02/09/2026
*कळवा रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ! जेवणात झुरळ, टॉयलेटजवळ भांडी; नताशा आव्हाडांनी काढले प्रशासनाचे धिंडवडे!*
ठाणे (कळवा):
ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील (CSM Hospital) अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक परिस्थिती समोर आली आहे. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणात झुरळ सापडल्याची संतापजनक घटना नुकतीच घडली असून, त्यानंतर रुग्णालयातील स्वच्छतेचे अक्षरशः धिंडवडे काढले गेले आहेत. या गंभीर प्रकरणाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या नताशा आव्हाड यांनी रुग्णालयाला अचानक भेट दिली असता, प्रशासनाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे.
*रुग्णालयातील परिस्थिती इतकी भीषण आहे की, ज्या कॅन्टीनमध्ये रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे जेवण बनवले जाते, त्याच कॅन्टीनच्या बाजूला असलेल्या प्रसाधनगृहात (Toilet) चक्क भांडी घासली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. रुग्णांना ज्या भांड्यांमध्ये जेवण दिले जाते, तीच भांडी अशा अस्वच्छ ठिकाणी धुतली जात असल्यामुळे रुग्णांच्या जीवाशी मोठा खेळ खेळला जात असल्याचे दिसून येत आहे. रुग्णालयाच्या आवारात सगळीकडे कचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे.*
रुग्णालयात रात्रंदिवस मेहनत घेणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांचीही मोठी गैरसोय केली जात आहे. त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी (Hostels) बाथरुमची दारे तुटलेली आहेत, प्रसाधनगृहे अत्यंत घाणेरड्या अवस्थेत आहेत आणि त्यांच्या तक्रारींकडे प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. विद्यार्थ्यांकडून सातत्याने पाठपुरावा करूनही, प्रशासनाकडून केवळ निधी नसल्याचे कारण पुढे केले जात आहे.
गेल्या १५ महिन्यांपासून या कॅन्टीनचे कंत्राट एकाच कंत्राटदाराकडे असूनही, प्रशासनातील एकाही अधिकाऱ्याने किंवा अधिष्ठात्यांनी (Dean) येथे येऊन पाहणी करण्याची तसदी घेतलेली नाही. यावरून ठाणे महानगरपालिका (TMC) आणि रुग्णालय प्रशासनाची रुग्णांप्रती असलेली असंवेदनशीलता स्पष्ट होते.
*या सर्व प्रकारावर नताशा आव्हाड यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. "ठाणे महानगरपालिकेकडे 'स्मार्ट सिटी'च्या नावाखाली रस्ते रंगवण्यासाठी आणि अनावश्यक प्रकल्पांवर उधळण्यासाठी शेकडो कोटी रुपये आहेत, मात्र रुग्णालयाच्या स्वच्छतेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध नाही,"अशी घणाघाती टीका त्यांच्याकडून करण्यात आली आहे. रुग्णालयातील बायोमेडिकल वेस्ट (Biomedical Waste) आणि सॅनिटरी पॅड्स (Sanitary Pads) उघड्यावर फेकले जात असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. रुग्णांचे आरोग्य आणि विद्यार्थ्यांच्या समस्या तत्काळ सोडवल्या नाहीत, तर विद्यार्थ्यांसोबत ठाणे महापालिकेवर धडक देऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.*
या घटनेमुळे ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन आता यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.