17/07/2026
लोकमान्य टिळक स्मारक परिसरातील अस्वच्छतेविरोधात वीर भगतसिंह फाउंडेशनचे नगर परिषदेला निवेदन
वर्धा
गोलबाजार भाजीमंडी परिसरातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मारकाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा, प्लास्टिक व घाण साचल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी वीर भगतसिंह फाउंडेशन, वर्धा यांच्या वतीने शुक्रवारी (दि. १७ जुलै) नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात स्मारक परिसरात नियमित स्वच्छता होत नसल्याने दुर्गंधी पसरत असून डास, माशा व इतर कीटकांची वाढ होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच परिसरात भटक्या जनावरांकडून प्लास्टिक व इतर घातक कचरा खाल्ला जात असल्याने त्यांच्या जीवितालाही धोका निर्माण होत असल्याची बाब मांडण्यात आली.
वीर भगतसिंह फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रणय रोडे म्हणाले,
“लोकमान्य टिळक यांसारख्या महान स्वातंत्र्यसैनिकाच्या स्मारक परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आमचे फाउंडेशन दररोज स्मारकाची स्वच्छता करत असून परिसरही शक्य तितका स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते. मात्र ही जबाबदारी नगरपरिषदेची आहे. नगरपरिषद प्रशासन यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते .यासाठी नगरपरिषद व नगराध्यक्ष नैतिकदृष्ट्या जबाबदार आहेत.”
फाउंडेशनने नगरपरिषदेला तातडीने संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्याची, नियमित कचरा उचलण्याची, कचरापेट्यांची व्यवस्था करण्याची आणि स्मारक परिसर कायमस्वरूपी स्वच्छ ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
वीर भगतसिंह फाउंडेशनने नागरिकांनाही आवाहन केले आहे की, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, स्वच्छता राखावी आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनीही आपली जबाबदारी पार पाडावी.
“स्वच्छ स्मारक – स्वच्छ शहर – निरोगी नागरिक” हा संदेश देत फाउंडेशनने प्रशासनाला त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रातील नगरपरिषदांची जबाबदारी स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनाची असल्याचे राज्याच्या नगर प्रशासनाच्या कार्यात नमूद आहे.
वीर भगतसिंह फाउंडेशनतर्फे स्मारकाची नियमित स्वच्छता केली जात असली तरी आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा साचत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो
फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रणय दीपक रोडे यांनी नगर परिषद प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अन्यथा लोकसहभागातून पुढील आंदोलनाचा विचार करण्यात येईल, असा इशाराही दिला.
शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सातत्याने स्वच्छता मोहिमा राबविल्या जात असल्याने सार्वजनिक ठिकाणे आणि ऐतिहासिक स्मारकांची स्वच्छता राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.या वेडी प्रणय रोडे सचिव श्रेया ठाकरे हिमांशु झिले गणेश धुर्वे क्रिश कदम मनीष गुरनूले कृष्णा नांदुरकर उपस्थित होते