश्यक पायाभूत सुविधा वेगाने उभारण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

बजाज फिनसर्व्हच्या प्रस्तावित मुख्यालयाच्या भूमिपूजन समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, बजाज फिनसर्व्हचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज, बजाज फिनसर्व्ह सीएसआरच्या अध्यक्षा शेफाली बजाज, बजाज फायनान्सचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव जैन, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह बजाज समूहातील पदाधिकारी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, पुणे आणि मुंबई देशातील फिनटेक इकोसिस्टीमची राजधानी झाली आहेत. पहिल्या तिमाहीत मुंबईने बंगळूरुला मागे टाकले असून एकूण फिनटेक गुंतवणुकीपैकी ६१ टक्के गुंतवणूक मुंबईत झाली आहे. फिनटेक स्टार्टअपमध्येही मोठी वाढ झाली असून ५९ टक्के वाढ आणि ९०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक या क्षेत्रात झाली आहे. ही इकोसिस्टीम नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथेही नेण्याची गरज आहे. लवकरच नागपूरमध्येही बजाज फिनसर्व्हची सेवा सुरू झालेली दिसेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पुणे वेगाने वाढणारे शहर आहे. या वेगाला अनुरूप आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. बाह्य आणि अंतर्गत रिंगरोडसोबत भुयारी मार्गाचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. पुढील तीन ते चार वर्षांत पुण्याची ओळख वेगवान वाहतूक व्यवस्था असलेले शहर म्हणून निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आधुनिक शहर म्हणून पुण्याची ओळख निर्माण करायची असून त्यामध्ये बजाज फिनसर्व्हचा आधुनिक परिसर महत्त्वाची भूमिका बजावेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, पुण्यात उभारण्यात येणारे बजाज फिनसर्व्ह पुणे परिसर आणि त्यातील सुविधा देशातील महत्त्वाची आणि शाश्वत व्यवस्था ठरणार आहे. या व्यवस्थेत सुमारे ४० हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत. परिसराला जोडणारा रस्ता आणि अतिरिक्त पूल इमारतींचे काम पूर्ण होण्यापूर्वी उभारण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. बजाज समुहाने पुण्यात कला आणि सांस्कृतिक केंद्र उभारण्याचा मनोदय व्यक्त केला असून महानगरपालिकेसह सर्वांच्या सहकार्याने असे केंद्र उभारण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आर्थिक व्यवहार आणि बँकिंग क्षेत्रात महाराष्ट्र पुढे असून राज्याला आणखी पुढे नेण्यासाठी विशेष धोरण तयार करण्यात आले आहे. डोमेस्टिक इन्शुरन्स आणि डिजिटल लेंडिंग मार्केटमध्ये महाराष्ट्राने आपले वर्चस्व कायम ठेवावे यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. फिनटेक क्षेत्रात महाराष्ट्राचे नेतृत्व अधिक भक्कम करण्यासाठी बजाज फिनसर्व्हने राज्य शासनासोबत सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

बजाज फिनसर्व्हने फायनान्शियल टेक्नॉलॉजीचा उपयोग करून या क्षेत्रात आधुनिकता आणल्याने फिनटेक क्षेत्रातील महत्वाची संस्था म्हणून या समूहाकडे पाहिले जाते असे नमूद करून बजाज समूहाने स्थापनेपासून भारताचा औद्योगिक विकास आणि राष्ट्रनिर्माणात दिलेल्या योगदानाचा आणि शासनाच्या सामाजिक उपक्रमातील सहभागाचा मुख्यमंत्र्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.





04/09/2026

📍 पुणे

मुख्यमंत्री #देवेंद्रफडणवीस यांच्या हस्ते मॅग्नमच्या ग्लोबल बिझनेस सोल्युशन्स सेंटरचे पुणे येथे उद्घाटन.

मॅग्नमचे पुण्यातील केंद्र एक हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करणार; त्यासोबतच अप्रत्यक्ष रोजगारालाही चालना मिळणार-मुख्यमंत्री

ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सचे प्रमुख केंद्र म्हणून #पुणे वेगाने विकसित होत असून, पुण्यात आतापर्यंत १३० पेक्षा अधिक जीसीसी कार्यरत झाले आहेत. आगामी एका वर्षात ही संख्या ८०० पेक्षा अधिक होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. जीसीसी क्षेत्रात पुण्याने देशात प्रथम क्रमांकाचे स्थान मिळवावे, हे राज्य शासनाचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाकड येथील ईओएन वेस्ट आयटी पार्कमध्ये मॅग्नम आईस्क्रीम कंपनीच्या ग्लोबल बिझनेस सोल्युशन्स सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार अमित गोरखे, शंकर जगताप, उद्योग, गुंतवणूक व सेवा विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक व धोरण सल्लागार कौस्तुभ धवसे, मॅग्नम आईस्क्रीम कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी अभिजीत भट्टाचार्य, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह उद्योजक आणि कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र हे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्ससाठी देशातील प्रमुख आणि पसंतीचे गुंतवणूक केंद्र बनले असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुण्यात जागतिक कंपन्यांकडून ग्लोबल व्यवसाय सेवा केंद्रे सुरू करण्याला मिळणारा प्रतिसाद हा शहरातील उद्योगपूरक वातावरण आणि उपलब्ध कुशल मनुष्यबळाची पावती आहे. मॅग्नमचे पुण्यातील केंद्र एक हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करणार आहे. त्यासोबतच अप्रत्यक्ष रोजगारालाही चालना मिळणार आहे. कंपनीच्या जागतिक व्यवसाय प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी या केंद्रात कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वयंचलित तंत्रज्ञान, लॉजिस्टिक्स आणि अन्य आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. उत्पादन, वितरण आणि ग्राहक अनुभवाशी संबंधित प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. शासन आणि उद्योग क्षेत्राने एकत्रितपणे काम केल्यास गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना देणारी सक्षम परिसंस्था निर्माण होते. राज्यात गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांना आवश्यक ते सहकार्य आणि अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

श्री.फडणवीस म्हणाले, मुंबईतील प्रादेशिक मुख्यालयासोबत पुण्यात सुरू झालेले हे ग्लोबल बिझनेस सोल्युशन्स सेंटर मॅग्नमच्या महाराष्ट्रातील विस्ताराला नवी दिशा देणारे ठरेल. पुण्यातील औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधा अधिक सक्षम करून ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्ससाठी आणखी आकर्षक केंद्र बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हिंजवडीसह पुण्यातील आयटी क्षेत्राशी संबंधित पायाभूत सुविधांचे प्रश्न सोडविण्यावर शासनाचे विशेष लक्ष आहे. उद्योग आणि गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याच्या शासनाच्या प्रयत्नांना उद्योग क्षेत्राकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद ही त्याचीच परिणती आहे. गुंतवणुकीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती करण्यास शासनाचे प्राधान्य असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.





04/09/2026

📍 पुणे

मुख्यमंत्री #देवेंद्रफडणवीस यांच्या हस्ते बजाज फिनसर्व्ह कॅम्पसचे भूमिपूजन.



Address

Divisional Information Office, New Central Building
Pune
411001

Alerts

Be the first to know and let us send you an email when विभागीय माहिती कार्यालय, पुणे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to विभागीय माहिती कार्यालय, पुणे:

Shortcuts

Share