11/08/2023
गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी, सावर्डेमध्ये २०१८- २२ या शैक्षणिक वर्षाचा दीक्षांत समारंभ शनिवार दिनांक ४ ऑगस्ट रोजी पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून इंडो अमाइन लिमिटेड मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक विजय पालकर व इंडो अमाइन लिमिटेड मुंबईच्या कार्यकारी संचालका सौ. भारती पालकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार शेखर निकम यांनी भुषवले.
याप्रसंगी सह्याद्री शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी महेश महाडिक, सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डेचे माजी प्राचार्य प्रकाश राजेशिर्के, कॉलेजचे प्राचार्य डॉ. अनिल बत्तासे, कॉलेज ऑफ फार्मसी पॉलीचे प्राचार्य संजय देसाई, आयटीआय कॉलेजचे प्राचार्य उमेश लकेश्री व कॉलेजचे उपप्राचार्य प्रवीण वाघचौरे उपस्थित होते. यावेळी गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी, सावर्डेचे प्राचार्य डॉ. अनिल बत्तासे यांनी पाहुण्यांचे स्वागत करताना महाविद्यालयाची स्थापना, प्रगती, महाविद्यालयाने विविध कार्यक्रमाद्वारे सामाजिक बांधिलकी जोपासत असताना संशोधन विभागात केलेली प्रगती आणि या सर्वांमधून होणारा येथील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास याबद्दल अहवाल सादर केला. इंडो अमाइन लिमिटेड मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक विजय पालकर यांनी केलेल्या भाषणात विद्यार्थ्यांना विपणन विभागात सुरू झालेली त्यांची कारकीर्द व्यवस्थापकीय संचालकपदापर्यंत कशी पोहोचली याविषयी मार्गदर्शन केले. त्यांनी औषध निर्माण शास्त्रात असणाऱ्या विविध संधी व त्या विद्यार्थीनी कशा मिळवाव्या यासंबंधी मार्गदर्शन केले. आ. शेखर निकम यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना केवळ पदवी संपादन करणे पुरेसे नसून आपल्या व्यक्तीमत्वामध्ये दडलेली विशेषता तसेच इतर गुणवैशिष्टये जी आपल्याला दैनंदिन जीवनात इतरांशी संवाद साधताना तसेच आपल्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यास कशी मदत करतात या विषयावर प्रकाश टाकला. तसेच त्यांनी महाविद्यालयाची १५ वर्षांची वाटचाल पाहून प्राचार्य, प्राध्यापक आणि सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अश्विनी पाटील व प्रतीक्षा निकम यांनी केले. पदवी प्रदान समारंभात प्रातिनिधिक स्वरूपात ८५ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.