17/06/2026
रायगड विकास प्राधिकरण अंतर्गत दुर्गराज रायगडावर सुरू असलेल्या संवर्धन व विकास कामांबाबतची आढावा बैठक मंत्रालय येथे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिषजी शेलार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना झाल्यापासून पहिल्यांदाच सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने आढावा बैठकीचे आयोजन केले, याबद्दल मंत्री महोदयांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
या बैठकीत रायगड विकास प्राधिकरणामार्फत गडावर सुरू असलेल्या कामांबाबत सविस्तर चर्चा झाली. रायगडसारख्या दुर्गम गडावर काम करताना येणाऱ्या अडचणी व मर्यादा मंत्री महोदयांसमोर मांडल्या. प्राधिकरणास कोणत्याही प्रकारची स्वायत्तता नसून प्रशासकीय अधिकार नसल्याने केवळ सल्लागाराची भूमिका प्राधिकरणास पार पाडावी लागत आहे, याबाबत खंत व्यक्त केली. यावर सांस्कृतिक कार्य विभागाच्या सचिवांनी महिनाभरात सर्व संबंधित विभाग व तज्ञांशी चर्चा करून कामांची विभागणी, अडचणी व जबाबदाऱ्यांबाबत कृती आराखडा सादर करण्याचे आदेश मंत्री महोदयांनी दिले असून हा अहवाल सादर झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
पर्यटकांच्या मूलभूत सोयीकरिता पुरातत्व विभागाच्या अटी शर्थीनुसार व देखरेखीखाली प्राधिकरणाने गडावर ठिकठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी केलेली आहे. ही स्वच्छतागृहे हस्तांतरित करून घेण्यास पुरातत्व विभाग चालढकल करत आहे. परिणामी गडावर येणाऱ्या शिवभक्त व पर्यटकांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. याविषयी सविस्तर वृत्तांत या बैठकीच्या निमित्ताने मांडला. यावर केंद्रीय पुरातत्व विभागाच्या प्रादेशिक संचालिका यांनी ज्याअर्थी पुरातत्त्व विभाग गडावर येणाऱ्या पर्यटकांकडून तिकीट आकारणी करतो, त्याअर्थी स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी देखील पुरातत्त्व विभागाची असल्याचे मान्य करित, लवकरच पुरातत्व विभाग याची प्रत्यक्ष जबाबदारी स्वीकारेल अशी ग्वाही दिली. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने पुरातत्व विभागाने ही जबाबदारी घ्यावी, असे यावेळी सूचित केले.
छत्रपती घराण्याचा वारस म्हणून असलेली जबाबदारी व एक निस्सीम शिवभक्त या नात्याने दुर्गराज रायगडची आजवर अखंडपणे सेवा करत आलो आहे व यापुढेही करत राहीन. प्राधिकरण अध्यक्ष या नात्याने रायगडावर सुरू असणाऱ्या कामांची दर महिन्याला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करतो. या वयातही संपूर्ण गड पायी चढतो व उतरतो. यादरम्यान प्रत्येक कामांची बारकाईने पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देतो. वेळप्रसंगी काम दर्जेदार न झाल्यास व कामात दिरंगाई झाल्यास संबंधित कंत्राटदारावर कारवाईची देखील शिफारस केलेली आहे. महाड ते रायगडपर्यंत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात दिरंगाई केल्याबद्दल संबंधित पूर्वीच्या कंत्राटदारास केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करून ब्लॅकलिस्ट केले आहे. राजशिष्टाचार बाजूला ठेवून मंत्रालयापासून ते दिल्ली पर्यंत संवर्धन कामांना परवानगी आणण्यासाठी व पाठपुराव्यासाठी स्वत: फेऱ्या मारतो, अधिकाऱ्यांचे उंबरे झिजवतो. रायगडाची सेवा करण्यामध्ये मला गौरव वाटतो, समाधान मिळते आणि येणाऱ्या अडचणींचा सामना करण्याची ताकददेखील रायगडच देतो.
अनेक नैसर्गिक, तांत्रिक व प्रशासकीय अडचणी असतानाही त्यांवर मात करत, पुरातत्व विभागाचे असहकार्य व जाचक नियम अटींतून मार्ग काढत, गडाच्या बाह्य भागांत संवर्धनाची कामे प्राधिकरणाने केलेली आहेत. मात्र, गडाचा मुख्य भाग असलेल्या नगारखाना, राजसदर, राजवाडा, मनोरे, राणीवसा, अष्टप्रधान वाडे, बाजारपेठ या वास्तू व महाराजांचा समाधी परिसर केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित येतो. या वास्तूंचे संवर्धन करण्याची मंजूरी मिळावी यासाठी रायगड विकास प्राधिकरण गेली अनेक वर्षे केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा करित आहे. मात्र, पुरातत्त्व विभागाकडून याकरिता कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही.
चित दरवाजा ते होळीचा माळ, रोपवे अप्पर स्टेशन ते होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर तसेच टकमक टोकाकडे जाणाऱ्या पदपथाचे काम पुरातत्व विभागाने लावलेल्या सर्व अटी व नियम पाळून पूर्ण केले आहे. हत्ती तलाव, फुटका तलाव क्र. १, २ व ३, श्रीगोंदा तलाव अशा महत्त्वाच्या तलावांचे जतन व संवर्धन कार्य सुरू आहे. खुबलढा बुरुज, नाणे दरवाजा व तटबंदी, महादरवाजा व तटबंदी, वाघ दरवाजा व तटबंदी, हिरकणी बुरुज अशा लष्करीदृष्ट्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटकांचे जतन व संवर्धन कार्य शास्त्रोक्त पद्धतीने सुरू आहे. त्यासाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाने घालून दिलेल्या प्रत्येक नियमाचे पालन होत आहे. पण अजूनही गडाच्या मुख्य ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी प्राधिकरणास कोणतेही कार्य करण्यासाठी पुरातत्त्व विभागाने मंजुरी दिलेली नाही, ही बाब याप्रसंगी प्रकर्षाने नजरेस आणून दिली.
प्राधिकरणामार्फत करण्यात आलेली कामे, सुरू असणारी कामे, येणाऱ्या अडचणी आणि भविष्यातील संकल्पना यावर अतिशय सकारात्मक चर्चा या बैठकीच्या निमित्ताने झाली. येणाऱ्या काळात सांस्कृतिक कार्य मंत्रालय, महाराष्ट्र शासन, रायगड विकास प्राधिकरण, रायगड जिल्हा प्रशासन आणि केंद्रीय पुरातत्त्व खाते यांच्या एकत्रित सहयोगातून रायगड आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच भरीव योगदान देता येईल, याची या आढावा बैठकीच्या निमित्ताने खात्री झाली आहे.
या बैठकीस नामदार भरतशेठ गोगावले, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांचेसह सांस्कृतिक कार्य विभाग, केंद्रीय पुरातत्व विभाग व राज्य पुरातत्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच रायगड विकास प्राधिकरणचे सदस्य सचिव, तज्ञ व अधिकारी वर्ग उपस्थित होते.
- संभाजीराजे छत्रपती,
अध्यक्ष, रायगड विकास प्राधिकरण
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
Yuvraj Sambhaji Chhatrapati
Maharashtra DGIPR