जिल्हा माहिती कार्यालय यवतमाळ

  • Home
  • India
  • Yavatmal
  • जिल्हा माहिती कार्यालय यवतमाळ

जिल्हा माहिती कार्यालय यवतमाळ Official Page of District Information Office (DIO), Yavatmal l Directorate General Of Information and Public Relations (DGIPR), Mantralaya, Mumbai

27/08/2026

📍यवतमाळ l 7 सप्टेंबर रोजी लोकशाही दिन

जनतेच्या तक्रारी व समस्या सोडविण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येते. त्यानुसार सप्टेंबर महिन्याचा जिल्हा लोकशाही दिन दि. 7 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता बचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.

जिल्हा लोकशाही दिनामध्ये न्याय प्रविष्ट प्रकरणे, राजस्व अपिल प्रकरणे, सेवा, आस्थापना विषयक बाबी, विहीत नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे असे पत्र स्वीकारण्यात येणार नाही. वैयक्तिक स्वरुपाची तक्रार, निवेदन सादर करुन नये.
महिन्यातील तिसऱ्या सोमवारी तालुका स्तरावर लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये अर्जाचे निराकरण न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज सादर करावा. तसेच अर्ज दाखल करतेवेळी तालुका स्तरीय लोकशाही दिनात अर्ज दाखल केल्याची पोच जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये सादर करावी. याशिवाय संबंधित अर्ज स्विकारले जाणार नाही, यांची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुध्द बक्षी यांनी केले आहे

27/08/2026

📍यवतमाळ l गाव ते जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’;
रुग्णालयनिहाय सेवा निश्चित
>आरोग्य विभागाचा महत्वपूर्ण निर्णय

सार्वजनिक आरोग्य सेवेत पारदर्शक, विश्वासार्हता वाढणार -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या रुग्णालयांमध्ये नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने रुग्णालयनिहाय आरोग्यसेवांचे सर्वसमावेशक मानक निश्चित केले आहेत. ग्रामीण रुग्णालयापासून ३०, ५०, १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयापर्यंत कोणत्या स्तरावर कोणते तज्ज्ञ डॉक्टर, सुश्रुषा सेवा, कुशल मनुष्यबळ, प्रयोगशाळा व रेडिओलॉजी सेवा, औषधे आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध असाव्यात, याची स्पष्टता शासन निर्णयातून करण्यात आली आहे.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील सेवा अधिक सुसूत्र होण्याबरोबरच नागरिकांना कोणत्या रुग्णालयात कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, याची माहिती सहज मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे शासकीय आरोग्यसेवेतील पारदर्शकता आणि नागरिकांचा विश्वास वाढण्यास हातभार लागणार आहे.

रुग्णालयाच्या क्षमतेनुसार सेवांचे स्पष्ट मानक

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध स्तरावरील रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधांची विविध मानके एकत्रित करुन रुग्णालयनिहाय सेवा निश्चित करण्यात आल्या आहेत. रुग्णालयाची खाट क्षमता आणि सेवा स्तर यानुसार तज्ज्ञ वैद्यकीय सेवा, नर्सिंग, अलाइड हेल्थ व पॅरामेडिकल मनुष्यबळ, प्रयोगशाळा सेवा तसेच इतर रुग्णसेवांचे निकष स्पष्ट करण्यात आले आहेत.

फिजिशियन, सर्जन, स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ,

अस्थिव्यंग तज्ज्ञ, नेत्र शल्यचिकित्सक, भूलतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, दंतशल्यचिकित्सक आदी तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता रुग्णालयाच्या स्तरानुसार निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे शक्य तितक्या उपचारांसाठी रुग्णांना दूरच्या शहरांकडे जाण्याची गरज कमी होण्यास मदत होणार आहे.

३०८ प्रकारच्या निदानात्मक चाचण्यांची स्पष्टता

निदानात्मक सेवांबाबतही शासन निर्णयात स्पष्ट मानके निश्चित करण्यात आली आहेत. ग्रामीण रुग्णालयांमध्ये ७६ व १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये ११० आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये १२२ प्रकारच्या निदानात्मक चाचण्यांची उपलब्धता निश्चित करण्यात आली आहे. अशा प्रकारे या तीन स्तरांवर मिळून ३०८ प्रकारच्या निदानात्मक चाचण्यांबाबत स्पष्टता करण्यात आली आहे.

यामध्ये रक्तातील साखर, हिमोग्लोबिन, विविध रक्त तपासण्या, यकृत व मूत्रपिंड कार्याच्या तपासण्या, लिपिड प्रोफाइल, एचबीए वन सी , थायरॉईड, पॅप स्मिअर, काही कर्करोग विषयक तपासण्या तसेच विविध संसर्गजन्य आजारांच्या तपासण्यांचा समावेश आहे.

एक्स-रेपासून एमआरआयपर्यंत रेडिओलॉजी सेवा

रुग्णालयाच्या स्तरानुसार एक्स-रे आणि सोनोग्राफीसारख्या रेडिओलॉजी सुविधा उपलब्ध असणे अपेक्षित करण्यात आले आहे. १०० खाटांपेक्षा अधिक क्षमतेच्या रुग्णालयांमध्ये सीटी स्कॅनची सुविधा, तर जिल्हा रुग्णालय स्तरावर एमआरआय सुविधेचे निकष निश्चित करण्यात आले आहेत.

कुशल मनुष्यबळावर विशेष भर

आरोग्यसेवेची गुणवत्ता केवळ डॉक्टरांच्या उपलब्धतेवर अवलंबून नसून प्रशिक्षित नर्सिग आणि पॅरामेडिकल मनुष्यबळही तितकेच महत्त्वाचे असल्याने त्यांचेही रुग्णालयनिहाय निकष निश्चित करण्यात आले आहेत.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, ईसीजी तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, रक्तपेढीतील मनुष्यबळ, आहारतज्ज्ञ, भौतिकोपचार तज्ज्ञ, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते आणि मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्ते अशा विविध अलाइड हेल्थ व पॅरामेडिकल मनुष्यबळाची उपलब्ध स्पष्ट करण्यात आली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियाच्या माध्यमातूनही सार्वजनिक आरोग्य संस्थांसाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये १११ सुपर स्पेशालिस्ट, १ हजार ५१९ स्पेशालिस्ट, २ हजार ९१९ वैद्यकीय अधिकारी, ३ हजार ५ आयुष वैद्यकीय अधिकारी आणि ११ हजार ५७१ स्टाफ नर्स यांसह विविध संवर्गांचा समावेश आहे.

अत्यावश्यक औषधांची उपलब्धता निश्चित

रुग्णालयांमध्ये उपचारासाठी आवश्यक औषधे उपलब्ध राहावीत, यासाठी रुग्णालयाच्या स्तरानुसार अत्यावश्यक औषधांची यादी आणि आवश्यक औषधसाठ्याबाबतचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे औषधांची उपलब्धता अधिक नियोजनबद्ध पद्धतीने सुनिश्चित करण्यास मदत होणार आहे.
रक्तपेढी, डायलिसिसपासून माता-बाल आरोग्य सेवांपर्यंत सुविधा

या मार्गदर्शक सूचनांमध्ये केवळ डॉक्टर, तपासण्या आणि औषधांपुरतेच मर्यादित न राहता विविध पूरक आरोग्यसेवांचाही समावेश करण्यात आला आहे. रक्तपेढी व रक्त संक्रमण केंद्र, आयुष सेवा, डायलिसिस सुविधा, लसीकरण कक्ष, माता-बाल आरोग्य सेवा, प्रसूती कक्ष आदी सुविधांबाबतही रुग्णालयाच्या स्तरानुसार स्पष्टता करण्यात आली आहे.

याशिवाय रुग्णवाहिका, दिव्यांग प्रमाणपत्र, वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र, डिस्चार्ज प्रमाणपत्र,जन्म-मृत्यू नोंदणी, जननी सुरक्षा योजनेचा लाभ, आहार सुविधा आणि तक्रार निवारण व्यवस्था यांसारख्या रुग्णाभिमुख सेवांनाही महत्त्व देण्यात आले आहे.

मानकांनुसार आरोग्यसेवा हा केंद्रबिंदू

गावातील ग्रामीण रुग्णालयापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत उपलब्ध होणाऱ्या आरोग्यसेवांचे स्पष्ट मानक निश्चित झाल्यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत अधिक क सुसूत्रता आणि उत्तरदायित्व निर्माण होण्यास मदत होणार आहे. प्रत्येक रुग्णालयात उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाचा आणि पायाभूत सुविधांचा प्रभावी वापर करून नागरिकांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यावर भर देण्यात आला आहे.

“नागरिकाला कोणत्या रुग्णालयात कोणती सेवा मिळणार, कोणते तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असतील, कोणत्या तपासण्या होतील आणि कोणत्या सुविधा उपलब्ध असतील, याची स्पष्ट माहिती असणे आवश्यक आहे. या निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्य सेवेत पारदर्शकता वाढून नागरिकांचा शासकीय आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होईल,” असा विश्वास आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला.

गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत 'मानकांनुसार आरोग्यसेवा' उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हा निर्णय महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असून, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यास त्याचा मोठा फायदा होणार आहे.

27/08/2026

📍यवतमाळ l बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

मुंबई उच्च न्यायालयातील महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सामाईक न्यूनतम कार्यक्रमांतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि राणी लक्ष्मीबाई विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायदा, २०१२ या विषयावर कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आनंद एल. यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, यवतमाळ दीपक एच. दाभाडे यांच्या पुढाकाराने २४ ऑगस्ट रोजी राणी लक्ष्मीबाई विद्यालयात हा शिबिर घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रसाद कुलकर्णी होते. प्रमुख वक्ते म्हणून सहायक लोकअभिरक्षक तृप्ती आसवा आणि जिल्हा ग्रामिण समस्या मुक्ती ट्रस्ट, यवतमाळच्या जिल्हा समुपदेशक माधुरी कोटेवार उपस्थित होत्या.

यावेळी प्रमुख वक्त्या तृप्ती आसवा यांनी मुला-मुलींसोबत होणारे अत्याचार, त्यासंदर्भातील विविध कायदे, तक्रार करण्यासाठी उपलब्ध दूरध्वनी क्रमांक तसेच पीडित मुलींचे योग्य पद्धतीने समुपदेशन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन केले. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, २०१२ तसेच विधी सेवा प्राधिकरण कायदा, १९८७ याबाबतही त्यांनी माहिती दिली.

कार्यक्रमाच्या वक्त्या माधुरी कोटेवार यांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, २०१२ याबाबत सविस्तर मार्गदर्शन करताना मुलींना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यातील फरक कसा ओळखावा याची माहिती दिली. तसेच असा प्रकार घडत असल्यास विद्यार्थीनींनी तो लपवून न ठेवता तातडीने आपल्या शिक्षक, आई-वडील किंवा विश्वासातील व्यक्तीच्या निदर्शनास आणून देण्याचा सल्ला त्यांनी दिला.

लहान मुलांचे अधिकार, अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी उपलब्ध मदत तसेच प्रत्येक मुल कसे सुरक्षित राहील याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया माध्यमांद्वारे मुलींना वेगवेगळ्या पद्धतीने कसे फसविले जाते याचे उदाहरणे देत त्यांनी विद्यार्थिनींना सावधगिरी बाळगण्याबाबत व अनुचित प्रकाराबाबत शिक्षक, पालकांना निदर्शनास आणून देण्याचे आवाहन केले. या ग्रामीण भागांतून येणाऱ्या मुली बसमधून येतांना त्यांना मुले किंवा माणसे धक्का मारतात तर त्याबाबत आपण संबंधीत व्यक्तीला निर्देशानास आणून देणे किती गरजेचे आहे याबाबत माहिती दिली. आई-वडीलांनी सुध्दा आपल्या मुला-मुलींकडे लक्ष देणे किती महत्वाचे आहे याविषयी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सविता कडु यांनी केले, तर शिक्षक कौस्तुभ पाटवाजे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास राणी लक्ष्मीबाई विद्यालयातील विद्यार्थीनी तसेच शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

📍यवतमाळ l  खैरगाव येथे शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची ३० वी सभा उत्साहातप्रगतशील शेतकऱ्यांच्या अनुभवांची देवाणघेवाण ; एकात्मिक...
27/08/2026

📍यवतमाळ l खैरगाव येथे शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची ३० वी सभा उत्साहात
प्रगतशील शेतकऱ्यांच्या अनुभवांची देवाणघेवाण ; एकात्मिक शेती पद्धतीची प्रत्यक्ष पाहणी

कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची ३० वी सभा पांढरकवडा तालुक्यातील खैरगाव येथे प्रगतशील शेतकरी कृष्णाभाऊ देशेट्टीवार यांच्या शेतावर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

या सभेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, उपविभागीय कृषी अधिकारी सी.जे.निंघोट, मंचाचे अध्यक्ष जगदीश चव्हाण, उपाध्यक्ष बाबासाहेब कपिले यांच्यासह मंचाचे १५ सदस्य उपस्थित होते. यावेळी नुकताच उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कृष्णा देशेट्टीवार तसेच वसंतराव नाईक प्रतिष्ठान पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अशोक वानखेडे यांचा शेतकरी शास्त्रज्ञ मंचातर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे महत्त्व अधोरेखित केले. “शेतकरी शास्त्रज्ञ मंच ही यवतमाळ जिल्ह्याच्या शेतीची ओळख आहे,” असे प्रतिपादन त्यांनी केले. मंचाच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी एकत्र येत असून, त्यांच्या अनुभवांचा आणि सूचनांचा जिल्ह्याच्या कृषी विकासासाठी निश्चितच मोठा फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकरी शास्त्रज्ञ मंचाच्या सदस्यांकडून प्राप्त होणाऱ्या सूचना कृषी विभागामार्फत सकारात्मकतेने विचारात घेण्यात येतील. तसेच जिल्ह्यातील शेतीच्या विकासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्‍यांनी दिली.

याप्रसंगी से-ट्री संस्थेचे आबा लाड यांनी संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या फळबाग वाढीच्या उपक्रमाची माहिती दिली. जिल्ह्यात फळबागांचे क्षेत्र वाढविण्यासाठी शेतकरी, कृषी विभाग आणि संबंधित संस्थांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात फळबाग क्षेत्र वाढविण्याच्या या उपक्रमास सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

पुरस्कारप्राप्त अशोक वानखेडे आणि श्री बेंडे यांनी शेतकरी शास्त्रज्ञ मंचाच्या आगामी कार्याची दिशा, शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि कृषी विकासामध्ये मंचाची भूमिकाबाबत मनोगत व्यक्त केले.

या सभेनंतर प्रगतशील शेतकरी कृष्णा देशेट्टीवार यांच्या शंभर एकर प्रक्षेत्राची पाहणी करण्यात आली. त्यांच्या शेतावरील एकात्मिक शेती पद्धतीची प्रत्यक्ष पाहणी करुन विविध पिकांची लागवड, पीक व्यवस्थापन, उत्पादन तंत्रज्ञान तसेच शेतीशी संबंधित विविध उपक्रमांची माहिती शेतकऱ्यांनी घेतली. तसेच प्रक्षेत्र भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी एकमेकांच्या अनुभवांची देवाणघेवाण केली.
या कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. दिपक कच्छवे, राहुल चव्हाण, डॉ. प्रमोद मगर, डॉ. नरेंद्र देशमुख, पांढरकवडा खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष जितेंद्रसिंह कोंगारेकर, तालुका कृषी अधिकारी पांढरकवडा बळवंतकर, तालुका कृषी अधिकारी झरी-जामणी दासरवार, इफको फर्टिलायझरचे संतोष फलटणकर तसेच परिसरातील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकरी, कृषी विभाग, कृषी शास्त्रज्ञ आणि विविध संस्थांमध्ये समन्वय साधून जिल्ह्याच्या कृषी विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने ही सभा महत्त्वपूर्ण ठरली.

27/08/2026

📍यवतमाळ l स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांना अर्ज नुतनीकरणाची संधी

>१५ सप्टेंबरपर्यंत मुदत

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्जाचे नुतनीकरण करण्यासाठी संधी दकेण्यात आली असून त्यासाठी संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. हे संकेतस्थळ सन २०२५-२६ मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी नुतनीकरण अर्ज भरलेले होते व सदर अर्ज समाज कल्याण विभागाकडून मंजूर झाले आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आले आहे.

समाज कल्याण विभागाकडून अर्ज नुतनीकरणासाठी महत्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये अर्जाचे नुतनीकरण करण्यासाठी http://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर १५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत संबंधित विद्यार्थ्यांनी आपला अर्ज नुतनीकरण करणे आवश्यक आहे.

अर्ज नुतनीकरण करताना विद्यार्थ्यांना कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास त्यांनी अंतिम मुदतीपूर्वी, म्हणजेच १५ सप्टेंबरपूर्वी, संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. अंतिम मुदतीनंतर विद्यार्थ्यांच्या अर्जामध्ये कोणताही बदल करता येणार नसल्याने विद्यार्थ्यांनी याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

विहित मुदतीत विद्यार्थ्यांनी अर्जाचे नुतनीकरण केले नाही, तर संबंधित विद्यार्थी स्वाधार योजनेच्या लाभासाठी इच्छुक नाही, असे गृहीत धरुन त्यांचा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. तसेच अंतिम मुदतीनंतर अर्ज नुतनीकरणासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसल्याने विद्यार्थ्यांनी http://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर लॉगीन करुन १५ सप्टेंबर २०२६ पूर्वी आपला अर्ज ऑनलाइनरित्या भरावे, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त मंगला मुन यांनी केले आहे.

27/08/2026

📍यवतमाळ l अग्निप्रतिबंधक उपाययोजना तात्काळ पूर्ण करा
शासकीय, खाजगी आस्थापनांना जिल्हा प्रशासनाचे निर्देश

जिल्ह्यात आग लागण्याच्या घटनांमध्ये जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ आणि प्रभावी प्रतिसाद सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग, रुग्णालये, दुकाने, मॉल, औद्यागिक संस्था व खासगी आस्थापनांना आवश्यक अग्निप्रतिबंधक उपाययोजना तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक व जीवसंरक्षण उपाययोजना अधिनियम, २००६, त्याअंतर्गत नियम २००९ तसेच २०२३ मधील सुधारित तरतुदींनुसार शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, खाजगी कोचिंग संस्था, वसतिगृहे, प्रशिक्षण केंद्रे, रुग्णालये, व्यापारी संकुले, मॉल, दुकाने, औद्योगिक आस्थापने आणि इतर सार्वजनिक वापराच्या इमारतींमध्ये आवश्यक अग्निसुरक्षा उपाययोजना राबविणे बंधनकारक असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सर्व संबंधित आस्थापनांनी त्यांच्यास इमारतीच्या स्वरूप व जोखीमी च्या प्रमाणानुसार आवश्यक क्षमतकची व मान्यताप्राप्त अग्निशामक यंत्रे, अग्निशमन उपकरणे व इतर अग्निसुरक्षा साधने उपलब्ध करून ती कायम कार्यरत स्थितीत ठेवावीत. तसेच अग्निशामक यंत्रांची नियमानुसार तपासणी, रिफिलिंग व सर्व्हिसिंग करून त्याची अद्ययावत नोंद ठेवावी. अग्निसुरक्षा यंत्रणा कोणत्याहीवेळी वापरण्यास सक्षम राहील याची खात्री संस्थेच्या प्रमुखांनी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

याशिवाय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि संबंधित व्यक्तींना अग्निशामक यंत्रांचा वापर, आपत्कालीन परिस्थितीतील प्रथम प्रतिसाद, सुरक्षित स्थलांतर व आपत्ती व्यवस्थापनाचे नियमित प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात यावे. इमारतींमध्ये आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग, दिशादर्शक फलक, आपत्कालीन संपर्क क्रमांक, अग्निसुरक्षा सूचना आणि इमारतीचा स्थलांतर आराखडा दर्शनी व सहज दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित करावे. विशेषतः शाळा, महाविद्यालये, कोचिंग संस्था आणि वसतिगृहांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी नियमित अग्निसुरक्षा मॉक ड्रिल आयोजित करून त्याची नोंद ठेवावी. तसेच अग्निसुरक्षा आराखडा व आपत्कालीन प्रतिसाद योजना व अग्निसुरक्षा उपाययोजनांची वेळोवेळी पडताळणी करावी, असे निर्देशही जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक व जीवसंरक्षण उपाययोजना अधिनियमातील तरतुदीनुसार आवश्यक त्या ठिकाणी अग्निसुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करणे आणि त्याचे वेळेवर नूतनीकरण करणे संबंधित आस्थापनांची जबाबदारी असून, अधिनियमातील तरतुदींचे पालन न केल्यास संबंधित कायद्यांनुसार दंडात्मक व अन्य कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

जिल्हा प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि स्थानिक अग्निशमन विभागामार्फत वेळोवेळी अग्निसुरक्षा तपासणी करण्यात येणार असल्याने सर्व संबंधित आस्थापनांनी अग्निसुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आवश्यक उपाययोजना तात्काळ पूर्ण कराव्यात व त्या सातत्याने कार्यान्वित ठेवाव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी केले आहे.

27/08/2026

📍यवतमाळ l ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेतील
कला प्रकाराबाबत आक्षेप, पुरावे दाखल करण्याचे आवाहन

> ५ सप्टेंबरपर्यंत मुदत

सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णय नुसार राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेतील मागील चार वर्षातील अर्ज सादर केलेल्या साहित्यिक व कलावंतांना आपल्या कला प्रकाराबाबत काही आक्षेप असल्यास ते सबळ पुराव्यांसह सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या काही साहित्यिक व कलावंतांनी त्यांच्या कलेचा प्रकार ३० टक्के साहित्यिक व प्रयोगात्मक कलाप्रकार किंवा ६० टक्के संघटित, असंघटित पारंपरिक लोककला या प्रवर्गात येत असतानाही त्यांची नावे १० टक्के भक्ती संप्रदाय कला प्रकारात समाविष्ट झाल्याबाबत तक्रारी जिल्हाधिकारी तथा राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेचे अध्यक्ष यांच्याकडे येत आहेत.

या पार्श्वभूमीवर संबंधित साहित्यिक व कलावंतांना आपल्या कला प्रकाराबाबत आक्षेप असल्यास त्यासंदर्भातील सबळ पुरावे दि. ५ सप्टेंबरपर्यंत संबंधित पंचायत समिती किंवा पंचायत विभाग, जिल्हा परिषद, यवतमाळ येथे सादर करावेत.

दि. ५ सप्टेंबरनंतर प्राप्त होणारे आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पं) तथा जिल्हा समितीचे सदस्य सचिव यांनी केले आहे.

📍यवतमाळ l शासनमान्य ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी २५ लाखांपर्यंत अर्थसहाय्य> राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच...
27/08/2026

📍यवतमाळ l शासनमान्य ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी २५ लाखांपर्यंत अर्थसहाय्य
> राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या विविध अर्थसहाय्य योजना ;
> ३१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव पाठविण्यास मुदतवाढ

भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता यांच्या समान व असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध अर्थसहाय्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी ३१ ऑगस्टपर्यंत प्रस्ताव जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास पाठविण्याचे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे प्र.संचालक अमोल गाडेकर यांनी केले आहे.

या योजनांसाठी आवश्यक असलेले नियम, अटी व अर्जाचा नमुना www.rrrlf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, इच्छुक ग्रंथालयांनी तेथून अर्ज डाउनलोड करून प्रस्ताव तयार करावेत.

समान निधी योजनेंतर्गत इमारत बांधकाम व विस्तारासाठी कमाल २५ लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाणार आहे. या योजनेव्यतिरिक्त इतर समान निधी योजनांचा लाभ केंद्रीय स्तरावर दिला जात असल्याने त्या योजनांसाठी राज्यस्तरावर प्रस्ताव सादर करू नयेत, असेही संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

असमान निधी योजनांमध्ये ग्रंथालय सेवा देणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधनसामग्री, फर्निचर तसेच इमारत बांधकाम व विस्तारासाठी अर्थसहाय्य दिले जाते. त्याअंतर्गत फर्निचर खरेदीसाठी ४ लाख तर इमारत बांधकामासाठी १० ते १५ लाख रुपये अर्थसहाय्य दिले जाते. 'ज्ञान कोपरा' विकसित करण्यासाठी २.५० लाख व विशेष सहाय्य आधुनिकीकरणासाठी २ लाख रुपये अर्थसहाय्य दिले जाते. महोत्सवी वर्ष जसे ५०, ६०, ७५, १००, १२५ व १५० वर्ष साजरे करण्यासाठी ६.२० लाख व इमारत विस्तारासाठी १० लाख रुपये अर्थसहाय्य दिले जाते. राष्ट्रस्तरीय चर्चासत्र, कार्यशाळा, प्रशिक्षण वर्ग व जागरुकत कार्यक्रमांच्या आयोजनासाठी १.५० ते ३ लाख रुपये तसेच 'बालकोपरा' स्थापन करण्यासाठी ६.८० लाख रुपये अर्थसहाय्य देण्याच्या योजना राबविण्यात येत आहेत.

या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी किंवा हिंदी भाषेत चार प्रतींमध्ये संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत सादर करावा. तसेच तोच प्रस्ताव प्रतिष्ठानच्या ऑनलाइन प्रणालीद्वारेही सादर करणे आवश्यक आहे.

योजनांबाबत अधिक माहितीसाठी www.rrrlf.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच आवश्यकता असल्यास संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक मा. गाडेकर यांनी केले आहे.

Pictorial Bibliography Graphic Novel : A Day at the Museum Directory of Indian Museums Handbook on Conservation Museum Cards Pocket Map of Kartavya Path

📍यवतमाळ l वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात ‘स्वच्छता पंधरवडा’ उत्साहातमेरा युवा भारत, यवतमाळच्या वतीने वसंत...
27/08/2026

📍यवतमाळ l वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात ‘स्वच्छता पंधरवडा’ उत्साहात

मेरा युवा भारत, यवतमाळच्या वतीने वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात ९ ते १७ ऑगस्टदरम्यान ‘स्वच्छता पंधरवडा’ उपक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कालावधीत महाविद्यालय परिसर, वर्गखोल्या तसेच बाह्य परिसराची स्वच्छता करुन विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली.
मेरा युवा भारतचे जिल्हा युवा अधिकारी सूरज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन मेरा युवा भारतचे कार्यक्रम अधिकारी अनिल ढेंगे यांनी केले. उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रवी शेळके आणि विवेक राठोड यांनी विशेष सहकार्य केले.
स्वच्छता पंधरवड्या दरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान करुन संपूर्ण परिसर स्वच्छ केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल महाविद्यालयाचे सहयोगी अधिठाता सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजना युनिट चे यांचे विशेष आभार मानण्यात आले. या मोहिमेत महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन स्वच्छतेची शपथ घेतली. या प्रसंगी स्वच्छता अभियान जनजागृती करीता रॅली काढण्यात आली. त्यात युवकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेवून जनजागृती केली.

मृद व जलसंधारण रील स्पर्धा : 5 दिवस बाकी
27/08/2026

मृद व जलसंधारण रील स्पर्धा : 5 दिवस बाकी

माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा! 💧
मृद व जलसंधारण रील स्पर्धेत सहभागी व्हा आणि आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनेतून जल व मृदा संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवा.
अंतिम तारीख : ३१ ऑगस्ट २०२६

Address

तहसिल कार्यालयाजवळ, दगडी इमारत, नागपूर रोड
Yavatmal
445201

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when जिल्हा माहिती कार्यालय यवतमाळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share