30/07/2026
महाडीबीटी २.० पोर्टलवर अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया सुरू
अहिल्यानगर, दि. २८ :- शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता महाडीबीटी २.० या नवीन प्रणालीवर मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांचे ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून सर्व पात्र विद्यार्थी, पालक तसेच शैक्षणिक संस्थांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त प्रविण कोरगंटीवार यांनी केले आहे.
शिष्यवृत्तीच्या लाभाची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न (Aadhaar Seeded) बँक खात्यात जमा होणार असल्याने अर्जदारांनी अर्जामध्ये अचूक माहिती भरावी. सर्व विद्यार्थ्यांसाठी महाआयडी (Maha ID) नव्याने तयार करणे बंधनकारक असून जुन्या पोर्टलवरील युझर आयडी व पासवर्डची आवश्यकता राहिलेली नाही. विद्यार्थ्यांनी आधार क्रमांकाचा वापर करून नवीन महाआयडी तयार करावा. तसेच आधार पोर्टलवरील पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल व बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवावी. नवीन तसेच नूतनीकरण (Renewal) या दोन्ही प्रकारच्या अर्जांसाठी नवीन महाआयडीद्वारे आधार लॉगिन करणे आवश्यक असून नूतनीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लॉगिननंतर 'माझा अर्ज नूतनीकरण करावा' हा पर्याय निवडावा. अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र व शैक्षणिक गुणपत्रिका स्पष्ट स्वरूपात अपलोड कराव्यात.
भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत संबंधित महाविद्यालयांकडून शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी शिक्षण शुल्क आकारले जात नसल्याने केंद्राचा हिस्सा विद्यार्थ्यांच्या खात्यात प्राप्त झाल्यानंतर संबंधित शिक्षण शुल्काची रक्कम महाविद्यालयास अदा करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
महाविद्यालयांसाठी महाडीबीटी २.० प्रणालीवर केवळ प्राचार्य लॉगिन उपलब्ध राहणार असून लिपिक लॉगिन बंद करण्यात आले आहे. महाविद्यालयांनी मागील युझर आयडी व नवीन डीफॉल्ट पासवर्डद्वारे लॉगिन करून आपली प्रोफाइल तपासावी तसेच अभ्यासक्रमनिहाय शुल्करचना तात्काळ अद्ययावत करावी. पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित न ठेवता विहित मुदतीत मंजूर करून पुढे पाठविण्याची जबाबदारी संबंधित प्राचार्यांची राहणार आहे. अनुसूचित जातीच्या कोणत्याही पात्र विद्यार्थ्याकडून प्रवेशावेळी शिक्षण शुल्क अथवा परीक्षा शुल्क आकारू नये. तसेच महाविद्यालयाचे नाव, मान्यताप्राप्त अभ्यासक्रम, अभ्यासक्रमाचा कालावधी, प्रवेश क्षमता, मान्यतेचे आदेश व शुल्करचना यांची माहिती संबंधित शैक्षणिक यंत्रणेकडून पोर्टलवर मॅप करून घ्यावी. मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांसाठी पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन भरण्यासाठी शाळांच्या मुख्याध्यापकांनी संबंधित गट शिक्षण अधिकाऱ्यांशी समन्वय साधून आवश्यक सहकार्य करावे.
महाडीबीटी २.० पोर्टलद्वारे भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षण व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील पीपीपी योजनेअंतर्गत उपलब्ध जागांवर आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना राबविण्यात येत आहेत.
अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरील महाडीबीटी २.० पोर्टलचा वापर करावा. शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी नागरिकांसाठी लॉगिन किंवा 'महाआयडीशिवाय प्रवेश करा' या पर्यायाद्वारे आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करून लॉगिन करावे. त्यानंतर पात्र योजनांचा तपशील अद्ययावत करून संबंधित योजनेची निवड करावी. वैयक्तिक माहिती, चालू व मागील शैक्षणिक तपशील तसेच आवश्यक कागदपत्रे अद्ययावत करून अर्ज ऑनलाइन सादर करावा. अर्जाची प्रिंट अथवा पीडीएफ प्रत जतन करून ठेवावी. जात, प्रवर्ग, महाराष्ट्राचे रहिवासी, दिव्यांगत्व व कौटुंबिक उत्पन्न यांसह आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरावी.
अर्ज भरण्याबाबत अथवा महाडीबीटी २.० प्रणालीसंदर्भात कोणतीही अडचण आल्यास ०२२-४९१५०८०० किंवा १८००१०२५३११ या दूरध्वनी क्रमांकावर अथवा [email protected] या अधिकृत ई-मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त श्री. कोरगंटीवार यांनी केले आहे.