ZILLA PARISHAD THANE

ZILLA PARISHAD THANE Zilla Parishad Thane, A Government Organization

“पोषण भी पढ़ाई भी” प्रशिक्षण कार्यक्रमाला ठाणे जिल्ह्यात उत्साहपूर्ण प्रतिसाद - ३३८१ अंगणवाडी सेविका प्रशिक्षणात सहभागीद...
16/10/2025

“पोषण भी पढ़ाई भी” प्रशिक्षण कार्यक्रमाला ठाणे जिल्ह्यात उत्साहपूर्ण प्रतिसाद - ३३८१ अंगणवाडी सेविका प्रशिक्षणात सहभागी

दि. १६ (जिल्हा परिषद, ठाणे) — महिला व बालविकास विभागांतर्गत “पोषण भी पढ़ाई भी” या राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाला ठाणे जिल्ह्यात उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमांतर्गत अंगणवाडी सेविकांना बाल पोषण, आरोग्य, शिक्षण आणि सर्वांगीण बालविकास विषयक सर्वसमावेशक प्रशिक्षण देण्यात येत आहे.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचा कालावधी दि. ६ ऑक्टोबर २०२५ ते १५ डिसेंबर २०२५ असा निश्चित करण्यात आला असून, एकूण ३३८१ अंगणवाडी सेविका या प्रशिक्षणात सहभागी होत आहेत.

*ठाणे जिल्ह्याचे प्रशिक्षण नियोजन*
ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या १७ एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) प्रकल्पांतील सर्व अंगणवाडी सेविकांसाठी हे प्रशिक्षण टप्प्याटप्प्याने आयोजित करण्यात आले आहे.
प्रशिक्षणाचे नियोजन प्रती बॅच १०० (जास्तीत जास्त १०५) सेविका या प्रमाणे केले असून, प्रत्येक बॅचमध्ये पोषण, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण व बालसुरक्षा यांसारख्या विषयांवर सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक मार्गदर्शन दिले जात आहे.

*प्रशिक्षणाचे उद्दिष्ट*
“पोषण भी पढ़ाई भी” या प्रशिक्षणाचे उद्दिष्ट म्हणजे —
• अंगणवाडी सेविकांना बाल पोषण, आरोग्य, स्वच्छता आणि शैक्षणिक क्रियाकलापांवरील अद्ययावत माहिती व कौशल्य देणे,
• शालेयपूर्व शिक्षणासह बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सेविकांची कार्यक्षमता वाढविणे,
• आणि ग्रामीण व शहरी बालकांना अधिक गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी अंगणवाडी प्रणाली सशक्त करणे.

*प्रशिक्षणाचे आयोजन*
प्रशिक्षणाचे आयोजन ठाणे जिल्हा परिषदेतर्फे संबंधित प्रकल्प अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी आणि मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्था यांच्या समन्वयातून करण्यात आले आहे. प्रशिक्षण स्थळी सेविकांसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, विषयतज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन केले जात आहे.

जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास), जिल्हा परिषद ठाणे संजय बागुल यांनी सांगितले की, “पोषण भी पढ़ाई भी प्रशिक्षण सध्या ठाणे जिल्ह्यात यशस्वीपणे सुरू आहे. अंगणवाडी सेविकांना नवीन कौशल्ये व कार्यपद्धतींचे प्रशिक्षण देऊन त्यांना अधिक सक्षमी केले जात आहे. हा उपक्रम ग्रामीण भागातील बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.”

“पोषण भी पढ़ाई भी” प्रशिक्षण कार्यक्रमामुळे ठाणे जिल्ह्यातील बालविकास आणि शिक्षण क्षेत्रात नवीन उर्जा निर्माण झाली आहे. महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद ठाणे या माध्यमातून अंगणवाडी सेविकांचे सक्षमीकरण, गुणवत्तापूर्ण सेवा आणि बालकांच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.
000

ठाणे जिल्हा परिषद निवडणूक विभाग (गट) आरक्षण सोडत 2025 आज जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भ...
15/10/2025

ठाणे जिल्हा परिषद निवडणूक विभाग (गट) आरक्षण सोडत 2025 आज जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, तहसिलदार (सर्वसाधारण) सचिन चौधर, ठाणे जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.

CMOMaharashtra Maharashtra DGIPR Chief Electoral Officer Maharashtra Collector Thane Ddikonkan Konkanbhavan DEOThane

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक संपन्न“जिल्ह्यातील सर्व शाळा स्मार्ट शाळा करण्यासाठी १०० कोटींचा निधी ...
15/10/2025

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक संपन्न

“जिल्ह्यातील सर्व शाळा स्मार्ट शाळा करण्यासाठी १०० कोटींचा निधी आराखडा तयार करा” — खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंद

“स्मार्ट आरोग्य केंद्र निर्मितीसाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा” — खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे

दि. १५(जिल्हा परिषद, ठाणे)- जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे अध्यक्षतेखाली आज, दि. १५ ऑक्टोबर, २०२५ रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे बैठक संपन्न झाली.

जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने जिल्ह्याचा विकास करण्यासाठी दिशा समिती बैठक आयोजित करण्यात आली असून योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी ही बैठक महत्त्वाची आहे. केंद्र सरकारच्या अंतर्गत राबविणाऱ्या योजना विविध विभागांना दर्जेदार पायाभूत सुविधांची कामे सुनिश्चित करून आणि योजना त्यांच्या इच्छित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतील याची खात्री करण्याचे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

तसेच प्रधानमंत्री आवास योजना संदर्भात कामकाज करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी प्रशासनाने लोकप्रतिनिशीं चर्चा करणे आणि योग्य मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील रहावे, तसेच जिल्ह्यातील सर्व शाळा ‘स्मार्ट शाळा’ करण्यासाठी १०० कोटी निधी आराखडा तयार करून कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या. जिल्ह्यातील स्मार्ट आरोग्य केंद्र तयार करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा.

यावेळी इ-वेस्ट मॅनेजमेंट करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणेने पुढाकार घ्यावा. मलंगगड, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका तसेच इतर ठाणे जिल्हयातील इतर ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून कार्यवाही करावी, असे नमूद केले. शहापूर तालुक्यातील पाणी टंचाई निवारणासाठी ऍक्शन मोडवर कामकाज करण्यात यावे. स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत कामकाज करताना येणाऱ्या अडचणींवर सविस्तर चर्चा देखील करण्यात आली.

२७ गावातील जिल्हा परिषदेच्या १८ शाळा कल्याण डोंबिवली महापालिकेत समायोजन करण्यात आले असून जिल्हा परिषदेच्या या शाळांना स्मार्ट करण्यासाठी आयुक्त अभिनव गोयल यांनी विशेष पुढाकार घ्यावा, अशा सुचना यावेळी देण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या १ हजार ३२९ शाळा असुन प्रस्तावित करण्यात आलेल्या सर्व शाळा दुरुस्ती करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेत १२ टक्क्यांनी पटसंख्या वाढ झाली आहे. तसेच दिशा प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर उंचावले आहे. ५७ कोटी ७५ लाख निधी उपलब्ध होता आणि त्याअंतर्गत शाळा दुरुस्ती करण्यात आली असून नाविन्य पुर्ण योजनेचा निधी व जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेचा निधी देखील शाळा दुरुस्तीसाठी तसेच शाळा स्मार्ट तयार करण्यासाठी १०० कोटींचा निधी आराखडा तयार करण्यासाठी सुचना दिल्या.

जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्हा प्रशासनासंदर्भांतील कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी उद्देश समोर ठेवून कामकाज करण्याबाबत प्रास्तिविकात सांगितले.

यावेळी खासदार तथा सह अध्यक्ष दिशा समिती नरेश गणपत म्हस्के, खासदार तथा सह अध्यक्ष दिशा समिती बाळ्या मामा - सुरेश गोपीनाथ म्हात्रे, विधानसभा सदस्य डॉ. बालाजी किणीकर, विधानसभा सदस्य कुमार आयलानी, विधानसभा सदस्य राजेश मोरे, विधानसभा सदस्य सुलभा गणपत गायकवाड, आयुक्त नवीमुंबई महानगरपालिका डॉ.‌ कैलास शिंदे, आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका अभिनव गोयल, आयुक्त उल्हासनगर महानगरपालिका मनिषा आव्हाळे, पोलीस अधीक्षक ठाणे (ग्रामीण) डॉ. डी. एस. स्वामी, आयुक्त भिवंडी निजामपूर महानगरपालिका अनमोल सागर, अतिरिक्त आयुक्त ठाणे महानगरपालिका संदिप माळवी, पोलिस उपायुक्त ठाणे शहर श्रीकांत पाठक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे तसेच संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

या बैठकीत पंतप्रधान आवास योजना शहरी (PMAY-U), स्वच्छ भारत मिशन (SBM), स्मार्ट सिटी मिशन, अमृत योजना, सर्व शिक्षा अभियान (SSA), मिड-डे मील स्कीम, एकात्मिक ऊर्जा विकास योजना, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना, आदर्श ग्राम योजना, जल जीवन मिशन या अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणी आणि संचालनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

खासदार तथा सह अध्यक्ष दिशा समिती नरेश गणपत म्हस्के यांनी दिशा समिती मार्फत जलद गतीने कामकाज पुर्ण करण्यासाठी सुचना दिल्या आणि केंद्र शासनाच्या योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच पंतप्रधान आवास योजना शहरी भागात राबविण्यासाठी ठाणे महापालिकेने विशेष प्रयत्न करण्यात यावे, असे मार्गदर्शन केले.

ग्रामीण भागाच्या विकासासाठी दिशा समिती काम करत असते आणि यासाठी दिशा समितीमार्फत नियंत्रण असणे गरजेचे आहे. जल जीवन मिशन योजना, स्वच्छ भारत मिशन, शिक्षण विभागातील कामकाज वेगाने होण्यासाठी पाठपुरावा करून कामकाज सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन खासदार तथा सह अध्यक्ष दिशा समिती बाळ्या मामा- सुरेश गोपीनाथ म्हात्रे यांनी केले.
000

मनोज रानडे यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारलादि. १२ ऑक्टोबर (जिल्हा ...
12/10/2025

मनोज रानडे यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला

दि. १२ ऑक्टोबर (जिल्हा परिषद ठाणे) - जिल्हा परिषद ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे (भा.प्र.से) यांची बदली जिल्हाधिकारी, जळगाव या पदावर करण्यात आली असून, त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हा परिषद पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे (भा.प्र.से) यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

रोहन घुगे यांनी दि. ८ ऑक्टोबर, २०२५ रोजी मध्यान्होत्तर मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे या पदावरून कार्यमुक्त होताना मनोज रानडे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. मनोज रानडे यांनी दि. १० ऑक्टोबर, २०२५ रोजी दुपारनंतर जिल्हा परिषद ठाणे या पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे.

ठाणे जिल्हा परिषदेने रोहन घुगे यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या अनेक क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. आता या वाटचालीला अधिक वेग देत नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित प्रशासनाचा ध्यास कायम ठेवू,असे प्रतिपादन यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर व अतिरिक्त कार्यभार, जिल्हा परिषद ठाणे मनोज रानडे यांनी केले आहे.

रोहन घुगे यांच्या कार्यकाळातील कामगिरी
रोहन घुगे यांनी १९ जून २०२४ मध्ये जिल्हा परिषद ठाण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांच्या कार्यकाळात शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास आणि प्रशासन या क्षेत्रात ठाणे जिल्हा परिषदेत उल्लेखनीय बदल घडवून आणले. त्यांनी शासनाच्या “Door Step Delivery”, “दिशा उपक्रम”, ई-ऑफिस प्रणाली, ब्लॉक फॅसिलिटेशन कमिटी, ई-कामवाटप आणि AI आधारित प्रशासन या नाविन्यपूर्ण उपक्रमांद्वारे जिल्हा प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता, पारदर्शकता आणि गतिमानता आणण्यावर भर दिला. तसेच मुख्यमंत्री १०० दिवस कार्यक्रमांतर्गत ठाणे जिल्हा परिषदेने उत्तम कामगिरी करून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला, ही त्यांची मोठी कामगिरी ठरली.
000

स्वच्छ भारत मिशन व रोटरी क्लब हिल्स यांच्या संयुक्त विद्यमाने दापूर परिसरातील तीन जिल्हा परिषद शाळांमध्ये स्वच्छतागृहांच...
11/10/2025

स्वच्छ भारत मिशन व रोटरी क्लब हिल्स यांच्या संयुक्त विद्यमाने दापूर परिसरातील तीन जिल्हा परिषद शाळांमध्ये स्वच्छतागृहांचे लोकार्पण

दि. ११ (जिल्हा परिषद, ठाणे) - शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत अजनूप-दापूर परिसरातील विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतेचा आणि आरोग्यदायी शालेय वातावरणाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. आज, दि. ११ ऑक्टोबर, २०२५ रोजी रोटरी क्लब हिल्स, ठाणे आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), जिल्हा परिषद ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीन जिल्हा परिषद शाळांमधील नव्याने बांधण्यात आलेल्या शौचालय व स्वच्छतागृहांचे लोकार्पण सोहळे संपन्न झाले.

जिल्हा परिषद शाळा उठावा, जिल्हा परिषद शाळा बोंडारपाडा, जिल्हा परिषद शाळा मेंगाळपाडा या तीन शाळांमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वच्छ आणि सन्मानपूर्वक सुविधा उपलब्ध होणार आहेत. विशेषतः विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांची उपलब्धता ही स्वच्छ भारत मिशनच्या उद्दिष्टपूर्तीकडे महत्त्वाचे पाऊल ठरली आहे.

या लोकार्पण सोहळ्याला गटविकास अधिकारी बी. एच. राठोड, ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, तसेच रोटरी क्लब हिल्स ठाणेचे अध्यक्ष समिर लिमये व त्यांच्या सहकाऱ्यांची उपस्थिती होती.
रोटरी क्लबने सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून ग्रामीण भागातील शाळांमध्ये स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला असून, जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन विभागाच्या सहकार्याने हे प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.

या उपक्रमामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची सवय, आरोग्यविषयक जागरूकता आणि स्वच्छ वातावरणाबाबत जबाबदारीची भावना निर्माण होणार आहे. हा उपक्रम “स्वच्छ शाळा, आरोग्यदायी भविष्य” या संकल्पनेचा उत्कृष्ट नमुना ठरला आहे.
000

माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे (भा.प्र.से) यांचा ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने सन्मान सोहळा संपन्नदि.११ (जिल्हा प...
11/10/2025

माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे (भा.प्र.से) यांचा ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने सन्मान सोहळा संपन्न

दि.११ (जिल्हा परिषद, ठाणे) - ठाणे जिल्हा परिषदेतर्फे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे (भा.प्र.से) यांचा सन्मान सोहळा दि. १० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३:०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन, ठाणे येथे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ (भा.प्र.से) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

या प्रसंगी माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या पत्नी डॉ. मिहिका घुगे तसेच त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. ठाणे जिल्हा परिषद परिवार, विविध विभाग प्रमुख, अधिकारी-कर्मचारी, पत्रकार, सामाजिक संस्था आणि ग्रामविकास संघटनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांचा सन्मान केला.

मनोगत व्यक्त करताना मा. रोहन घुगे म्हणाले,“ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक आठवण ही माझ्यासाठी मोलाची आहे. माझ्या सहकाऱ्यांच्या समन्वयातून आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे अनेक लोकाभिमुख उपक्रम यशस्वीरीत्या राबवता आले. ठाण्यातील सामाजिक संस्था, संघटना आणि नागरिकांनी प्रशासनाला दिलेले सहकार्य अविस्मरणीय आहे. लोकाभिमुख काम करताना ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हेच माझ्या कामाचे खरे समाधान आहे.”

रोहन घुगे पुढे म्हणाले, “जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागाने नाविन्यपूर्ण कामकाजासाठी पुढाकार घेतला, त्यामुळेच ठाणे जिल्हा परिषद ‘१०० दिवस कृती कार्यक्रमांतर्गत राज्यात प्रथम’ आली. हा सर्वांचा संयुक्त यश आहे. ठाण्यातील पत्रकार बांधवांनी वेळोवेळी बातम्यांचा पाठपुरावा करून प्रशासनाचे काम जनतेपर्यंत पोहोचवले. ठाण्यातील आठवणी माझ्या मनात कायम राहतील.”

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, “रोहन घुगे यांनी ठाणे जिल्ह्यात कार्यरत असताना पारदर्शक, लोकाभिमुख आणि गतिमान प्रशासनाचे उत्कृष्ट उदाहरण साकारले. त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा प्रशासनाने राज्यात लौकिक मिळवला असून, त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीस शुभेच्छा!”

भिवंडी मतदारसंघ बाळ्या मामा म्हात्रे, यांनी सन्मान सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना सांगितले की, "मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून परिणामकारक प्रशासनाचे उत्कृष्ट उदाहरण निर्माण केले. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेचा प्रत्येक उपक्रम हा केवळ शासकीय न राहता लोकांच्या सहभागातून साकार झाला. हेच त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य आहे. ठाणे जिल्ह्याला डिजिटल आणि विकासाच्या दिशेने वेग दिला. त्यांच्या कार्याची छाप दीर्घकाळ ठाणेकरांच्या मनात कायम राहील."

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की,“मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यकाळात ठाणे जिल्हा परिषदेत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, लोकाभिमुख निर्णयप्रक्रिया आणि नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात आल्या. त्यांच्या नेतृत्वामुळे ठाणे जिल्हा परिषद राज्यात नावलौकिकास पात्र ठरली.”

या प्रसंगी शिवसेना अध्यक्ष प्रकाश पाटिल, अपर आयुक्त माणिकराव दिवे, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटिल, शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप माने, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, कार्यकारी अभियंता (बाधंकाम) पद्माकर लहाने, प्रकाश सासे, युवराज कदम, कृषी विकास अधिकारी एम. एम. बाचोटीकर, समाजकल्याण अधिकारी उज्वला सकपाळे, तसेच जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचारी, शिक्षक, पत्रकार आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरुडकर यांनी केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन डॉ. तरुलता धनके आणि प्राथमिक शिक्षक रविंद्र तरे यांनी केले.

ग्रामविकास अधिकारी संघटना, शिक्षक संघटना, सामाजिक संस्था व पत्रकार बांधवांनी रोहन घुगे यांच्या ठाण्यातील कार्यकाळातील आठवणींना उजाळा देत त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
000

आज जिल्हा नियोजन समिती सभागृह, ठाणे येथे अनुकंपा तत्त्वावरील व लोकसेवा आयोगामार्फत नियुक्ती झालेल्या लिपिक टंकलेखकांना न...
08/10/2025

आज जिल्हा नियोजन समिती सभागृह, ठाणे येथे अनुकंपा तत्त्वावरील व लोकसेवा आयोगामार्फत नियुक्ती झालेल्या लिपिक टंकलेखकांना नियुक्तपत्र देण्याचा ऐतिहासिक सोहळा संपन्न होत आहे.

याप्रसंगी आमदार संजय केळकर, आमदार सुलभा गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अपर आदिवासी विकास प्रकल्प आयुक्त गोपीचंद कदम, पोलीस अधीक्षक डॉ.डी.स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील, वैशाली माने, उद्योग सहसंचालक विजू शिरसाठ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, जिल्हा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क प्रवीण तांबे, तहसिलदार सचिन चौधर, संदीप थोरात, उमेश पाटील, सचिन शेजाळ, अभिजित खोले, अमित पुरी, विशेष कार्यकारी दंडाधिकारी मुकेश पाटील, सर्व नायब तहसीलदार, विविध शासकीय विभागांचे कार्यालयप्रमुख, नियुक्ती पात्र ठरलेले उमेदवार आणि पालक उपस्थित आहेत.

CMOMaharashtra Maharashtra DGIPR Sanjay Kelkar Collector Thane Ddikonkan Konkanbhavan

अहिंसा, सत्य, साधेपणाचे दैवत, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संघर्ष करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी त्यांच्या ज...
02/10/2025

अहिंसा, सत्य, साधेपणाचे दैवत, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संघर्ष करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

#गांधीजयंती #राष्ट्रपिता

जय जवान जय किसान या घोषणेद्वारे देशभक्तीची नवी ऊर्जा निर्माण करणारे, स्वातंत्र्य भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्...
02/10/2025

जय जवान जय किसान या घोषणेद्वारे देशभक्तीची नवी ऊर्जा निर्माण करणारे, स्वातंत्र्य भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीजी त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!!

त्यांच्या देशप्रेमातून, प्रामाणिकपणातून आणि साधेपणातून आपण सर्वांनी प्रेरणा घेऊया.

#लालबहादूरशास्त्री #जयजवानजयकिसान #जयंती

आज जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व जिल्हा उद...
30/09/2025

आज जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे व जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक सोनाली देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकांमध्ये ठाणे जिल्ह्याने एक ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टात योगदान देण्यावर भर दिला.
या बैठकांमध्ये औद्योगिक सुधारणांवर लक्ष केंद्रित करण्यात आले, ज्यामध्ये विभागीय आयुक्तांनी नियुक्त केलेल्या क्षेत्रांचा समावेश आहे.
या बैठकांमध्ये 'औद्योगिक समूह विकास योजना' (Industrial Cluster Development Scheme) या विषयावर चर्चा झाली.
विशेषतः, ज्या उद्योजकांनी रेडीमेड गारमेंट उद्योगात 'डीपीआर' (DPR - Detailed Project Report) मंजूर करून घेतला आहे, त्यांना आवश्यक असलेल्या इतर मदतीवर विचार करण्यात आला.
याव्यतिरिक्त, उद्योजकांसाठी 'झूम' (ZUM - ZILLA UDYOG MITRA COMMITTEE) समितीची बैठकही आयोजित करण्यात आली.
या बैठकांमध्ये 'जिल्हा निर्यात प्रोत्साहन परिषद' (DEPC - DISTRICT EXPORT PROMOTION COUNCIL) च्या बैठकीचा देखील समावेश होता, ज्याचा उद्देश जिल्ह्याची निर्यात वाढवणे, हा आहे.
CMOMaharashtra Maharashtra DGIPR Collector Thane Ddikonkan Konkanbhavan ZILLA PARISHAD THANE

जिल्हा परिषद ठाणेची अधिकृत वेबसाईट नागरिकांसाठी सुलभ व पारदर्शकदि. २९ सप्टेंबर २०२५ (जिल्हा परिषद ठाणे) – मा. मुख्यमंत्र...
29/09/2025

जिल्हा परिषद ठाणेची अधिकृत वेबसाईट नागरिकांसाठी सुलभ व पारदर्शक

दि. २९ सप्टेंबर २०२५ (जिल्हा परिषद ठाणे) – मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या १५० दिवस कार्यक्रमांमध्ये ठाणे जिल्हा परिषदेचे एक महत्त्वाचे पाऊल म्हणून जिल्हा परिषद ठाण्याची अधिकृत वेबसाईट https://zpthane.maharashtra.gov.in/ नागरिंकाना वापरण्यास सुलभ व पारदर्शक करण्यात आली आहे.

वेबसाईट मधील बदलामार्फत नागरिकांना जिल्हा परिषदेच्या विविध योजना, उपक्रम आणि सेवांबाबत सुलभ, पारदर्शक व अद्ययावत माहिती उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश असल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे यांनी सांगितले.

राष्ट्रीय माहितीशास्त्र केंद्र (NIC), इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या S3WaaS (Secure, Scalable आणि Sugamya Website as a Service) या सुरक्षित, विस्तारक्षम व सुगम्य तंत्रज्ञानावर ही वेबसाईट विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ ऑनलाईन पद्धतीने मिळणार असून माहिती सुलभतेने आणि पारदर्शकतेने पोहोचणार आहे.

या वेबसाईटवर उपलब्ध सुविधा :
• जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांची प्रशासकीय रचना व कार्याबाबत माहिती.
• शासकीय योजना, परिपत्रके व माहितीचा अधिकार अंतर्गत आवश्यक माहिती (कलम १ ते १७).
• भरतीसंदर्भातील जाहिराती व सेवा ज्येष्ठता यादी.
• पंचायत समित्यांची सविस्तर माहिती.
• नागरिकांसाठी आवश्यक संपर्क क्रमांक.
• ऑनलाईन तक्रार निवारणाची सुविधा.

भाषिणी एकत्रीकरण – माहिती आता २३ भारतीय भाषांमध्ये
जिल्हा परिषद ठाण्याच्या संकेतस्थळावर भारत सरकारच्या “भाषिणी – National Language Translation Mission” या उपक्रमाचे यशस्वीरीत्या एकत्रीकरण करण्यात आले आहे. यामुळे आता संकेतस्थळ २३ भारतीय भाषांमध्ये पाहता येते. नागरिकांना त्यांच्या मातृभाषेत माहिती मिळाल्यामुळे शासनाच्या योजना व उपक्रम अधिक प्रभावीपणे समजून घेता येतात.

Voice to Text आणि Text to Speech सुविधा – सर्वांसाठी सुगम्यता
संकेतस्थळावर Voice to Text ही आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे नागरिक इच्छित माहिती की-बोर्डवर टाईप करण्याऐवजी फक्त मायक्रोफोनद्वारे आवाजाच्या मदतीने शोधू शकतात. विशेषतः वयोवृद्ध आणि दिव्यांग नागरिकांसाठी ही सेवा उपयुक्त ठरत आहे.

तसेच Text to Speech सुविधेमुळे संकेतस्थळावरील मजकूर वाचण्याऐवजी थेट ऐकता येतो. दृष्टिहीन आणि वाचनात अडचण असलेल्या नागरिकांना या सुविधेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

जिल्हा परिषद ठाण्याच्या डिजिटलायझेशन व ई-गव्हर्नन्सच्या दिशेने हे एक महत्वाचे पाऊल ठरणार असून, नागरिक-केंद्रित प्रशासनासाठी ही वेबसाईट मोलाची ठरेल, असा विश्वासही फडतरे यांनी व्यक्त केला.
000

डॅशबोर्ड प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण!१५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद ठाणे यांच्या व्दारे विकसित डॅशबोर्ड स...
29/09/2025

डॅशबोर्ड प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण!

१५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद ठाणे यांच्या व्दारे विकसित डॅशबोर्ड संगणकीय प्रणाली संदर्भात आयोजित प्रशिक्षण कार्यक्रम आज, २९ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हा परिषद मुख्यालय, ठाणे येथे उत्साहात पूर्ण झाला.

सर्व खातेप्रमुख व डॅशबोर्डवर काम करणारे कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवत प्रणालीचे सखोल ज्ञान आत्मसात केले.

या प्रशिक्षणामुळे जिल्हा परिषदेचे कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि कार्यक्षम होणार आहे.

#जिल्हापरिषदठाणे

Address

Thane
400601

Alerts

Be the first to know and let us send you an email when ZILLA PARISHAD THANE posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to ZILLA PARISHAD THANE:

Share